मायावती : राजकारणातील नवे सत्ताकेंद्र!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Sep-2018
Total Views |

 
 
बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा मायावती यांचे नशीब सध्या जोरात आहे. राजकारणाच्या मुख्य प्रवाहातून काहीशा बाजूला फेकल्या गेलेल्या मायावती पुन्हा राजकारणाच्या केंद्रस्थानी येत आहेत. विरोधी पक्षांच्या मोदीविरोधाच्या आणि त्यामुळेच महाआघाडीच्या राजकारणात मायावती यांचे महत्त्व वाढत आहे. दलितांवरील वाढत्या अत्याचाराच्या मुद्यावरून मायावती यांनी आपली राज्यसभा सदस्यत्वाची मुदत संपण्याच्या वर्षभर आधी खासदारकीचा राजीनामा दिला होता. अशा मायावती यांच्या नावाची आता पंतप्रधानपदासाठीही चर्चा होत आहे.
 
 
 
देशात हाताच्या बोटावर मोजता येणार्या राष्ट्रीय पक्षांमध्ये मायावती यांच्या बसपाचा समावेश आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत त्यांचा प्रभाव कमी झाला की काय, असे वाटायला लागले होते. बसपा हा राष्ट्रीय पक्ष असला तरी तो उत्तरप्रदेशपुरताच मर्यादितही झाला आहे. गेल्या तीन निवडणुकांत उत्तरप्रदेशात बसपाला सातत्याने पराभवाचे तोंड पाहावे लागले. 2012 मध्ये उत्तरप्रदेशात झालेल्या विधानसभा निवडणुकीत बसपाचा पराभव झाला. 2014 मधील लोकसभा निवडणुकीत तर त्यांच्या पक्षाला उत्तरप्रदेशात आपले खातेही उघडता आले नव्हते! 2017 मध्ये उत्तरप्रदेशातील विधानसभा निवडणुकीत बसपाचा पुन्हा पराभव झाला आणि बसपा संपली, अशी चर्चा सुरू झाली.
 
मायावती या हार मानणार्या नेत्या नाही, त्या योग्य संधीची वाटत पाहात होत्या. आपल्या राजकीय अस्तित्वासाठी उत्तरप्रदेशमध्ये मायावती यांच्या बसपाला आणि अखिलेश यादव यांच्या सपाला आघाडी करावी लागली. या आघाडीचा चांगला परिणाम दिसून आला. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या गोरखपूर आणि फुलपूर मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत बसपाने सपाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. आश्चर्य म्हणजे या दोन्ही ठिकाणी भाजपा उमेदवारांचा पराभव झाला आणि अचानक मायावती यांचे राजकारणातील अच्छे दिन सुरू झाले.
 
 
 
उत्तरप्रदेशपाठोपाठ अन्य राज्यांतही मायावती यांच्या बसपाशी आघाडी करण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ सुरू झाली. आपल्या राजकीय अस्तिवाची लढाई लढणार्या कॉंग्रेसला तर मायावती यांच्या रूपात जादूचा दिवाच सापडला होता! मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसने बसपाशी आघाडी करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या. मात्र, मायावती या अतिशय धूर्त आणि चलाख अशा नेत्या आहेत. आपल्यासोबत येण्याशिवाय अन्य राजकीय पक्षांना पर्याय नाही, याची पूर्ण कल्पना असल्यामुळे मायावती यांनी सन्मानजनक जागा मिळाल्याशिवाय आघाडी नाही, अशी भाषा सुरू केली.
 
मायावती यांचा सन्मान किती जागांमध्ये सामावला आहे, हे त्याच सांगू शकतात. त्यामुळे उत्तरप्रदेशात सपाचे अखिलेश यादव, मायावती यांच्या बसपाशी आघाडी करण्यासाठी उतावीळ झाले असताना आणि त्यासाठी आपल्या हक्काच्या काही जागा सोडण्याची त्यांची तयारी असताना उत्तरप्रदेशात सपा आणि बसपा यांची आघाडी होईल काय, याचे उत्तर फक्त मायावती यांच्याजवळ आहे! दुसरीकडे, मायावती यांनी छत्तीसगडमध्ये कॉंग्रेसला मोठा धक्का दिला आहे. विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसशी आघाडी न करता अजित जोगी यांच्या जनता कॉंग्रेससोबत मायावती यांच्या बसपाने आघाडी केली आहे आणि याची किंमत मायावती यांच्या पंतप्रधानपदाच्या दावेदारीला पाठिंबा देऊन जनता कॉंग्रेसने तातडीने चुकवलीही. मात्र, मायावती शेवटपर्यंत आपल्यासोबत राहतीलच, याची अजित जोगी यांनाही खात्री नाही.
 
