भीष्म आणि राधेय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Sep-2018
Total Views |



वृद्ध भीष्मांनी आपल्या या नातवाला पुन्हा पुन्हा जवळ घेतलं. त्याला निरोप दिला. राधेय आपल्या तंबूत परत आला. आता दुर्योधन अजून निद्रेतच होता. राधेयला आपले मन स्वच्छ झाले आहे, असे वाटले. भीष्मांचे आपल्यावरही तितकेच गाढ प्रेम आहे हे कळले म्हणून तो आनंदात होता.

 

तामह भीष्म मृत्युशय्येवरती आहेत, हे कळल्याबरोबर राधेय खूप दुःखी व सुन्न झाला. तो एकटाच तंबूत नि:शब्दआणि स्तब्ध बसून राहिला. त्याला भेटायला दुर्योधन आला. दोघा मित्रांनी एकमेकांस दृढ आलिंगन दिले. दुर्योधन पण सुन्न झाला होता. तो रडूही शकत नव्हता. मात्र, मित्राची भेट व स्पर्श होताक्षणी त्याच्या मनाचा बांध फुटला. तो हमसाहमशी रडू लागला. राधेयच्या छातीवर डोके ठेवून तो हुंदके देऊन रडला. राधेयने त्याचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. पण, काहीच उपयोग झाला नाही. थोड्या वेळाने दमल्यामुळे दुर्योधनाला आपोआप झोप आली. राधेय त्याच्याकडे पाहत बसला होता. उद्या तो रणभूमीवर भावांशी लढायला जाणार होता. सारे झोपलेले पाहून तो हलक्या पावलांनी भीष्म ज्या ठिकाणी पहुडले होते तिथे जायला निघाला. तो तिथे पोहोचला आणि त्याने पितामहांचे पाय धरले. भीष्म जागे झाले आणि म्हणाले, “या बाणांपेक्षाही तुझे अश्रू मला अधिक वेदना देत आहेत. तू कोण आहेस वत्सा? असा माझ्या जवळ ये, मला तू दिसत नाहीस. माझ्या डोक्यालाही खूप वेदना होत आहेत आणि मान वळवता येत नाहीये.”
 

राधेय हुंदका देऊन म्हणाला, “महाराज, मी राधेय! तुमचं प्रेम लाभण्याचं भाग्य ज्याला कधीच मिळाले नाही असा दुर्दैवी राधेय! माझा आदर तुमच्या चरणी वाहायला मी आलो आहे. यापूर्वीही मी येऊ शकलो असतो. परंतु, सर्वांसमोर तुमच्याकडून माझा अपमान होईल, या भीतीने मी कधीच आलो नाही. तुमच्या भेटीसाठी मी रात्र होण्याची वाट पाहत बसलो.” भीष्मांचेही डोळे अश्रूंनी भरून आले. ते म्हणाले, “माझ्या वत्सा, तू चुकतो आहेस. तू माझा कधीही नावडता नव्हतास. तू माझा नातू आहे हे ठाऊक असताना तू माझा नावडता कसा होशील?” राधेय म्हणाला, “होय महाराज, तुम्ही माझे आजोबा आहात. मी कुंतिपुत्र असून पाचही पांडव माझे सहोदर आहेत, असं मला सांगण्यात आलं. हस्तिनापुरात श्रीकृष्ण आला असताना त्याने मला हे सांगितलं. पण तुम्हाला हे कसे कळले?”

 

भीष्म म्हणाले, “बाळा, मला तर हे फार पूर्वीपासूनच ठाऊक आहे. व्यासांनी हे मला सांगितलं. परंतु, हे गुपित कोणालाच सांगायचं नव्हतं. त्यामुळे माझे आणि विदुराचेही ओठ शिवलेले होते. तू अहंकारामुळे अंध होऊ नये म्हणून मी तुझ्यावर रागवत होतो. अनेकदा ती तुझ्या उत्साहावर पाणी टाकत राहिलो. पंडूपुत्रांनी तुझे काहीही वाईट केले नाही. तरी तू तुझा दुस्वास करत राहिलास. मला हे कधीच आवडत नाही. कौरवांच्या दरबारात माझ्या कटू शब्दांनी मी तुला दुखावलं; पण ते मी पांडवांविषयी मला वाटणार्‍या प्रेमामुळे केलं. तू कधीच माझा नावडता नव्हतास. माझ्यावर विश्वास ठेव. जेवढ माझं दुर्योधनावर प्रेम आहे, तितकचं तुझ्यावरही आहे. तुझी साथ व मैत्री नसती, तर दुर्योधनाने पांडवांशी वैर पत्करलं नसतं. म्हणून तर मी तुला कठोरपणे बोलत होतो. त्याबद्दल तू मला क्षमा कर. तुझे शौर्य मी जाणतो. तू अजिंक्य आहे. मला माझे औदार्यही ठाऊक आहे. तू तर जगातील सर्वश्रेष्ठ दाता आहेस. धनुर्विद्येत तुझा हात धरू शकणारा कुणीच नाही. तू अर्जुन व श्रीकृष्ण यांच्या बरोबरीचा आहेस. काशीच्या राजाशी एकटाच लढून तू कुरूपुत्रांसाठी वधू जिंकून आणली आहेस. अनेक वर्षांपूर्वी मीही तसेच केले होते. ज्याने कुणाचाही सहज पराभव केला अशा जरासंधांना तुझ्यापुढे हार पत्कारावी लागली. मला तुझा अभिमान आहे. तू महापुरुष, शूरवीर आहेस. तू सदा सत्यनिष्ठ आहेस आणि माझा नातू आहेस. म्हणून मला तुझा गर्व आहे. तू सूर्यपुत्र आहेस व त्याच्या इतकाच तेजस्वी आहेस. तू सामान्य माणूस नाहीस. एक देव तुझा पिता आहे. पण देव तुला कधी वश झाले नाही. तुझ्या नशिबी सदैव दुःखच आलं. पांडव तुझे बंधू आहेत. तू त्यांना जाऊन मिळाला, तर मला खूप आनंद होईल. तसं झालं तर हे युद्ध संपून जाईल. माझ्या मरणासोबतच हे युद्ध संपू द्या. हा नरसंहार थांबवा.”

