सर्वांसाठी चांगले शिक्षण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Sep-2018
Total Views |


 


५ सप्टेंबर हा शिक्षक दिन! त्यानिमित्ताने केंद्र सरकारने गेल्या चार वर्षांत मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात काही उत्साहवर्धक बदल केले आहेत. त्यात शालेय शिक्षण अधिक जीवनाभिमुख कसे करता येतील, यावर भर दिला आहे. हे बदल नेमके काय आहेत, ते समजून घेण्यासाठीचा हा लेख प्रपंच.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/


२६ मे, २०१४ ला भारतात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप आणि सहकारी पक्षांचे एनडीए सरकार विकासाच्या मुद्यावर सत्तेवर आले. सत्तेवर चढताना अनेक आव्हाने देशासमोर होती. या आव्हानांना एक-एक करत सामोरे जाण्याची बिकट वाट या सरकारला चालायची होती. या सगळ्यावर नियोजनबद्ध पध्दतीने सामोरे जाण्याचे या सरकारने निश्चित केले. सव्वाशे कोटी जनतेचं नेतृत्व करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारने देशातील मनुष्यबळाच्या क्षमतांचा या साऱ्या साठी योग्य पद्धतीने वापर करण्याचा व त्या हातांना व त्यांच्यातल्यातील सद्गुणांना प्रोत्साहन देण्याचा निश्चय केला. त्यातूनच विविध मंत्रालयांची क्षमतावृद्धी करत नवनवीन निर्णय घेत देशाच्या विकास कामाला गती देण्याची कास धरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली मनुष्यबळ विकास मंत्रालयाद्वारे शिक्षण क्षेत्रांत अनेक सकारात्मक बदल केले. त्यात प्रामुख्याने सुलभ प्रवेश प्रक्रिया, गुणवत्ता, जबाबदारी, समानता आणि सर्वांना परवडण्याजोगे शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने आमूलाग्र बदल केले आहेत. शिवाय संशोधन आणि नाविन्यपूर्णतेला प्रोत्साहन देण्यावरया सरकारने भर दिलेला आपल्याला दिसतो. या सरकारने शिक्षणाच्या प्रत्येक टप्प्यावर काही ठळक बदल केले आहेत. त्याचे परिणाम हळूहळू दिसू लागले आहेत. शालेय शिक्षण क्षेत्रात केलेले हे बदल नेमके कोणते आहेत, ते आपण समजून घेऊया.

 

वाढ आणि वृद्धी

प्राथमिक शिक्षण चांगले मिळवण्याच्या हेतूने १५ .३५ लाख शालेय शिक्षण देणाऱ्या शाळा देशभर कार्यरत आहेत. त्यात ८६ .९ लाख शिक्षक २६ कोटी विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत. यामध्ये नव्याने १०३ केंद्रीय विद्यालये आणि ६२ नवोदय विद्यालये सुरू करण्यात आली आहेत. प्रत्येक वर्षी प्रत्येक विषयांत आणि वर्गात शिकण्याचा परिणाम काय झाला, हे तपासले जात आहे. यामुळे शाळा, शिक्षक आणि विद्यार्थी त्याचबरोबर पालकांना जबाबदारीची जाणीव झाली आणि त्यामुळे आपला शिक्षणाचा दर्जा उंचावू लागला आहे. तिसरी, पाचवी आणि आठवीचे २२ लाख विद्यार्थी आणि दहावीच्या १५ लाख विद्यार्थ्यांचे जगातील सर्वात मोठे राष्ट्रीय मूल्यांकन सर्व्हेक्षण करण्यात आले. याचा अहवाल राज्यांचे मुख्यमंत्री, खासदार आणि अधिकार्यांना दाखविण्यात आला. शिक्षकप्रशिक्षणाच्या बाबतीत स्वयं व्यासपीठाच्या माध्यमातून १४ लाख अप्रशिक्षित शिक्षक डिप्लोमा इन अर्ली लर्निंग एज्युकेशनचे अध्ययन करीत आहेत. यातील पहिल्या वर्षाची परीक्षा यशस्वीरित्या पार पडली आहे. तसेच नापास न करण्याच्या योजनेत बदल झाल्यामुळे पाचवी आणि आठवीचे विद्यार्थी सातत्यपूर्ण शिक्षणात रमतील आणि त्याच्या गुणवत्तेत सुधारणा होईल.

 

अभ्यासक्रमाचे सुसूत्रीकरण

पाठांतराचा अभ्यास म्हणजे शिक्षण नव्हे. मूल्यशिक्षण, अनुभवातील शिक्षण, जीवन कौशल्य शिक्षण, सर्जनशील शिक्षण आणि शारीरिक शिक्षण यावर अधिक वेळ देण्याची गरज असल्यावर आणि अभ्यासक्रमाचे ओझे कमी करण्याबाबत ३७ हजार लोकांनी आपल्या बहुमूल्य सूचना दिल्या. त्याचा सकारात्मक विचार करण्यात आला आहे. त्यातून केंद्र शासनाने शिक्षण प्रक्रियेतील पुढील टप्पे निश्चित केले आहेत.

