पंतप्रधानांचा टोला...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Sep-2018
Total Views |


 


देशात एखाद्या हुकूमशहाचे राज्य असल्याचा झटका अनेकांना येत असतो. यात काँग्रेस तर आहेच, पण देशातले काही तथाकथित विचारवंत व आपल्या अजेंड्यावर देश चालविण्याचा प्रयत्न करणारे काही संपादक व माध्यमवीरही आहेत. राजकीय पक्षांना मोदींची राजवट ‘हुकूमशाही’ वाटते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 

आपण शिस्तीविषयी बोलायला लागलो तर आपल्याला ‘हुकूमशहा’ म्हणतात, असा एक मार्मिक चिमटा देशाच्या पंतप्रधानांनी दिल्लीत काढला. देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी ते बोलत होते. कामकाज उत्तमरित्या म्हणजेच शिस्तीत चालविण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या व्यंकय्या नायडूंचे त्यांनी कौतुकही केले. पंतप्रधान जे म्हणाले तो टोला खरं तर मराठीतल्या ‘लेकी बोले सुने लागे’ या म्हणीप्रमाणेच होता. त्यांचा टोला काँग्रेसला होता, असा समज दिल्लीतल्या माध्यमांनी करून घेतला. वस्तुत: तो टोला त्यांनी काँग्रेस आणि राहुल गांधींना लगावला होताच, पण त्याचबरोबर देशात अचानक हुकूमशाही आल्याचे साक्षात्कार ज्यांना होतात त्यांनाही होताच. देशात एखाद्या हुकूमशहाचे राज्य असल्याचा झटका अनेकांना येत असतो. यात काँग्रेस तर आहेच, पण देशातले काही तथाकथित विचारवंत व आपल्या अजेंड्यावर देश चालविण्याचा प्रयत्न करणारे काही संपादक व माध्यमवीरही आहेत. राजकीय पक्षांना मोदींची राजवट ‘हुकूमशाही’ वाटते. ती वाटणे साहजिकच आहे, कारण गांधी परिवार आणि सत्तेची सोन्याची ताटे पटकावणाऱ्या राजकीय पक्षांना पूर्वी लोकशाही आणि राज्यव्यवस्था आपल्या बापजाद्यांची जहागीर वाटायची. काँग्रेसला साथ द्यायची आणि मलईदार खाती पदरात पाडून घ्यायची, असा हा शिरस्ता. यात खंड पडला तो मोदींच्या सत्तेवर येण्याने अन् करड्या शिस्तीने. नरेंद्र मोदींच्या या कारभाराचा फटका बसल्याने दोन प्रकारच्या मंडळींची दुकाने बंद पडली. ती म्हणजे भ्रष्टाचारात आकंठ बुडालेले राजकीय पक्ष अन् परकीयांच्या रसदपुरवठ्यावर पोसलेल्या ढोंगी सामाजिक स्वयंसेवी संस्था. मोदींविरोधात खडे फोडणारी हीच ती जमात.

 

