विश्वसुखाचे ‘विज्ञान’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Sep-2018   
Total Views |


 


 

या तीन दिवसीय उपक्रमाची चर्चा दीर्घकाळ चालू राहील. संघाच्यादृष्टीने विचार केला, तर समाजातील सर्व स्तरांना जवळ करण्याच्या दृष्टीने संघाने टाकलेले हे फार मोठे पाऊल आहे. संघाच्या पारंपरिक टीकाकारांना आणि त्यातीलही प्रामाणिक टीकाकारांना विलक्षण धक्के देणारे विषय मोहनजींच्या भाषणातून आलेले आहेत. अज्ञान, भ्रम, कलुषित बुद्धी आणि स्वार्थ यांच्या प्रभावाखाली येऊन संघाचे टीकाकार झालेल्या लोकांना खूप काही नवीन देण्याचा विषय या तीन दिवसाच्या कार्यक्रमातून झाला.


 

डॉ. हेडगेवारांनी १९२५ साली संघ सुरू केला, तेव्हा त्याची बातमी कोणत्याही वर्तमानपत्रात आली नाही. डॉ. मोहनजी भागवत यांचा तीन दिवसीय ‘भविष्यातील भारत’ या विषयावर व्याख्यान आणि प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम झाला. त्याची बातमी सर्व वर्तमानपत्रांत आणि दूरदर्शन वाहिन्यांवर प्रसारित झाली. कसलीही दखल न घेतली जाणारा १९२५ चा संघ, २०१८ ला केवळ भारतातच नव्हे, तर जागतिक स्तरावर दखल घेणारा झाला. डॉ. हेडगेवारांनी १९२५ साली जे सांगितले, ते जवळजवळ जसेच्या तसे डॉ. मोहनजी भागवत यांनी दोन दिवसीय भाषणातून आणि एक दिवसीय प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमातून सांगितले. डॉ. हेडगेवारांनी १९२५ साली संघ सुरू करत असताना सांगितले की, हे आपले प्राचीन हिंदूराष्ट्र आहे. हिंदुंच्या असंघटीतपणामुळे ते दुर्बळ झाले आहे, त्यामुळे पारतंत्र्यात गेले आहे. त्याला स्वतंत्र आणि सबळ करण्यासाठी हिंदुंचे संघटन झाले पाहिजे. केवळ हिंदू संघटनेसाठी संघ सुरू झाला. डॉ. मोहनजी भागवत यांनी विज्ञान भवनातील आपल्या भाषणात संघ आज काय करू इच्छितो, हे डॉक्टरांच्याच शब्दांत सांगितले. “संघाला हिंदू संघटन करायचे आहे. व्यक्ती निर्माण हे आमचे काम आहे आणि संघ फक्त तेवढेच काम करतो.” डॉ. हेडगेवारांनी १९२५ साली सांगितले की, “संघ राजकारण करणार नाही. संघ कोणत्याही चळवळीत भाग घेणार नाही. पन्नास स्वयंसेवक झाले, तर त्याचे पाचशे कसे होतील, पाचशेचे पाच हजार कसे होतील, पाच हजारचे पन्नास हजार कसे होतील याचा संघ विचार करीत राहील.” ‘संघटनेसाठी संघटना’ हे डॉक्टरांनी सांगितले. विज्ञान भवनातील भाषणात डॉ. मोहनजींनी हेच सांगितले. संघ राजकारण करीत नाही. संघाच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याला राजकीय पक्षाचा सभासद होता येत नाही. संघाचे स्वयंसेवक राजकारणात असतात. ते सत्तेवर जातात. दिल्लीत आज भाजपची सत्ता आहे. पंतप्रधान आणि राष्ट्रपतीदेखील संघस्वयंसेवक आहेत. परंतु, सरकार संघ चालवित नाही. ‘नागपूरवरून फोन गेला म्हणून असा निर्णय झाला,’ या म्हणण्याला काही अर्थ नाही. डॉक्टरांनी एक दृष्टी ठेवली की, संघ संस्था म्हणून काही करणार नाही, परंतु संघ संस्कार ग्रहण केलेले स्वयंसेवक राष्ट्र उभारणीसाठी जे जे आवश्यक आहे ते ते करतील. महाराष्ट्राचे माजी संघचालक बाबाराव भिडे म्हणत की, “संघ काही करणार नाही, परंतु झाले मात्र पाहिजे सर्व.” आज जीवनाच्या सर्व क्षेत्रांत संघस्वयंसेवक काम करतात. समाजावर त्याचा परिणाम होतो. संघस्वयंसेवक जे काम करतात ते अतिशय उत्तम प्रकारे केलेले काम असते. डॉ. मोहनजींनी आपल्या भाषणातून हे सर्व विशद केले.