 
 
मध्यप्रदेशात आता मायावती काय करणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र, मध्यप्रदेशातही मायावती आपला हत्ती कॉंग्रेसच्या पंजात देतील, असे वाटत नाही. मायावती कधी काय करतील, याचा नेम नाही. मायावती या लहरी आणि बेभरवशाच्या राजकारणी आहेत. राजकारणातील त्यांची विश्वसनीयता शून्य अशी आहे. मायावती यांनी एखाद्या राजकीय पक्षाशी आघाडी केली तरी ती त्या टिकवतील, याची कोणतीही खात्री नाही. मायावती आपल्या राजकीय स्वार्थासाठी कोणत्याही पक्षाशी आघाडी करू शकतात, मात्र आपला राजकीय स्वार्थ पूर्ण झाला की आघाडी तोडण्यासाठी त्या एका क्षणाचाही विलंब लावत नाही.
भाजपाने याचा चांगलाच अनुभव घेतला. उत्तरप्रदेशात काही वर्षांपूर्वी बसपा आणि भाजपा एकत्र आले होते. अडीच-अडीच वर्षं सत्ता वाटून घेण्याचा करार त्यांच्यात झाला होता. त्यानुसार मायावती पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्या. मायावती यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपल्यावर भाजपाचा मुख्यमंत्री होण्याची वेळ आली असता मायावती यांनी भाजपाच्या सरकारला पाठिंबा देण्याचा आपला शब्द पाळला नाही. मुळात राजकारणात असो की अन्य कोणत्याही क्षेत्रात शब्दाला अनन्यसाधारण महत्त्व असते. तुम्ही कोणाला एखादा शब्द दिला तर तो पाळला पाहिजे. शब्द न पाळण्यामुळे आपला तात्कालिक लाभ होतो असे त्यांना वाटत असले, तरी दीर्घकालीन नुकसानही होत असते, त्याची त्यांना जाणीवही नसते.
 
 
 
अशा भूमिकेमुळेच 2014 च्या लोकसभा निवडणुकीत उत्तरप्रदेशातून बसपाचा एकही खासदार निवडून आला नाही. उत्तरप्रदेश विधानसभेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीतही उत्तरप्रदेशात बसपाचे फक्त 19 आमदार विजयी झाले. मायावती यांच्या अशा कार्यपद्धतीला कंटाळून दलित समाजाने भाजपाला जवळ केल्याचे 2017 मध्ये राज्यात भाजपाला मिळालेल्या जागांवरून दिसून येते आहे.
2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या वेगवेगळ्या राज्यांत महाआघाडीचे जे राजकारण सुरू आहे, ते पाहता राजकारणात कुणीच कुणाचा कायमस्वरूपी मित्र वा शत्रू नसतो, याची प्रचीती येते. वर्षानुवर्षांचे मित्र एकदुसर्याला सोडून जातात, तर छत्तीसचा आकडा असलेले राजकीय पक्ष एकदुसर्याच्या गळ्यात गळा घालतात.
कधीकाळी समाजवादी पार्टी आणि बसपा यांच्यात उत्तरप्रदेशात छत्तीसचा आकडा होता. राजधानी लखनौतील व्हीआयपी गेस्ट हाऊसमध्ये काही वर्षांपूर्वी समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मायावती यांच्यावर प्राणघातक हल्ला चढवला होता. पण, आज त्याच समाजवादी पार्टीशी मायावती सत्तेसाठी हातमिळवणी करत आहेत. राजकारणात शत्रूचा शत्रू तो आपला मित्र, या भूमिकेतून निर्णय घेतले जात असतात, आघाड्या होत असतात.
2002 मध्ये बसपाने राज्यात 20.08 टक्के मते मिळवत 88 जागा जिंकल्या होत्या. 2007 मध्ये तर बसपाचा हत्ती जोरात होता. बसपाने 30.43 टक्के मतांसह 206 जागा जिंकल्या होत्या. 2012 च्या विधानसभा निवडणुकीत बसपाला 25.91 टक्के मतांसह फक्त 80 जागा जिंकता आल्या. 2017 मध्ये बसपाला तर 22.23 टक्के मतांसह फक्त 19 जागा जिंकता आल्या. म्हणजे बसपाच्या राजकीय कामगिरीचा हा नीचांक आहे. उत्तरप्रदेशात बसपाची सरासरी 20 ते 30 टक्के मते आहेत, मतांच्या कायम असलेल्या याच टक्केवारीमुळे मायावती यांचे राजकीय महत्त्व वाढले आहे. राजकीय पक्षाचा त्यांच्याकडचा ओढा वाढला आहे.
 
 
मायावती यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा खूप आहेत. आपल्या राजकीय ताकदीपेक्षा त्यांना नेहमीच जास्त हवे असते. यासाठी कोणत्याही थराला जाण्याची त्यांची तयारी असते. मायावती यांच्या पक्षात अधिकार असलेला दुसरा कोणताही नेता नाही. पक्षांतर्गत लोकशाही तर दूरदूरपर्यंत नाही. बसपात उमेदवाराची निवड ही त्यांच्या सामाजिक आणि राजकीय कामगिरीवर नाही, तर आर्थिक ताकदीवर होत असते. एकखांबी तंबूसारखी बसपाची वाटचाल सुरू आहे. स्वत:च विणलेल्या कोषात त्या मग्न असतात. मात्र, दलितांच्या मतांच्या मोठ्या सौदागर म्हणून राजकारणातील एक मोठी ताकद मायावती झाल्या आहेत, ज्याकडे कोणत्याच राजकीय पक्षाला दुर्लक्ष करता येत नाही. आपल्या राजकीय स्वर्थासाठी का होईना, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मायावती यांचे राजकीय ओझे सर्व राजकीय पक्षांना सोयीनुसार वाहावे लागणार आहे, याचाच फायदा मायावती उचलत आहेत.
 
 
 
श्यामकांत जहागीरदार
9881717817
@@AUTHORINFO_V1@@