वाडा येथील शाळेसाठी सरसावले इस्रायली विद्यार्थी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Sep-2018
Total Views |



 

 

वाडा : इस्रायलच्या मॅनेजमेंट कॉलेजमधील ४० विद्यार्थी आणि एल आल या इस्रायली विमान कंपनीचे कर्मचारी गेले १७-२९ ऑगस्ट असे दोन आठवडे वाड्यामध्ये राहून जिल्हा परिषदेच्या शाळेच्या नूतनीकरणात आणि विद्यार्थ्यांना शिकवण्यात रमले होते. या विद्यार्थ्यांनी इस्रायलमध्ये देणग्या गोळा करून वाड्यातील मुलांसाठी दोन टन सामान गोळा केले होते. त्यात शैक्षणिक साहित्य, पुस्तकं, कपडे आणि खेळण्यांचा समावेश होता. दोन आठवड्याच्या आपल्या वास्तव्यात इस्रायली विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेच्या इमारतीची रंगरंगोटी केली असून शाळेसमोरच्या अंगणात मुलांसाठी वेगवेगळ्या शैक्षणिक खेळांची निर्मिती केली आहे. याशिवाय मुलांना इंग्रजी, गणित, आरोग्य आणि पर्यावरण या विषयांचे धडे देण्यात आले.
 

गेल्या वर्षी भारत-इस्रायल संबंधांना २५ वर्ष पूर्ण झाली. गेल्या वर्षभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्रायलला त बेंजामिन नेतान्याहू यांनी भारताला भेट दिली होती. भारत-इस्रायल या दोन्ही देशांमध्ये शेती, पाणी, सायबर सुरक्षा, स्मार्ट शहरे तसेच शिक्षण शा अनेक क्षेत्रात सहकार्य वाढत आहे. याबरोबर दोन्ही देशातील नागरिकांमधील आणि एकमेकांच्या संस्थामधील सांस्कृतिक बंध अधिकाधिक मजबूत होत आहेत. इस्रायली तरुण-तरुणी सक्तीच्या लष्करी सेवेनंतर जगभर प्रवास करतात. त्यातील सुमारे ४०,००० भारताला भेट देतात. त्यांनी काही दिवस आपण भेट देत असलेल्या देशांमध्ये सामाजिक कामात सहभाग घेतला, तर त्याचा इस्रायलच्या परराष्ट्र संबंधांना फायदा होऊ शकेल, या हेतुने ८ वर्षांपूर्वी या प्रकल्पाची सुरुवात झाली होती. यापूर्वी केनिया, फिलिपाईन्स, युगांडा या देशात इस्रायली मुलांनी काम केले आहे. भारतात येण्याची त्यांची ही दुसरी खेप होती.

 
 

 

इस्रायलच्या विद्यार्थ्यांपैकी प्रत्येकाने वाड्याला येण्यासाठी स्वतःच्या खिशातून सुमारे लाखभर रुपये खर्च केले. या कार्यक्रमासाठी इस्त्रायलमधून शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी आपली नावं नोंदवली होती. पण नियोजनाच्या दृष्टीने केवळ ४० विद्यार्थ्याना भारतात या कार्यासाठी प्रवेश देण्यात आला. या उपक्रमाची तयारी गेले १० महिने चालू होती. मॅनेजमेंट कॉलेजचे प्रतिनिधी लिओर टुइल आणि अलोन मिझराखी यांनी एप्रिल २०१८ मध्ये वाड्याला भेट दिली होती. मुलांची पार्श्वभूमी आणि शैक्षणिक गरजा त्यांनी समजावून घेतल्या. गेले ३ महिने इस्रायली विद्यार्थी वाडा येथील मुलांना काय आणि कसे शिकवायचे याची तयारी करत होते. या प्रयत्नांची दखल घेत इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने त्यांच्यासाठी सुमारे १० लाख रुपयांचा निधी उपलब्ध केला.
 

