कतार विरुद्ध सौदी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

 


 
 
 
 
आखाती देशांमध्ये सुरू असलेले राजनैतिक वाद अद्याप थांबायचं नाव घेत नाही. पुन्हा एकदा अरब देशांनी कतार विरोधात कंबर कसण्यास सुरुवात केली आहे. यावेळी सौदी अरेबियाने आपल्या भोवताली कालवा तयार करून कतारला एक बेट म्हणून वेगळं पाडण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
 

कतार दहशतवादाला खतपाणी घालत असल्याच्या आरोपावरून सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, बहारीन आणि इजिप्त या देशांनी कतारला वेगळं पाडण्याचा निर्णय घेतला होता. २०१७ साली या देशांनी कतारशी व्यावसायिक आणि राजनैतिक संबंधांवरदेखील निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर अमेरिकेने यात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यांच्याही प्रयत्नांना यश मिळाले नव्हतेत्या दरम्यानच कतारशी इतर देशांचे संबंध इतके ताणले गेले होते की, कतारच्या विमानांनादेखील इतर देशांच्या हवाई सीमांमधून उडण्यावर बंदी घालण्यात आली होती. गेल्या वर्षभरापासून कतार विरुद्ध अन्य देश एकवटले असले तरी आता सौदी अरेबियाच्या एका निर्णयाची झळ कतारला नक्कीच बसण्याची शक्यता आहे. सौदी अरेबियाचे राजे मोहम्मद बिन सलमान यांचे वरिष्ठ सल्लागार सऊद अल-कहतानी यांनी नुकतेच सौदी अरेबिया कतारच्या सीमेलगत एक कालवा खणण्यावर विचार करत असल्याचे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे कतारच्या पायाखालची वाळू तर नक्कीच सरकली असेल, पण त्याचे इतर देशांवरही काय परिणाम होतील, हे येत्या काळात पाहावे लागणार आहे. कालव्यामुळे त्या ठिकाणच्या भौगोलिक परिस्थितीत मोठ्या प्रमाणात बदल होणार आहेत. ‘सब्क’ या शाही कुटुंबाच्या अगदी जवळच्या मानल्या जाणाऱ्या संकेतस्थळाने याबाबत माहिती दिली होती.

 

कालवा खणण्यासाठी सौदी अरेबियाने अनेक कंपन्यांशीदेखील चर्चा केल्याचे समोर आले आहे. हा कालवा ६० किलोमीटर लांब आणि २०० मीटर रूंद असणार आहे. यासाठी २.८ अब्ज रियाल म्हणजेच भारतीय चलनात याची किंमत पाच हजार ३१५.२५ कोटी इतकी असणार आहे. त्यातच एक महत्त्वाची बाब म्हणजे या कालव्याचा एक विशिष्ट भाग आण्विक कचरा टाकण्यासाठीही वापरला जाणार आहे. या कालव्यामुळे कतार हा देश वेगळा पडणार असून भविष्यात त्याचे कतारलाही मोठे परिणाम भोगावे लागण्याची शक्यता आहे. जर ही योजना प्रत्यक्षात आली तर कतार आपल्या मुख्य भूमीपासूनही वेगळा पडणार असून यामुळे कतार आणि अन्य देशांमधील संबंध अधिकच ताणले जाण्याची शक्यता निर्माण होईल. सध्या सौदी अरेबिया यासाठी प्रयत्नशील असला तरी कतारने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. अरब-आखाती-सुन्नी जगातील अंतर्गत राजकारण आणि व्यवस्था कतारने अक्षरश: ढवळून काढली, हे कतारवरच्या बहिष्काराचे मुख्य कारण आहे. ‘मुस्लीम ब्रदरहूड’, ‘हमास’ आणि ‘हेझबुल्ला’ या तीन दहशतवादी संघटनांना कतारकडून पैसे आणि शस्त्रास्त्र पुरवली जातात, असा आरोप अरब देशांचा आहे. मात्र, कतारचे हात त्याने बरबटल्याचे कोणतेही पुरावे त्यांच्याकडे नाहीत. त्यातच सौदी अरेबियाही दहशतवाद्यांना मदत करत असतो हे काही लपलेली गोष्ट नाही. अल कायदाला असेल किंवा इराक, सीरिया, येमेन या ठिकाणच्या शिया विरोधी दहशतवादी गट असतील त्यांना सौदीने मदत केलीच आहे. शिया-सुन्नी गटांमधील मारामारी हे या कोंडीमागचे मुख्य कारण आहे, असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. सौदी, इजिप्त, बहारीन, येमेन इत्यादी सुन्नी देशांना आखाती-अरब प्रदेशाचे नायकत्व जवळचे वाटते, तर कतारसारखा देश इराणला मदत करत असल्यामुळे त्यांची कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या देशांची आर्थिक बाजूही कोंडीचे हेच कारण आहे. कतारमध्ये जगातील सर्वात मोठा नैसर्गिक वायूचा साठा आहे, तर सौदी, कुवेत आदी देशांमध्ये तेलाचे साम्राज्य आहे. तेलाच्या किंमतींना नैसर्गिक वायूच्या किंमतींमुळे नुकसान होण्याची शक्यता असल्याने इतर देशांची धडपड सुरू असल्याचे समोर येत आहे. अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाची दुतोंडी भूमिका सर्वांच्याच परिचयाची आहे आणि त्याची प्रचिती या ठिकाणीही दिसून येते. एकीकडे कोंडीला समर्थन, मग विरोध आणि अशातच कतारमध्ये मोठा लष्करी तळ उभारायचा. मात्र, आता बेट म्हणून वेगळे पाडल्यानंतर कतार समोर आणि अन्य देशांसमोर कोणती आव्हाने उभी राहतील हे पाहावे लागणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@