गेल्या चार वर्षांतल्या मोदींच्या कारभाराचा धसका घेतलेल्या या लोकांना आपल्या सगळ्याच उद्योगांतून गाशा गुंडाळावा लागल्याने त्यांची बोंबाबोंब सदैव सुरू असते. या बोंबाबोंब करणाऱ्यात अग्रक्रमाने घेण्याजोगी नावे म्हणजे राहुल गांधी, मायावती, मुलायमसिंह यादव, लालूप्रसाद यादव. गांधी घराण्याचा वारस अन् त्या वारसाहक्काने मिळणारे सर्वच लाभ पदरात पडणाऱ्या राहुल गांधींची, सोनिया गांधींची अन् प्रियांका गांधी, रॉबर्ट वड्रा अशा सर्वांचीच सत्तेत असल्याने होणारी चंगळ बंद पडली. देशाला स्वातंत्र्य केवळ आमच्याचमुळे मिळाल्याची शेखी मिरवणाऱ्या काँग्रेसला हा देश नेहमीच चरण्यासाठीचे कुरण वाटत आला. मनमोहन सिंग पंतप्रधानपदी असताना, सोनिया गांधींनी राष्ट्रीय सल्लागार मंडळाच्या नावाखाली सत्तेच्या नाड्या आपल्याच हाती ठेवल्या. याच सत्तेतून गांधी कुटुंबीयांनी पैसा, प्रतिष्ठा, लाभ, फायदे पुरेपूर मिळवले. देशात अशी वेळ होती की, सोनियांनी बोलावे अन् मनमोहन सिंग नामक पंतप्रधानाने डोलावे, असा रिवाज बनला. पण, मोदींच्या सत्तेवर येण्याने या सगळ्यालाच सुरुंग लागला अन् सोनिया-राहुल गांधींच्या, काँग्रेसच्या तोंडातून मोदीद्वेष बाहेर पडू लागला. तर उठसूट डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेत स्वतःच्या जातीयवादी राजकारणाची खुंटी बळकट करू पाहणाऱ्या मायावतींचीही अशीच गत. ताजमहालाशी संबंधित ताज कॉरिडॉर प्रकल्पात कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या अन् सत्तेत असताना सर्वसामान्य जनतेच्या कष्टाचा पैसा स्वतःचेच पुतळे उभारण्यात खर्ची घालणाऱ्या मायावतीही मोदींविरोधात बडबडू लागल्या. त्यामुळे ज्यांचे हात भ्रष्टाचाराच्या, गैरव्यवहाराच्या चिखलाने बरबटले आहेत, अशा मायावतींनी मोदींविरोधात बोलणे म्हणजे हास्यास्पद अन् कीव येणारेच.

 

मोदींविरोधात आघाडी उघडणारा आणखी एक नग म्हणजे साधासुध्या वेषात वावरणारा, पण बिलंदर राजकारणी लालूप्रसाद यादव होय. गायी-म्हशींसाठी खरेदी करण्यात येणारा चारा स्वतःच खाण्याचा विक्रम यांच्या नावावर. हाच चारा घोटाळा देशात कित्येक वर्षे गाजला, पण लालूंना शिक्षा झाली ती मोदी सत्तेत आल्यानंतर. याआधी राजकारण्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होतेच, पण सत्ताधाऱ्याशी असलेल्या साटेलोट्यामुळे अशा लोकांना कधी शिक्षा झाली नाही. लालूंना अशी शिक्षाही झाली अन् त्यातच त्यांची कित्येक दशकांची राजकीय कारकीर्दही संपुष्टात आली. असा प्रकार पहिल्यांदाच झाला, त्यामुळे लालूंना मोदींमुळे देशात हुकूमशाही अवतरल्याचा साक्षात्कार होणारच ना! मुलायमसिंह यादव यांचे अन् त्यांच्या समाजवादी पक्षाचे उत्तर प्रदेशात दिवाळे वाजल्यानंतर त्यांनाही मोदींविरोधात महाआघाडी, महागठबंधन करण्याचे डोहाळे लागले. तिकडे बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या आक्रस्ताळेपणात भलतीच वाढ झाली. मोदींमुळे दीदींना ‘फेडरल फ्रंट’ उभारून देशाची सत्ता ताब्यात घेण्याचीही लालसा झाली अन् त्या मोदींविरोधात ‘हुकूमशहा...हुकूमशहा’ म्हणून किंचाळू लागल्या, पण आपल्याच राज्यात एका व्यंगचित्रकाराची त्याच्या व्यंगचित्रामुळे आपण मुस्कटदाबी केल्याचे दीदी सोयीस्कररित्या विसरल्या. ती ममता बॅनर्जींची हुकूमशाहीच होती ना?  

 

महाराष्ट्रात मोदींविरोधात रोजच बोलण्याचे, लिहिण्याचे रतीब घालणाऱ्या शिवसेनेबद्दल काय बोलावे? भाजपसोबत सत्तेत राहून लाथा झाडण्याचे काम करणाऱ्या शिवसेनेचे खरे दुखणे म्हणजे सत्तेच्या सोन्याच्या ताटाचा पुरेपूर आस्वाद घेता न येणे, हे होय. मंत्रिमंडळ विस्तारावेळी केंद्रातील सेनेचे मंत्री अनंत गीते यांनी तर कमाल करत मला मिळालेले खाते चांगले नसल्याचे म्हणत खाते बदलण्याचीही मागणी केली होती. आता शिवसेनेच्या दृष्टीने चांगले खाते म्हणजे जिथून जास्तीत जास्त मलई मिळेल ते. पण मोदींनी, “तुम्हाला मिळालेले खाते चांगले नाही असे वाटते तर ते चांगले करा,” असे म्हणत यांची बोळवण केली. तेव्हापासून यांच्या तोंडातून मोदीविरोधाचे सूर पाझरू लागले, ते आजतागायत कायम आहेत.

