केसीआर यांचे शक्तिप्रदर्शन ही निवडणुकीची नांदी?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Sep-2018   
Total Views |


 


तेलंगण राष्ट्र समितीचे नेते आणि मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची हैदराबादजवळ जी प्रचंड सभा आयोजित करण्यात आली होती, त्या सभेत के. चंद्रशेखर राव निवडणुकीची घोषणा करतील असे वाटत होते. पण, तसे काही घडले नसले तरी सरकार त्यादृष्टीने लगेच निर्णय घेईल, असे एकंदरीत हालचालींवरून दिसते.

 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

दक्षिणेकडील राज्यांमध्ये विविध राजकीय घडामोडी घडत असल्याचे दिसचे. त्यातील केरळ हे राज्य सध्या त्यांच्यावर कोसळलेल्या नैसर्गिक आपत्तीपासून सावरण्याचा प्रयत्न करीत आहे. तामिळनाडू राज्यात द्रमुक नेते करुणानिधी यांच्या निधनानंतर पक्षाची सूत्रे त्यांचे पुत्र स्टालिन यांच्याकडे आली असली तरी त्या पक्षात धुसफूस चालूच आहे. करुणानिधी यांचे दुसरे पुत्र अलगिरी यांनाही, आपल्याकडे पक्षाची सूत्रे असावीत, असे वाटत होते. पण, तूर्त तरी त्यांची ही इच्छा फलद्रूप होऊ शकलेली नाही, पण करुणानिधी परिवारामध्ये सत्तेसाठी संघर्ष चालू असल्याचे दिसून येत आहे, तर इकडे कर्नाटकमध्ये काँग्रेस पक्षातील वाद चव्हाट्यावर आल्याचे दिसते. बेळगाव जिल्ह्यात काँग्रेसच्या दोन गटांमध्ये जो वाद उफाळला आहे, तो मिटविण्याची जबाबदारी माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर टाकण्यात आली आहे. त्या राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होऊ घातला आहे, त्यात ज्यांना स्थान मिळणार नाही असे नेते कुमारस्वामी सरकारला नीट काम करू देणार नाहीत, हे उघड आहे. तिकडे आंध्रमध्ये चंद्राबाबू नायडू भाजपविरोधात आघाडी निर्माण करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत, तर कालच्या रविवारी तेलंगण राज्यात तेलंगण राष्ट्र समितीने घेतलेली प्रचंड सभा हा चर्चेचा विषय झाला आहे.

 

तेलंगण राष्ट्र समितीचे नेते आणि मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची सध्या राज्यावर असलेली पकड लक्षात घेता आता निवडणुका घेतल्यास आपल्या पक्षास घवघवीत यश मिळू शकते, असा त्यांचा होरा असल्याने त्यांनी तशी तयारी सुरू केल्याचे दिसून येत आहे. हैदराबादजवळ पक्षाची जी प्रचंड सभा आयोजित करण्यात आली होती, त्या सभेत के. चंद्रशेखर राव निवडणुकीची घोषणा करतील असे वाटत होते. पण, तसे काही घडले नसले तरी सरकार त्यादृष्टीने लगेच निर्णय घेईल, असे एकंदरीत हालचालींवरून दिसते. केसीआर यांना तातडीने निवडणुका व्हाव्यात, असे वाटते. ते लक्षात घेऊन येत्या 10 सप्टेंबरपूर्वी ते विधानसभा विसर्जित करण्याच्या दिशेने पावले टाकतील, असे राजकीय निरीक्षकांना वाटत आहे. रविवारी आयोजित महासभेत केसीआर यांनी पुन्हा निवडून देण्याचे आवाहन जनतेला केले. गेल्या चार वर्षांमध्ये आपण जी चांगली कामे केली आहेत ती पुढे चालू ठेवण्यासाठी आम्हाला निवडून द्या, असे आवाहन त्यांनी केले. कित्येक दशके ज्या राज्याची नुसती पिळवणूक होत होती, त्या राज्याने आता किती प्रगती केली आहे त्याचे दाखले त्यांनी या सभेत दिले. आपले राज्य हे देशातील श्रीमंत राज्य असून 17.2 टक्के इतका विकासाचा दर राज्याने गाठला असल्याचे त्यांनी सांगितले. “तुमच्यापुढे योजना आहेत आणि त्याचे लाभ तुम्ही घेत आहात,” असे लक्षात आणून देऊन “जनतेने आमच्या मागे उभे राहावे,” असे आवाहन त्यांनी केले.

