मातीचा सुगंध असलेले व्यक्तिमत्व

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Sep-2018
Total Views |


 


आज आपला देश एका अभूतपूर्व आर्थिक संकटातून वाटचाल करीत आहे. गेल्या साठ वर्षांतील अविवेकी आर्थिक धोरणांचा तो परिपाक आहे. त्या संकटातून बाहेर पडण्याचे विविध मार्ग अनेक अर्थतज्ज्ञ सुचवित आहेत. परंतु त्यांच्यातही एकमत झालेले नाही. जो तो बुद्धीवादच सांगतो, अशी त्यांची अवस्था झाली आहे. आर्थिकदृष्ट्या अत्यंत कठीण अशा परिस्थितीत तीव्रतेने आठवण होत असेल, तर ती पं. दीनदयाळ उपाध्याय या महापुरुषाची होय.

 

पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या निधनाला आज चार दशकांहून अधिक काळ लोटला असला तरी त्यांचे चिंतन आजही ताज्या फुलांप्रमाणे टवटवीत आहेत. १९५२ ते १९६८ या सोळा वर्षांच्या काळात त्यांनी मांडलेल्या विचारांचा सुगंध आजही सर्वत्र दरवळत आहे. भारतीय जनसंघाचे महामंत्री म्हणून एका वर्धिष्णु राजकीय पक्षाच्या विविध जबाबदाऱ्या आपल्या अलौकिक कौशल्याने पार पाडताना त्यांनी जे मूलगामी सिद्धांत मांडले ते त्रिकालाबाधित सत्य आहेत. कोणत्याही विषयाचा ऊहापोह करताना त्याच्या गाभ्याला हात घालणारे त्यांचे चिंतन पाहिले की, पंडितजी एक दिशादर्शक होते असेच म्हणावे लागेल.
 

हम जिस दिशासे चलेंगे वही रस्ता होगा।

 

पंडितजींनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना अनेक वेळाहमे हमारा मार्ग बनाना होगा। हम जिस दिशासे चलेंगे वही रास्ता होगा।‘ असे सांगितले होते. पंडितजींच्या उण्यापुऱ्या पन्नास वर्षांच्या आयुष्याचा मागोवा घेतला, तर वरील सुभाषित त्यांनी अंगीकारले होते हे सहज लक्षात येते. भारतीय जनसंघाची स्थापना झाल्यानंतर अवघ्या दोन वर्षांत डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे आभाळाएवढे नेतृत्व निघून गेले. त्यांचे अन्य सर्व सहकारी ३० ते ३५ वयोगटातील होते. त्यापैकी कुणाकडेही तेजोवलय नव्हते. या परिस्थितीत पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना पक्ष बांधायचा होता. त्या पक्षाचे पाथेय निर्माण करावयाचे होते. साऱ्या देशात निरंतर भ्रमण करीत पक्ष संघटना उभी करावयाची होती. तसेच विविध राजकीय, सामाजिक व राष्ट्रीय समस्यांची उकल करून त्यावरील उपायही सांगावयाचे होते. देशाचे सारे प्रमुख पक्ष एका दिशेने वाटचाल करीत असताना त्या प्रवाहाविरुद्ध पोहायचे होते. प्रादेशिक राष्ट्रवाद, मिश्रसंस्कृती, समाजवाद, साम्यवाद, भांडवलवाद यांच्या गदारोळात सांस्कृतिक राष्ट्रवाद, एक राष्ट्र, एक जन, एक संस्कृती, एकात्म मानव दर्शन आदी सिद्धांतांचा झेंडा उंच फडकावयाचा होता. स्वत:चा पक्ष स्वत:च निर्माण करावयाचा होता. पं. दीनदयाळजींनी असाधारण कर्तृत्वाने ते सारे केले. भारतीय जनसंघाला एका व्यापक पक्षाचे रूप देतानाच त्यांनी एकात्म मानवदर्शनाचा सूत्रपातही केला. पंडितजींचे भारताच्या राजकीय क्षेत्रातील योगदान हे एकमेकाद्वितीय असेच आहे.

