चळवळ परिवर्तनाची अभाविप, नाशिक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Sep-2018
Total Views |


 



संस्कारांना जपत, आधुनिकता आणि पारंपरिकता यांचा समन्वय साधत ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदसमाजाच्या अनेक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभागी होते. नाशिक ‘अभाविप’ला प्रामाणिक इच्छाशक्ती व सातत्यपूर्ण प्रयत्नाने आपला हेतू सफल होतो याची प्रचिती आली. औचित्य होते ते ‘श्रीगणेशमूर्ती व निर्माल्य संकलन’ या उपक्रमाचे. गोदामाईच्या संरक्षणासाठी नाशिकमध्ये ‘गणेशमूर्ती संकलन’ हा उपक्रम सुरू झाला.

 

गेली १२ वर्षे ‘अभाविप’च्या माध्यमातून गोदामाईच्या संरक्षणासाठी ‘श्रीगणेशमूर्ती व निर्माल्य संकलन’ उपक्रम राबवला जातो. जनजागृतीचा प्रामाणिक प्रयत्न, सर्व कार्यकर्त्यांचे अपार कष्ट आणि सातत्य या त्रिसूत्रीच्या जोरावर आज एक मोठी चळवळ नाशिक शहरात उभी राहिली आहे. सुरुवातीला फक्त एक संघटना मूर्तीदान करा, देव द्या व देवपण घ्या’ म्हणत अंधश्रद्धा निर्मूलन विषयाचे काम करायची. पण कुठे तरी याने गणेशभक्तांच्या भावना दुखावल्या जायच्या आणि या मोहिमेला प्रतिसाद मिळायचा नाही. लोक भांडायचे, मूर्ती नदीपात्रात सोडायचे, नदीतून बाहेर काढून आणल्या तर वाद घालायचे...
 

‘अभाविप’ने हा विषय हाती घेतला आणि या विषयाला गोदावरी प्रदूषणाबद्दल जनजागृतीचा, पर्यावरण संवर्धनाचा, मूर्ती नदीपात्रात विसर्जित करून काय हानी होते असा विचार आणि एक अभिनव दृष्टिकोन दिला. तेव्हा खर्या अर्थाने या कामाला सुरुवात झाली. २००६ ते २००८ या काळात रामसेतू या पुलाजवळ ‘अभाविप’चे काही कार्यकर्ते महानगरपालिकेच्या स्वयंसेवकांसोबत काही वेळ थांबून मदत करायचे. २००९ साली पहिल्यांदा रामकुंड या ठिकाणी ‘अभाविप’ म्हणून कापडी बॅनर व एक चित्र प्रदर्शनी लावून गणेशमूर्ती संकलन उपक्रम सुरू केला जो आजपर्यंत सातत्याने सुरू आहे. हळूहळू हा उपक्रम एक लोकचळवळ बनली. ज्यांना ज्यांना हा विचार पटला, त्यांनी विविध संघटनांना, शाळा-महाविद्यालयांना या कार्यात सहभागी व्हावे, ज्यांना ‘अभाविप’ सोबत नाही, पण वेगळे उपक्रम करायचे असतील त्यांनी त्यांच्या बॅनरखाली हा उपक्रम करावा पण उपक्रम जरूर राबवावा आणि चांगल्या कार्यात सहभागी व्हावे. गोदासंरक्षणात आपले योगदान द्यावे, असे आवाहन केले. २००७ साली ‘अभाविप’चे फक्त चार-पाच कार्यकते, १० तास लोकांना गोदासंवर्धनासाठी आवाहन करत होते पण फक्त १८२ गणेशमूर्ती संकलित झाल्या. हा उपक्रम लोकांना आजच्या इतका स्वीकार्य वाटत नव्हता. २००९ नंतर व्यवस्थित नियोजन करून हा विषय SFD (Students for Development) च्या पर्यावरण व सामाजिक विषयात काम करणार्यांमधून प्रमुखपणे राबवला गेला आणि या विषयाची सातत्याने आणि विविध कार्यकर्त्यांच्या अपार कष्टाने जनजागृती होत होत २०१५ साली अशी वेळ आली की, ‘अभाविप’ आणि त्यांच्यासोबतच्या विविध संस्था-संघटना, महाविद्यालये अशा दोनशेहून अधिक गटांनी आणि तीन हजारांपेक्षा जास्त स्वयंसेवकांनी मिळून २ लाख ३० हजारांपेक्षा जास्त गणेशमूर्ती संकलित केल्या. २०१४ साली गोदावरीला आलेल्या पुरातदेखील कार्यकर्त्यांचा उत्साह कमी झालेला नव्हता. गळ्यापर्यंतच्या पाण्यात उतरून, दिवसभर कार्यकर्त्यांनी हजारो मूर्ती संकलित केल्या.

