शबरीमलात ‘ती...’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Sep-2018
Total Views |
 
 

हजारो वर्षांपासून निरनिराळ्या पंथ-संप्रदाय-धर्मांच्या अनुयायांनी, परकीय आक्रमकांनी आपल्यावर शेकडो वेळा आक्रमणे केले, तरीही हे सर्वच आघात सहन करून हिंदू धर्म टिकून राहिला. कारण आक्रमणाला तोंड देण्याचे सामर्थ्य तर हिंदूंमध्ये होतेच पण नवे ते स्वीकारण्याची आणि अनावश्यक, कालबाह्य ते टाकून देण्याची हिंदू समाजाची मानसिकता. शबरीमला मंदिरातील महिलांच्या प्रवेशाबाबत न्यायालयाने दिलेल्या निकालाकडे याच दृष्टीने पाहण्याची आवश्यकता आहे.

 

महिलांना मंदिरात प्रवेश नाकारणे घटनाबाह्य असल्याचा ऐतिहासिक निर्वाळा देत सर्वोच्च न्यायालयाने आज कर्मठ-सनातनी प्रवृत्तीच्या धर्ममार्तंडांना चपराक लगावली. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा निर्णय अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण तर आहेच, पण महिलांविषयी हजारो वर्षांपासून बाळगलेल्या पावित्र्य-अपावित्र्याच्या समजुतींना धक्का देणाराही ठरतो. म्हणूनच सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निर्णयाचे केवळ महिलांनीच नव्हे, तर समाजातल्या सर्वच स्तरांतील लोकांनी स्वागत केले पाहिजे. हा केवळ शबरीमला या एका मंदिरातील महिलांच्या प्रवेशावर दिलेला निकाल नसून आतापर्यंत महिला म्हणून समाजातल्या निम्म्या लोकसंख्येला नाकारले गेलेले अधिकार, हक्क मिळवून देणाराही आहे. मासिक पाळी सुरू असलेल्या महिलांच्या मंदिर प्रवेशबंदीचा राज्यघटना आणि धर्म अशा दोन्ही अंगांनी विचार करता ती अन्यायी प्रथा असल्याचेच सुजाण आणि विवेकी जनांच्या लक्षात येईल, पण बुरसटलेल्या चाली-रीती-प्रथा-परंपरा-रुढींना कवटाळून बसलेल्यांच्या मनात आम्ही म्हणतो तोच न्याय, हीच धारणा बळावलेली असल्याने त्यांनी कधी याचा विचार केला नाही. केवळ महिला असल्याने देवाची, ईश्वराची आराधना, प्रार्थना, पूजा-अर्चना नाकारली गेली व धर्मधुरिणांनी, धर्ममार्तंडांनी याला समर्थन दिले. परिणामी आपले म्हणणे ऐकणारे कोणीही नाही, अशी भावना निर्माण झालेल्यांनी सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण नेले व त्यातूनच न्यायालयाला इथे हस्तक्षेप करावा लागला. देशात १९५० साली राज्यघटना स्वीकारण्यात आली व सर्व नागरिकांना समान अधिकार देण्यात आले. स्पृश्य-अस्पृश्य, जातीपातीच्या नावाने केला जाणारा भेदाभेद संविधान लागू झाल्याने संपुष्टात आला. मात्र, घटनाधिष्ठित राज्य येऊनही मध्ययुगीन काळात जगणार्‍यांना त्याचा अर्थ कळला नाही व त्यांनी शेकडो वर्षांपूर्वींचे नियम-कायदे पाळण्यालाच प्राधान्य दिले. गेल्या ७० वर्षांत अशा लोक व परंपरांविरोधात आंदोलने, चळवळीही झाल्या व ज्यांना हक्क-अधिकारांपासून डावलण्यात आले होते, त्यांना ते मिळालेही. आजच्या महिलांच्या शबरीमला मंदिर प्रवेशासंबंधीच्या प्रकरणाकडेही याच दृष्टीने पाहायला हवे.