त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी इस्रायलचे मुंबईतील महावाणिज्य दूत याकोव फिंकलश्टाईन यांनी, दूतावासातील काँसुल गलीत लारोश फलाह आणि राजकीय संबंध आणि विशेष प्रकल्प अधिकारी अनय जोगळेकर यांच्यासह वाड्याला भेट दिली. या निमित्ताने केलेल्या निरोप समारंभास महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालक मंत्री श्री विष्णु सवरा उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात ऐनशेत गावातील शाळेत गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याच्या वाटपाने झाली. या उपक्रमास मोलाचे सहकार्य करणाऱ्या ३६० फाउंडेशनचे रोहन ठाकरे यांच्या घरी याकोव फिंकलश्टाईन आणि विष्णु सवरा यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनतर वाड्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेस भेट देऊन इस्रायली विद्यार्थ्यांनी केलेल्या कामाची पाहणी करण्यात आली.

 

त्यानंतर आयोजित केलेल्या समारोपाच्या कार्यक्रमास शाळेचे विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि वाड्यातील रहिवासी अशा सुमारे ३०० लोकांची उपस्थिती होती. या प्रसंगी झालेल्या भाषणात याकोव फिंकलश्टाईन इस्रायली विद्यार्थ्यांचे कौतुक करताना, राखी पौर्णिमेचा उल्लेख करून वाड्यातील मुलांना नवीन बहिणी आणि भाऊ मिळाले असल्याचे सांगितले. आदिवासी विकास मंत्री विष्णु सवरा यांनी इस्रायलच्या विद्यार्थ्यांनी राज्यभरातील शाळांची पाहाणी करून वाड्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेची निवड केली होती. इस्त्राइलच्या विद्यार्थ्यांनी वाड्यात येऊन तेथील मुलांसाठी समाजकार्य करणे हा वाड्याचा गौरव असल्याचे सांगितले. या वेळी इस्रायली विद्यार्थी लिओर टुइल यांनी चक्क मराठीत भाषण केले. महाराष्ट्राचे अर्थमंत्री डॉ. सुधीर मुनगंटीवार आणि शिक्षण मंत्री श्री विनोद तावडे यांनीही या उपक्रमाची दखल घेऊन इस्रायलच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

 

या प्रकल्पाच्या यशात वाड्याचे रहिवासी आणि ३६० फाउंडेशनचे रोहन ठाकरे यांचा मोठा वाटा आहे. प्रकल्पाच्या नियोजनात तसेच प्रत्यक्ष कामात त्यांनी मोठ्या प्रमाणावर मदत केली. इस्रायलच्या विद्यार्थ्यांना आपल्या गावातील शाळेसाठी काम करताना पाहून वाड्यातील स्थानिक रहिवासी आणि सामाजिक संस्था मदतीसाठी पुढे आल्या. पी.जे. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी कामात हातभार लावला, कोणी रंग आणून दिला तर कोणी शैक्षणिक साहित्य पुरवले. यामुळेच अनेकदा १०० हून अधिक लोक शाळेसाठी काम करत होते. हे या प्रकल्पाचे आठवे वर्ष असून पण स्थानिक लोकांनी एवढ्या मोठ्या प्रमाणावर पहिल्यांदाच सहभागी होताना पाहिल्याची कबुली अलोन मिझराखी यांनी दिली.

 

संपूर्ण पालघर जिल्ह्यात या प्रकल्पाची चर्चा झाली. ‘आमची वसई’ यांसारख्या विविध सामाजिक संस्थांनी या दरम्यान या शाळेला भेटी दिल्या. या दरम्यान आमदार पांडुरंग बरोरा यांनी शाळेला रंगाचे डब्बे भेट म्हणून दिले. जिल्हाधिकारी राजेंद्र ननावरे यांनी पुढील वर्षी अशा प्रकल्पाच्या प्रकल्पात सहभागी व्हायला जिल्हा प्रशासनाला आवडेल असे म्हणत जणू या कामाची पोचपावती दिली. देशातील सामान्य नागरिक दोन देशांतील संबंध सुधारण्यासाठी किती महत्त्वाची भूमिका बजावू शकतात हे या प्रकल्पातून दिसून आले आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@