 

आत्मनिर्भर राष्ट्रनिर्माण हेच लक्ष्य

 

जनसंघाचा जन्म झाला, त्यावेळी पंचवार्षिक नियोजनाचे मार्गक्रमण सुरू झाले होते. तशा प्रकारच्या नियोजनाची देशाला गरजही होती. परंतु, त्या नियोजनामागील प्रेरणा मात्र विदेशी होती. पं. जवाहरलाल नेहरू यांच्यावर समाजवादाचा प्रचंड पगडा होता आणि भारताच्या सांस्कृतिक सचित्रांबद्दलचा एक प्रकारचा तिरस्कारही त्यांच्या मनात होता. काँग्रेसमध्ये त्यांनी समाजवादी समाजरचनेचा उद्घोष केला होता. भारतासारख्या नवस्वतंत्र देशाला प्रगती साधायची असेल, तर रशियाप्रमाणे साम्यवादी सिद्धांतांचा पाठपुरावा करावा लागेल असे त्यांचे ठाम मत होते. त्यानुसार सहकारी शेतीचा ठरावही त्यांनी अंमलात आणण्याचा प्रयत्न केला होता. सार्वजनिक क्षेत्रे आणि नियंत्रणे या दोन संकल्पनांनी ते जणू झपाटले होते. त्या प्रेरणेतून त्यांनी डॉ. महाल नेविस या अर्थतज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखाली भारताच्या पंचवार्षिक नियोजनाचे मॉडेल तयार केले. नंतर ते ‘नेविस मॉडेल’ म्हणून ओळखले जाऊ लागले. त्या मॉडेलचे दुष्परिणाम पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या कार्यवाहीनंतर लगेच दिसू लागले आणि दुसरी पंचवार्षिक योजना पूर्ण झाल्यावर त्या दुष्परिणामांवर जणू शिक्कामोर्तब झाले. दहा वर्षांच्या नियोजनबद्ध आर्थिक वाटचालीनंतर देशातील गरिबी आणि बेकारी वाढली. शेतीचे उत्पादन घटले आणि औद्योगिक रोजगाराचे प्रमाण अपेक्षेइतके वाढले नाही. आत्मनिर्भरतेकडे जाण्याऐवजी देश अधिकाधिक परावलंबी, परानुकरण प्रिय होऊ लागला. देशाचा रशियाकडील कल वाढू लागला. रुपयाचे अवमूल्यन करावे लागले. आंतरराष्ट्रीय बाजारातील भारताची पत घसरू लागली. त्या दुष्टचक्राचा मागोवा दीनदयाळजी घेत होतेच. त्या परिस्थितीवर मात करायची असेल, तर भारताला स्वत:च्याच सामर्थ्यावर आणि स्वत:च्याच प्रतिभेने चालावे लागेल, असे त्यांनी आत्मविश्वासाने सांगितले. ‘योजना बदलो’ ही पुस्तिका त्यांनी लिहिली आणि जनसंघाने एक आंदोलनही केले. सहकारी शेतीला जनसंघाने एक तीव्र विरोध करून एक देशव्यापी आंदोलन केले होते.त्या जबरदस्त आंदोलनामुळे पं. नेहरुंना तो प्रस्ताव बासनात गुंडाळून ठेवावा लागला. या आंदोलनात दीनदयाळजींनी ‘सहकारी शेती नको, शेतीत सहकार हवा,’ असा सिद्धांत मांडला होता. ‘योजना बदलो’ आंदोलनातून आत्मनिर्भरतेचा संदेश त्यांनी देशभर पोहोचविला. आत्मनिर्भर व्हायचे असेल, तर ‘स्वदेशी’ या सनातन भावनेचे जागरण करण्याशिवाय गत्यंतर नाही असे त्यांनी सांगितले होते.

 

स्वदेशी’ ही राष्ट्राची जीवननिष्ठा झाली पाहिजे!

