ममता बॅनर्जी यांचा थयथयाट!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Sep-2018   
Total Views |

 

 

 
 
 
ममता बॅनर्जी यांनी यंदाच्या मोहरमच्या सुमारास घडलेल्या घटनेचे निमित्त करून भाजप-संघावर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला आहे. प. बंगालमध्ये गुंतवणूक वाढावी, यासाठी विदेश दौरा चालू असताना, इटलीमधील मिलान येथून त्यांनी, उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील इस्लामपूर परिसरातील घटनेचे खापर भाजप-संघावर फोडले आहे.
 

तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्या राज्यात काही ताणतणाव निर्माण झाला की त्यास भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघास जबाबदार ठरवून त्यांच्यावर आगपाखड करण्याचे ठरविलेले दिसत आहे. पूर्वी देशात कोठेही जातीय संघर्ष निर्माण झाला की, त्याचे खापर संघावर फोडायची काँग्रेसच्या नेत्यांना सवय लागली होती. ममता बॅनर्जी त्याच काँग्रेस संस्कृतीत वाढलेल्या असल्याने त्यांच्यामध्ये तो गुण कायम राहिला असल्याचे दिसून येत आहे. बंगालमधील अल्पसंख्याक समाजास खुश ठेवण्यासाठी मागील वर्षी, मोहरम लक्षात घेऊन दुर्गा विसर्जन मिरवणुकांवर ममता सरकारने निर्बंध घालून, आपणास कोणत्या समाजाचा जास्त पुळका आहे, कोणती मतपेढी आपणास प्रिय आहे, हे दाखवून दिले होते. त्याच ममता बॅनर्जी यांनी यंदाच्या मोहरमच्या सुमारास घडलेल्या घटनेचे निमित्त करून भाजप-संघावर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला आहे. प. बंगालमध्ये गुंतवणूक वाढावी, यासाठी विदेश दौरा चालू असताना, इटलीमधील मिलान येथून त्यांनी, उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील इस्लामपूर परिसरातील घटनेचे खापर भाजप-संघावर फोडले आहे. तेथे गेल्या २० सप्टेंबर रोजी विद्यार्थी आणि पोलीस यांच्यात झालेल्या संघर्षाच्यावेळी जो गोळीबार झाला, त्यामध्ये दोन तरुण मृत्युमुखी पडले होते. ममता बॅनर्जी यांनी हा गोळीबार संघ आणि भाजपच्या ‘भाडोत्री गुंडां’नी केल्याचा आरोप केला! पोलिसांनी हा गोळीबार केला नाही. ज्या बुरखाधारी लोकांनी २० सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांवर गोळीबार केला, त्यांचा शोध घेण्याचे आदेश आपण पोलिसांना दिले आहेत, तसेच या घटनेचा आपण तीव्र निषेध करीत आहोत, असे त्यांनी म्हटले आहे. घटनेची सत्यासत्यता न पडताळून पाहता ममता बॅनर्जी या घटनेचे खापर भाजप-संघावर फोडून मोकळ्या झाल्या. ममता बॅनर्जी यांनी केलेल्या या आरोपांची गंभीर दखल प. बंगालमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांनी घेतली असून, हे आरोप सिद्ध करण्याचे आव्हान संघाने ममता बॅनर्जी यांना दिले आहे. आरोप सिद्ध करा; अन्यथा बिनशर्त माफी मागा, अशी मागणीही संघाने केली आहे. ममतादीदी यांनी केलेले आरोप खोटारडे आणि बिनबुडाचे आहेत. या सर्व प्रकरणाची सीबीआयकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी दक्षिण बंगालमधील संघाचे पदाधिकारी जिष्णू बसू यांनी केली आहे.

 

उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील इस्लामपूर येथील एका माध्यमिक शाळेत उर्दू शिक्षकाच्या नेमणुकीवरून संघर्ष उफाळल्याचे सांगण्यात येते. त्यावेळी विद्यार्थ्यांवर गोळीबार झाला होता. हा गोळीबार पोलिसांनी नव्हे; तर भाजप-संघाच्या गुंडांनी केल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला होता. मोहरमच्या पार्श्वभूमीवर, भाजप राज्यात जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करून, ’‘आगीशी खेळू नका,” असा इशारा त्यांनी भाजपला दिला. उर्दू शिक्षकास शाळेत दाखल करून घेऊ नये, यासाठी भाजपने विद्यार्थ्यांना भडकविले, असा आरोप ममतादीदी यांनी केला. दरम्यान, कालच्या रविवारी तृणमूल काँग्रेसचे दोन आमदार कन्हैयालाल अग्रवाल आणि मोहम्मद गुलाम रब्बानी हे, गोळीबारामध्ये मरण पावलेल्या राजेश सरकार आणि तपाश बर्मन या दोन तरुणांच्या कुटुंबीयांना भेटण्यास गेले असता स्थानिक जनतेच्या रोषास त्यांना बळी पडावे लागले. “तुम्ही येथे आमचे सांत्वन करण्यास आला आहात, पण या घटनेस कोण जबाबदार आहे, याबद्दल एक चकार शब्दही बोलण्यास तुम्ही तयार नाहीत,” असे तपाशच्या आईने त्यांना सुनावले. त्यानंतर या आमदारांनी या घटनेची तटस्थपणे चौकशी व्हायला हवी, हे मान्य केले. त्यातील एका आमदाराने तर या दोघांपैकी एक तरुण पोलीस गोळीबारात मरण पावला असल्याचे मान्य केले. हे दोघे आमदार लोकांचा रोष पाहून तेथे अर्धा तासही थांबू शकले नाहीत. ममता बॅनर्जी या घटनेबद्दल भाजप-संघावर ठपका ठेवत असताना, त्यांच्याच पक्षाचा आमदार पोलीस गोळीबारामध्ये एकाचा मृत्यू झाला असल्याचे म्हणतो, हे पाहता नेमके कोण खोटे बोलत आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही!

 

भाजपचे शिष्टमंडळ भेटण्यास त्या गावी गेले असता वेगळे चित्र दिसून आले. त्यांनी दोघा मृत तरुणांच्या नातलगांची भेट घेतली आणि त्या गावामध्ये सभाही घेतली. भाजपनेते मुकुल रॉय यांनी, हे दोन्ही तरुण पोलीस गोळीबारात मरण पावले असून या घटनेची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आम्ही केंद्राकडे करणार आहोत, असे सांगितले. या गोळीबारामध्ये जे दोन तरुण मरण पावले आहेत, त्यांच्या नातेवाईकांना २० ते ३० लाख रुपये देण्यात यावेत, अशी मागणी प. बंगाल भाजप अध्यक्ष दिलीप घोष यांनी केली आहे. दरम्यान, या घटनेच्या मुळाशी जाण्याऐवजी पोलिसांनी, चिथावणीखोर भाषणे केल्याच्या आरोपांवरून भाजपच्या दोन नेत्यांवर कारवाई केली आहेउत्तर दिनाजपूर जिल्ह्यात घडलेल्या या घटनेच्या निषेधार्थ भाजपने उद्या बुधवारी, २६ सप्टेंबर रोजी १२ तासांच्या ‘राज्यव्यापी बंद’ चे आवाहन जनतेला केले आहे. ममता बॅनर्जी आपला दहा दिवसांचा विदेश दौरा आटपून त्याच दिवशी परत येत आहेत. या ‘बंद’ ने त्यांचे ‘स्वागत’ केले जाणार आहे. भारतीय जनता पक्षाने ‘राज्यव्यापी बंद’चे आवाहन केले असले तरी हा ‘बंद’ मोडून काढण्यासाठी राज्य सरकारने तयारी केली आहे. ‘बंद’ला आपला पाठिंबा नसल्याचे काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने जाहीर केले आहे, तर सरकारने सर्व व्यवहार सुरळीत चालतील, ‘बंद’ यशस्वी होणार नाही, असा दावा केला आहे. तृणमूल काँग्रेसने आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना, ‘बंद’ पाळण्याचा प्रयत्न कोणी केल्यास तो हाणून पाडण्याचे आवाहन केले आहे. तसेच जे शासकीय कर्मचारी अनुपस्थित राहतील, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प. बंगाल सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना दिला आहे.

 

भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी, भाजप नव्हे, तर प. बंगालची जनता हा ‘बंद’ यशस्वी करून दाखविल, असे म्हटले आहे. ममता बॅनर्जी जर्मनीमधून, आपले प्रशासन ‘बंद’ यशस्वी होऊ देणार नाही, असे धमकावित आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. दोन तरुणांचा नाहक बळी घेतल्याची घटना लक्षात घेऊन त्याविरुद्ध आवाज उठविण्याचा निर्धार भाजपने केला आहे. त्यासाठी ‘राज्यव्यापी बंद’ चे आयोजन केले आहे, तर ममता बॅनर्जी यांचा त्याविरुद्ध थयथयाट चालू आहे. या निमित्ताने, उठसूट भाजप आणि संघ यांच्यावर खोटेनाटे आरोप करणाऱ्या ममता बॅनर्जी यांचा खरा चेहरा जनतेसमोर पुन्हा एकदा येणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@