पालिका अधिकाऱ्यांच्या चुकांमुळे फेरीवाल्यांवर उपासमारीची वेळ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Sep-2018
Total Views |


 

 

मुंबई (नितीन जगताप): मुंबई महापालिकेने फेरीवाला धोरण लागू करण्यासाठी सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणामुळे फेरीवाला धोरणाला विलंब होत आहे. परिणामी फेरीवाले हवालदिल असताना चेंबूर रेल्वे स्थानकाजवळ पालिका अधिकाऱ्यांनी फेरीवाल्यांसाठी मर्यादारेषा १५० मीटरपेक्षा जास्त आखली होती. त्यामुळे फेरीवाल्यांचे एका वर्षाचे नुकसान झाले असून उपासमारीची वेळ आली आहे, असा आरोप फेरीवाल्यांनी केला आहे.

 

एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर रेल्वे स्थानकापासून १५० मीटर आणि शाळा, महाविद्यालय, रुग्णालय, मंदिरे तसेच महापालिका मंडई यापासून १०० मीटर परिसरात फेरीवाल्यांना बसण्यास न्यायालयाने बंदी घातली आहे. मात्र चेंबूर स्थानक परिसरात नारायण आचार्य मार्गावर १५० मीटरऐवजी १६२ मीटर लांबीची मर्यादारेषा आखली आहे. त्यामुळे ४० ते ५० फेरीवाल्यांचे वर्षभराचे नुकसान झाले. ही रेषा जास्त असल्याची तक्रार वारंवार फेरीवाल्यांनी केली. पालिकेने त्याकडे दुर्लक्ष केले होते. परंतु आज पुन्हा मोजणीत तीन ते चार ठिकाणी १२ मीटरची जास्त जागा मर्यादा रेषेत गेल्याचे आढळले. या जागेत ४० ते ५० फेरीवाले बसत होते. त्यांचे नुकसान झाले आहे. फेरीवाल्यांना उदरनिर्वाह, मुलांच्या शिक्षणाचा आणि त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न भेडसावत आहे. त्यामुळे फेरीवाल्यांचे पुनर्वसन करून उपजीविकेचे साधन उपलब्ध करून द्यावे, असे अंकुश मोरे या फेरीवाल्याने दै. मुंबई तरुण भारतशी बोलताना सांगितले.

 

तर याबाबत फेरीवाल्यांनी पालिका अधिकाऱ्यांची भेट घेतली असता त्या १२ मीटरच्या जागेसाठी लॉटरी पद्धतीने जागा दिली जाईल. ज्या फेरीवाल्यांचे त्यामध्ये नाव नसल्यास त्यांना जागा सोडावी लागेल, असे, पालिकेने सांगितल्याचे कोनैन शेख म्हणाले.

 

मोजणीबाबत कल्पना नाही

 

चेंबूर स्थानकाजवळील फूटपाथवर मर्यादारेषेची मोजणी केल्याची कल्पना नाही. पालिकेचे काम सुरूच असते. परंतु आजची जी रेषा आहे ती रेल्वेसाठी आहे की फेरीवाल्यासांठी याबाबतची माहिती मिळाली नाही. त्याबाबत संबधित अधिकाऱ्यांशी बोलून खातरजमा करायला हवी. त्यानंतर यासंदर्भात बोलता येईल. तसेच फेरीवाले अनधिकृत असतील, तर त्यांना मर्यादारेषेबाबत बोलण्याचा अधिकार नाही. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाला हे म्हणणे चुकीचे आहे. जे पात्र आहेत त्यांचे त्या ठिकाणी पुनर्वसन करण्यात येईल.
 

-संभाजी घाग, साहाय्यक आयुक्त, ‘एम’ पूर्व

 

फेरीवाल्यांच्या नुकसानीला जबाबदार कोण?

 

महापालिकेने फेरीवाला धोरण लागू करण्यासाठी सर्वेक्षण केले होते. सर्वेक्षणात सावळागोंधळ असून अनेक फेरीवाल्यांवर अन्याय झाला आहे. आता तर फेरीवाल्यासांठी मर्यादारेषेत जास्त अंतर सोडल्यामुळे वर्षभराचे फेरीवाल्यांचे नुकसान झाले आहे. त्यासाठी जबाबदार कोण आहे? या फेरीवाल्यांना पालिकेने न्याय द्यायला हवा.
 

-आशा मराठे, स्थानिक नगरसेविका

  
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@