पवारसाहेब, खरं बोलताय?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Sep-2018
Total Views |


 

सध्या शरद पवारांनी संघाचे, संघकार्याचे कौतुक केल्याचे आपल्याला दिसतेच आहे, पण जसजशी निवडणूक जवळ येत जाईल, तसतशा देशाच्या राजकारणात काय काय घटना घडत जातील, हे पाहणेही मजेशीर असेल. आज पवार संघाविषयी बोलले, उद्या कदाचित अन्य कोणी संघकार्याची महती मान्य करेल.

 

राज्य आणि देशपातळीवरील राजकारणाचा अर्धशतकीय अनुभव गाठीशी असलेल्या शरद पवारांनी एखाद्या विषयावर मत व्यक्त केले की, त्याची चर्चा होणे निश्चितच. गेल्या काही काळापासून राष्ट्रीय राजकारणात, समाजकारणात कितीतरी अशा घटना घडल्या आणि घडत आहेत, ज्यावर बहुतांश राजकीय नेत्यांनी आपापली मते मांडली. शरद पवारांचा एक चाहतावर्ग महाराष्ट्रात अगदी पहिल्यापासूनच आहे. या वर्गाला पवारांनी अलीकडच्या काळातील घटनांवर भाष्य करावे, असे वाटत होते आणि त्यांची इच्छा फलद्रूप झालीही. बऱ्याच विषयांवर बोलावे असे वाटूनही मोजक्याच विषयांवर, पण नेमके भाष्य करणाऱ्या शरद पवारांना बोलते केले ते डॉ. उदय निरगुडकर यांनी. ‘न्यूज १८ लोकमत’ या वृत्तवाहिनीचे संपादक डॉ. निरगुडकरांनी कालच शरद पवारांची पुण्यातल्या मोदीबागेत मुलाखत घेतली आणि पवारांनीही निरनिराळ्या घडामोडींवरील आपली भूमिका स्पष्ट केली. खरंतर दिल्लीतील रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचा जनसंवादाचा कार्यक्रम, संघाचे कार्य आणि प्रतिमा, सध्या विविध आरोप-प्रत्यारोपांनी गाजत असलेला राफेल विमान खरेदी व्यवहार आणि कृषी, हवामान अंदाज आदी विषयांवर उदय निरगुडकरांनी शरद पवारांसारख्या मुरब्बी नेत्याचे मनोगत उकलले, हे कौतुकास्पदच.

 

दि. १७, १८ आणि १९ सप्टेंबर रोजी दिल्लीतील विज्ञान भवनमध्ये ‘रा. स्व. संघ आणि भविष्यातील भारत’ या विषयावर सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी आपली भूमिका सर्वांसमोर ठेवली. आपल्या स्थापनेपासून अविरतपणे भारतमातेच्या सेवेसाठी राष्ट्रभक्तीची ज्योत तेवत ठेवत समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी संघाचे स्वयंसेवक अपार कष्ट उपसत आहेत. असे असूनही संघाच्या स्थापनेपासून ते स्वातंत्र्यानंतरही डाव्या, कथित पुरोगामी मंडळींनी संघाबाबत गैरसमज पसरविण्याचे पद्धतशीर प्रयत्न केले. संघाला मुस्लीमविरोधी, घटनाविरोधी, अनुसूचित जाती-जमाती विरोधी, आरक्षण विरोधी, जातीव्यवस्था समर्थक ठरवून संघ पडद्याआडून कारवाया करतो, असे आरोप करत आपले ईप्सित साध्य करण्याचे धोरण अनेकांनी अवलंबले. सरसंघचालकांच्या तीन दिवसीय व्याख्यानांनी मात्र संघाबाबत गैरसमज पसरविणाऱ्यांचे धंदे बंद पडले. या पार्श्वभूमीवरच शरद पवारांना निरगुडकरांनी प्रश्न विचारले आणि पवारांनीही संघाबद्दल नेमके काय वाटते, ते मोकळेपणाने सांगत संघविरोधकांना बोधामृत पाजले. “संघ आता बदलत असून आतापर्यंत संघाला एक संकुचित, विशिष्ट जातीधर्माची विचारधारा मानणारी संघटना समजले जात होते, पण नुकत्याच झालेल्या कार्यक्रमातून संघाने आपली जुनी प्रतिमा पुसून अधिक व्यापक प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न केला,” असे पवार म्हणाले. संघाच्या विधायक कामांचे कौतुक करत पवार म्हणाले की, “देशात, राज्यात वा कुठेही भूकंप, पूर वा नैसर्गिक, मानवनिर्मित आपत्तींची संकटे आली की, रा. स्व. संघाचे स्वयंसेवक लगेच धाव घेतात, ही संघाची जमेची बाजू आहे. संघाने याच कामाच्या माध्यमातून जनतेसमोर आपली प्रतिमा उभी केली.” शिवाय मी जिथे जातो तिथे गेल्या महिन्याभरापासून रा. स्व. संघाची पुस्तके वाचत असल्याचेही पवारांनी स्पष्ट केले. शरद पवारांच्या या भूमिकेचे खरेतर स्वागत केले पाहिजेच, पण शरद पवार जे बोलतात, त्याच्या नेमके उलट त्यांचे मत असते, असे इथे होऊ नये इतकेच. त्यामुळेच “पवारसाहेब, खरं बोलताय ना?,” असे विचारण्याचा मोह होतो.

