शिवसेनेपुढे ‘सरडा’ही खजील!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Sep-2018
Total Views |

जनमानस

 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...https://www.facebook.com/Tarunbharatjal/
 
दारूची नशा एकवेळ उतरते, पण सत्तेची नशा एकदा मस्तकात भिनली की, उतरता उतरत नाही. तसाच प्रकार जळगाव महापालिकेत शिवसेनेचा झाला आहे. सत्ता आणि खुर्चीसाठी रंग बदलणार्‍या शिवसेनेचे कथित स्वयंघोषित नेते आणि त्यांच्या ‘महाजनकी’पुढे हे तर आपलेही ‘बाप’ निघाले, असे म्हणत चक्क सरडाही खजील होईल. या नेत्यांनी गेली ३० वर्षे सत्तेची फळे चाखली. असे करताना शोषण झाले, ते जळगावकरांचे आणि पोषण झाले ते या तथाकथित नेत्यांचे. शहराचा सत्यनाश करूनही यांची पोटं अजूनही काही भरलेली नाहीत. महापालिका निवडणुकीत हायव्होल्टेजचा ‘झटका’ बसूनही ही मंडळी भानावर येण्यास तयार नाहीत. यांना चढलेल्या नशेसाठी शुद्धीवर आलेल्या अट्टल दारूड्यानेही यांच्यासमोर लोटांगणच घालायला हवे. महापौर निवडणुकीत केलेला ‘बिग ड्रामा’ फसल्यानंतर आता विरोधी पक्षनेत्याला दालन मिळावे, अशी यांची मागणी आहे. त्यासाठी ते तगमगत आहेत. परंतु, असे दालन मिळावे किंवा अशी मागणी करावी, एवढी नैतिकता तरी यांच्यात आहे का?
 
 
महापालिकेतील विशिष्ट गटाच्या भ्रष्टाचाराविरुद्ध आयुष्यभर लढलेलेे ज्येष्ठ व अभ्यासू नगरसेवक दिवंगत नरेंद्रअण्णा पाटील यांना महानगर विकास आघाडीचे गटनेते म्हणून मिळालेले दालन एकेकाळी यांनीच बळजबरीने काढून घेतले होते, हे ते विसरलेले दिसतात. या इतिहासाची शिवसेना नेत्यांची एकदा आवर्जून उजळणी करावी. मुंबई, पुणे, नागपूर आणि औरंगाबाद येथील महापालिकेत सर्वच पक्षांचे गटनेते व विरोधी पक्षांना देण्यात आलेले दालन, कर्मचारी व अन्य सुविधा याची माहिती रितसर ‘माहिती अधिकारा’त मागवून त्याआधारे नरेंद्रअण्णांनी जळगाव महापालिकेत दालनाची विनंती केली होती. ती तत्कालीन महापौर आशाताई कोल्हे यांनी मान्यही केली होती. अण्णांना या दालनामुळे ‘ऑफिशियल स्टेट्स’ मिळाले होते. पण यामुळे महापालिकेतील भ्रष्टाचाराची इत्थंभूत माहिती तेथूनच मीडियाला पुरविली जाते की काय, या संशयापोटी कथित घोटाळ्यातील ‘रथी-महारथीं’चा तीळपापड झाला. गटनेत्यांचे दालन काढून घेण्याचा ठराव केला गेला आणि त्याची तातडीने अंमलबजावणीही करण्यात आली. अण्णांनी आपल्यावरील अन्यायाविरोधात शेवटपर्यंत संघर्ष केला. काळ बरोबर सूड उगवतो, हे शिवसेना नेत्यांनी समजून घेतले पाहिजे. नरेंद्रअण्णा महापालिकेत असे आदरणीय व्यक्तिमत्त्व होते की, त्यांच्याकडे बोट दाखविण्याची कुणीही हिंमत केली नाही. उलट काही नेत्यांकडे मात्र, त्यांनी केलेल्या किंवा त्यांच्या नेतृत्त्वात झालेल्या भ्रष्टाचारासाठी जळगावातील लक्षावधी बोटे अंगुलीनिर्देश करतात, याकडे मात्र सोईस्कर डोळेझाक केली जाते.
 
