कल्याण-डोंबिवलीत डेंग्यूचे १९० संशयित रुग्ण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Sep-2018
Total Views |


 


डोंबिवली : कल्याण-डोंबिवली परिसरातले बदलते तापमान, हवेत वाढलेली आर्द्रता यामुळे डेंग्यूच्या प्रसाराला पोषक असे वातावरण निर्माण झाले आहे. या काळात महापालिकेकडून पुरेशी खबरदारी घेतली जात नसल्याने डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे चित्र दिसत आहे. डोंबिवली एमआयडीसी निवासी विभागातील फक्त मिलापनगरमध्ये एकाच ठिकाणी ४ ते ५ डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळून आले. त्यामुळे संपूर्ण कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात मागील काही दिवसांत डेंग्यूच्या रुग्णांची संख्या तब्बल १९० पर्यंत पोहोचली असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली आहे .

 

कल्याण-डोंबिवली शहर खाडीकिनारी परिसरात वसलेले आहे. खार्‍या हवेमुळे शहरातील आर्द्रता वाढत असते. त्यातच गेल्या काही दिवसांत पावसाने थोडीशी उघडीप घेतल्याने तापमान वाढून वातावरणात बदल झाला आहे. या वातावरणातील बदलामुळे ताप आणि मलेरियाचे रुग्णही वाढत असतात. त्याचबरोबर डेंग्यूच्या प्रसारासाठी पोषक असे वातावरण निर्माण झाल्याने डेंग्यूचे रुग्णदेखील वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र जोपर्यंत तपासणीत डेंग्यू झाला आहे, असे निष्पन्न होत नाही, तोपर्यंत तो संशयित डेंग्यू रुग्ण गृहीत धरून त्यावर उपचार केले जातात.

 

शहरात मलेरियासोबत डेंग्यूच्या आजाराचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. त्यामुळे महापालिकेच्या स्वच्छता विभागाची जबाबदारी वाढली आहे. पावसाळ्याच्या दिवसात हे आजार होत असल्याने स्वच्छता राखणे, पाणी साचू न देणे आणि वेळोवेळी फवारणी करणे या गोष्टीला प्राधान्य दिले गेले पाहिजे. अनेक वेळा पालिकेच्या माध्यमातून डासांच्या अळ्यांचे निर्मूलन करण्यासाठी कीटकनाशक फवारणी केली जाते. फवारणी परिणामकारक होण्यासाठी प्रभावी अशीच कीटकनाशक वापरण्याची आवश्यकता आहे. मात्र तसे होताना दिसत नाही.

 
 

डेंग्यूचा आजार हा प्रामुख्याने साचलेल्या पाण्यात डासांच्या अळ्या घातल्याने होत असतो. अनेक वेळा सर्वसामान्य नागरिक या साचलेल्या स्वच्छ पाण्याकडे दुर्लक्ष करीत असतात. त्यामुळे याबाबत नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्याची गरज आहे. डेंग्यूची मादी धोकादायक असून ती चावल्याने डेंग्यूचा आजार होतो. हा आजार झाल्यानंतर उपचार करणे जास्त कठीण होते. त्यामुळे हा आजार मुळात होऊ नये याचीच काळजी घ्यावी. याबाबत नागरिकांना अनेक वेळा विविध माध्यमांतून सूचना दिल्या जात असतात. मात्र त्या सूचनांकडे दुर्लक्ष केले जाते. त्या सूचनांचे पालन केले जात नाही. त्यामुळे हे असे आजार पसरत असतात.

- डॉ. राहुल पाटील , स्थानिक डॉक्टर

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@