माणूसपण जपले नाही

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Sep-2018   
Total Views |


आपल्या मुलाला वाढदिवसाची भेट म्हणून परभणीच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी पंढरीनाथ शिंदे यांनी स्वत:च्या मुलाचा वाढदिवस स्मशानात साजरा केला. अर्थात व्यक्तिस्वातंत्र्याचा आदर असल्याने वाढदिवस स्मशानात करोत वा कुठेही साजरा करोत, त्या आचारविचार स्वातंत्र्याचा आदर करायला हवा, पण वाटते की समाजात राहणार्‍या कोणत्याही व्यक्तीने समाजाच्या भावनांचा थोडातरी विचार करावा की नाही? कितीही म्हटले की, श्वास घेणे आणि श्वास घेणे बंद होणे यामधला क्षूद्र प्रवास म्हणजे जीवन आहे. तरीसुद्धा या प्रवासात मानवी भावभावनांचे अनमोल बंध बांधले जातातच. माणूस मेल्यानंतर त्या मेलेल्या माणसासाठी सगळे संपते, पण त्या माणसाशी संबंधित असलेल्यांच्या भावविश्वातून मेलेला माणूस संपत नाही. स्मशानात आपल्या जिवाभावाच्या व्यक्तीचे दहन होते. ते स्मशान त्यांच्यासाठी दुःखद आणि गूढच असते. त्या स्मशानात आनंदोत्सव साजरा करणे म्हणजे त्या स्मशानात दहन केलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांच्या भावनांचा, दुःखाचा अपमानच आहे. वाढदिवस साजरा करताना अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांनी स्मशानात केक कापला. जेवणावळी उठवल्या. त्यावेळी भलेही त्यांचे टिपीकल उत्तर असेलच की, लोक स्मशानात जायला घाबरतात. त्या अनुषंगाने येणारी भूतबाधा, करणीमोहनी, काळी जादू या अंधश्रद्धेतून लोक बाहेर यावेत. त्यांची भीती दूर व्हावी म्हणून वाढदिवस स्मशानात साजरा केला. प्रश्न असा आहे की, एक वाढदिवस साजरा करून लोकांच्या मनातली अंधश्रद्धा दूर होईल का? नाहीच. तसेही समाजात असंख्य अंधश्रद्धा आहेत. कचरा, हागणदारी या तर मुख्यच समस्या. जर या लोकांनी कचराकुंडी साफ करून किंवा हागणदारी स्वच्छ करून तिथे वाढदिवसाचा केक कापून जेवणाच्या पंक्ती झोडल्या असत्या तर गोष्ट वेगळी. कारण समाजाला सुधरवायचे असेल तर समाजाच्या बाहेर राहून सुधारणे कोणालाही शक्य झाले नाही. माणसाच्या बुद्धीने चंद्र जिंकला पण मनातले चांदणे आजही फुलते, ते माणसाच्या भावभावनांच्या हिंदोळ्यावरच. त्यामुळेच श्रद्धा-अंधश्रद्धांच्या पारड्यात कुणाच्या भावना दुखवू नये, हेच खरे माणूसपण आहे. हे माणूसपण अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकार्‍याने जपले नाही.

 

वैचारिक दहशतवाद कुणाचा?

काही लोक धर्मसुधारणेच्या नावावर धर्माची निंदा, श्रद्धांची टिंगलटवाळी आणि त्याद्वारे लोकांच्या भावना दुखावतात. मात्र, त्यावर कुणीही विचारणा केली की, लगेच कोल्हेकुई उसळते हिटरलचे राज्य आहे, मनूचे राज्य आहे. विचारस्वातंत्र्य नाही वगैरे वगैरे. हे सगळे करताना ही मंडळी पुरोगामित्वाच्या आड समाजात वैचारिक दहशतवाद माजवतात. त्यांच्या मतानुसार समाजाने जगलेच पाहिजे, हा यांचा अट्टाहास असतो. बरं हा कंपू दुसरी बाजू समजून घ्यायलाच तयार नसतो. ते खरोखरच अंधश्रद्घा निर्मूलन करत असतील तर चांगलेच आहे. पण जर एखाद्याच्या श्रद्धेने कुणाचे नुकसान होत नसेल तर त्या निरुपद्रवी श्रद्धेला विरोध करायचे यांना कारण काय? यांना विशिष्ट गोष्टीला अंधश्रद्धा मानण्याचा अधिकार आहे तसा दुसर्यालाही त्या विशिष्ट गोष्टीविषयी श्रद्धा बाळगावी की बाळगू नये, हा वैयक्तिक अधिकार आहे. असो, ज्याला समाजाला सुधरवायचे आहे, त्याने समाजाला दुखवून समाज का त्यांचे म्हणणे मानणार आहे? याबाबत स्वामी विवेकानंदांचे विचार आठवतात. ते म्हणतात, ”समाज हे एक बोट आहे. या बोटीमध्ये पाणी शिरले म्हणून कोणी जर बोटीच्या एका टोकाला जाऊन दुसर्‍या टोकाला ते पाणी जाण्यासाठी छिद्र पाडत असेल तर त्याने काही क्षणापुरते पाणी बोटीतून जाईल.पण त्यानंतर त्याच छिद्रातून बोटीमध्ये इतके पाणी भरेल की बोट तर बुडेलच आणि त्या बोटीला वाचवण्यासाठी बोटीला छिद्र पाडणारेही बुडतील.” आज पुरोगामी बुरख्याआड समाज आणि धर्माचे भले चिंतणार्‍यांचे पण असेच आहे. समाजसुधारणेच्या आड त्यांनी श्रद्धांवर टीका करताना समाजाची सांस्कृतिक, भावनिक हानी केली तर ती हानी केवळ त्या समाजाची नाही तर, समाजाच्या सकारात्मक श्रद्धांवर आघात करणार्‍यांचीही आहे. दुसरीकडे घटनेने श्रद्धा बाळगण्याचा आणि त्यानुसार जगण्याचा हक्क सगळ्यांना दिला आहे. सगळ्यांनाच अंधश्रद्धेच्या चष्म्यातून पाहणार्‍यांनी सकारात्मक श्रद्धेचे बळही अनुभवावे,असे वाटते. पण त्यांनी श्रद्धेचे बळ अनुभवावेच, असा मुळीच हट्ट नाही. कारण भारत प्रजासत्ताक आहे. इथे कुठलाच दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही अगदी वैचारिक दहशतवादही...मग तो श्रद्धेचा असू दे वा अंधश्रद्धेचा.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
 
@@AUTHORINFO_V1@@