अमेझिंग अॅमेझॉन - संधी आणि आव्हाने

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Sep-2018   
Total Views |

 

 

 
 
 
‘अॅमेझॉन’ चा विषय आंतरराष्ट्रीय संबंधांबाबत असलेल्या सदरात चर्चेला घेण्याचे कारण हे की, अमेरिकेतील ई-कॉमर्स क्षेत्रात ५० टक्के मिळवणाऱ्या ‘अॅमेझॉन’ने भारतातील ई-कॉमर्स क्षेत्रातही ३० टक्क्यांहून अधिक वाटा मिळवला आहे. ‘अॅमेझॉन’चे अस्तित्त्व जगातील अनेक देशांत असले तरी भारतात तिने जोर लावला आहे.
 

सप्टेंबरमध्ये ‘अॅमेझॉन’च्या शेअर्सनी दोन हजार डॉलरचा आकडा पार केल्यामुळे ती १ लाख कोटी डॉलर मूल्यांकन असलेली जगातील दुसरी कंपनी बनली. ‘अॅपल’ने ऑगस्टमध्ये हा मैलाचा दगड पार केला होता. या दोन्ही कंपन्यांचे बाजार भांडवल एकत्रित केले तर त्याचा आकार ब्राझीलच्या अर्थव्यवस्थेहून मोठा होतो. अर्थात, सकल राष्ट्रीय उत्पन्न आणि शेअर बाजारातील मूल्यांकन हे दोन वेगवेगळे आकडे आहेत. बाजार भांडवल महिन्याभरात ४० टक्क्यांनी वाढू शकते, तसेच कमीही होऊ शकते. २०१५ सालपर्यंत पहिल्या दहातही नसणारे जेफ बेझोस हे ‘अॅमेझॉन’चे संस्थापक, २०१८ साली जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत१९९४ साली स्थापन झालेल्या आणि पुस्तकांच्या विक्रीपासून सुरुवात करणाऱ्या ‘अॅमेझॉन’ने पहिल्या दहा वर्षांमध्ये एकही पैसा न कमावता अब्जावधी डॉलरचा तोटा सहन केला. तरीही गुंतवणूकदार ‘अॅमेझॉन’मध्ये पैसे टाकत राहिले. कारण, ‘अॅमेझॉन’ने आपल्या स्थापनेपासून फायद्या-तोट्यापेक्षा बाजारात स्थिर झालेल्या व्यवस्थेला धक्का द्यायचे काम केले. पुस्तकांच्या बाजारातील ५०-१०० टक्के इतके फायद्याचे प्रमाण हेरून त्यांनी कुठलीही पुस्तकं प्रथम अमेरिकेच्या आणि मग जगाच्या कानाकोपऱ्यात छापील किमतीच्या ३०-५० टक्के स्वस्त दरात घरपोच पोहोचवायला सुरुवात केली. ‘किंडल’च्या माध्यमातून ई-पुस्तकांच्या नवख्या क्षेत्रात आपली एकाधिकारशाही निर्माण केली आणि जगातील मोठ्या प्रकाशकांना आणि विक्रेत्यांना आपल्यासमोर गुडघे टेकायला भाग पाडले.

 