 

पं. दीनदयाळजींनी मांडलेली ‘स्वदेशी’ची कल्पना संकुचित नाही. ‘स्वदेशी’ म्हणजे नव्याला नकार, अकार्यक्षमता, मध्ययुगाकडे वाटचाल, रॉकेटकडून बैलगाडीकडे जाणे, पोस्टखाते रद्द करून पुन्हा कबुतरांमार्फत संदेश पोहोचविणे अशा प्रकारचा हास्यास्पद, अवमानजनक, टिंगलटवाळीचा प्रचार सध्या केला जातो. परंतु ‘स्वदेशी’ म्हणजे असे काही नाही. पंडितजींच्या शब्दांत सांगावयाचे म्हणजे जगातील वैचारिक चिंतन ही कोणा एका राष्ट्राची जहागिरी नाही आणि जगातील तांत्रिक प्रगतीवरही कोणाचा एकाधिकार असता कामा नये. या दोन्ही गोष्टी मानवजातीचा ठेवा आहेत. परंतु, व्यवहारात त्याचा उपयोग करताना अनादीकाळापासून झालेले तत्त्वचिंतन युगानुकूल करून घ्यावे आणि तांत्रिक प्रगती देशानुकूल घ्यावी. त्यालाच ‘स्वदेशी’चा अविष्कार मानावे.

 

पंडितजींचे ‘स्वदेशी’ अर्थचिंतन

 

पं. नेहरूप्रणित पंचवार्षिक योजनांचे दुष्परिणाम जेव्हा दिसू लागले तेव्हा जनसंघाने त्याविरुद्ध विविध आंदोलने केली. त्या आंदोलनाची वैचारिक पार्श्वभूमी मांडताना पं. दीनदयाळजींनी अनेक मूलगामी आर्थिक सिद्धांत मांडले. जनसंघाच्या त्याकाळच्या ठरावातून पंडितजींच्या चिंतनाचे प्रतिबिंब उमटलेले आढळते. ‘हर हाथ को काम,’ ‘हर खेतीको पानी,’ ‘श्रमाभिमुख विकेंद्रित कृषी औद्योगिक अर्थरचना,’ ‘अंत्योदय लगातार आधा करो,’ अशा घोषणांतून त्या अर्थचिंतनाच्या प्रेरणा शब्दबद्ध होत असत. खेड्यातील शेवटचा गरीब माणूस हा आमच्या राष्ट्रीय विकासाची मोजपट्टी असेल, काम करण्याचा मूलाधिकार घटनेत समाविष्ट करा. काम करेल तो खायला घालेल आणि खाणारा प्रत्येकजण काम करेल. राजा आणि रंक, पुंजीपती आणि कामगार, गरीब आणि श्रीमंत या सर्वांना श्रमाची साधना करावी लागेल. जेथे सर्वव्यापी श्रम असतात तेथे सत्य आणि तीच शिव आणि सुंदर असते, आदी अनेक ‘स्वदेशी सूत्रे’ पंडितजींनी सांगितली आहेत.

 

अर्थायाम

 

सध्या आर्थिक संपन्नतेत एक विकृत मॉडेल सर्वत्र दिसू लागले आहे. कमीत कमी श्रम, अधिकाधिक धनसंग्रह आणि अधिकाधिक उपयोग हे त्या संपन्नतेचे परवलीचे शब्द आहेत. त्यातून सर्व भक्षक व अनिर्बंध उपभोगवादाचा भस्मासूर निर्माण झाला आहे. जगातील अनेक विचारवंतांना त्याने भयकंपित केले आहे. भारतासारख्या अविकसित अथवा विकसनशील देशात या उपभोगवादाचे आयाम अधिकच विघातक आहेत. कारखानदार कमीतकमी कामगारांच्या आधारे यांत्रिकीकरणातून अधिकाधिक उत्पादन करून जास्तीतजास्त नफा मिळविण्याच्या मागे आहे. नवनव्या अनावश्यक चैनीच्या वस्तूंचे अमाप उत्पादन दूरदर्शनच्या माध्यमातून ग्राहकांच्या माथ्यावर मारण्यातच मार्केटिंगचे यश मोजले जात आहे. समाजातील एक ‘नवश्रीमंत वर्ग’ समाजाचे मला काय देणे घेणे?असे म्हणत त्या उपभोगात बुडून जाण्यातच पुढारलेपण मानीत आहे. पाश्चिमात्य ते चांगले, असे मानून आंतरबाह्य पश्चिमी, अमेरिकन झालेली एक पिढी सर्वत्र दिसू लागली आहे. मॅडोना आणि मायकेल जॅक्सन हे त्यांचे देव बनले आहेत. देशातील गरिबी, बेकारी, अज्ञान, अंधश्रद्धा, कर्जबाजारीपणा आदी विक्रमांची उंची गाठत असताना देशातील ‘नवश्रीमंत‘ मात्र उपभोगवादातच जीवनाचे साफल्य मानू लागले आहेत. अशा या कठीण परिस्थितीतून यशस्वीपणे मार्ग काढावयाचा असेल, तर पंडितजींनी सूत्रबद्ध केलेल्या ‘अर्थायाम’ या संकल्पनेचाच आधार देशाला घ्यावा लागेल. अधिकाधिक मानवी श्रमांच्या आधारे अधिकाधिक उत्पादन, सुयोग्य वितरण, संयमित उपभोग आणि बचतीतून पुनर्निर्माण याला पंडितजी ‘अर्थायाम’ म्हणत. ‘योजना बदलो’पासून ‘हर हाथ को काम,’ ’हर खेत को पानी’ या सिद्धांतांपर्यंत पंडितजींच्या साऱ्या ‘स्वदेशी अर्थसिद्धांतां’चा जन्म या ‘अर्थायामा’तून झाला आहे.