 

शबरीमला मंदिरात प्रवेश मिळावा, ही मागणी करणारे सर्वच लोक हे ‘हिंदू’ या एकाच धर्माचे अनुयायी आहेत. काळाच्या ओघात हिंदूंमध्ये अनेकानेक वाईट प्रथा अस्तित्वात आल्या आणि हिंदूंच्या लवचिक-सहिष्णु-परिवर्तनशील भूमिकेमुळे त्या वेळोवेळी मागेही पडल्या. पण, एकाच धर्माच्या अनुयायांना आपल्या देवतांच्या पूजा-अर्चनेचा अधिकार नाकारणे हे आपणच आपल्यात भेद, दुही निर्माण करण्यासारखेच. ही ऐतिहासिक चूक आपल्या पूर्वजांकडून झाली आणि ती निस्तारण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर येऊन पडली. महिलांच्या मंदिर प्रवेशबंदीचे समर्थन करणार्यांनी याचा नक्कीच विचार केला पाहिजे. कारण, धर्माच्या सर्वच अनुयायांना मंदिरात आपल्या आराध्य दैवताची आराधना करण्याची परवानगी देणारा किंवा अशा परवानगीची वेळच येऊ न देणारा आपला समावेशक धर्म आहे, ज्याला मूठभर कर्मठ-सनातनी व आपापल्या अंधानुमतांनाच चिकटून बसलेल्यांनी संकुचित केले. सर्वोच्च न्यायालयाचा आजचा निर्णय अशा संकुचित मानसिकतेच्या लोकांना दणका देणारा आणि देव व भक्त यांच्यामध्ये लुडबूड करणार्यांना त्यांची जागा दाखवून देणाराच म्हटला पाहिजे. समाजातील सर्वच नागरिक एकाच देवाची लेकरे आहेत आणि सर्वच देवदेवता एकाच ईश्वराची रूपे आहेत, असे मानणार्‍या हिंदू धर्मात माणसाच्या लिंगावरून केला जाणारा भेदभाव, पाळल्या जाणार्‍या अनिष्ट प्रथा या निर्णयामुळे मिटतील. विशेष म्हणजे, हा निर्णय फक्त शबरीमला मंदिरापुरता मर्यादित न राहता इतरही धर्मस्थळे, मंदिरस्थळी लागू व्हावा व सर्वच नागरिकांनी मोठ्या मनाने स्वीकारावा. स्त्रीला देवीच्या रूपात पुजणार्‍यांनी आता तिला जिथे जिथे प्रवेश नाकारला जात होता, तिथे तिथे कोणताही किंतु-परंतु न बाळगता मुक्त प्रवेश करू द्यावा. त्यातच समाजाच्या एकसंधतेचे, एकरूपतेचे हित आहे.

 