इंटरनेट आणि क्लाऊड कम्प्युटिंगचे महत्त्व इतरांच्या आधी ओळखून ‘अॅमेझॉन’ ने छोटे व्यापारी आणि विक्रेत्यांना ई-बाजारपेठेत पाय ठेवायची संधी उपलब्ध करून दिली. त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांमध्ये भांडवली गुंतवणूकही केली. त्यामुळे पुस्तकांपासून सुरुवात केलेली ‘अॅमेझॉन’ हळूहळू विक्रेत्याच्या रूपातून बाहेर पडून ई-बाजारपेठेचा एक प्लॅटफॉर्म बनली. ग्राहकोपयोगी वस्तू, किराणा माल, संगीत, सिनेमा इ. सर्व क्षेत्रांत ‘अॅमेझॉन’ने बस्तान बसवले. मालाची साठवणूक आणि दळणवळणात तंत्रज्ञानाच्या साहाय्याने क्रांतिकारक बदल करून ‘अॅमेझॉन’ने आपल्याशी बांधिलकी जपणाऱ्या ग्राहकांना एका दिवसात माल पोहोचवायची ‘प्राईम’ व्यवस्था सुरू केली. काही शहरांमध्ये आणि काही क्षेत्रांत ‘अॅमेझॉन’ ऑर्डर दिल्यापासून दोन तासांच्या आत माल पोहोचवू शकते. ड्रोनचा वापर मालाची ने-आण करण्याची क्लृप्तीही ‘अॅमेझॉन’चीच. तुम्ही कधी खरेदी करता, किती पैसे खर्च करता, वस्तू निवडताना काय पाहाता, तुमची पत किती आहे, या सर्व गोष्टी ठाऊक झाल्याने ‘अॅमेझॉन’ने अनेक क्षेत्रांत आता स्वतःचे ब्रॅण्ड सुरू केले असून कुठल्याही जाहिरातीशिवाय ते अल्पावधीत यशस्वी होत आहेत. ‘अॅमेझॉन’ने डिजिटल संगीत, सिनेमा याबरोबरच चित्रपटनिर्मिती क्षेत्रात प्रवेश केला असून जेफ बेझोस यांनी तोट्यात गेलेले ’वॉशिंग्टन पोस्ट’ हे प्रतिष्ठित वर्तमानपत्र विकत घेतले आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचे (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) महत्त्व ओळखून सगळ्याच जागतिक कंपन्या त्यात शिरकाव करत आहेत.

 

अॅपल, अल्फाबेट (गुगल) आणि फेसबुक या तिन्ही मोठ्या कंपन्यांकडे आपल्या ग्राहकांची माहिती विस्तृत प्रमाणावर असली तरी ‘अॅमेझॉन’च्या माध्यमातून लोक सर्व प्रकारची खरेदी करत असल्यामुळे त्यांच्याकडील ग्राहकांची माहिती तुलनेने सरस आहे. त्यामुळे ‘अॅलेक्सा’ या डिजिटल असिस्टंटपासून सुरुवात करणाऱ्या ‘अॅमेझॉन’ने आता डिजिटल घरं-त्यात एकमेकांना आणि इंटरनेटला जोडले गेलेले एसी, मायक्रोवेव्ह ओवन, टीव्ही, फ्रीज अशी उपकरणं आणि डिजिटल गाड्यांच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. यावर्षीपासून ‘अॅमेझॉन’ने आपल्या प्लॅटफॉर्मवर जाहिराती घ्यायलाही सुरुवात केली आहे. त्यामुळे कंपनीच्या उत्पन्नात घसघशीत वाढ झाली आहेसुरुवातीला असे वाटले होते की, गेली अनेक वर्षं वस्तूंच्या छापील किंमतीपेक्षा कमी किंमतीला, तोटा सहन करून, विक्री करणाऱ्या ‘अॅमेझॉन’ला कालांतराने धंद्यात राहाण्यासाठी किमती वाढवाव्याच लागतील, पण जाहिराती आणि क्लाऊड सेवेतून मिळणाऱ्या उत्पन्नामुळे ‘अॅमेझॉन’ कायमच सवलतीत विकू शकेल.

 

