काँग्रेसने मनसेला झिडकारले, आघाडीत प्रवेश नाही

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Sep-2018
Total Views |


 

मुंबई: २०१९ मध्ये होणारी लोकसभा निवडणूक जवळ येऊ लागली असतानाच आघाड्या आणि युत्यांची समीकरणे अधिक वेगाने जुळू लागली आहेत. भाजपविरोधाचा जणू एककलमी कार्यक्रम हाती घेतलेल्या आणि दुसरीकडे विविध माध्यमांतून राष्ट्रवादी काँग्रेसशी जवळीक साधू पाहणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला भाजपविरोधी आघाडीत घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसपाशी आग्रह धरला आहे मात्र, काँग्रेसने मात्र उत्तर भारतीय मते डोळ्यापुढे ठेऊन मनसेला या आघाडीपासून लांब ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे दिसत आहे. यामुळे मनसेला आघाडीत प्रवेश मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे.

 

विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नुकतीच विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या निवासस्थानी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी महाआघाडीत मनसेच्या समावेशाबाबत विचार केला जावा, असा प्रस्ताव मांडला. मात्र, या प्रस्तावाला मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम आणि इतर अनेक नेत्यांनी कडाडून विरोध केल्याचे समजते. तसेच, त्यानंतर संजय निरुपम यांनी माध्यमांशी बोलतानाही मनसेला आघाडीत घेतल्यास उत्तर भारतीय मतदार काँग्रेसवर नाराज होईल व यामुळे काँग्रेसचे मोठे नुकसान होईल, अशा स्वरूपाचे मत व्यक्त केले. मनसे आणि आमची विचारधारा जुळत नाही. मनसे कायद्याचे पालन करत नाहीहिंसेचेराजकारण करतात. २०१४ मध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला होता. आताही त्यांनी मोदींना पाठिंबा द्यायला हवा, असा उलटा सल्ला देत भाजप आणि मनसेचे जवळचे संबंध असल्याची टीकाही निरुपम यांनी केली.

 

पवारांशी जवळीक करून फायदा नाहीच?

 

सातत्याने अपयशाचा सामना करणाऱ्या मनसेला मोदीविरोधाचे टॉनिक देऊन वाचवण्यासाठी राज ठाकरे सध्या वेगवेगळे मार्ग अवलंबत आहेत. यातूनच त्यांनी गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी जवळीक केल्याचे दिसत आहे. यामुळे मनसे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत जाणार, अशी सध्या चर्चा आहे. राष्ट्रवादीही याबाबत अनुकूल असली तरी आघाडीतील प्रमुख पक्ष असलेला काँग्रेसच यासाठी राजी नसल्याने आघाडीच्या तंबूत सामील होण्याची संधीही राज ठाकरे गमावणार असल्याचे दिसत असून यामुळे शरद पवार यांच्याशी केलेली जवळीक काय कामाची अशा स्वरुपाचे प्रश्न मनसेचे कार्यकर्ते व सहानुभूतीदार खासगीत बोलताना व्यक्त करत आहेत.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@