वीजबिलाचे पैसे वाचवणार्‍या उद्योजकाची कथा...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Sep-2018   
Total Views |
 
 
 
कन्नमवार नगर. मुंबईतील मराठी मध्यमवर्गीयांची वसाहत. याच वसाहतीतील एका इमारतीच्या गच्चीवर १२-१३ वर्षांचा जयवंत टिव्ही अ‍ॅन्टीना साफ करत होता. पावसाच्या रिमझिम धारा बरसत होत्या. ज्यांच्या टीव्ही अ‍ॅन्टीनाचं काम जयवंत करत होता, ते काका आडोशाला उभे होते. जयवंत पावसाने चिंब भिजून गेल्यामुळे थरथरत होता. काकांनी जवळ येऊन पाहिलं तर जयवंतचं अंग तापलेलं होतं. अंगात ताप असूनसुद्धा जयवंत काम करत होता. त्याला एकच माहीत होतं, जर आपण काम केलं तर पैसे मिळतील आणि आपल्या घराला हातभार लागेल. त्या काकांनी जयवंतला कसंबसं घरी पाठवलं. तापाने फणफणलेला जयवंत त्यानंतर चार दिवस अंथरूणाला खिळूनच होता. आजारातून बरा झाल्यानंतर टीव्ही अ‍ॅन्टीनाचं उरलेलं काम करण्यासाठी जयवंत परत त्या काकांच्या घरी गेला. एव्हाना काकांनी अन्य एका वायरमनकडून उरलेलं काम करून घेतलं होतं. काकांनी त्याला विचारले, “फक्त वायर कनेक्शनच्या ठिकाणी घासलं असतंस तरी चाललं असतं. मग संपूर्ण अ‍ॅन्टीना का घासत होता?” अपेक्षेपेक्षा जास्त दिलं तर कस्टमर खूश होतो आणि खूश झालेला कस्टमर आपल्याला जास्त काम देतो, हे बाळकडू ज्ञात असलेला जयवंत त्यांना म्हणाला, “तुमचा अ‍ॅन्टीना चकाचक करून देणं हे माझं कामंच होतं. मग तो पूर्णच साफ करून द्यायचा हे ठरवलं म्हणून मी संपूर्ण अ‍ॅन्टीना साफ केला.” महापालिकेच्या शाळेत सातवीमध्ये शिकणार्‍या जयवंतचे हे उद्गार होते. ग्राहकांना समाधानी ठेवण्याच्या लहानपणी गवसलेल्या याच कौशल्यामुळे जयवंत गोसावी यांनी ऊर्जा क्षेत्रातील ‘ऊर्जय इलेक्ट्रिकल्स प्रा. लि’ नावाची कंपनी स्थापन केली.
 
 

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार यांच्या सहकार्यामुळे मध्यमवर्गीय मराठी माणसांना इमारतींमध्ये स्वत:चं घर मिळालं. त्यामुळे या वसाहतीला त्यांचंच नाव देण्यात आलं असं म्हटलं जातं. भारतातील एक सर्वात मोठी वसाहत म्हणूनसुद्धा कन्नमवार नगराचा उल्लेख होतो. याच वसाहतीत राहणार्‍या काशिनाथ गोसावी आणि सत्यभामा गोसावी या दाम्पत्याच्या पोटी जयवंतचा जन्म झाला. जयवंतला एक भाऊ आणि दोन बहिणी. गोसावी हे मूळचे मालवणमधील चिंदर गावचे. जयवंतचे शिक्षण महानगरपालिकेच्या शाळेत सातवीपर्यंत झाले, तर आठवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण उत्कर्ष बालविद्यामंदिर येथे पूर्ण केले. जयवंतचे बाबा एका मिलमध्ये कामाला होते. त्यावेळी मिलकामगारांचा पगार तुटपुंजाच होता. या तुटपुंजा पगारात इतकं मोठं कुटुंब सांभाळणं जयवंतच्या आईला जिकिरीचं होतं. आई-बाबांची कुटुंबासाठी चालणारी ही ओढाताण लहानगा जयवंत पाहत होता. आपल्या घराला आर्थिक हातभार लागावा, यासाठी तो पेपर टाकत असे. दूधसुद्धा घरोघरी जाऊन पोहोचविण्याचं काम त्याने केलं होतं. एवढ्याने काही घरातलं भागणार नाही हे त्याला माहीत होतं. म्हणून एका वायरमन मित्राच्या हाताखाली तो काम करू लागला. तशी त्याला तांत्रिक ज्ञानाची आवड होतीच. छोट्या- मोठ्या दुरुस्तीची कामे तो करू लागला. त्यातून पैसे हाती येऊ लागले. मित्राच्या मदतीने त्याने सातवीत असताना पहिले काम मिळवले होते. ते म्हणजे अ‍ॅन्टीना दुरुस्तीचे. त्याचवेळी जयवंत आजारी पडला होता. जयवंतला त्या काकांनी पैसे दिले. “पैसे नको मला. मी ते काम नाही केले,” असे जयवंत म्हणाला. तेव्हा काका म्हणाले, “अरे, त्या वायरमनने फक्त अ‍ॅन्टीनाला दिशा दिली. भर पावसात तू अ‍ॅन्टीना पूर्ण घासलास. तुझ्या मेहनतीचे हे खरे पैसे आहेत.” जयवंतने कमावलेली ही पहिली स्वतंत्र कमाई. याचदरम्यान कधीतरी जयवंतची आई फरशीवरून घसरून पडली. आईच्या पाठीला मुकामार लागला. स्लीप डिस्कचा त्रास होऊ लागला. आईला घरकामात मदत व्हावी म्हणून त्यावेळेस जयवंतच्या बाबांनी वॉशिंगमशीन विकत घेतले. ते विकत घ्यायला लहानग्या जयवंतने एक हजार रुपये दिले होते.

