गीरच्या जंगलात ११ सिंहांचा मृत्यू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Sep-2018
Total Views |


जुनागढ : गुजरातमधील सिंहांसाठी प्रसिद्ध असलेल्या गीरच्या जंगलात ११ सिंहांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जंगलाच्या पूर्व भागात ही घटना घडली असून गेल्या ११ दिवसांत ११ सिंहांचा मृत्यू झाला असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी गुजरात राज्य सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत.

 

गीर राष्ट्रीय उद्यानाच्या येथील पूर्व भागात ११ सिंहांचे मृतदेह मिळाल्याची माहिती गुजरात वन विभागाचे उपसंरक्षक पी. पुरुषोत्तम यांनी माध्यमांशी बोलताना दिली. ते म्हणाले की, ”अमरेली जिल्ह्यातील राजुला भागात आम्हाला काही सिंहांचे मृतदेह बुधवारी मिळाले. त्यानंतर आणखी तीन सिंहांचे मृतदेह त्याच दिवशी दलकहनियाजवळ मिळाले. या सगळ्या मृतदेहांचा व्हिसेरा आम्ही जुनागड येथील वन्य प्राण्यांच्या रुग्णालयात पाठवला असून या संदर्भातला अहवाल आल्यावरच हे मृत्यू का झाले, याची माहिती मिळू शकेल,” असेही पुरुषोत्तम यांनी स्पष्ट केले.

 

दुसरीकडे, राज्याच्या वन व पर्यावरण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजीवकुमार गुप्ता यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले असल्याचे सांगितले. मुख्य वनसंरक्षकांच्या अध्यक्षतेखालील समिती या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे ते म्हणाले. ११ पैकी ८ सिंहांचा मृत्यू हा आपसातील भांडणात एकमेकांवर केलेल्या हल्ल्यामुळे झाला असल्याचा अंदाजही गुप्ता यांनी यावेळी व्यक्त केला. गुजरातमधील गीरचे जंगल सिंहांसाठी प्रसिद्ध आहे. प्रतिवर्षी हजारो, लाखो पर्यटक येथे सिंहांना पाहण्यासाठी येत असतात. त्यामुळे अशा जगप्रसिद्ध जंगलात एक-दोन नाही तर तब्बल ११ सिंह केवळ ११ दिवसांत मृत आढळल्याने या घटनेकडे सर्व प्राणीप्रेमी तसेच पर्यावरण क्षेत्राचे लक्ष वेधले गेले आहे. २०१५ मधील प्राणी जनगणनेनुसार गीरच्या जंगलात एकूण ५२० सिंह आहेत. सदर ११ पैकी ८ सिंहांचा मृत्यू हा आपसातील भांडणात एकमेकांवर केलेल्या हल्ल्यामुळे झाला असल्याचा अंदाज आहे. तथापि, आम्ही या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले असून मुख्य वनसंरक्षकांच्या अध्यक्षतेखालील समिती याप्रकरणी चौकशी करणार आहे, असे वनविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजीवकुमार गुप्ता यांनी सांगितले आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@