 

संघस्वयंसेवकांचे अस्तित्त्व जीवनाच्या सर्व क्षेत्रात वेगवेगळ्या संस्था जीवनाच्या आणि सेवाकार्याच्या माध्यमातून समाज अनुभवत असतो. यामुळे संघ ही देशातील शक्तिशाली संघटना झालेली आहे.जो शक्तिस्थानावर पोहोचतो, त्याची दखल सर्वांना घ्यावी लागते, तुमची इच्छा असो अगर नसो. १९२५ साली संघाची शक्ती शून्य होती. २०१८ साली संघाची शक्ती अमर्याद झालेली आहे. म्हणून १९२५चा नगण्य संघ देशात आज अग्रगण्य संघ झालेला आहे. संघ शक्तिशाली झाल्यामुळे आणि संघाचे स्वयंसेवक राजसत्तेत असल्यामुळे काही लोकांना असे वाटते की, संघ ‘रिमोट कंट्रोल’ने सत्ता चालवितो. संघ हे घटनाबाह्य शक्तिकेंद्र आहे. संसदीय लोकशाहीत न बसणारी ही संकल्पना आहे. टीकाकार जेवढी भाजपवर टीका करतात, त्याहून अधिक ते संघाला लक्ष्य करीत असतात. पूर्वी संघाला लक्ष्य करताना ‘संघ प्रतिगामी संघटना आहे, संघाचा विचार संकुचित आहे, संघ दलित आणि महिलाविरोधी आहे, संघाला देशात धर्मसत्ता निर्माण करायची आहे, संघ फॅसिस्ट संघटना आहे,’ अशा प्रकारचे आरोप केले जात असत. त्यावेळेला लोक म्हणत की, ‘संघाला चिरडून टाकले पाहिजे. संघाला अरबी समुद्रात बुडविले पाहिजे. संघावर कायम स्वरूपाची बंदी घातली पाहिजे,’ असे म्हणणारी माणसे मोठी होती, ती निजधामाला गेली. आज त्यांचे नाव कुणीही काढीत नाही. संघ मात्र लोकधामात जाऊन बसलेला आहे. आज संघाला लक्ष्य करताना थोडी वेगळी भाषा वापरली जाते. संघ घटनाविरोधी आहे. संघाला ही घटना बदलून मनुस्मृतीवर आधारित घटना आणायची आहे. संघाला भारताला ‘हिंदू पाकिस्तान’ करायचा आहे. संघाला सगळे राजकीय पक्ष संपवून टाकायचे आहेत. भाजपची एकपक्षीय राजवट आणायची आहे. यामुळे आता संघावर घणघाती टीका करण्याचे शब्दही बदलले आहेत. कुणी म्हणतात, भारताला संघमुक्त केले पाहिजे. दुसरा म्हणतो, ‘मुस्लीम ब्रदरहूड’ आणि ‘इसिस’ याची दुसरी आवृत्ती म्हणजे संघ आहे. भारताच्या ऐक्याला संघ हा जबरदस्त धोका आहे. हिटलरने जसे ज्यूंचे शिरकाण केले, तसे संघ मुसलमानांचे करणार आहे. असे आरोप करणारे आणखी दहा वर्षांनी कुठे वसलेले असतील, हे मी सांगू शकत नाही. परंतु, संघ मात्र आज आहे, त्यापेक्षा दुप्पट किंवा तिप्पट लोकांच्या मनात आदराचे स्थान निर्माण करून वसलेला असेल. डॉ. मोहनजी भागवत यांनी सर्व लोकयुक्त भारताची संकल्पना आपल्या भाषणात मांडली. डॉ. हेडगेवार सांगत की, “आम्हाला कुणाचाही विरोध करायचा नाही. आमचे कुणाशी शत्रुत्व नाही.मोहनजींनी हाच आशय आजच्या परिभाषेत असा सांगितला की, “आमच्या ‘भारता’च्या संकल्पनेत आणि ‘हिंदुत्वा’च्या संकल्पनेत मुसलमानांना स्थान आहे. ‘मुसलमान वगळून भारतही आमची संकल्पना नाही. आम्ही विश्वबंधुत्व मानतो. ‘स्वदेशो भुवनत्रयम्’ अशी आमची संकल्पना आहे. ‘हे विश्वची माझे घर’ असा आपला विचार आहे. सर्वसमावेशकता, कुणाशी शत्रुत्व नाही आणि सर्वांनी मानवधर्माचे पालन करून गुण्यागोविंदाने राहावे, ही आमची संकल्पना आहे. ‘मुस्लीम ब्रदरहूड’शी तुलना करणार्यांना ही ‘युनिव्हर्सल ब्रदरहूड’ची (वैश्विक बंधुत्वाची) संकल्पना समजून घ्यायला पाहिजे. संघ यासाठी आपले काम करतो आहे.