 

पर्यावरणाचा विचार अनिवार्य

 

सध्या पर्यावरणाच्या संदर्भातही अनेक विचार मांडले जात आहेत. समाजवाद, साम्यवाद अथवा भांडवलवादात केवळ आर्थिक मानवाचा विचार केला गेला. त्यामुळे त्यांना पर्यावरणाचे आयाम नव्हते. गेल्या २५ ते ३० वर्षांतील अनिर्बंध औद्योगिकरणामुळे जगापुढे पर्यावरण विनाशाचे गंभीर संकट निर्माण झाले आहे. अनिर्बंध उपभोगासाठी उत्पादन आणि अनिर्बंध उत्पादनासाठी निसर्गाचे अनिर्बंध शोषण अशी ती साखळी आहे. परमेश्वराने ही सारी सृष्टी माणसाच्या उपभोगासाठीच निर्माण केली आहे. हा काही उपासनापंथांचा पायाभूत सिद्धांत त्या सार्‍यांच्या मुळाशी आहे. पर्यावरणाच्या आज निर्माण झालेल्या संकटांच्या सावल्या पंडितजींना दिसू लागल्या होत्या. पंडितजींनी त्यांच्या एकात्म मानव दर्शनात त्या संकटाचा वेध घेतल्याचेही आढळते. भारताच्या प्राचीन दार्शनिकांना वाट पुसत पंडितजींनी ‘दोहाना’चा सिद्धांत मांडला. नैसर्गिक संपत्तीवर केवळ याच पिढीचा नव्हे, तर पुढील असंख्य पिढ्यांचा अधिकार आहे, हे नित्य ध्यानात ठेवले, तर सृष्टीचे शोषण न करता दोहन करण्याचा हिंदू सिद्धांतच जगाला स्वीकारावा लागेल असे ते आत्मविश्वासाने सांगत असत.

 

विश्वाच्या साऱ्या घटकांत समन्वय आहे

 

विश्वामध्ये विविध अधिसत्तांत संघर्ष आहे. ‘समर्थ आहे, तोच जगेल’ हा डार्विनचा सिद्धांत विश्वाचा आधार आहे असे पाश्चिमात्य तत्त्वज्ञ मानतात.पंडितजींनी त्यांच्या एकात्म मानव दर्शनात या सिद्धांताचे खंडन केले आहे. माणसाचे जीवन शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा या चार घटकांच्या संतुलनाने सुखी बनते. व्यक्ती, समष्टी, सृष्टी आणि परमेष्टी या चार अधिसत्तांच्या समनव्ययानेच विश्व व्यापार सुरळीत चालतो. त्या विश्वव्यापाराच्या केंद्रस्थानी विचार करणारा मानव आहे आणि म्हणूनच जगात अन्य कुणावरही नसलेला कर्तव्याचा भार त्याच्यावर आहे. ते कर्तव्य समर्थपणे पार पाडण्यासाठी आपल्या पूर्वजांनी प्रगाढ चिंतनानंतर धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चार पुरुषार्थांची मांडणी केली आहे. ते चारही पुरुषार्थ कर्तव्यप्रधान आहेत. विश्वातील माणूस नावाचा घटक जर कर्तव्यप्रधान बनला, तर ती साऱ्या विश्वाचे सुयोग्य धारण करण्यास समर्थ बनेल. व्यक्ती केवळ समाजच नव्हे, तर सृष्टीचाही आधार बनेल. व्यक्ती, समाज, सृष्टी, परमेष्टी अथवा निसर्ग ही एक अखंड मंडलाकार रचना असून ते मंडल विस्तार पावणारे आहे. ‘समर्थ तोच जगेल’ हा जंगलाचा न्याय असतो. ‘समर्थ तो रक्षण करेल’ हा माणसाचा न्याय आपल्याला निर्माण करायचा आहे. पंडितजींच्या एकात्म मानव दर्शनात अनेक मूलगामी सिद्धांतांचा समावेश आहे. भारताच्या प्राचीन जीवनदर्शनाचे ते नवनीत आहे आणि हेच खरे हिंदू जीवन दर्शन आहे, असे ते सांगत असत. प्रेरणा असल्या तरी बहुतेक भौतिक प्रेरणांचा मागोवा त्यांनी घेतला आहे.

