भाजपच्या पराभवासाठी काँग्रेस भारताबाहेर शोधतेय मित्र

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Sep-2018
Total Views |


 

 
भोपाळ: “१२५ वर्षांची परंपरा सांगणाऱ्या काँग्रेसचे अस्तित्व आज देशभरात भिंग लावून शोधावे लागते. भाजपचा पराभव करण्यासाठी काँग्रेसने भारताबाहेर मित्र शोधत त्यांच्याशी हातमिळवणी करण्याचे प्रयत्न चालवले आहेत,” असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केला. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि काँग्रेसकडून राफेल विमान खरेदी व्यवहारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर आरोप करण्यात येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसच्या आरोपांचा खरपूस समाचार घेत पलटवार केला. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीदिनी भाजपने मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे कार्यकर्ता महाकुंभाचे आयोजन केले आहे. यावेळी पंतप्रधान बोलत होते. या महाकुंभाला १० लाख कार्यकर्ते उपस्थित असल्याचे म्हटले जात आहे. हा भाजपचा आतापर्यंतचा सर्वात मोठा मेळावा असल्याचा दावा मोदींनी केला आहे. यावेळी मोदींनी अमित शाह यांच्या कामाचे कौतुकही केले.
 

पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले की, “स्वातंत्र्यानंतरही देश महात्मा गांधी, राममनोहर लोहिया आणि दीनदयाळ उपाध्याय या तीन महापुरुषांना कधीही विसरणार नाही. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे जीवन प्रेरणादायक असून आम्ही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत सामाजिक न्यायावर विश्वास ठेवतो. मात्र, गेल्या ७० वर्षांतील मतांच्या राजकारणामुळे देशाचे अतोनात नुकसान झाले.

 

केंद्रात ज्यावेळी काँग्रेस आघाडीचे सरकार होते, त्यावेळी ज्या राज्यांत भाजपच्या नेतृत्वातील सरकारे होती, त्या राज्यांतील जनतेला काँग्रेस शत्रू समजत असे. ज्यांनी १०-१० वर्षं मध्य प्रदेशला व इथल्या जनतेला शत्रुत्वाची वागणूक दिली, त्यांना शिक्षा झाली पाहिजे. काही लोकांनी मध्य प्रदेशला नेहमीच प्रगतीपासून, विकासापासून दूर ठेवले. ज्या पक्षाने देशावर ५० ते ६० वर्षं राज्य केले, त्यांना भिंग लावून आता शोधावे लागत आहे. आता काँग्रेसला आत्मचिंतनाची गरज आहे.काँग्रेसच्या अहंकारानेच त्या पक्षाचा पराभव केला आहे. खुर्चीवर काही जण स्वतःचा वडिलोपार्जित हक्क समजतात,” अशा शब्दांत मोदींनी काँग्रेसवर प्रहार केला.

 

मोदी पुढे म्हणाले की, “काँग्रेसला आता छोट्या छोट्या पक्षांच्या पाया पडावे लागत असून काँग्रेस नेत्यांनी वेळीच आत्मचिंतन केले असते तर काँग्रेसवर ही वेळ आली नसती. आम्ही पैशाने नव्हे, तर जनतेच्या शक्तीच्या बळावर निवडणुका लढतो. मतपेटीच्या राजकारणासाठी काँग्रेस तिहेरी तलाकची प्रथा बंद करू इच्छित नाही. काँग्रेस देशासाठी एक ओझे झाले असून त्या पक्षाने शब्दकोशातल्या सर्वच शिव्यांचा माझ्याविरोधात वापर केला. माझ्यावर चिखलफेक करण्याची एकही संधी काँग्रेसने सोडली नाही, परंतु काँग्रेस जेवढी अधिक चिखलफेक करेल तेवढी अधिक कमळं फुलतील,” असे मोदींनी स्पष्ट केले.

 

एनआरसी थांबणार नाही

 

भाजपसाठी देशाची सुरक्षा सर्वात महत्त्वाची आहे, मतपेटीचे राजकारण नाही. काँग्रेसने कितीही जोर लावला तरी देशहितासाठी आता एनआरसीची प्रक्रिया थांबणार नाही. मोदींनी असे एकही काम केलेले नाही की, ज्यामुळे कार्यकर्त्यांची मान खाली जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवराजसिंह चौहान यांनी असे काम केले आहे की, कार्यकर्त्यांची मान ताठ होईल.”
 

- अमित शाह, भाजप अध्यक्ष

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@