 

नरेंद्र मोदींविरोधात सदान्कदा आदळआपट करणारा वर्ग म्हणजे भोंदू समाजसेवकांचा. मोदींनी एफसीआरए कायद्यात बदल करून या कथित समाजसेवकांच्या स्वयंसेवी संस्थांना मिळणाऱ्या परदेशी निधीच्या वाटा बंद केल्या. याआधी देशातल्या गरीब, अन्याय-अत्याचारग्रस्त लोकांची नावे घेत स्वतःच्या तिजोऱ्या भरणाऱ्या ढोंगबाजांची यामुळे गोची झाली. परदेशी देणग्यांची नोंदणी करून त्याचा हिशोब द्यावा लागणार, या नुसत्या कल्पनेनेच या लोकांच्या पायाखालची वाळू घसरली. गुजरात दंगलीतील पीडितांच्या नावाने कोट्यवधी रुपये गोळा करून स्वतःच्या मौजमजेखातर उडवणाऱ्या तिस्ता सेटलवाड आणि इंदिरा जयसिंगसारख्या पाखंडी समाजसेवकांना मोदींमुळे रस्त्यावर यावे लागले. अशा लोकांचा मोदींविरोधातील जळफळाट त्यामुळेच वेळोवेळी समोर येतो. प्रसारमाध्यमांत तर मोदींमुळे मोठीच उलथापालथ झाली. बरखा दत्त, राजदीप सरदेसाई, करण थापरसारख्या पत्रकार मंडळींचे दिल्लीतले महत्त्व संपल्याने त्यांची अस्वस्थता टीपेला पोहोचली. ल्युटंट दिल्लीतली मोठी नावे असणाऱ्या या मंडळींनी काँग्रेसची सत्ता असताना राजकारण कसे चालेल हे ठरवण्यापर्यंत, प्रभावित करण्यापर्यंत मजल मारलेली होती. निरा राडिया टेप प्रकरणानंतर हे सत्य प्रकर्षाने समोर आले. पण मोदी सत्तेत आले आणि त्यांनी जनतेशी संवादाचा निराळाच ‘मन की बात’ पॅटर्न समोर आणला अन् या माध्यमवीरांचा बोलबाला एकदमच नाहीसा झाला. ना मुलाखत, ना परदेश दौरा, ना आतली माहिती मिळण्याची कोणतीही शक्यता यामुळे या लोकांचे धाबे दणाणले. काँग्रेसच्या काळात या लोकांचे जसे चोचले पुरवले गेले तसे मोदींच्या काळात काही झाले नाही, उलट या लोकांना हातावर हात चोळत बसण्याखेरीज दुसरा पर्याय उरला नाही. कधीकाळी दिल्लीच्या सत्ताधाऱ्यावर प्रभाव पाडणाऱ्या, आतल्या गोटात वावरणाऱ्या या मंडळींना कोणी विचारेनासे झाले. परिणामी त्यांना मोदी अघोषित आणीबाणी लादणारे हुकूमशहा वाटणे साहजिकच, पण सोशल मीडियावरील जनतेच्या प्रतिक्रिया, मते, भूमिका पाहिल्या असता, ती या लोकांची मोदींनी कशी जिरवली, याच प्रकारच्या पाहायला मिळतात अन् हेच जनतेने वेळोवेळी झालेल्या निवडणुकांतूनही सिद्ध करून दाखवले. ती मोदींच्या शिस्तीला दिलेली पावतीच होती आणि हे ओळखण्याची कुवत नसलेल्या लोकांना मोदी हुकूमशहा वाटतात, पण जनतेला तेच हवेहवेसे वाटत असतील तर?

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@