 

आज विश्वात ज्या ज्या ठिकाणी हिंदू आहेत, त्या त्या ठिकाणी त्या त्या देशांच्या कायद्यानुसार हिंदू संघटनेचे काम चालते. हे वैश्विक काम आहे आणि विश्वातील हिंदुंना संघाचे एवढेच सांगणे असते की, आपण ज्या ठिकाणी राहतो, तिथल्या लोकजीवनाशी आपण समरस झाले पाहिजे. चांगले हिंदू जीवन कसे असते, ते आपल्या उदाहरणातून सर्वांपुढे ठेवले पाहिजे. पहिल्या दिवशीच्या भाषणातच डॉ. मोहनजींनी एक गोष्ट स्पष्ट केली की, “मी तुमचे मतपरिवर्तन करण्यासाठी येथे आलेलो नाही. संघ काय आहे आणि तो कसा चालतो, कसा विचार करतो, हे सांगण्यासाठी मी येथे आलेलो आहे. संघाला आपला विचार कुणावरही लादायचा नाही. जबरदस्ती लादणे ही आपली परंपरा नाही. या परंपरेचे उदाहरण म्हणजे त्यांनी एका प्रश्नाचे उत्तर आहे. ते म्हणाले,“सर्व धर्म समान आहेत, हे एकदा स्वीकारले तर धर्मांतर करण्याची काही आवश्यकता राहत नाही.काही गोभक्त कायदा आपल्या हातात घेतात आणि आपले म्हणणे दुसऱ्यावर लादण्याचा प्रयत्न करतात. डॉ. मोहनजींनी त्याचे समर्थन केले नाही. ते म्हणाले की, “कायदा मोडणार्यांना शिक्षा झाली पाहिजे.” ‘आय हॅव कम टू फुलफिल, नॉट टू डिसट्रॉय,’ हे बायबलमधील वाक्य त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. त्याचा अर्थ होतो, ‘मी विनाशासाठी आलो नसून पूर्तता करण्यासाठी आलो आहे.’ म्हणजे, संघाचे काम कसल्याही प्रकारचा विनाश करण्याचा नसून परिपूर्ण करण्याचे आहे. ही परिपूर्णता कसली आहे, तर भारताचा एक स्वभाव आहे. हा स्वभाव विश्वाला शांती आणि सुखाचा मार्ग दाखविण्याचा आहे. विश्व त्याने परिपूर्ण करायचे आहे. परंतु, केवळ विचार सांगितल्याने ते होणारे नाही. त्यासाठी विचार जगणारा समाज उभा करावा लागतो. डॉ. हेडगेवार सांगत असत की, “तत्त्वे खूप चांगली आहेत म्हणून समाज चांगला होतो असे नाही. तत्त्वे जगावी लागतात. ती जीवनातउतरावी लागतात, तेव्हा त्या तत्त्वांना अर्थ निर्माण होतो. हिंदू समाजाकडे मानवजात सुखी करण्याचे तत्त्वज्ञान आहे; परंतु हे तत्त्वज्ञानआपण जगत नाही. ते आपल्या तत्त्वज्ञानाच्या ग्रंथात असते, जीवनातनसते. डॉक्टरांनी हे तत्त्वज्ञान जीवनात आणण्यासाठी संघ सुरू केला. डॉ. मोहनजींनीदेखील हेच सांगितले. “आम्हाला तत्त्वज्ञानजगायला शिकले पाहिजे,” आपल्या संविधानाचा उल्लेख करून ते म्हणाले की, “संविधानाच्या उद्देशिकेत ‘बंधुभाव’ हा शब्द आहे. ही उद्देशिका आपल्याला सांगते की, राष्ट्राचे ऐक्य आणि एकात्मता निर्माण करण्यासाठी समाजात बंधुभाव निर्माण झाला पाहिजे.