 

समग्र शिक्षण

देशातील प्रत्येक मुलाला योग्य शिक्षण मिळावे, म्हणून करण्यात आलेल्या आर्थिक तरतुदीत प्रत्येक वर्षी २० टक्क्यांनी वाढ केलेली बघायला मिळते. २०१७ -२०१८ - २८ हजार कोटी रुपये, २०१८ -२०१९ - ३४ हजार कोटी रुपये, २०१९ -२०२०- ४१ हजार कोटी रुपये इतकी तरतूद करण्यात आली आहे, तर सानुग्रह अनुदानात १४ हजार ते 50 हजार रुपयांवरून 25 हजार रुपये ते एक लाख रुपये एवढी वाढ करण्यात आली आहे. एससीईआरटी, डीआयईटी, बीआरसी आणि सीआरसीसारख्या शिक्षक प्रशिक्षण संस्थांना भरघोस आर्थिक मदत दिली जाणार आहे.

 

‘बेटी बचाओ बेटी पढ़ाओ’

३७०० कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात शिकणाऱ्या ग्रामीण वंचित मुलींसाठी चालविल्या जाणाऱ्या वसतिगृहात आता बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या मुलींना राहण्याची अनुमती देण्यात आली आहे. यामुळे एस.सी, एस.टी, ओबीसी, अल्पसंख्यांक आणि अन्य वंचित समाजातील सहा लाखांहून जास्त ग्रामीण मुलींना फायदा होतो आहे. त्यामुळे त्यांना बारावीपर्यंत निरंतर शिक्षण घेणे, सहज शक्य झाले आहे.

 

‘अटल साधनसामुग्री दुरुस्ती प्रयोगशाळा’

विद्यार्थ्यांमध्ये साधनसामुग्री दुरुस्तीची अभिनव कौशल्ये निर्माण करण्यासाठी देशामध्ये २४०० ‘अटल साधनसामुग्री दुरुस्ती प्रयोगशाळा’ निर्माण करण्यासाठी प्रत्येकी २० लाख रुपये खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. या प्रयोगशाळेत पहिले ‘ऑलिम्पियाड’ आयोजित करण्यात आले होते. त्यात हजारो विद्यार्थ्यांनी आपल्या विविध कल्पना, विचार आणि त्यांचे प्रयोग सादर केले. या प्रयोगशाळेत थ्रीडी छपाई, रोबोटिक्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता उपलब्ध करून दिली जाणार आहे.

 

माध्यान्ह भोजन

ही जगातील सर्वात मोठी माध्याह्न भोजन योजना भारतातील शाळांमध्ये राबविण्यात येत आहे. दररोज एक कोटी ११ लाख चार हजार शाळांमधून ९५ दशलक्ष विद्यार्थ्यांना ताजे तयार केलेले भोजन देण्यात येते. यासाठी वर्षाला १७ हजार कोटी खर्च केले जातात. या कार्यक्रमांतर्गत अन्न तयार करणे, वाहतूक करणे या कामांकरिता या योजनेला अधिक सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने अधिक खर्च मंजूर केला आहे.

 

मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे

एकूण चार लाख १७ हजार स्वच्छतागृहांपैकी एक लाख ९० हजारस्वच्छतागृहे मुलींसाठी एका वर्षात बांधण्यात आलीत. शाळांमधील सर्व स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेसाठी आणि देखभालीसाठी विशेष अनुदानातील विशिष्ट भागाची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे शाळेत न येणाऱ्या मुलींचे प्रमाण घटले असून वर्गातील शिकवण्याकडे त्यांचे लक्ष्य केंद्रीत होऊ लागले आहे. विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांमधील मुलींना प्रतिमहिना २०० रुपये शिष्यवृत्ती देण्यात येते. या विद्यार्थ्यांसाठी ५४ हजार रॅम्प आणि रेलिंग आणि ५० हजार विशेष स्वच्छतागृहे निर्माण करण्यात आली आहेत.

