‘जोकसत्ता’चा हलकटपणा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Sep-2018
Total Views |

संघाविषयी गैरसमज पसरवून आपल्या चाकऱ्या टिकविणारा एक मोठा वर्ग माध्यमांत नक्कीच आहे. पत्रकारितेला टोक लागते हे मान्यच, पण धांदांत खोटे बोलून आणि मजकूर छापून अनेकांनी आपली दुकाने सजविली आणि चालविलीसुद्धा. ‘लोकसत्ता’नेही यात आपली भूमिका बजावलेली आहेच.

 

जर्नलिझम ऑफ करेज’ अशी शेखी मिरविणाऱ्या इंडियन एक्सप्रेस समूहातील ‘लोकसत्ता’ची पत्रकारितेतील नीत्तिमत्ता किती तकलादू आहे, ते गेल्या दोन दिवसांच्या घडामोडीतून समोर येत आहे. पत्रकारिता म्हणून ‘लोकसत्ते’ने जे काही केले आहे ते लांच्छनास्पद आहेच; पण त्याचबरोबर कायदेशीर द़ृष्ट्यादेखील मानहानी व प्रतिमाभंजनाच्या गुन्ह्याचे संपादक महोदय हे आरोपी ठरू शकतात. भारतीय दंड विधानाच्या कलम ४९९ व ५०० नुसार फौजदारी तक्रारही त्यांच्याविरोधात दाखल होऊ शकते. सरसंघचालकांनी दिल्लीत तीन दिवस समाजाशी मोकळा संवाद साधला. संघाविषयी गैरसमज पसरवून आपल्या चाकऱ्या टिकविणारा एक मोठा वर्ग माध्यमांत नक्कीच आहे. युपीएच्या काळात अशा अनेकांची रोजीरोटीच अशा कुकर्मांमुळे चालत होती. पत्रकारितेला टोक लागते हे मान्यच, पण धांदांत खोटे बोलून आणि मजकूर छापून अनेकांनी आपली दुकाने सजविली आणि चालविलीसुद्धा. ‘लोकसत्ता’नेही यात आपली भूमिका बजावलेली आहेच. पण, वैचारिक मतभेद म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले जात होते. सरसंघचालकांच्या तीन दिवसांच्या संवादानंतर अनेक संपादकांनी आपले अग्रलेख लिहिले. यातील बहुसंख्य लेख संघाकडून अपेक्षा व्यक्त करणारे आहेत. संघ आज समाजाच्या केंद्रस्थानी येऊन पोहोचल्याने अशा अपेक्षा असणे साहजिकच आहे. मात्र, ‘लोकसत्ता’ने आपले वेगळेपण टिकविण्यासाठी जे केले, ते पत्रकारितेच्या कुठल्या तत्त्वाभिधानात बसते? असा सवाल संपादकाला केलाच पाहिजे

 

अखलाखच्या मृत्यूनंतर सरसंघचालकांचे म्हणून जे काही विधान खपविले गेले आहे, ते मुळात सरसंघचालकांचे नाहीच. त्यांच्या कुठल्याही कार्यक्रमात त्यांनी असे विधान केलेले नाही. असे असताना कोणत्यातरी नशेत लिहिल्याप्रमाणे हा अग्रलेख लिहून संपादकांनी आपली भूमिका संघावर थोपली आहे. जे विधान त्यांनी छापले, ते मुळात अन्य कुठल्या तरी लेखकाने आपल्या लेखात उद्धृत केलेले आहे. त्या लेखातील विधान सरसंघचालकांच्या तोंडी घालण्याचे पाप संपादकांनी का केले? हे त्यांना विचारले पाहिजे. त्याचे न्याय्य स्पष्टीकरण त्यांच्याकडे नसेल, तर न्यायालयाचा मार्ग अवलंबून न्यायमूर्तींच्या समोरच्या पिंजऱ्यात उभे करून तरी त्यांना बोलते केले पाहिजे. या साऱ्या विषयातील स्वयंसेवकांच्या भावना तीव्र आहेत. मुक्तमाध्यमांवर जो काही दबाव निर्माण झाला, विनय जोशींसारख्या कार्यकर्त्याने जो काही पिच्छा पुरवला आहे, त्यामुळे ‘लोकसत्ता’ने घडीच्या खाली तळाला लहानसा खुलासा छापला आहे. प्रकाशन व्यवसायातील एक साधा निकष आहे, ‘लेखकांच्या मताशी संपादक सहमत असतोच असे नाही,’ हा मुद्दा एकवेळ बाजूला ठेवला तरीही ‘सरसंघचालकांच्या तोंडी असलेले वाक्य प्रत्यक्षात ‘पांचजन्य’ या संघाच्या मुखपत्रातील आहे,’ असे छापणे हा हलकटपणाचा दुसरा नमुना आहे. स्वत:चे वेगळेपण टिकविण्यासाठी माध्यमांना असे उद्योग करावे लागतात. पण, असे करताना माध्यमे कुठल्या थराला जातात याचेच हे उदाहरण आहे

 

अग्रलेख समाजात वैचारिक भूमिका निर्माण करण्याचे काम करतात. ‘लोकसत्ता’च्या अग्रलेखाने या निमित्ताने काय पार्श्वभूमी निर्माण केली ते याच फालतू खुलाशाच्यावर छापलेली तीन पत्रे वाचली की, लगेचच लक्षात येईल. या साऱ्या खटाटोपांचा अर्थ संघाने आपल्या भूमिका कितीही वेळा मांडल्या तरी, काही लोक हत्ती आणि आंधळ्यांच्या गोष्टीतील आंधळेच राहणार असाच आहे. संघाविषयीचे एक निश्चित मत या मंडळींनी निर्माण करून ठेवले आहे. त्यामुळे संघ बोलणार म्हणजे असेच काहीतरी बोलणार, अशी पक्की समज या मंडळींनी आपल्या मनात करून ठेवलेली असते. ‘आपला समज म्हणजेच सत्य’ हा अजून एक गैरसमज! त्यामुळे मोठ्या माध्यमसमूहांच्या ओसरीवर बसून अकलेचे तारे तोडण्याचे असे उद्योग केवळ हेच महाशय करतात असे नाही. दिल्लीतही असे बरेच लोक आहेत, यातील बऱ्याच मंडळींनी आपले रोजगार या पूर्वग्रहदूषणामुळे गमावले आहेत. मुक्तमाध्यमांवर त्यांचे गरळ ओकण्याचे उद्योग आजही सुरूच असतात. संघ विश्वासार्ह नाही, असा जो काही निष्कर्ष या कल्पोकल्पित विधानामुळे अग्रलेखाच्या शेवटी काढला आहे, त्याचा पायाच अशा भुसभुशीत आणि विकृत विचारपद्धतीवर अवलंबून आहे. जो काही खुलासा छापून आपल्या बेअकली वागणुकीतून सुटण्याचा प्रयत्न ‘लोकसत्ता’ करीत आहे, तो मुळीच स्वीकारार्ह नाही. उद्या सेवाकार्यांच्या दोन-चार चांगल्या बातम्या छापल्यामुळे स्वयंसेवकांनी हुरळून जाण्याचे कारण नाही. संघाविषयीचा हा अग्रलेख ‘लोकसत्ता’ने आता मागे घ्यावा, कारण तसे करण्यातील एक अनुभव त्यांच्या गाठीशी नक्कीच आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@