महिलांच्या मासिक पाळीबद्दल हिंदू जनमानसात विटाळाची, अपावित्र्याची भावना पूर्वापार चालत आलेली आहे. आधुनिक विज्ञानाने मात्र मासिक पाळी नैसर्गिक असल्याचे आणि त्यात कोणतेही वाईट, विचित्र, वावगे नसल्याचे सिद्ध केले. १५-२० वर्षांपूर्वीपर्यंत तर मासिक पाळी आलेल्या महिलेल्या घरातल्या एका कोपर्यात बसवत असत आणि तिच्याकडे गलिच्छ मानसिकतेनेच पाहिले जात असे. नजीकच्या काळात मात्र यात मोठा बदल झाला असून अशी प्रथा बहुतांश घरातून हद्दपारही झाली. शबरीमला मंदिरातील मासिक पाळी सुरू असलेल्या महिलांच्या प्रवेशबंदीकडे याच दृष्टीने पाहायला हवे. ज्या देवाने आपल्या सर्वांना जन्म दिला, असे आपण मानतो, त्याच देवाने महिलांच्या शरीरात मासिक पाळीची व्यवस्था केली, मग त्यानेच निर्माण केलेली व्यवस्था अपवित्र कशी असू शकेल? दुसरी गोष्ट भगवान अय्यप्पा ब्रह्मचारी असल्याचे दाखले देत गोंधळ घालणारेही कितीतरी लोक आहेतच. अशांनी एकाच प्रश्नाचे उत्तर द्यावे, ते म्हणजे व्यक्तीचा जन्म होतो स्त्रीदेहातूनच. मग जन्म होताना झालेला स्पर्श चालतो, त्या स्पर्शाने व्यक्तीचे ब्रह्मचर्य नष्ट होत नाही का? सर्वोच्च न्यायालयाने आज असेही सांगितले की, व्यक्तीची देवाबद्दलची आस्था, श्रद्धा शारीरिक वा जैविक आधारावर परिभाषित करता येणार नाही. म्हणजेच व्यक्तीची शारीरिक, जैविक स्थिती कशीही असो, तिला देवावर श्रद्धा-आस्था ठेवता येईल आणि त्याची पूजा-अर्चनाही करता येईल. व्यक्तीच्या धर्मस्वातंत्र्यावर कोणीही आडकाठी आणू शकणार नाही. शबरीमला मंदिरात प्रवेशाचा अधिकार मागणारे हिंदूच असून तो कोणताही वेगळा समुदाय नाही, हादेखील मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. म्हणजे आपल्याच धर्मातला एक घटक अशी मागणी करतोय आणि तिथे पाळली जाणारी प्रथा ही काही हिंदूंंची अनिवार्य धार्मिक प्रथा नाही, तर कालौघात रूढ झालेली परंपरा आहे. न्यायालयाच्या निर्णयाकडे याच आधारावर पाहत सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद द्यायला हवा.

 

न्यायालयाच्या निर्णयावर टीका करणार्‍यांकडून एक मुद्दा नेहमीच उपस्थित केला जातो. कोणतीही सुधारणा फक्त हिंदूंनीच करावी का, अन्य मुस्लीम, ख्रिस्तीधर्मीय लोक कधी सुधारणांच्या हाकेला ओ देणारच नाहीत का, हा तो मुद्दा. पण इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, कोणाला किती काळ आपापल्या धर्मातल्या अन्यायी प्रथांच्या बजबजपुरीत खितपत पडायचे, हे त्यांचे त्यांना ठरवू द्यावे. मुद्दा आपला आहे आणि आपण अशा अश्मयुगीन, मध्ययुगीन प्रथा किती काळ पाळत बसणार? याची उत्तरे आपणच शोधली पाहिजेत. म्हणूनच आज आपल्याला अशा अन्याय्य प्रथांना झुगारून देत माणूस होण्याची संधी मिळत असेल, तर ती नाकारणे योग्य ठरणार नाही. उलट अशा प्रकारची आणखी पावले किती लवकरात लवकर उचलता येतील, या दृष्टीने विचार करणेच श्रेयस्कर ठरेल. हिंदू धर्माचे वैशिष्ट्य म्हणजे हजारो वर्षांपासून निरनिराळ्या पंथ-संप्रदाय-धर्मांच्या अनुयायांनी, परकीय आक्रमकांनी शेकडो वेळा आपल्यावर आक्रमणे केले, तरीही हे सर्वच आघात सहन करून हिंदू धर्म टिकून राहिला. कारण, आक्रमणाला तोंड देण्याचे सामर्थ्य तर हिंदूंमध्ये होतेच, पण नवे ते स्वीकारण्याची आणि अनावश्यक, कालबाह्य ते टाकून देण्याची हिंदू समाजाची मानसिकता. हिंदूंच्या याच मानसिकतेमुळे जगातल्या प्राचीन संस्कृती आक्रमणकर्त्यांच्या वारांनी कोसळून पडत असताना आपण आजही ठामपणे उभे आहोत. बदलांना आपल्या कवेत घेणे हे हिंदूंचे वैशिष्ट्य असल्याने हिंदू धर्माचा प्रवाह नेहमीच काळाबरोबर पुढे धावत राहिला. आजच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने व त्याच्या स्वीकाराने हिंदूंचा हाच प्रवाहीपणा ठळकपणे दिसला, जो आणखी हजारो वर्षे टिकून राहण्याची शक्ती दर्शवतो.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@