आंबेडकरांनी आम्हाला धर्मनिरपेक्षता शिकवू नये : पवार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Sep-2018
Total Views |




मुंबई : एकीकडे मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन या मुस्लिम कट्टरतावादी पक्षाशी हातमिळवणी करत सर्वांनाच धक्का देणारे भारिप बहुजन महासंघाचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्यावर धर्मनिरपेक्षतेच्या मुद्द्यावरून जाहीर टीका केली होती. यानंतर आता शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातील वाक्युद्ध चांगलेच रंगले आहे. आंबेडकर यांच्या टीकेला उत्तर देताना शुकवारी पवार यांनी आंबेडकरांनी आम्हाला धर्मनिरपेक्षता शिकवू नयेअशा आशयाचा टोला लगावला.

 

शरद पवार म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष धर्मनिरपेक्ष नसता तर अकोल्यातील दोन निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांनी राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला नसता. प्रकाश आंबेडकर हे मला आधी धर्मनिरपेक्ष वाटायचे, पण आता वाटत नाहीत, अशीही बोचरी टीका पवार यांनी केली. तसेच, कित्येक वर्षांपूर्वीची मुंबईतील लोकसभा निवडणुकीची आठवण सांगत पवार यांनी आपण झालं-गेलंविसरलो नसल्याचा सूचक इशारा दिला. ते म्हणाले की, ईशान्य मुंबईत आमच्या उमेदवाराचा पराभव करण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी त्यांच्या पक्षात असलेल्या नीलम गोऱ्हे यांना निवडणुकीत उभे केले. आंबेडकरांच्या या निर्णयामुळे भाजप नेते प्रमोद महाजन यांना थेट फायदा मिळाल्याचा आरोप पवार यांनी केला.

 

भाजपच्या उमेदवाराला फायदा होण्यासाठी आपल्या पक्षाचे उमेदवार उभे करणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांनी आम्हाला धर्मनिरपेक्षता शिकवू नये, असा टोला शरद पवार यांनी लगावला. काही दिवसांपूर्वीच प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांच्यावर टीका करताना पवार धर्मनिरपेक्ष आहेत, परंतु त्यांचा पक्ष (राष्ट्रवादी) नाही, अशी टीका केली होती. तसेच, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्याशी राष्ट्रवादीच्या नेत्यांचे संबंध असल्याचाही आरोप त्यांनी केला होता. तसेच, यामुळे राष्ट्रवादीशी आघाडी करणे शक्य नसल्याचे सांगत आंबेडकर यांनी पवारांना स्पष्टपणे झिडकारले होते. या साऱ्या टीकेला पवार यांनी शुक्रवारी आंबेडकरांनी आम्हाला धर्मनिरपेक्षता शिकवू नयेअसे स्पष्ट उत्तर दिले. यामुळे आगामी काळात हे शाब्दिक युद्ध आणखी जोरात रंगण्याची चिन्हे दिसत असून याला प्रकाश आंबेडकर काय उत्तर देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

 

..मग पवारांच्या स्वप्नाचे काय?

 

२०१९ च्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांनी भाजपविरोधी पक्षांची आघाडी उभी करण्यासाठी जोरदार प्रयत्न चालवले आहेत. या प्रयत्नांतून पवार पुन्हा एकदा विरोधी पक्षांची मोट बांधून राष्ट्रीय स्तरावर नेतृत्व करण्यासाठी धडपड करत असल्याचेही बोलले जात आहे. भीमा-कोरेगाव हिंसाचारानंतर प्रकाशझोतात आलेले प्रकाश आंबेडकर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत यावेत म्हणून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न झाले होते, परंतु प्रकाश आंबेडकर यांनी त्यांची डाळ शिजू दिली नाही, असे पक्षांतर्गत सूत्रांकडून समजते. आता तर थेट एमआयएमशीच युती करत आणि पवारांवर जाहीर टीका करत आंबेडकरांनी भाजपविरोधी आघाडीच्या स्वप्नांना सुरूंग लावला असल्याचे बोलले जात आहे.

@@AUTHORINFO_V1@@