...तर महापालिकेतील विजयाचे श्रेय असते नाथाभाऊंचेच!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Sep-2018
Total Views |

जनमानस

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... https://www.facebook.com/Tarunbharatjal/
 
जळगाव, १९ सप्टेंबर
राजकारणातील मुरब्बी, आदरणीय, ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्तिमत्त्व म्हणजे आ. एकनाथराव खडसे, अर्थात खान्देशचे ‘नाथाभाऊ’. त्यांनी जीव ओतून परिश्रमपूर्वक जळगाव जिल्ह्यात भाजपाची पक्ष उभारणी केली, संघटनेची मजबूत बांधणी केली. सुरेशदादांच्या वर्चस्वाखाली असलेली जळगाव महापालिका त्यांच्या तावडीतून मुक्त करून तेथे भाजपाची सत्ता आणायची, हे स्वप्नही त्यांचेच. आज ते प्रत्यक्षात साकारलेही आहे. मात्र, त्याचे श्रेय मिळण्याचे भाग्य नाथाभाऊंच्या नशिबी नाही. असे का व्हावे? असा प्रश्‍न सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पडला आहे.
 
 
नाथाभाऊंची प्रशासनावर प्रचंड पकड आहे, हे सर्वांनीच पाहिले आहे. कुठला विषय कुठून मार्गी लागू शकतो आणि अंतिमतः त्याचा लाभ किती आणि कधी मिळू शकतो, याविषयी असलेली त्यांची ‘दृष्टी’ निर्विवाद आहे. राज्याच्या विकासाशी निगडित अनेक प्रकल्प त्यांनी लीलया मार्गी लावले, ते केवळ त्यांच्या अंगी असलेल्या अभ्यासू वृत्तीमुळेच. लातूरमधील भीषण पाणीटंचाई काळात तेथील जनतेला पाणी उपलब्ध होण्यासाठी नाथाभाऊंनी केलेली धडपड लातूरकर आयुष्यभर विसरणार नाहीत. धडाडीचे निर्णय घेणारे नेते म्हणूनही त्यांची प्रतिमा आजतागायत सर्वांच्या मनावर कोरली गेली आहे. जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात एकेकाळी केवळ नाथाभाऊंचाच शब्द चालायचा, असा त्यांचा दरारा होता.
 
 
जळगाव महापालिकेत स्पष्ट बहुमतात सत्ता स्थापन करण्याचे भाजपाचे स्वप्न ऑगस्ट २०१८ मध्ये साकारले. महापौर व उपमहापौरही निवडले गेले. या ‘सुवर्णांकित’ विजयाचे श्रेय नाथाभाऊंना मिळू शकले असते पण..... यातला ‘पण’ हा शब्दच अनेकांना छळतो आहे. असे काय घडले की, नाथाभाऊ आणि हे अभिमानाचे क्षण यात इतके अंतर पडावे, इतका दुरावा निर्माण व्हावा.
 
 
राज्यात दुसर्‍यांदा भाजपा-सेना युतीचे सरकार आल्यानंतर नाथाभाऊंना कॅबिनेट मंत्रिपद मिळाले. ते मुंबईहून जळगावला रेल्वेने येत, त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी, बॅगा उचलण्यासाठी कार्यकर्त्यांची झुंबड उडायची आणि आज त्यांच्याकडे मंत्रिपद नसताना मोजकेच कार्यकर्ते आणि अंगरक्षक स्टेशनवर दिसतात. हे असे का? हे नाथाभाऊंना कळत नसेल, अशा भ्रमात या कार्यकर्त्यांनी राहू नये.
 
 
नाथाभाऊ जाहीरपणे सडेतोड बोलण्यासाठी ओळखले जातात. ते तसे बोलतात हे सर्वांनाच ठावूक आहे. परंतु, शांत राहून जे प्रश्‍न सुटू शकतात, ते बोलण्याने अधिकच बिघडतात, चिघळतात. याचे उत्तम उदाहरण घरकुल प्रकरणात जळगावकरांनी बघितले आहे. या प्रकरणात संशयित नेत्यांपेक्षा त्यांचे कार्यकर्तेच अतिउत्साही होते. त्यामुळे नंतर काय-काय घडले, हे सर्व लोक जाणतात. ‘एकास ठेच, पुढचा शहाणा’ ही म्हण प्रसिद्धच आहे. जीवनात चढ-उतार होत असतातच. अशावेळी संयमित राहण्याची गरज असते. मात्र, नाथाभाऊंच्या भोवती जी गर्दी असते, त्यात सर्वच त्यांचे हितचिंतक असतील, असे अजिबात म्हणता येणार नाही. काही जण त्यांच्या माध्यमातून आपला हेतू साध्य करणारेही असू शकतात. नाथाभाऊंनी एखादे वक्तव्य केले की, त्याचे वेगवेगळे ‘अर्थ’ काढून मीडियाला खाद्य पुरविणार्‍यांमध्ये आपलेच कार्यकर्ते आहेत का, याचा शोध आता नाथाभाऊंनी घेणे आवश्यक झाले आहे. कारण, त्यांच्या अनेक साध्या विधानांवर मीडियामध्ये जी उलटसुलट चर्चा झाली होती, त्याला खाद्य याच कार्यकर्त्यांनी पुरविले होते. हे नंतर लक्षात आले. पण तोपर्यंत नाथाभाऊंना अकारण बदनाम करण्याचा त्यांचा हेतू मात्र सफल झाला होता. त्यामुळेच आता अधिक काळजी घेण्याची गरज आहे.
 
 
नाथाभाऊंना ओळखणारे आजही सांगतात की, ते मंत्रिपदी कायम असते तर जळगावचा विकास नक्कीच दुप्पट वेगाने झाला असता. अनेक उद्योग शहरात आले असते. अर्थातच, याचे श्रेय नाथाभाऊंनाच मिळाले असते. पण, आज महापालिकेत भाजपा सत्तारूढ झाली असताना या विजयाचे श्रेय मात्र नाथाभाऊंना नाही. अफाट क्षमता, विकासाची दूरदृष्टी आणि कामे करवून घेण्याची धमक असूनही आपण बाजूला का पडतोय? याचा नाथाभाऊंनीही शांत चित्ताने एकदा तरी विचार करावा, अशीच कार्यकर्त्यांचीही इच्छा आहे. कारण, त्यांच्यासारखा धडाडीचा नेता जर आघाडीवर नसेल, तर कुठलेही युद्ध अंतिमतः जिंकता येत नाही, हा इतिहास आहे. तो जळगावलाही लागू होतो.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... https://www.facebook.com/Tarunbharatjal/
 
 
@@AUTHORINFO_V1@@