जे.कृष्णमूर्ती : एक आनंद मेघ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Sep-2018
Total Views |


 

जे. कृष्णमूर्ती हे आधुनिक काळातील एक थोर तत्त्वज्ञ होते. त्यांच्या विचारांचा गाभा या पुस्तकाच्या रुपाने वाचकांपुढे लेखिकेने ठेवला आहे. या पुस्तकाची अर्पणपत्रिका पुढीलप्रमाणे आहे- मनातील संवेदनशीलता आणि करुणा जपत निरीच्छ, निर्व्याजवृत्तीचा वस्तुपाठ आमच्यापुढे ठेवणाऱ्या आमच्या वडिलांना, नरसिंह गोपाळ केसकर यांना सादर समर्पित.

 

 
जे. कृष्णमूर्ती हे आधुनिक काळातील एक थोर तत्त्वज्ञ होते. त्यांच्या विचारांचा गाभा या पुस्तकाच्या रुपाने वाचकांपुढे लेखिकेने ठेवला आहे. या पुस्तकाची अर्पणपत्रिका पुढीलप्रमाणे आहे- मनातील संवेदनशीलता आणि करुणा जपत निरीच्छ, निर्व्याजवृत्तीचा वस्तुपाठ आमच्यापुढे ठेवणाऱ्या आमच्या वडिलांना, नरसिंह गोपाळ केसकर यांना सादर समर्पित. आरंभी जे. कृष्णमूर्तींचे ग्रंथवाचन केल्यानंतर हे विचार क्लिष्ट आहेत अन् पटण्यासारखेही नाहीत, असा कौल त्यांच्या मनाने दिला. कालांतराने त्यांनी जे. कृष्णमूर्तींची आणखी काही पुस्तके वाचली, त्यांचे चरित्र वाचले आणि मग लेखिकेने अभ्यासूवृत्तीने त्यांच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला. या पुस्तकात एकंदर नऊ प्रकरणे आहेत. ‘शब्द आणि त्याचे आशय’ या पहिल्या प्रकरणात लेखिकेने जे. कृष्णमूर्ती शब्दांचा किती वेगळेपणाने उपयोग करत याचे स्पष्टीकरण दिले आहे. निसर्गाचे आपणही घटक आहोत आणि निसर्गाकडे पाहणे कसे वेगळे असते, याचे सविस्तर वर्णन केले आहे. ‘धर्म आणि धर्मशील मन’ या प्रकरणात जे. कृष्णमूर्तींच्या लेखी ‘धर्म’ या शब्दाचा अर्थ, आशय कसा बदलतो याचे विवेचन केले. वाचकांना हे विवेचन वाचून शब्दसामर्थ्याची वेगळी प्रचिती येईल. ‘ईश्वर-अनामाची अनुभूती’ यात कृष्णजींची ईश्वरविषयक भूमिका व्यक्त झाली आहे.
 

‘शिक्षण जगण्याच्या कलेचे’ या प्रकरणात जे. कृष्णमूर्ती यांचे विचार पुढीलप्रमाणात नोंदवले आहेत. शिक्षण म्हणजे केवळ परीक्षा उत्तीर्ण होणे, पदवी मिळविणे व लग्न करून संसार थाटणे एवढेच नाही, तर त्यात पक्ष्यांचे कूजन ऐकणे, गगनाचे दर्शन घेणे, एखाद्या वृक्षाचे असाधारण सौंदर्य पाहणे, टेकड्यांच्या आकृत्या पाहणे व अंत:करणाने त्यांना साद देणे, त्यांच्याशी प्रत्यक्ष संपर्कात असणे, याही गोष्टी येतात.’ आपण केवळ माहितीचे ओझे वाहत राहतो. एका चौकटीतील, पिंजऱ्यातील जीवन जगत असतो, हे लेखिका स्पष्ट करते. ‘प्रेमासाठी दाही दिशा’ या प्रकरणात कृष्णजींनी ‘प्रेम’ या सर्वव्याप भावनेला ‘धूम्ररहित ज्योत’ म्हटले आहे. ‘प्रेम’ या शब्दाची त्यांना अभिप्रेत असलेली विशालता लेखिकेने अत्यंत उत्कटतेने वर्णन केली आहे. ‘प्रेमा’ला नात्यांच्या चौकटीत अडकवले जाते. मर्यादित केले जाते. परस्परावलंबन म्हणजे ‘प्रेम’ नाही, हे स्पष्ट केले आहे.

 

‘राष्ट्रवाद आणि कृष्णजी’ या प्रकरणात लेखिकेने कृष्णजींच्या विशाल दृष्टिकोनाचा परिचय करून दिला आहे. आधुनिक काळातील ‘राष्ट्रवाद’ आपल्या मनाला किती संकुचित बनवतो. त्यामुळे प्रेमापेक्षा व्यक्ती-व्यक्ती, समाजातील विविध स्तर यांच्यातील दुभंगलेपण कसे वाढवले जाते आहे, याचे वर्णन केले आहे. ‘परस्पर संबंधातील आध्यात्मिकता’ या प्रकरणातही ‘सत्य म्हणजे काय याचा शोध घेणे, हेच धर्माचे स्वरूप आणि तोच मानवी जीवनाचा हेतूया कृष्णजींच्या विधानाचा परामर्श लेखिकेने घेतला आहे. ‘मी आणि माझे’ हा परिघ हा जीवनाला मर्यादा घालतो. अध्यात्म या प्रचलित संकल्पनेला धक्का देणारे, असे कृष्णजींचे तत्त्वज्ञान काहीतरी वेगळे मांडते आहे, त्याचे विवेचन लेखिकेने मुद्देसूद केले आहे. याचे कारण तत्त्वज्ञानाचा गाढा अभ्यास हे आहे.

 

‘ध्यान म्हणजे आत्मभान’ या प्रकरणात ‘ध्यान’ या शब्दाला असलेले महत्त्व आधी स्पष्ट केले आहे. ‘ध्यान’ म्हणजे काय नाही, याप्रमाणेच ‘ध्यान’ म्हणजे काय, यांचेही स्पष्टीकरण दिले आहे. जे. कृष्णमूर्ती यांनी विविध ठिकाणी, वेळोवेळी केलेल्या गटचर्चांचे संदर्भ लेखिकेने दिले आहे. भारतीय तत्त्वज्ञान आणि जे. कृष्णमूर्ती यांचे तत्त्वज्ञान यातील साम्यभेद काही ठिकाणी स्पष्ट केलेले आहे. जे. कृष्णमूर्ती यांच्या तत्त्वज्ञानातील ‘आधुनिकता’ सुलभ, सुबोध अशा पद्धतीने या पुस्तकात आली आहे. जे. कृष्णमूर्ती यांच्या समग्र तत्त्वज्ञानाची माहिती वाचकाला यातून मिळते. एका नव्या विचारधारेचे स्पष्टीकरण करताना लेखिकेची आस्था, अभ्यास, व्यासंगी वृत्ती आढळून येते. ‘सुखदु:ख मीमांसा’ आणि ‘जे. कृष्णमूर्ती : एक आनंदमेघ’ या पुस्तकद्वयांतून वाचकांना खरोखरच अत्युच्च समाधान मिळेल.

 
 

पुस्तकाचे नाव : जे. कृष्णमूर्ती : एक आनंद मेघ

लेखिका : डॉ. मीरा केसकर

प्रकाशक : प्राजक्त प्रकाशन

पृष्ठसंख्या : 256

किंमत : 260

 

- सुनीति पेंडसे
@@AUTHORINFO_V1@@