 

धर्मराज्य

 

‘धर्मराज्य’ हा वरवर आध्यात्मिक वाटणारा, परंतु पूर्णत: भौतिक अनुबंध असलेला सिद्धांत त्यांनी मांडला. ‘धर्मराज्य’ म्हणजे युरोप अथवा मध्य-पूर्वेत दिसणारे पंथराज्य (थिऑक्रेटिक स्टेट) नव्हे हे ते आवर्जून मांडीत असत. धर्मराज्यात राज्याचा कोणताही पंथ नसतो, तर सर्व नागरिकांचे पालन हा त्या राज्याचा धर्म असतो. आधुनिक परिभाषेतील ‘सला ऑफ लॉ’ या संकल्पनेचा जवळ असणारा शब्द म्हणजे ‘धर्मराज्य’ असे ते सांगत. विख्यात अमेरिकन राष्ट्रपुरुष अब्राहम लिंकन यांच्या ‘डेमोक्रसी इन गव्हर्नमेंट ऑफ दी पीपल,’ ‘बाय दी पीपल एण्ड फॉर दी पीपल’ या वचनावर भाष्य करताना लिंकन यांच्या वचनातील ‘ऑफ’ हा शब्द स्वातंत्र्याचा, ‘बाय’ हा शब्द लोकशाहीचा तर ‘फॉर’ हा शब्द धर्मराज्याचा निर्देशक आहे, असे प्रतिपादन ते करीत. पंडितजींनी त्यांच्या तत्त्वचिंतनात ‘चिती’ आणि ‘विराट’ या दोन अमूर्त संकल्पनांचेही विवेचन केले आहे. या संकल्पना अमूर्त असल्या तरी त्यांची अनुभूती राष्ट्रजीवनात वारंवार येत असते. प्रत्येक व्यक्तीला एक आत्मा असतो. त्याप्रमाणे राष्ट्रालाही एक आत्मा असतो. परंपरेच्या प्रदीर्घ प्रवासात स्वीकारलेल्या जीवनमूल्यांच्या जाणीवपूर्वक केलेल्या जोपासनेतूनच त्या त्या राष्ट्रांच्या व्यक्तिमत्वाचा एक आकृतिबंध तयार होतो. त्यालाच ‘राष्ट्रात्मा’ किंवा ‘चिती’ असे संबोधले जाते. एका भारतीय दार्शनिकाने हे नामविधान केले आहे. या ‘चिती’ची ओळख करून आणि तिच्याशी संवाद साधणारे संकल्प केल्यास राष्ट्रजीवन प्रभावशाली बनविता येईल, असे ते आग्रहाने सांगत. त्या ‘चिती’ची ओळख झाली आणि तिची अनुभूती घेतल्यास त्यातून राष्ट्राचा पुरूषार्थ म्हणजे ‘विराट’ जागृत करता येतो. तसे झाल्यास राष्ट्रजीवन चहुबाजूंनी बहरू लागेल, राष्ट्रपराक्रमाने ओसंडू लागेल आणि मानवकल्याणाचे ध्येय असेल, तर ते राष्ट्र साऱ्या विश्वाचा आधार बनते. एकात्म मानव दर्शनाला वाट पुसत स्वदेशी चिंतनाने भारताचा ‘विराट’ जागा करून परमवैभव हे उज्ज्वल ध्येय साकार करण्यास नित्य कर्मशील राहण्यात जीवनाचे साफल्य आहे असे ते सांगत. सध्याच्या अत्यंत गोंधळाच्या परिस्थितीत अभूतपूर्व अर्थसंकटांवर आणि अन्य राष्ट्रसंकटावर मात करण्यासाठी पंडितजींच्या चिंतनाचे स्थान एखाद्या तेजस्वी वादळातही अचल राहणाऱ्या दीपस्तंभासारखे आहे. त्यांच्या प्रकाशात आपण आपली राष्ट्रनौका हाकली, तरच त्यांचे योग्य स्मरण केल्यासारखे होईल.

