येत्या तीन वर्षात मुंबईचा चेहरामोहरा बदलणार – मुख्यमंत्री

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Sep-2018
Total Views |


 


मुंबई: देशातील पहिल्या वहिल्या भुयारी मेट्रो कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ च्या ३३.५ किमी लांबीच्या भुयारीकरणाच्या पहिल्या टप्प्याचे अनावरण सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल २ येथे करण्यात आले. यावेळी कोस्टल रोड, सी लिंक, मेट्रो आदी प्रकल्पांमुळे येत्या ३ वर्षांत मुंबईचा चेहरामोहरा बदलणार असून एक आधुनिक शहर म्हणून पुढील काळात मुंबई पाहायला मिळेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

 

मुंबई मेट्रो ३, पॅकेज ७ मधील १.२६ किमी इतके भुयारीकरण पूर्ण झाले. या भुयारीकरणाच्या कामाचे अनावरण मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाले. मुंबईकरांच्या दृष्टीने आजचा दिवस ऐतिहासिक असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, “मुंबईतील वाहतूककोंडीचा प्रश्न खऱ्या अर्थाने सोडविण्यासाठी राज्य शासनाने मेट्रोचे विस्तृत जाळे उभे करण्यास सुरुवात केली आहे. त्यातील मेट्रो ३ या महत्त्वाच्या मार्गिकेतील पहिल्या भुयारी टप्प्याच्या अनावरण सोहळ्याचे साक्षीदार होताना विशेष आनंद होत आहे. ही चांगली सुरुवात असून आणखी खूप मोठे काम करायचे आहे. मेट्रो ही मुंबईसाठी वरदान ठरणार आहे. यामुळे मुंबई महानगर क्षेत्रामध्ये सुरक्षित, आरामदायी अशी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मिळणार असून भुयारी मेट्रोला एलिव्हेटेड मेट्रोने जोडल्यानंतर सार्वजनिक वाहतुकीचे इंटिग्रेशन होऊन नागरिकांना मोठी सोय उपलब्ध होणार आहे.” असे त्यांनी सांगितले. मुंबईला शांघाय करण्याचे बोलले जात आहे. मात्र, आम्ही मुंबईला आधुनिक शहर म्हणून उभे करणार असून शांघायमधील नागरिकही २१ व्या शतकातील अतिशय चांगले शहर म्हणून मुंबई पाहायला येतील, असेही फडणवीस यांनी सांगितले.

 

एकात्मिक तिकीट प्रणाली सुरू करणार

 

मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारून सर्वांसाठी एकच तिकीट प्रणाली विकसित करण्यात येत आहे. यासाठी मुंबई महानगरप्रदेश विकास प्राधिकरणाने तयार केलेले प्लॅटफॉर्म उत्तम असून नीति आयोगाची टीम ते पाहण्यासाठी येणार आहे. त्यानंतर संपूर्ण देशात ही प्रणाली लागू होऊ शकते, असे फडणवीस यांनी नमूद केले. तसेच राज्य शासनाने आखलेल्या पायाभूत सुविधांचे प्रकल्प आता प्रत्यक्षात सुरू होत आहे. एलिव्हेटेड रेल्वेचे कामही जोमाने सुरू झाले आहे. येत्या ३ वर्षांत मुंबईचा चेहरामोहरा बदलेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

 

आव्हानांचा समर्थपणे सामना – अश्विनी भिडे

 

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने अनेक आव्हानांना समर्थपणे तोंड देऊन हा यशाचा टप्पा गाठला आहे. मुख्यमंत्र्यांचे प्रभावी नेतृत्व, मुख्यमंत्री कार्यालयातील वॉररूमचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, सर्व भागधारक, आणि मुंबईकर नागरिकांचा भक्कम पाठिंबा आणि सहकार्य यामुळे मुंबई मेट्रो ३ च्या टीमला प्रकल्पातील अडथळे पार करून,या महाप्रकल्पाचे स्वप्न वेळेत पूर्ण करण्याची प्रेरणा वेळोवेळी मिळत असल्याच्या, एमएमआरसीच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे म्हणाल्या.

 
 
 

 

मेट्रो तीनच्या पहिल्या टप्प्याची वैशिष्ट्ये
 

> मुंबई शहराचा भूगर्भ बेसाल्ट, ब्रेशिया तसेच टुफ अशा प्रकारच्या कठीण खडकांचा असून त्यांना भेदत भुयारीकरण करून 'वैनगंगा १' या टनेल बोअरिंग मशीनने (टीबीएम) काम केले आहे.

 

> वैनगंगा १ या टनेल बोअरिंग मशीनने २५९ दिवसांत १.२६ किमीचे अंतर यशस्वीरीत्या पूर्ण करून एक इतिहास रचला आहे.

 

> शांघाय टनेलिंग इंजिनीअरिंग कंपनीने हे टनेल बोअरिंग मशीन तयार केले आहे.

 

> हे टीबीएम ९२ मी लांबीचे असून प्रतिदिन ४.६ मी इतक्या वेगाने भुयारीकरण करते.

 

> या मशीनने सध्या कार्यरत असलेली मेट्रो लाईन १ आणि सहार उन्नत मार्ग यासारख्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांच्या खालून भुयारीकरण केले आहे.

 

> २५० निष्णात अभियंते, तंत्रज्ञ आणि कुशल कामगार यांनी सातत्यपूर्ण मेहनत घेतली

 

> मुंबई मेट्रो ३चे पॅकेज ७ मरोळ नाका येथे वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो १ आणि जेव्हीएलआर येथे स्वामी समर्थ नगर-जोगेश्वरी-कांजूरमार्ग-विक्रोळी मेट्रो ६ यांना जोडणार

 

> तसेच मुंबई उपनगरीय रेल्वे सेवेने जोडली न गेलेली एमआयडीसी, सीप्झ यासारखी महत्त्वाची औद्योगिक आणि रोजगार केंद्रेही जोडली जाणार

 

> मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या पूर्ण प्रकल्पातील सुमारे ९ किमी इतके भुयारीकरण पूर्ण झाले आहे.

 

> १९,४०,२५४४ क्यु.मी. इतक्या मातीचे उत्खनन

 

> पॅकेज ७ चे हे काम एल अँड टी आणि शांघाय इंजिनीअरिंग कंपनी संयुक्त भागीदारीत करत आहेत

 

> पॅकेज ७ मधील भुयारीकरणचा हा टप्पा ७.०७ किमी इतका असून त्यातून एकूण ११ लाख क्यू.मी. इतकी माती उत्खनित होणार.

 

> ही माती तळवली पिसे येथे निर्धारित शासकीय जागेत टाकली जाणार

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@