विरोधी पक्षनेत्याचे दालन मिळावे, म्हणून आज शिवसेनेची जी तगमग चालली आहे ती वृथा आहे. असाच प्रकार तेव्हा विरोधी बाकावर भाजपा नेत्यांच्या बाबतीतही घडला होता, हे कसे विसरता येईल? एकीकडे इतरांचे महत्त्व वाढू नये, म्हणून ज्येष्ठ-श्रेष्ठांची दालने काढून घ्यायची आणि दुसरीकडे आता मात्र, ‘आम्हाला दालन द्या’ अशी याचना करायची. ही दुटप्पी भूमिका नैतिकतेच्या कोणत्या कसोटीवर खरी उतरेल? जळगावकरांनी ज्यांना आधीच ‘बाहेरचा रस्ता’ दाखविला आहे, त्यांनी याचा अर्थ जाणून घ्यावा. त्यात गल्लत झाल्यास पार्किंगच नव्हे, तर एखाद्या रस्तावरही बसणे नशिबी येऊ शकते.
 
 
भाजपाने ‘जनतेचे विश्‍वस्त’ म्हणून काम करण्याची भूमिका स्वीकारली आहे. तसे ते त्यांनी जाहीरपणे सांगितले तर त्यात गैर काय? उलट भाजपाची भूमिका समस्त जनतेपर्यंत पोहोचल्याने पक्षावरील नैतिकतेचा दबाव अधिक वाढला आहे. जबाबदारीचे भान दुप्पट झाले आहे. मनपाच्या कर्जमुक्तीपर्यंत वाहने वापरणार नाही, भत्ता घेणार नाही, हे प्रामाणिकपणे आणि उघडपणे सांगायलाही धारिष्ट्य लागते. याआधी वाहने न वापरणार्‍याचा निर्णय घेतलेल्या काही मोजक्या पदाधिकार्‍यांनी काय दिवे लावले आहेत? कुणी किती भूखंड सोडवून घेतले, त्याचा वापर (टायटल) कसा बदलवून आणला आणि कोट्यवधींचा मलिदा कसा पचविला? हे जळगावकरांना ठावूक नाही, असे समजण्याचे कारण नाही.
 
 
सत्तेवर असताना करदात्यांना यथेच्छ लुटणार्‍यांना सत्ता जाताच आपली प्रतिष्ठा आठवते, जनतेचा कळवळा येतो? गंमतच आहे. म्हणूनच तर या रंग बदलणार्‍या बापांपुढे सरडादेखील खजील होईल. जळगावकरांनी केवळ सत्तेवरून खाली खेचले आहे, यातच ‘महाजनकी’ करणार्‍यांनी सुदैव मानावे. अन्यथा त्यांनी अन्य मार्गाचाही अवलंब केला असता. ‘उतू नका, मातू नका’ हे म्हणणे चुकीचे नाही. सत्तेत असताना सुखेनैव ‘विलासी’ सत्ता उपभोगताना सर्वसामान्यांची कशी हाय लागली याची मोजदाद त्यांनी जरूर करावी. म्हणजे आजचे मिळालेले फळ आणि झालेली स्थिती याचे कारण काय? हे झगझगीतपणे त्यांना कळल्यावाचून राहणार नाही. एखादा पक्ष किंवा त्याचा विचार कधीच वाईट नसतो. फक्त तो अमलात कसा आणला जातो, यावर त्याचे मूल्य ठरत असते. जळगावात शिवसेनेच्या काही अतिउत्साही नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठींची मान खाली आणली आहे. त्याला कारण आहे, त्यांची अपरिपक्वता आणि उठवळपणा!
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...https://www.facebook.com/Tarunbharatjal/
 
 
@@AUTHORINFO_V1@@