 

समग्र चिंतन

 

पंडित दीनदयाळ उपाध्याय हे थोर विचारवंत होते. त्यांची गणना तरल बुद्धीच्या मेधावी ऋषितुल्य व्यक्तीत करण्याचा मोह अनेकांना होतो. त्यांचे विचार विश्वविशाल होते. विविध विषयांवर अभ्यासपूर्ण विवेचन ते सहज करीत. समाजकारण, राजकारण, अर्थकारण असे अनेक विषय त्यांनी यशस्वीपणे हाताळले. राष्ट्रधर्म प्रकाशनाच्या माध्यमातून ‘राष्ट्रधर्म’, ‘पांचजन्य’, ‘दैनिक स्वदेश’,‘संयोजक’ या नात्याने त्यांनी विपुल प्रत्येक मनुष्य स्वतःचे बनवतानाच केवळ संबंध मनुष्यजातच नव्हे, तर संपूर्ण सृष्टीबरोबर एकात्मतेचा साक्षात्कार घडवून नरापासून नारायण बनविण्यास समर्थ होईल. हेच आपल्या संस्कृतीचे, राष्ट्राचे शाश्वत, दैवी आणि कायमचे स्वरूप आहे. चौकात उभे असलेल्या विश्व मानवजातीस आमचे मार्गदर्शन हे असे आहे. या कार्यास आम्हास आवश्यक ती शक्ती देऊन या कार्यात यश देवो, अशी आमची परमेश्वराजवळ प्रार्थना आहे. ११ फेब्रुवारी १९६८ रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची मुगलसराय(उत्तर प्रदेश) रेल्वे स्टेशनवर निर्घृण हत्या करण्यात आली. अपराधी अद्याप फरारच आहेत. त्यांच्या हत्येनंतर अटल बिहारी वाजपेयी म्हणाले होते की, “पंडितजींना आमच्यापासून हिरावून आमची प्रगती रोखण्यात यश मिळेल असा विचार करणारे जे लोक आहेत त्यांना पंडितजींची खरी ओळखच नाही. पंडितजींचे आम्ही अनुयायी असून आम्हालाही ते कदाचित ओळखत नसावेत. पंडितजींचे कार्य व्यक्तिनिष्ठ नव्हे, तर तर्कनिष्ठ होते. आदर्श आणि सिद्धांतांसाठी जगण्याचे शिक्षण त्यांनी आम्हाला दिले. दीनदयाळजींच्या देहातून वाहिलेल्या रक्ताचा प्रत्येक थेंब आपल्या माथ्यावर लावून आपण आपल्या ध्येयाकडे वाटचाल करू या ! त्यांच्या चितेच्या उठलेल्या ठिणगीला हृदयात सामावून परमोच्च ध्येयप्राप्तीसाठी वाटचाल करू या! या नवदधिचीच्या प्रत्येक अस्थींपासून नवे वज्र तयार करू व नव्या वज्रासुरावर प्रहार करूया. आपल्या या परमपावन मातृभूमीला निष्कंटक बनवूया! या देहाचा विनाश झाला तर काय झाले, ध्येयदीप तेवतच राहील. नवी पिढी त्यात तेल घालतच राहील. त्यांचे जीवन म्हणजे एक यज्ञ होता व मृत्यू पूर्णाहुती होती. भावी पिढी आणि युवकांना त्यातून निश्चितच प्रेरणा मिळेल.”

 

त्यागमयी जीवनाचा राजकारणातील आदर्श अशा पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांना भावपूर्ण अभिवादन!

 
- अरुण शेंदुर्णीकर 

(लेखक नाशिक महानगरचे भाजप कार्यालयीन चिटणीस आहेत.)

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@