‘आयुष्यमान भारत योजने’चा जिल्ह्यातील ३ लाख कुटूंबीयांना लाभ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Sep-2018
Total Views |



 



ठाणे: देशभरात ‘आयुष्यमान भारत’ या योजनेचा शुभारंभ रविवार दि. २३ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झारखंडमधील रांची येथे होणार आहे. ठाणे येथेदेखील या योजनेचा शुभारंभ रविवारी दुपारी १२ वाजता ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या उपस्थितीत करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी दिली. यावेळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर हेदेखीलही उपस्थित राहणार आहेत. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात पाच कुटुंबांना हेल्थ कार्डचे वाटप केले जाईल. ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ८३ हजार ८९३ तर शहरी भागातील २ लाख ६५ हजार कुटुंबांना याचा लाभ होणार आहे, अशी माहिती या योजनेचे जिल्हा समन्वयक प्रवीण मोटे यांनी दिली. राज्य आरोग्य हमी सोसायटी, जीवनदायी भवन, वरळी येथून या योजनेचे नियंत्रण केले जाणार आहे.

 

प्रति वर्ष ५ लाखांचे विमा संरक्षण

 

आयुष्यमान भारत योजनेत पात्र लाभार्थी कुटूंबाना प्रति वर्षी प्रत्येक कुटूंबाला आरोग्यासाठी पाच लाख रुपये विमा संरक्षण देण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत त्या कुटूंबाना ठराविक आजारांसाठी संपूर्ण देशभरातील कोणत्याही मान्यता प्राप्त रुग्णालयात उपचार घेता येतील. तसेच यासाठी लाभार्थी कुटुंबाना ई-कार्ड देण्यात येणार आहेत. यासाठी जी रुग्णालये संलग्न करण्यात येतील त्या रुग्णालयातील आरोग्य मित्र हे ई-कार्ड देतील. सद्यस्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालय व भिवंडी येथील इंदिरा गांधी, कळवा येथील छत्रपती शिवजी महाराज रुग्णालय तसेच उल्हासनगर येथील रुग्णालये संलग्नित करण्यात आले असून या योजनेंतर्गत एक हजार १२२ आजारांचा समावेश करण्यात आलेला आहे. सध्या राज्यात महात्मा ज्योतिबा फुले जन-आरोग्य योजना’ ही कार्यान्वित असून ‘आयुष्यमान भारत’ योजनेसोबतच ही योजना सुरू राहणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@