 

तेलंगण राष्ट्र समितीच्या या सभेस ‘प्रगती निवेदन सभा’ असे नाव देण्यात आले होते. या नावाप्रमाणेच सरकारने काय काय केले याचा पाढा त्यांनी या सभेत वाचला. “आपल्या पक्षाचा जाहीरनामा तयार करण्यात येत असून आपण लवकरच काही राजकीय निर्णय घेऊन येत आहोत,” असे सूचित करून ही महासभा म्हणजे निवडणुकीची नांदी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या सभेसाठी तेलंगण राष्ट्र समितीने तेलंगण राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यातील सात हजार बसगाड्या भाड्याने घेतल्या होत्या. या परिवहन महामंडळाकडे एकूण 10 हजार,525 बसगाड्या आहेत. ही संख्या लक्षात घेता या सभेमुळे अन्य ठिकाणी प्रवासास जाणाऱ्या रयतेचे किती हाल झाले असतील याची कल्पना करता येईल. पण, त्यांची चिंता, ज्यांच्या हाती सत्ता असते ते कशाला करतील? याच सभेत बोलताना केसीआर यांनी विरोधकांवर अत्यंत जहाल शब्दांमध्ये टीका केली नसली तरी राष्ट्रीय पक्षांवर अप्रत्यक्ष टीका केली. “तेलंगण राज्याशी निगडित निर्णय येथे घ्यायचे की दिल्लीमध्ये?” असा प्रश्न त्यांनी उपस्थितांना केला. विधानसभेच्या तिकिटांवरून काँग्रेसमधील ‘चमचेगिरी’ मोठ्या प्रमाणात दिसून आली. त्यामुळेच तामिळनाडूसारख्या राज्याने दिल्लीप्रधान राजकारण फेटाळून लावले. दिल्लीस्थित पक्षांचे ‘गुलाम’ म्हणून जगायचे की तेलंगणच्या ‘गुलाबी’खाली (तेलंगण राष्ट्र समितीच्या झेंड्याचा रंग गुलाबी आहे) राहणे सुरू ठेवायचे हे आपण ठरवावे, असे आवाहन त्यांनी केले. काँग्रेसने सातत्याने प्रादेशिक अस्मितेची उपेक्षा केल्याने आणि सर्व निर्णयासाठी दिल्लीला धाव घेण्याची आणि दिल्लीची हुजरेगिरी करण्याची सवय लावल्याची किती तिडीक तेथील नेत्यांच्या मनात आहे त्याचे दर्शन या निमित्ताने झाले! केसीआर हे विधानसभा विसर्जित करण्याचा निर्णय 6 सप्टेंबर रोजी घेतील, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. ‘6’ हा आकडा त्यांच्यासाठी शुभ असल्याचे सांगण्यात येते. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ आणि मिझोराम या राज्यांतील विधानसभा निवडणुकांसमवेत आपल्या राज्यातील निवडणुका व्हाव्यात असे त्यांना वाटते.

 

तेलंगण राष्ट्र समितीची ‘प्रगती निवेदन सभा’ बरीच गाजत असली तरी तेलंगण काँग्रेसने त्यावर जोरदार टीका केली आहे. तेलंगण राष्ट्र समितीने जनतेला जी आश्वासने दिली होती, त्यांची पूर्तता करण्यात त्या पक्षास अपयश आल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. ‘प्रगती निवेदन सभा’ घेण्यासाठी 300 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचा आरोपही त्या पक्षाने आणि तेलुगू देसम पक्षाने केला आहे. ‘केसीआर हटाव, तेलंगण बचाव,’ अशी घोषणाही काँग्रेसने केली आहे. तेलंगण राष्ट्र समितीचे नेते केसीआर यांनी गेल्या दोन महिन्यांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तीन वेळा विविध कारणांसाठी भेट घेतली आहे. केसीआर यांचा पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या जवळ गेला असल्याचे सर्वविदित आहेच. आपल्या भेटीत मुदतपूर्व निवडणुकीस पाठिंबा द्यावा, अशी विनंतीही त्यांनी मोदींना केल्याचे सांगण्यात येते. या सर्व घडामोडी लक्षात घेता, लवकरच तेलंगण हे राज्य विधानसभा निवडणुकींना सामोरे जाण्याची चिन्हे दिसत आहेत. तेलंगणमधील निवडणुका एप्रिल-मे मध्ये अपेक्षित आहेत, पण त्याच वेळी लोकसभा निवडणुका होत असल्याचे लक्षात घेऊन केसीआर यांना लगेचच निवडणुका व्हाव्यात, असे वाटते. तेलंगणमध्ये नेमके काय घडणार आहे त्याचे चित्र काही दिवसांतच स्पष्ट होणार आहे.

 

9869020732

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@