 

डिजिटल पुढाकार (डिजिटल बोर्ड मोहीम)

इयत्ता नववीपासून ते पदव्युत्तर अभ्यासक्रमापर्यंत असलेल्या 15लाख वर्गांना परस्पर संवाद साधणारा डिजिटल बोर्ड पुढील पाच वर्षांत उपलब्ध करून दिला जाणार आहे. प्रत्येक वर्ग हे ‘फ्लिप क्लास’ बनतील आणि शिक्षकांना जलदगतीने संवाद साधणे शक्य होईल. ‘ई-पाठशाळे’च्या माध्यमातून डिजिटल स्वरूपात असणारी एनसीईआरटीची पुस्तके विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध झाली आहेत. १५ लाख विद्यार्थ्यांनी ‘ई-पाठशाळे’चे अॅप डाऊनलोड केले आहे. आणि ३० लाख विद्यार्थ्यांनी ‘ई-पाठशाळे’ला भेट दिली आहे. शिवाय शगुन पोर्टलच्या (ऑनलाईन मॉनिटेरिंग आणि रिपोझिटरी पोर्टल) माध्यमातून सर्वोत्तम यशोगाथांचे सादरीकरण करण्यात आले आहे.शिक्षकांचे शिक्षणतंत्र आणि कौशल्य सुधारण्यासाठी दीक्षा हे अद्वितीय पोर्टल निर्माण करण्यात आले आहे. शिक्षक आपले साहित्य या पोर्टलवर अपलोड करतील, ज्याला ‘ऑनलाईन कोर्स’ म्हणून संबोधले जाईल. जे शिक्षक उत्तम साहित्य प्रदान करतील, त्यांचे साहित्य प्रकाशित केले जाईल आणि क्युआर कोडच्या माध्मातून प्रगतीचा आलेख आणि उत्साही मजकूर असलेले साहित्य प्रस्तुत केले जाईल.

 

इंटिग्रेटेड बी. एड.

ज्या विद्यार्थ्यांना भविष्यात शिक्षक व्हायचे आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी इतर अभ्यासक्रमांप्रमाणे चार वर्षांचा इंटिग्रेटेड बी.ए.बी.एड. - बी.एस.सी.बी.एड. अभ्यासक्रम देण्यात येईल. या बहुप्रतिक्षित बदलावर अनेकदा चर्चा झाली आहे, परंतु त्याची अंमलबजावणी झाली नव्हती. २०१९ -२०२० शैक्षणिक वर्षापासून त्याची अंमलबजावणी होण्याची अपेक्षा आहे.

 

स्वच्छ विद्यालय पुरस्कार

ही स्पर्धा २०१७ सालापासून सुरू करण्यात आली. पहिल्या वर्षी झालेल्या ऑनलाईन स्पर्धेत अडीच लाख सरकारी शाळांनी भाग घेतला होता. या स्पर्धेदरम्यान शाळेची संपूर्ण स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहे आणि वर्गांमधील स्वच्छता तपासण्यात आली.यंदाच्या वर्षी सरकारी व खासगी अशा सहा लाख शाळा या स्पर्धेतसहभागी झाल्या होत्या. स्वच्छ संस्कृती निर्माण करणारे हे काम अनेक वर्षे चालणारे आहे. पण भविष्यात यातूनच हे विद्यार्थी स्वच्छताग्रही बनतील.

 

एक भारत श्रेष्ठ भारत

विविधतेने नटलेल्या आपल्या देशातील विविध राज्यांतील नागरिकांमध्ये परस्पर समन्वय आणि बंधुत्वाची भावना या कार्यक्रमाच्या माध्यमातून निर्माण करण्यात येत आहे. 35 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यात समावलेले आहेत. यामुळे विविध राज्यांना इतर राज्यांची संस्कृती, उत्सव, खाद्य संस्कृती, प्रथा, रितीरीवाज, साहित्य, भाषा यांचा अभ्यास करता येतो. या कार्यक्रमात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे देशातील दोन लाख लोकं आणि अंदाजे ५०० उच्च शिक्षण देणाऱ्या संस्था सामील झाल्या आहेत. जम्मू-काश्मीर आणि तामिळनाडू, उत्तराखंड, पंजाब, गुजरात, छत्तीसगढ़, महाराष्ट्र, ओडिशा, गोवा आणि उत्तराखंड या राज्यांनी आपसात केलेल्या विद्यार्थ्यांच्या आदानप्रदान आणि सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रमातून राष्ट्रीय एकात्मता दृढ होण्यास मदत झाली आहे. या सरकारने केलेल्या बदलांमुळे भविष्यात भारतातील एकूण मनुष्यबळ विकासाला गती मिळणार यात शंका नाही. पण हे काम एकट्या सरकारचे नसून याच्याशी संबंधित प्रत्येक घटकाचे आहे, मग ते शासकीय अधिकारी असोत, शाळा संचालक असोत, शिक्षक असोत, विद्यार्थी असोत की त्यांचे पालक या सार्यांच्या एकत्रित प्रयत्नांतून नव्या भारताचे निर्माण होणार आहे. चला, या शिक्षक दिनाच्या निमित्ताने सार्यांनी भविष्य सुंदर करणाऱ्या या प्रयत्नांना साकार करूया.

-मिलिंद धक्टू चाळके

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 


@@AUTHORINFO_V1@@