‘अॅमेझॉन’चा विषय आंतरराष्ट्रीय संबंधांबाबत असलेल्या सदरात चर्चेला घेण्याचे कारण हे की, अमेरिकेतील ई-कॉमर्स क्षेत्रात ५० टक्के मिळवणाऱ्या ‘अॅमेझॉन’ने भारतातील ई-कॉमर्स क्षेत्रातही ३० टक्क्यांहून अधिक वाटा मिळवला आहे. ‘अॅमेझॉन’चे अस्तित्त्व जगातील अनेक देशांत असले तरी भारतात तिने जोर लावला आहे. हिंदीमध्ये आपली वेबसाईट आणि अॅप सुरू करून ‘अॅमेझॉन’ने केवळ इंग्रजीचा वापर करणाऱ्या भारतीय कंपन्यांना धडा घालून दिला आहे. भविष्यात ‘अॅमेझॉन’ प्रादेशिक भाषांमध्येही वेबसाईट सुरू करणार आहे. ‘अॅमेझॉन’चे यश पाहून वॉलमार्टनेही ई-कॉमर्स क्षेत्रात आपली ताकद पणाला लावली आहे. रणनीतीचा भाग म्हणून कंपनीने फ्लिपकार्टचे ७७ टक्के समभाग १६ अब्ज डॉलरला विकत घेतले. यामुळे भारतीय बाजारात ‘अॅमेझॉन वि. वॉलमार्ट’ या दोन बलाढ्य अमेरिकन कंपन्यांमध्ये युद्ध अधिक तीव्र होत जाणार आहे. या युद्धामुळे ग्राहकांचा फायदा होणार आहे. मालाची साठवणूक आणि वाहतूक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगार तयार होत आहेत. दुसरीकडे लोक जसजसे गरजेच्या जवळपास सगळ्याच गोष्टी ऑनलाईन खरेदी करू लागतील, तसे किराणा माल आणि किरकोळ विक्रीच्या क्षेत्रात काम करणाऱ्या पाच कोटींहून अधिक लोकांचे रोजगार धोक्यात येतील. तेवढेच उत्पन्न मिळवण्यासाठी अधिक तास काम करावे लागेल, नाविन्यपूर्ण कल्पना आणाव्या लागतील तसेच तंत्रज्ञानाचीही मदत घ्यावी लागेल. हा प्रश्न हाताळण्यात चूक झाली तर त्यातून उग्र राजकीय आंदोलने उभी राहतील.

 

या विषयाची दुसरीही बाजू आहे. ई-कॉमर्स आणि इंटरनेट क्षेत्रात चिनी कंपन्यांनीही आपला दबदबा निर्माण केला आहे. ‘अलिबाबा’ ही चिनी ई-कॉमर्स कंपनी ‘अॅमेझॉन’च्या तोडीस तोड आहे. आजवर त्यांनी प्रत्यक्ष स्पर्धा टाळली असली तरी भविष्यात त्यांच्यात संघर्ष होणार, हे उघड आहे. चीनची १3५ कोटी लोकांची बाजारपेठ, ११० कोटी इंटरनेटला जोडल्या गेलेल्या उपकरणांतून प्रचंड प्रमाणावर उपलब्ध होणारी माहिती, खाजगीपणा जपण्याबाबत सैल असलेले नियम आणि चिनी लोकांची व्यापारी वृत्ती यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात चीनचे पारडे जड होताना दिसत आहे. अमेरिकन कंपन्यांना त्यांच्याशी टक्कर द्यायची तर भारत आणि आग्नेय अशियातील ई-कॉमर्स क्षेत्रावर प्रभुत्त्व मिळवायला हवे. सायबर आणि डेटा सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आल्यामुळे सगळेच देश सावध झाले आहेत. आजवर सगळ्या जागतिक कंपन्या भारतीय ग्राहकांकडून मिळणारी सगळी माहिती आपापल्या देशात संचित करून ठेवत आहेत. त्यात बँक खाती, आधार क्रमांकापासून लोकांचे बोटांचे ठसे आणि चेहर्‍यांच्या आकारपट्टीपर्यंत सर्व माहितीचा समावेश आहे. हे असेच जर सुरू राहिले तर डिजिटल क्षेत्रात भारत पारतंत्र्यात जायला वेळ लागणार नाही. हे ओळखून सरकारने डेटाचा संचय आणि सुरक्षा याबाबत नवीन नियमावली केली आहे. वैयक्तिक माहिती सुरक्षा कायदा, २०१८ चा पहिला मसुदा दोन महिन्यांपूर्वी प्रकाशित केला. या मसुद्यानुसार भारतीयांच्या सर्व प्रकारच्या माहितीची एक कॉपी भारतातील सर्व्हरवर ठेवणे आवश्यक असून काही संवेदनशील माहिती फक्त भारतातच साठवावी लागेल. या गोष्टी ‘अॅमेझॉन’सह जागतिक इंटरनेट कंपन्यांच्या पचनी पडणे अवघड आहे. पण, १३० कोटी लोकांच्या बाजारपेठेसाठी त्यांना मान झुकवावी लागेल. ‘अॅमेझॉन’च्या यशाचे कौतुक करताना डिजिटल युगात आपली ओळख केवळ ‘बाजारपेठ’ म्हणून राहाणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@