पुत्रे मित्रवदाचरेत!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Sep-2018
Total Views |

 


 
 
 
 
पौगंडावस्थेतील मुले ‘अबोल’ झाली आहेत अशी तक्रार बहुतांश पालकांकडून येते. या वयातील मुलांचे पालकत्व हा, मुलांनी आखलेल्या रेघेच्या एक पाऊल आत आणि दुसरे बाहेर ठेऊन खेळण्याचा, अवघड खेळ आहे खरा. पण, आपल्या मुलांचा स्वतंत्र वैचारिक विकास आपल्या डोळ्यासमोर होताना अनुभवणे यासारखे दुसरे बक्षीसही नाही. ही कसरत जमत गेली की मग मुलांचे कात्रीत पकडणारे प्रश्नही सक्षमपणे हाताळता येतात.
 
 
आता चौदाव्या वर्षी तरी जबाबदारी यायला नको का? काही सांगायला गेलं की कपाळावर आठी आलीच.”
 

सध्या माझ्याशी तर तिचं अजिबात जमत नाही. वाक्यावाक्याला खटके उडतात आमचे.”

 

आजकाल कुटुंबाबरोबर वेळ घालवायचा म्हणजे बोअरिंग वाटतं चिरंजीवांना.”

 

मोबाईलमध्ये एकदा डोकं खुपसलं की भोवताली काय होतंय याचं भानच नाही उरत.”

 

सध्या याची दोस्तकंपनी मला जरा काळजीत टाकते. बाहेर काय काय घडतंय. पण, मित्रमंडळी हा विषय भलताच सेन्सेटिव्ह आहे.”

 

परवा अभ्यास न करण्यावरून बोलले तर घर सोडून जाईन म्हणाला. मग गप्प बसले. उगीच एक करता एक व्हायचं.”

 

हिचे आणि मैत्रिणींचे गप्पांचे विषय मला फारच धक्कादायक वाटतात. बरं त्यावर काही बोललं की आईला काही कळत नाही असा कटाक्ष टाकून लेक मोकळी होते.”

 

आजकाल एका शब्दात उत्तरं असतात प्रश्नांची. कानाला सतत हेडफोन्स लावलेले. कसं बोलायचं यांच्याशी?”

 

मला दिसतंय गं की ती खूप अस्वस्थ आहे सध्या. पण तिच्याशी संवाद कसा साधावा तेच कळत नाही.”

 

एका ओळखीच्या कुटुंबातल्या पंधरा वर्षाच्या मुलाने आत्महत्या केली गेल्या आठवड्यात. काय कारण असेल तेच कळत नाही. त्याचे आई-बाबा तर पुरते हवालदिल होऊन गेलेत.”

 
 

अशी एक ना अनेक उदाहरणे घरात आणि आजूबाजूला दिसत आहेत. पौगंडावस्थेतील मुले स्वतःभोवती आपले एक विश्व तयार करत जातात. त्यात कुणाला कधी प्रवेश द्यायचा हे स्वतःचं ठरवत जातात. काही वेळा त्यांचे निर्णय बरोबर ठरतात, तर काही वेळा चुकतातही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या वयातील मुलांचे खास असे एक जग तयार होणारच आहे, हे पालकांनी प्रथमतः मनापासून स्वीकारायला हवे. त्यांच्या या विश्वात त्यांचे जे शारीरिक, मानसिक, सामाजिक प्रयोग चाललेले आहेत त्यावर, थोडे अंतर राखून, लक्ष ठेवणे ही पुढची पायरी. ‘प्राप्ते तु षोडशे वर्षे, पुत्रे मित्रवदाचरेत।’ या शिकवणीचा गर्भितार्थ हा आहे की पौगंडावस्थेतील मुलांच्या आणि त्यांच्या पालकांच्या नात्यामध्ये आता प्रेमासोबत, ‘परस्पर आदर’ या भावनेने जाणीवपूर्वक प्रवेश करायला हवाकाही वेळा वरील उक्तीमधील ‘मित्रत्व’ ही भावना पालक चुकीच्या अर्थाने मनावर घेताना दिसतात. मुलांचे मित्र होण्यासाठी स्वतःची दमछाक करून घेतात. एका वर्गमित्राच्या नादाने वाहवत जाऊन स्वतःचे ध्येय्य विसरलेल्या आपल्या चौदा वर्षाच्या मुलीला जेव्हा समुपदेशन सत्रात तिची आई, तिची मैत्रीण होण्याच्या तीव्र गरजेपोटी माझ्यासमोर सांगते, “कोई नही बेटा, मेरे भी तो बहुत सारे दोस्त बॉइज थे। यह होता हैं इस उम्र में...” तेव्हा मला आईला थांबवून आधी तिच्यासमोर ठामपणे काही महत्त्वाचे प्रश्न ठेवावे लागतात. तिला आवर्जून सांगावे लागते की, मुलीशी मित्रत्वाचे नाते जोडणे म्हणजे तिच्या भावनांना, विचाराला आदर देणे; स्वतःबद्दलचा आदर तिच्यापुढे कमी करून ठेवणे नाही.

 

पौगंडावस्थेतील मुले ‘अबोल’ झाली आहेत अशी तक्रार बहुतांश पालकांकडून येते. शाळेतून आल्या-आल्या आपल्या अवतीभवती करत शाळेतील सगळ्या घटना इत्यंभूत कथन करणारे आपले मूल आता मात्र प्रश्न विचारले तरी उपकार केल्यासारखे मोजके उत्तर देते, हा बदल पचवायला पालकांना अवघड जाते. यावेळी ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे हे जाणून पालकांनीही, मोजके आणि नेमके संभाषण साधण्याचे प्रयत्न करायला हवेत. मुलांची विचारप्रक्रिया आता जास्त वेगाने विकसित होत आहे हे लक्षात घेऊन, त्यांना शब्दबंबाळ सल्ले न देता, त्यांच्या विचारांना योग्य चालना मिळेल अशी विचारांची बीजे त्यांच्या वाटेत पेरणे बऱ्याच अर्थांनी प्रभावी ठरते. या वयातील मुलांचे पालकत्व हा, मुलांनी आखलेल्या रेघेच्या एक पाऊल आत आणि दुसरे बाहेर ठेऊन खेळण्याचा, अवघड खेळ आहे खरा. पण, आपल्या मुलांचा स्वतंत्र वैचारिक विकास आपल्या डोळ्यासमोर होताना अनुभवणे यासारखे दुसरे बक्षीसही नाही. ही कसरत जमत गेली की मग मुलांचे कात्रीत पकडणारे प्रश्नही सक्षमपणे हाताळता येतात.

 
 
- गुंजन कुलकर्णी 

(लेखिका नाशिक येथे बाल व कुटुंब मनोविकासतज्ज्ञ आहेत.)

 
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@