रुग्णसेवेचा वसा घेतलेला प्रसाद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Sep-2018   
Total Views |



 


‘रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’ या उक्तीला आपल्या आयुष्याचे ध्येय ठरवून हजारो रुग्णांना जीवनदान देणारे, त्यांच्या नातेवाईकांना सदैव मदतीचा हात देणाऱ्या प्रसाद अग्निहोत्रींविषयी...


शिवभावे जीवसेवेचा वसा घेऊन समाजातल्या असहाय्य, दीन-दुबळ्या आणि असाध्य आजारांनी ग्रासलेल्या रुग्णांची सेवा करणारे प्रसाद अग्निहोत्री आज संवेदना रुग्ण सेवा समितीच्या माध्यमातून मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नाशिक आणि पुणे शहरात कार्यरत आहेत. २४ जानेवारी, १९६९ रोजी जन्मलेल्या प्रसाद अग्निहोत्री यांनी अगदी ऐन तारुण्यातच आपल्या आजूबाजूला आरोग्यविषयक समस्यांनी, अडचणींनी पिचलेल्यांना, गांजलेल्यांना साहाय्य करायचे ठरवले. नव्वदच्या दशकात ज्यावेळी भारत-पाकिस्तानदरम्यान युद्धाचे ढग जमा होऊ लागले, त्यावेळी २१ वर्षांच्या प्रसाद अग्निहोत्री यांना देशासाठी योगदान देण्याची इच्छा झाली. युद्धामध्ये प्रत्येकजण सीमेवर जाऊन लढू तर शकत नाही, पण अन्य मार्गांनी सैनिकांची, लष्कराची मदत तर करू शकतो ना, हा विचार करून प्रसादने रक्तदान शिबीर भरवण्याचे पक्के केले. मात्र, महाविद्यालयात जाणाऱ्या एकट्या तरुणाला रक्तदान शिबिराचे आयोजन करणे शक्य नव्हते. भारतीय जनता युवा मोर्चाचा वाशीतील अध्यक्ष असलेल्या प्रसादने त्यावेळी आपल्या संघटनेच्या व पक्षाच्या साहाय्याने रक्तदान शिबिराचे आयोजन केले, ज्याला मेजर पालकर यांची विशेष उपस्थिती होती. केईएम रुग्णालयाच्या रक्तपेढीने या शिबिरातल्या रक्तपिशव्या संकलनाची जबाबदारी घेतली. मात्र, त्या रक्तपिशव्या ‘आयएनएस अश्विनीव त्यावरील जवानांसाठी उपयोगात आणल्या गेल्या. या दिवसापासून प्रसाद अग्निहोत्रींचे रुग्णसेवेचे काम सुरू झाले.

 

