मातीचे सोने करणारा ‘परीस’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Sep-2018   
Total Views |


 
 

दहावीत असताना केवळ अडीच हजार रुपयांत संगणक बनवणार्‍या जयंत परब याने आज देशातील बेरोजगार आयटी अभियंत्यांना नोकर्‍या देण्याचे ध्येय निश्चित केले आहे. शिक्षणात सुरुवातीपासूनच सुमार कामगिरी असलेल्या जयंत परब याचे मन फारसे शाळेत रमले नाही. 

 


दहावीत नापास झाल्यावर वडिलांच्या संगणक दुरुस्तीच्या व्यवसायात तो मदत करू लागला. अभ्यासात अपयश आल्यावर खचून जाणार्‍या मुलांमधील जयंत नक्कीच नव्हता, हे त्याच्या नंतरच्या वाटचालीवरुन स्पष्ट झाले. अवघ्या २० वर्षे वयाच्या जयंतने स्वत:च्या व्यवसायाच्या सुरुवातीसाठीची प्रक्रियाही सुरू केली असून ई-कचर्‍यापासून विविध इलेक्ट्रॉनिक वस्तू बनवण्याचे काम तो सुरू करणार आहे. त्यानुसार येत्या काळात सुमारे १० ते १५ माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील अभियंत्यांना रोजगार देण्यासाठी व्यवसायाचे मॉडेल तो तयार करत आहे. सुरुवातच अपयशापासून झाल्याने जयंतने अपयशाशी सामना कसा करावा याचे बाळकडू शाळेतच मिळाले. दहावीत नापास झाल्यावर अनेकांकडून बोलणी खावी लागली. घरच्यांनीही बोल लावले; पण तुमचे ध्येय निश्चित असेल आणि निश्चय ठाम असेल, तर आपोआप तुमचा प्रवास ध्येयाच्या दिशेने सुरू होतो. जयंतचेही तसेच झाले. त्याने वडिलांच्या व्यवसायात मदत करण्यास सुरुवात केल्यानंतर फावल्या वेळेत विविध संगणक प्रशिक्षण केंद्रांतून कॉम्प्युटर हार्डवेअरचा कोर्स पूर्ण केला. काही काळ जयंतचे वडील रिक्षाचालक होते. त्यानंतर जोडधंदा म्हणून संगणक दुरुस्तीचा व्यवसाय सुरू केला. काही वर्षांनी पूर्णवेळ ते यात उतरले.

 

वडिलांच्या व्यवसायात हातभार लावणे भाग होते. त्यातूनच निर्मिती झाली एका संगणकाची, जो परब यांच्या कंपनीतील ई-कचर्‍यापासून बनला होता. शाळा, महाविद्यालये, कार्यालये आणि विविध संस्थांमधील जुने संगणक आणण्यासाठी जात असत. कालांतराने परब यांच्या दुकानात येणार्‍या संगणक, लॅपटॉप, मोबाईल दुरुस्ती आदी वस्तूंपासून मोठ्या प्रमाणावर ई-वेस्ट जमू लागला. संगणक प्रशिक्षण घेत असल्याने या वस्तू कचर्‍यात टाकायच्या तरी कशा, असा प्रश्न जयंतला पडला होता. या ई-कचर्‍यातून संगणकाचे सुटे भाग निवडून एक संगणक बनवला. याचा खर्च आला केवळ अडीच हजार रुपये. दोन जीबी रॅम, १२८ जीबी हार्डडीस्क त्यासह वायफाय, ब्ल्युटूथ, स्पीकर आणि १२ इंच स्क्रिन असे या संगणकाचे स्वरुप आहे. गेली तीन वर्षे हा संगणक सुस्थितीत सुरू आहे. जयंतने संगणकामधील तंत्रज्ञान अद्यावत केले. केवळ हार्डडिस्कच्या किंमतीत संगणक उपलब्ध करून देणार्‍या जयंतवर त्यावेळी कौतुकाचा वर्षाव झाला. कालांतराने दहावीचे शिक्षण पूर्ण करून त्यांने पुढील शिक्षणाकडेही वाटचाल सुरू केली. विद्यमान खा. पूनम महाजन यांची भेट घेत त्याने ई-कचर्‍याची संकल्पना मांडली. खा. पूनम महाजन यांनी जयंतबद्दल गौरवोद्गार काढत त्याच्या संकल्पनेचे कौतुकही केले. त्याच्या ई-कचरा निर्मूलनाच्या क्षेत्रातील राज्य सरकारने ‘महाराष्ट्र हरीत सेने’चे सदस्यत्व त्यांना दिले आहे. मुंबईतील असल्फा गावात एका छोट्याशा कुटुंबात राहणारा जयंत हा नव्या उद्योजकांना प्रेरणा देणारा आहे. आपल्यापेक्षा उच्चशिक्षित आणि बेरोजगार युवकांना नोकरी देण्यासाठी ई-कचर्‍यापासून उपयुक्त वस्तूंची स्वस्त किमतीत निर्मिती करणारी एक संस्था सुरू करण्याचा मानस जयंतने समोर ठेवला आहे.
 