 

दहावी झाल्यानंतर जयवंतने आयटीआयमध्ये दिवसा इलेक्ट्रिशनच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला, तर रात्री विद्या विकास रात्र शाळा महाविद्यालयात शिकून त्याने बारावी पूर्ण केली. आयटीआय पास झाल्यावर एका कंपनीमध्ये तो कामाला लागला. पगार होता फक्त ४० रुपये प्रती दिन. कधी कधी सलग ४८ तास काम करूनसुद्धा दोन हजार रुपयांवर हा पगार गेला नाही. सन २००० साली जयवंतला ‘बेस्ट’मध्ये नोकरी मिळाली. तिकडे नोकरी करत असताना जयवंत नेहमी पाहायचा की ‘बेस्ट’ कार्यालयात सर्वात जास्त लोक येतात ती विजेचं बील जास्त येतं अशा तक्रारी घेऊन. मग एखादा कर्मचारी मागील बील आणि आताचं बील यांची तुलना करून बिलाची रक्कम कशी योग्य आहे हे पटवून देतो. जयवंत यांच्या एक बाब लक्षात आली की, आपण प्रत्येकजण वीजबिलाचे नकळत पाच ते २० टक्के पैसे जास्त देतो. लोकांना याविषयी तांत्रिक माहिती नसते आणि ज्यांना ही माहिती असते ते भरमसाठी पैसे फीच्या स्वरूपात उकळतात. विशेषत: लघु, मध्यम स्वरूपाचे उद्योजक यात जास्त भरडले जातात. त्यांना कुठेतरी यासंबंधी शिक्षित करून योग्य दिशा मिळावी या उद्देशाने जयवंत गोसावी यांनी ‘बेस्ट’मधील नोकरीचा राजीनामा दिला. त्यांनी ‘ऊर्जय इलेक्ट्रिकल्स प्रा. लि’ नावाने कंपनीची स्थापना केली. आज या कंपनीत बी. ई झालेले इंजिनिअर्ससुद्धा कार्यरत आहेत. डी. वाय. पाटील विद्यापीठ, शापूरजी पालनजी, अजमेरा ग्रुप, कॉक्स अ‍ॅण्ड किंग्ज अशा नामांकित कंपन्यांना त्यांनी सेवा दिली आहे. सध्या कंपनीची उलाढाल कोटींच्या आसपास आहे. कोणत्याही उद्योगधंद्यामध्ये ‘कॉस्ट कटींग’ हा प्रकार खूप महत्त्वाचा असतो. वीजबिलामध्ये कपात हा यातील एक अत्यंत महत्त्वाचा घटक. त्यामुळे जयवंत गोसावी खर्‍या अर्थाने सामाजिक उद्योजकतेचे कार्य करत आहेत, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. किंबहुना, वीजबिलाचे पैसे वाचवून देणारा माणूस म्हणूनच लोक त्यांना आता ओळखू लागले आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@