 

समाजात बंधुभाव निर्माण व्हायचा असेल, तर स्त्री-पुरूष समानता, जाती समानता, पंथ समानता, निर्माण झाली पाहिजे. स्त्रीविषयीचा दृष्टिकोन डॉ. मोहनजींनी आपल्या भाषणातून स्वच्छ शब्दांत मांडला “स्त्रीला ‘देवता’ बनवू नये आणि ‘दासी’ही करू नये. तिला बरोबरीचे स्थान दिले पाहिजे आणि निर्णयप्रक्रियेत तिला सहभागी करून घेतले पाहिजे. अनेक बाबतीत पुरुषांपेक्षा स्त्रिया अधिक कार्यक्षमतेने काम करताना दिसतात. तसेच जातींचा विचार करता, संघात कुणी कुणाची जात विचारीत नाही. त्यांनी एक उदाहरण दिले, ते जेव्हा सरकार्यवाह झाले तेव्हा सहसरकार्यवाह म्हणून सुरेश सोनी यांचेही नाव घोषित झाले. वृत्तपत्रांनी बातमी दिली की, एक सहसरकार्यवाह ओबीसीचा असावा म्हणून सोनी यांना ठेवले आहे. डॉ. मोहनजींनी सुरेशजींना विचारले, “तुम्ही ओबीसीत येता का?” तेव्हा ते नुसतेच हसले. कारण, संघात असलेल्या कुणालाही बरोबरच्या कार्यकर्त्यांची जात माहीत नसते. जातीचा विषय सुरू झाला की त्याला जोडून आरक्षणाचा विषय येतो. आरक्षण किती काळ राहणार, ते ठेवायलाच पाहिजे का, असले प्रश्न निर्माण होतात. डॉ. मोहनजींनी आरक्षणाविषयी संघाची भूमिका स्वच्छ शब्दांत मांडली. “आरक्षण हे घटनेतून आलेले आहे आणि ज्यांच्यासाठी आहे, त्यांनीच त्याचा निर्णय ते किती काळ ठेवायचे हा करायचा आहे.” एवढी स्पष्ट भूमिका मांडल्यानंतरही काहीजण संघ आरक्षणविरोधी आहे, हे तुणतुणे वाजवतच राहतील. कारण, त्यांच्या डोळ्यांसमोर निवडणुकीचे राजकारण आहे. त्यांना आरक्षण राहिले काय आणि गेले काय, यापेक्षा आरक्षणाच्या तव्यावर राजकारणाची पोळी कशी भाजता येईल, याचीच चिंता असते. या तीन दिवसीय भाषणाचा विषय ‘भविष्यातील भारत’ हा होता आणि कार्यक्रमासाठी देशभरातील विविध विचारधारा मानणाऱ्या लोकांना कला, उद्योग, व्यापार, विज्ञान इत्यादी क्षेत्रांतील मान्यवरांना निमंत्रण दिले होते.

 

दहा वर्षांपूर्वी जर असा कार्यक्रम केला असता, तर त्याचा स्वीकार या लोकांनी केला असता का? असा प्रश्न नक्कीच निर्माण होतो. आज मात्र परिस्थितीत खूपच बदल झालेला आहे. विज्ञान भवनातील एकही आसन रिकामे नव्हते. शांतपणे सर्वजण भाषण ऐकत होते. भाषणाला दाद देत होते. डॉ. मोहनजींनी पहिल्याच भाषणात म्हटल्याप्रमाणे विचार लादण्याचा प्रयत्न केला नाही. विचार लादायचा असेल तर तो आक्रमकपणे मांडावा लागतो. प्रतिपक्षाचे खंडन करावे लागते. ते कसा चुकीचा विचार करतात, याची मांडणी करावी लागते. आमचेच म्हणणे कसे खरे आहे, हे सांगावे लागते. अशी मांडणी एकतर्फी असते. वकीलपत्र घेतल्यासारखा युक्तिवाद असतो. संघाची डॉ. हेडगेवारांपासूनची भूमिका अशी आहे की, आपल्या देशाचा जो सर्वसमावेशक, सर्व पंथाचा आदर करणारा आणि सर्व लोकांना स्वीकारणारा विचार आहे, तोच संघाचा विचार आहे आणि तशीच मांडणी डॉ. मोहनजींनी केली. ‘हिंदुत्व’ ही उपासना पद्धतीशी जोडलेली संकल्पना नाही, ती मूल्यांवर आधारित संकल्पना आहे. ही मूल्ये भारतातील सर्व पंथ-संप्रदयात सारखी आहेत. भगवान गौतम बुद्ध, महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर आणि ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी याबाबतीत काय म्हटले हे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. ‘भविष्यातील भारत’ सर्वसमावेशक आणि आपल्या जीवनमूल्यांवर जगणारा असेल. ही जीवनमूल्ये केवळ आपल्यालाच लाभदायक आहेत,असे नसून ही सर्व मानवजातीला लाभदायक आहे. भारतातील कोणताही उपासना पंथ असे सांगत नाही की, या पंथातील विचार हा पंथ मानणार्यांनाच लाभदायक आहे. हे विचार सर्व मानवजातीसाठी आहेत. मानवकल्याण हेच भारताचे वैश्विक लक्ष्य आहे. ही जीवनमूल्ये विश्वात आज मान्य होत चाललेली आहेत, याचे स्मरण डॉ. मोहनजींनी करून दिले. ‘भविष्यातील भारत’ केवळ स्वत:चा विचार करणारा भारत नसेल, तर ‘भविष्यातील भारत’ विश्व मानवाचा विचार करणारा भारत असेल. हे भारताचे वैश्विक लक्ष्य आहे. हे लक्ष्य संघाने शोधले असे नसून किंवा संघानेच ते प्रथम मांडले असेही नसून भारतातील सर्व थोर विचारवंतांनी ते मांडलेले आहे.