 

२०१३ ते २०१६ या प्रत्येक वर्षांत सर्वांचे मिळून दोन लाखांपेक्षा जास्त असे एकूण सर्व वर्षांच्या मिळून आजवर १० लाखांपेक्षा जास्त गणेशमूर्ती ‘अभाविप’ने संकलित केल्या. म्हणजे साधारण २५० टन पीओपी, हजारो किलो रासायनिक रंग आणि हजारो टन निर्माल्य नदीपात्रात टाकण्यापासून ‘अभाविप’ लोकांना थांबवू शकली. आज नाशिकमध्ये गणेशमूर्ती विसर्जन हा उपक्रम म्हणजे खूप मोठा ‘इव्हेंट’ झाला आहे. आज लोकं स्वत:हून आपल्या मूर्ती संकलन केंद्राच्या ठिकाणी देतात. निर्माल्य योग्य ठिकाणी टाकतात. आज लोकजागृतीचा उद्देश सफल झालेला दिसून येत आहे. लोकं स्वतःहून गणेशमूर्ती नदीपात्रात विसर्जित करत नाहीत, तर आपली जबाबदारी ओळखतात. हे सर्व झालं ते ‘अभाविप’च्या कार्यकर्त्यांनी केलेल्या अपार कष्टांमुळे. निष्काम भावनेने योगदान देण्याने, समर्पणाने हे साध्य झालं. आमच्या सर्वांच्या आयुष्यातील गेली बारा वर्षे (एक तप) हा एक दिवसाचा उपक्रम जणू पंढरीच्या वारीला जाऊन अनुपम सुख अनुभवण्यायोग्य राहिला आहे. या प्रवासात अनेक चांगले मित्र मिळाले. विविध सामाजिक संस्थांनी मोलाचे सहकार्य केले, स्थानिक प्रशासनानेदेखील खूप साह्य केले.

 

‘अभाविप’च्या मूर्ती संकलनास एक तप पूर्ण...

 

‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषद,’ नाशिक महानगरतर्फे रामकुंडावर गणेशमूर्ती व निर्माल्य संकलन करण्यात आले. गोदामाईचे प्रदूषण रोखणे व बाप्पांच्या मूर्तींची होणारी विटंबना रोखणे असे दोन प्रमुख हेतू समोर ठेऊन ‘अभाविप’च्या विद्यार्थ्यांनी हा उपक्रम सुरू केला. ‘अभाविप’ने सुरू केलेल्या या उपक्रमास यावर्षी एक तप अर्थात १२ वर्षे पूर्ण झाली. ‘अभाविप’च्या कार्यकर्त्यांनी अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळपासूनच रामकुंडावर भाविकांशी संवाद साधत त्यांना गणेशमूर्ती दान करण्याचे आवाहन केले. भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या उपक्रमास लाभला आणि ७,१२६ एवढ्या प्रचंड संख्येने मूर्तींचे संकलन कार्यकर्त्यांनी केले. ‘गणेशमूर्तींचे दान अर्थात गोदामाईचे संवर्धन’ असा नारा यावेळी देण्यात आला. नदीपात्रात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती विसर्जित केल्याने गोदेच्या प्रदूषणात प्रचंड वाढ होत असते. पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊन नदीतील जैविक परिसंस्थांचे नुकसान या प्रदूषणामुळे होत असते. तसेच बाप्पांच्या मूर्तींची होणारी विटंबना होते. याच सर्व पार्श्वभूमीवर ‘अभाविप’ हा उपक्रम राबवित पर्यावरण संवर्धनाचा संदेश जनमानसात पोहोचवत आहे. यावेळी पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल यांनी उपक्रमास भेट देऊन शुभेच्छा दिल्या. सकाळी ८ ते संध्याकाळी ७.३०पर्यंत हा उपक्रम राबविण्यात आला. संकलित झालेल्या मूर्ती महानगर पालिकेकडे सुपूर्द करून उपक्रमाची सांगता करण्यात आली.
 

‘अभाविप’ने सुरू केलेल्या या उपक्रमात लोकांचा वाढत असलेला प्रतिसाद स्वागतार्ह आहे असे प्रतिपादन ‘अभाविप’चे महानगर मंत्री प्रथमेश नाईक यांनी यावेळी केले. या उपक्रमात जिल्हा संयोजक सागर शेलार्रे, वैभव गुंजाळ, नितीन पाटील, राकेश साळुंके, अथर्व कुलकर्णी, तेजल चौधरी, सुयश सोनी, आदित्य आढाव, सिद्धेश्वर भदाने, विशाल रासकर, विकास थेटे, तेजस जाधव, योगेश्वरी सोनवणे, वैष्णवी गुंजाळ, भक्ती दोडे, श्रद्धा लवांगे, पूजा ढापसे, हरिओम विभूते, अक्षय खुळाद, अद्वैत जोशी, रोहीत डिडोळे, अपूर्व पाटील, निखिल गडकरी, शुभम पाटील, रुची अग्रवाल, अमूल्या जोशी, सचिन शितोळे, योगेश वाघ, अशोक सैनी, शुभम गाढवे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले.

 
- सागर शेलार

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@