“ग्राहकांना सर्वोत्तम सेवा द्या, त्यातूनच ते तुमच्याशी कायम जोडले जातील,” असा मंत्र तो नेहमी सांगतो. संगणक असो किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू, ज्या कंपनीची सेवा उत्तम त्यावर ग्राहक जास्त विश्वास ठेवतात. त्यामुळे चांगली सेवा देण्यावर जयंत भर देतो. देशात स्वच्छता अभियानाची सुरुवात मोठ्या व्यापक स्तरावर झाली. सध्या स्वच्छता पंधरावडाही सुरू आहे. मात्र, सध्या ई-कचर्‍याच्या विल्हेवाटीबाबत लोकांमध्ये अज्ञान आहे. जयंतने ऑनलाईन व्यासपीठावर, समाजमाध्यमांद्वारे जनजागृती सुरू केली आहेे. त्याच्या संकल्पनेबद्दल माहिती देणार्‍या चित्रफिती फेसबुक व यूट्यूबद्वारे लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम त्याने सुरू केले आहे. ई-कचर्‍याच्या आधारे देशात एक नवा उद्योग सुरू होईल, अशी आशा जयंतला आहे. स्टीव्ह जॉब्सला प्रेरणा स्थान मानणार्‍या जयंतने आत्तापर्यंत वडिलांच्या व्यवसायात हातभार लावून स्वतःच्या उद्योगाच्या निर्मिती प्रक्रियाही सुरू केली आहे. घाटकोपर भागात स्वतःची नवी कंपनी सुरू करण्यासाठी भांडवल उभारणी आणि अन्य कामे मार्गी लावण्यात जयंत सध्या व्यस्त आहेत. खा. पूनम महाजन यांनीही जयंतच्या संकल्पनेचे कौतुक करून उद्योग उभारणीसाठी सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासनही दिले आहे. येत्या काळात संगणक हार्डवेअर क्षेत्रात येणार्‍या विद्यार्थ्यांसाठी आणि नवउद्योजकांसाठी जयंत एक प्रेरणास्थान आहे. त्याच्या या कामासोबत विविध सामाजिक जबाबदार्‍याही तो पार पाडत असतो. जयंत या क्षेत्रात येणार्‍या विद्यार्थ्यांंना मार्गदर्शनही करतो. कौशल्य प्रशिक्षणासाठी त्याने विद्यार्थ्यांना प्रशिक्षणही सुरू केले आहे. व्यवसाय येऊ पाहणार्‍या उद्योजकांना प्रशिक्षण देण्याचे काम तो वडिलांमार्फत करतो. स्वत:चा व्यवसायच पुढे चालू ठेवायचा, असे ध्येय मनात ठेवणारा जयंत या क्षेत्रातील विद्यार्थ्यांनाही हाच संदेश देतो. नव्या संकल्पनांची निर्मिती करा. चाकोरी बाहेर राहून विचार करा. ग्राहकाभिमुख सेवा देण्याचा विचार करून व्यवसायाच्या कक्षेची निर्मिती करा,” असे सांगत धाडसाने त्यात उतरण्याबाबत त्यांचा आग्रह आहे. सरकारकडे रोजगार मागण्यापेक्षा देशात रोजगारनिर्मिती करा, असाही मंत्र तो तरुणांना देतो.                - तेजस परब

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@