 

देशातले राजकारण सध्या बऱ्यापैकी गोंधळ-गदारोळाने भरलेले दिसते. चार वर्षांतील मोदी सरकारची कामगिरी आणि भ्रष्टाचाराचे एकही प्रकरण समोर न आल्याने पुढेही सत्ता मिळत नसल्याचे पाहून कासावीस झालेल्या विरोधी पक्षांकडून केवळ विरोधासाठी विरोध केला जात आहे. पवारसाहेबांनी मात्र स्वतःला यापासून दूरच ठेवले. खरे म्हणजे पवारसाहेब भारतीय राजकारणातील हुशार व्यक्तिमत्त्व. कुठल्या विषयावर, कोणाबद्दल, कोणते भाष्य करायचे, हे पवारसाहेबांना बरोब्बर कळते. म्हणूनच मागच्या काही दिवसांपासून राफेल विमान खरेदी व्यवहारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शेंडा-बुडखा नसलेल्या आरोपांचा धुरळा उडवून देणाऱ्या राहुल गांधींसारखा मूर्खपणा शरद पवारांनी केला नाही. प्रसारमाध्यमे आणि पक्षातल्या विद्वानांनी चावी फिरवल्याने बडबडणाऱ्या राहुल गांधींकडून दुसरे काही होणार नाही, हेही खरेच. शरद पवारांनी मात्र आपण माजी संरक्षणमंत्री असल्याचे दाखवून देत राफेल कराराच्या किमती सांगाव्यात पण तांत्रिक बाबी उघड करणे शत्रूदेशांना मदत करण्यासारखेच होईल, असे आताच्या मुलाखतीत स्पष्ट केले. सोबतच राफेल खरेदी व्यवहारात नरेंद्र मोदींचा काही वैयक्तिक फायदा झाला असेल, हेही नाकारले. पवारांसारखी व्यक्ती असे बोलते म्हणजे त्यात नक्कीच तथ्य असणार. विरोधकांनीही ही गोष्ट वेळीच लक्षात घेतली तर बरे; अन्यथा तोंडावर आपटण्याची पाळी त्यांच्यावर येईल.

 

दुसरीकडे रा. स्व. संघाबाबतही शरद पवारांनी कधी काही उलटसुलट विधाने, आरोप केल्याचे दिसले नाही. असे असले तरी शरद पवारांची आतापर्यंतची कृती मात्र संघ विरोधकांना पूरक ठरणारी होती, हे खरेच. महाराष्ट्रात जातीयवादाचे स्तोम माजले तेही शरद पवारांच्याच काळात, पण अशावेळी त्यांनी कधी संघावर बरी-वाईट वा कोणतीही टीकाटिप्पणी करणे चलाखपणे टाळले, हे त्यांच्या जाणत्या प्रतिमेला साजेसेच. पण, आज वयाच्या या टप्प्यावर शरद पवारांना संघाचे, संघाच्या विधायक कामाचे कौतुक करण्याची, संघविषयक पुस्तके वाचण्याची, संघाबद्दल जाणून घेण्याची उपरती झाली, ही स्वागतार्हच बाब म्हटली पाहिजे. अर्थात शरद पवारांनी १०-२० वर्षांपूर्वीच संघाविषयी अशी भूमिका मांडली असती, तर उत्तम झाले असते. आता मात्र पवारांच्या मतांमुळे गोची होईल ती त्यांच्या समर्थक-कार्यकर्त्यांची. कारण, आतापर्यंत कोणीही संघाविषयी काही वावगे बोलले की, टाळ्या पिटत त्याच्यामागे बागडणारी कितीतरी मंडळी पवारांच्याच आशीर्वादाने अन् वरदहस्ताने राजकारणात आलेली होती. संघाचे नाव घेतले की अंगात आल्यासारखे सदान्कदा कावलेल्या अवस्थेत काहीबाही बोलणाऱ्यांत आ. जितेंद्र आव्हाड आघाडीवर असत, पण आता शरद पवारांनीच चाटवलेल्या मात्रेमुळे आव्हाडांची अवस्था सहनही होत नाही अन् सांगताही येत नाही, अशीच झाली असेल, हे नक्की. सध्या शरद पवारांनी संघाचे, संघकार्याचे कौतुक केल्याचे आपल्याला दिसतेच आहे, पण जसजशी निवडणूक जवळ येत जाईल, तसतशा देशाच्या राजकारणात काय काय घटना घडत जातील, हे पाहणेही मजेशीर असेल. आज पवार संघाविषयी बोलले, उद्या कदाचित अन्य कोणी संघकार्याची महती मान्य करेल. त्यामुळे आता फक्त पुढे पुढे काय होईल, हे हळूहळू उघड होत जाईल, एवढेच म्हणावेसे वाटते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@