प्रसाद अग्निहोत्रींच्या रुग्णसेवेच्या कामाचा खरा ट्रिगर पॉईंट ठरला तो मात्र, कॅन्सरवर उपचार करणाऱ्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलमधील अनुभव. १९९०च्याच ऑक्टोबर महिन्यात प्रसादच्या एका मित्राने रक्तदान करायला ये, म्हणून बरोबर येण्यास सांगितले. वाशीतून निघून गोवंडी, चेंबूर, कुर्ला अशी रेल्वेस्थानके एकामागून एक जात होती आणि प्रसाद आपल्या मित्राला नेमके कुठे जायचे रक्तदानासाठी हे विचारत राही. पण मित्र, केवळ आले जवळ, आले जवळ असे म्हणून कुठे जात आहोत, हे सांगण्याचे टाळत असे. शेवटी मित्राने त्यांना टाटा हॉस्पिटलमध्ये नेले. इथे यायचे हे आधी का सांगितले नाही,” असे विचारल्यावर मित्राने, “टाटा हॉस्पिटलचे नाव घेतले की लोक घाबरतात, म्हणून नाव सांगितले नाही,” असे उत्तर दिले. नंतर प्रसादने तिथे रक्तदानाऐवजी प्लेटलेट्सची गरज असल्याने प्लेटलेट्स दान केल्या. त्याचवेळी टाटा हॉस्पिटलमध्ये आलेल्या शेकडो रुग्णांची करुण आणि केविलवाणी अवस्था जवळून पाहिली. रुग्णांची बिकट अवस्था आणि त्यांच्या नातेवाईकांचे भकास चेहरे, टाटा हॉस्पिटलमधल्या या दृश्याने प्रसादला अंतर्बाह्य हलवून सोडले आणि इथूनच त्यांनी ठरवले की, आपले अवघे आयुष्य रुग्णसेवेच्या कामातच लावायचे. गेली २७-२८ वर्षे प्रसाद अग्निहोत्री यांनी स्वतःला याच रुग्णसेवेच्या कार्यात झोकून दिले. कॅन्सर, टीबी, हृदयरोग, मधुमेह, किडनीविकार, अपघातग्रस्तांपासून ते मोठमोठ्या ऑपरेशनसाठी मदतीची आस लावून बसलेले, दृष्टिहीन अशा समोर येणाऱ्या प्रत्येक रुग्णासाठी प्रसाद अग्निहोत्री यांनी आपल्या कुवतीनुसार व संवेदना रुग्ण सेवा समितीच्या माध्यमातून मदत केली. आर्थिक मदत मिळवून देणे, बाहेरगावाहून येणाऱ्या रुग्णांसाठी अशी मदत देणाऱ्या संस्था, ट्रस्टपर्यंत घेऊन जाणे, सल्ला, मार्गदर्शन देणे, अशी अनेकानेक कामे आणि तेही वेळकाळाचे भान न पाहता दिवस असो वा रात्र ते सदैव करतच असतात. केवळ टाटा हॉस्पिटलच नव्हे, तर मुंबई आणि अन्यत्रही कितीतरी रुग्णालयांत त्यांचे कार्य सुरू आहे. रुग्णसेवेचे काम करत असतानाच त्यांना या कामात मदत करणारे हातही मिळत गेले.

 

फक्त रुग्णसेवाच नव्हे तर यंदाच्या जानेवारी महिन्यात प्रसाद अग्निहोत्री यांच्यासमोर आलेले प्रकरण हृदयद्रावक म्हणावे असेच होते. वयोपरत्वे आलेल्या ज्येष्ठत्वाने जीर्ण-शीर्ण शरीर झालेले एक आजोबा त्यांना विरारमध्ये असल्याचे समजले. दृष्टीहीन असलेल्या आजोबांच्या मुलांनी त्यांना घराबाहेर काढले होतेच, पण त्यांचा कोणताही वैद्यकीय खर्च देण्यासही असमर्थता व्यक्त केली होती. त्यांना मोतिबिंदू असल्याचे कळले. सगळा खर्च अग्निहोत्रींनी उचलला. पण, कालांतराने त्या आजोबांचे निधन झाले. हे त्यांच्या मुलांना कळवल्यानंतरही मुलं अंतीमसंस्कारासाठी फिरकली नाहीत.ही घटना खरे तर हृदयद्रावकच. मुंबईतील लोकलमधून चोरट्यांमुळे पडलेल्या मुलीचे आणि आणखी एका कर्करोगग्रस्त पण लिहित्या झालेल्या मुलीचे आणि अशा कितीतरी रुग्णांची आयुष्ये प्रसाद अग्निहोत्रींनी जवळून पाहिली, मदत केली. आजही ते आपल्या याच रुग्णसेवेच्या कार्यात बुडालेले असून प्रसाद अग्निहोत्रींचे रुग्णांच्या, त्यांच्या नातेवाईकांच्या चेहऱ्या वर हास्य फुलविण्याचे हे कार्य असेच पुढेही सुरू राहील, याबाबत खात्री बाळगूया.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@