 

यावर राधेय म्हणाला, “पितामह, तुम्ही म्हणता तसे करता आले तर किती बरे झाले असते. परंतु, परिस्थिती अगदी विपरीतच आहे. सर्वच गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत. माझी व दुर्योधनाची मैत्री झाली तेव्हा मी त्याला वचन दिले होते की, या जगात तुझ्यासाठी मी काहीही करेन. तुला प्रसन्न करण्यासाठी मी अगदी अशक्यतील अशक्य गोष्टीही करेन. मी माझे शरीर, संपत्ती, पत्नी, मुलं, माझं आयुष्य पणाला लावीन. दुर्योधन हा एकच तारा माझ्या मनाच्या आभाळावर आहे. मी त्याच्यासाठी मरणही पत्करीन. त्याने माझ्या भरवशावर, माझ्या शौर्यावर भिस्त ठेऊन हा पांडवांनंतरचा राग जोपासला. आजोबा, मी त्याला आता मान खाली घालायला लावणार नाही. माणसांचा नाश करण्यासाठी जेव्हा सर्व देव कट करतात तेव्हा कुणीही तो थांबवू शकत नाही. पांडव माझे बंधू आहेत. माझे त्यांच्यावरती प्रेम आहे. पण, ती त्यांच्याशी लढेन. मला माझ्या विनाशाच्या मार्गाने जाऊ द्या. आम्हा सर्वांचा नाश होणार आहे, हे मला माहिती आहे. विदुरकाका आणि तुम्ही वेळोवेळी मला हे संकेत देत आलात. तशी सूचक स्वप्नेही मला पडतात. या सर्वाचा अर्थ म्हणजे कौरवांचा नाश. मी कृष्णाची थोरवी मानतो. आमच्या प्राक्तनी काय आहे ते त्याने आधीच ठरविले आहे. क्षत्रियाने शय्येवर मरण पत्करण्यापेक्षा लढूनच मरावे. मी क्षत्रिय आहे. सूतपुत्र नाही. हे आता जगाला समजू द्या. त्याकरिता मला तुमचे शुभाशीर्वाद हवे आहेत म्हणून मी आलो आहे. आजोबा मी तुम्हाला कधी काही कठोर शब्द बोललो असेन, तर मला क्षमा करा. शेवटी थोरांनीच लहानांना समजून घ्यायचे असते ना! मला शुभशीर्वाद द्या.” भीष्मांनी राधेयाला घट्ट मिठी मारली. आपल्या हृदयाशी घेत ते म्हणाले, “वत्स, आजोबा कधी नातवांवर रागवत नाहीत. तू आणि दुर्योधन दोघेही मला सारखेच प्रिय आहात. कौरव आणि पांडव यांच्यातील वैर पुसलं जाणे आता अशक्यच आहे. तुम्हाला लढावं तर लागणारच. थोर योद्धा म्हणून तूही या युद्धात मरण पत्कारून स्वर्गाचे दार उघड. मी तिथे तुझी वाट पाहीन. तुम्ही क्षत्रिय म्हणून तुमचे कार्य करा. शूराचं मरण पत्करून तुम्हाला जे जे हवे ते ते प्राप्त होईल. पुढील पिढ्या तुमचं नाव सदैव स्मरण करतील.”

 

राधेयाने त्यांना साष्टांग प्रणाम केला. तो म्हणाला, “आजोबा, मला तुमच्याकडून एक वर हवा आहे.” भीष्मांनी विचारले, “काय हवे?” राधेय म्हणाला, “आजोबा, माझ्या जन्माचे रहस्य गुपीतच राहू द्या! ते माझ्याबरोबरच संपावे.” भीष्म म्हणाले, “तू गेल्यावर हे रहस्य मी फक्त दुर्योधनास सांगेन इतर कोणासही नाही. कारण, तुझे त्याच्यावर किती प्रेम आहे, हे त्याला कळले पाहिजे. पण तू घाबरू नकोस. ही गोष्ट पांडवांना मजकडून कदापिही कळणार नाही.” राधेय त्यांच्यासमोर हात जोडून उभा राहिला. वृद्ध भीष्मांनी आपल्या या नातवाला पुन्हा पुन्हा जवळ घेतलं. त्याला निरोप दिला. राधेय आपल्या तंबूत परत आला. आता दुर्योधन अजून निद्रेतच होता. राधेयला आपले मन स्वच्छ झाले आहे, असे वाटले. भीष्मांचे आपल्यावरही तितकेच गाढ प्रेम आहे हे कळले म्हणून तो आनंदात होता. त्यांचे आशीर्वाद लाभले म्हणून त्याचा आत्माविश्वास पण वाढला होता. बाहेरच्या आकाशात एक तेजस्वी तारा दिसत होता, त्याकडे पाहत पाहत राधेय पण शांतपणे निद्राधीन झाला. उद्याच्या रक्तरंजित युद्धाची वाट बघत.

 
 

- सुरेश कुळकर्णी

[email protected]

@@AUTHORINFO_V1@@