 
संघ या विचारानुसार चालतो. तशा व्यक्ती घडविण्यात संघाची सर्व शक्ती खर्च होते, हेच संघाचे वैशिष्ट्य आहे. या तीन दिवसीय उपक्रमाची चर्चा दीर्घकाळ चालू राहील. संघाच्यादृष्टीने विचार केला, तर समाजातील सर्व स्तरांना जवळ करण्याच्या दृष्टीने संघाने टाकलेले हे फार मोठे पाऊल आहे. संघाच्या पारंपरिक टीकाकारांना आणि त्यातीलही प्रामाणिक टीकाकारांना विलक्षण धक्के देणारे विषय मोहनजींच्या भाषणातून आलेले आहेत. अज्ञान, भ्रम, कलुषित बुद्धी आणि स्वार्थ यांच्या प्रभावाखाली येऊन संघाचे टीकाकार झालेल्या लोकांना खूप काही नवीन देण्याचा विषय या तीन दिवसाच्या कार्यक्रमातून झाला. ज्यांनी झोपेचे सोंग घेतलेले आहे ते अशा भाषणाने जागे होणार नाहीत. समाजात काही लोकांची प्रवृत्ती अशी असते की, ते कशातही काहीही चांगले बघत नाहीत, त्यांची बुद्धी नेहमीच तिरकस चालते. त्यांचे समाधान जगातील कुणीही करू शकत नाही. त्यांच्या विचारांत आणि मनात बदल घडवून आणणे अशक्य आहे. दुर्योधन एकदा म्हणाला, “धर्म आणि अधर्म काय आहे, हे मी चांगल्या प्रकारे जाणतो; परंतु माझी प्रवृत्ती धर्माची नाही. अधर्माचे मला आकर्षण असते.अशा दुर्योधनांना ही भाषणे सुधारू शकत नाहीत. म्हणून त्याची चिंता करण्याचे करण नाही. युग परिवर्तनाच्या उंबरठ्यावर भारत उभा आहे. विवेकानंद, योगी अरविंद, महात्मा गांधी, आदी थोर पुरुषांनी जागृत होणाऱ्या भारताचेस्वप्न पाहिले. भारत आपले जडत्व टाकून पुन्हा चैतन्यमयी होईल आणि सर्व विश्वाला आपल्या कवेत घेण्याच्या शक्तीने उभा राहील, असे भव्य दृश्य या सर्वांनी पाहिले. ते दृश्य साकारण्याची कार्यशाळा डॉ. हेडगेवारांनी १९२५ साली सुरू केली. आज ९३ वर्षांनंतर संघ कार्यपद्धतीच्या विकासातून सर्वांगीण परिवर्तन घडवून आणणारी सात्विक शक्ती या देशात उभी राहिलेली आहे. डॉ. मोहनजी या शक्तीचे प्रतिनिधीत्व करतात आणि या शक्तीच्या अधिष्ठानावरून त्यांनी आपल्या पूर्वजांच्या भविष्यातील भारताचे अधिष्ठान काय असेल, हे ‘विज्ञान भवना’त सांगितले. ते उद्याच्या भारताचे आणि विश्वाचे खऱ्या अर्थाने ‘विज्ञान’ आहे.
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@