संघसत्याचा लखलखता प्रकाश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Sep-2018
Total Views |





संघ जातीव्यवस्थेचे समर्थन करतो, संघ आरक्षणविरोधी आहे, संघ घटना मानत नाही, संघ मुस्लीमविरोधी आहे, संघ तिरंगा-राष्ट्रध्वजाला मानत नाही, संघ हिंसेचे समर्थन करतो, या सगळ्याच आरोपांबाबत आपली भूमिका ठामपणे सर्वांसमोर ठेवली. संघविरोधकांनी पसरवलेल्या या सर्वच गोष्टींवरील काजळी सरसंघचालकांच्या विचारांतून हटली आणि संघसत्याचा प्रकाश लखलखला.

 

नवी दिल्लीच्या विज्ञानभवनात दि. १७ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर या कालावधीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भविष्यातील भारतहा तीन दिवसीय सोहळा रंगला. या कार्यक्रमाला ‘सोहळा’ अशासाठी म्हणायचे, कारण या कार्यक्रमाने संघ आणि समाजादरम्यानच्या मोठ्या संवादसेतूचे काम केले. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी अतिशय स्पष्टपणाने, नेमकेपणाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे काय, संघाचे स्वयंसेवक कसे कार्य करतात आणि देशातल्या निरनिराळ्या विषयांबाबतची संघाची भूमिका विशद केली. दिल्लीतील तीन दिवसीय संवादसोहळ्याआधी संघ म्हणजे काय, याची ज्याला कोणतीही माहिती नाही, असे लोक संघाबद्दल अनेकानेक भ्रम बाळगून होते. ज्यांना संघाची उन्नती जाचत होती, डाचत होती, त्यांनी संघाची एक वेगळीच प्रतिमा देशासमोर उभी केली होती. हत्ती आणि पाच दृष्टीहीनांची कथा आपल्याला माहितीच आहे. ज्यावेळी हत्ती या पाच दृष्टीहीनांसमोर आला, तेव्हा त्यांनी त्याच्या निरनिराळ्या अंगाला हात लावत आपापल्या परीने हत्ती कसा असेल, याची कल्पना केली. पण, प्रत्यक्षात हत्ती या पाचहीजणांच्या कल्पनेपेक्षा अगदी निराळाच होता. रा. स्व. संघाची वर्णनेदेखील याआधी अशाचप्रकारे केली गेली. संघामध्ये न येताही, शाखेमध्ये न जाता वा संघाशी संवाद न साधताही, केवळ आपल्या मनातील एका पूर्वग्रहाला कवटाळत विरोधी विचारांच्या लोकांनी संघ जसा नाही, तसाच असल्याचे सांगत संघाचे निराळेच रूप पेश केले. दूषित मनाने संघाबद्दलच्या या मत-मतांतरामुळे देशातल्या अनेक पुरोगाम्यांचे चांगलेच फावले. संघविरोधासाठी अशा लोकांनी संघाची भ्रामक प्रतिमाच खरी असल्याचे उच्चरवाने सांगत हिंदू संघटनाला अडथळा निर्माण करण्याचे डावपेच आखले. पण, या लोकांच्या कोणत्याही सापळ्यात न अडकता देशातल्या लाखो सर्वसामान्यांनी संघात येत, संघाशी संवाद साधून उघड्या डोळ्यांनी खरा संघ काय आहे, हे जाणून घेतले, समजावून घेतले.
 

संघाच्या कार्यपद्धतीमध्ये संघाच्या परिभाषेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सरसंघचालकांनी या सगळ्याच्या पलीकडे जाऊन समाजाशी संवाद साधला आणि स्थापनेपासून ते आजतागायत संघाने घेतलेल्या विविध भूमिकांबद्दल प्रतिपादन केले. संघावर ज्याप्रकारचे आरोप केले जातात, त्यात संघ जातीव्यवस्थेचे समर्थन करतो, संघ आरक्षणविरोधी आहे, संघ घटना मानत नाही, संघ मुस्लीमविरोधी आहे, संघ तिरंगा-राष्ट्रध्वजाला मानत नाही, संघ हिंसेचे समर्थन करतो, या सगळ्याच आरोपांबाबत आपली भूमिका ठामपणे सर्वांसमोर ठेवली. संघविरोधकांनी पसरवलेल्या या सर्वच गोष्टींवरील काजळी सरसंघचालकांच्या विचारांतून हटली आणि संघसत्याचा प्रकाश लखलखला. वस्तुतः संघ काय आहे, याची माहिती सरसंघचालकांनी दिली. भारतभूमी आपली माता असून मातेला आपण प्रणाम केला पाहिजे, सार्वजनिक जीवनात वावरताना प्रत्येक व्यक्तीच्या मनात राष्ट्र प्रथम हा भाव निर्माण झाला पाहिजे, आपल्या पूर्वजांचा-इतिहासाचा आपण अभिमान बाळगला पाहिजे आणि असा विचार करणारी प्रत्येक व्यक्ती हिंदू आहे, अशी संघाची भूमिका आहे. मात्र, संघविरोधकांनी व डाव्या विचारसरणीच्या बुद्धीवाद्यांनी संघ व समाजातील अंतराचा स्वतःचा अजेंडा पुढे रेटण्यासाठी पुरेपूर उपयोग करून घेतला. संघाबद्दल निरनिराळे गैरसमज पसरवले आणि संघ कसा समाजासमोरचा धोका आहे, हेच वेळोवेळी सांगितले. सरसंघचालकांच्या विवेचनातून हे सर्वच गैरसमज एका फटक्यासरशी दूर झाले.

 

सोबतच संघ केवळ एकाच व्यक्तीच्या आदेशाने चालतो आणि इतरांना आपले म्हणणे मांडण्याची संधी नसते, अशी दंतकथा नेहमीच पसरवली जाते. डॉ. मोहनजी भागवतांनी संघात असे काही होत नसल्याचे सांगत संघाचा प्रत्येक निर्णय सर्वसहमतीनेच घेतला जातो, असे सांगत टीकाकारांचा खोटेपणा उघडा पाडला. संघावर टीकाटिप्पणी आणि आरोप करताना ‘बंच ऑफ थॉट्स’चा नेहमीच आधार घेतला जातो. दिल्लीतील कार्यक्रमात याचबद्दल प्रश्नही विचारण्यात आला. सरसंघचालकांनी या प्रश्नाचे उत्तर अतिशय मोकळेपणाने देत स्थल-काल-परिस्थितीनुरूप बदल आत्मसात करण्याची, निर्णय घेण्याची आणि त्यानुसार वागण्याची संघाची रीत असल्याचे सांगितले. डॉ. हेडगेवारांनी संघाची स्थापना केली, त्यावेळीही असे सांगितले नाही की, स्वयंसेवकाने मी जे सांगेल तेच करावे, तर जे सर्वसहमतीने मान्य होईल, जे समाजाच्या भल्यासाठी उपयुक्त असेल, तेच विचार आणि कार्य कायम राहील, असे सांगितले. सरसंघचालकांनी ‘बंच ऑफ थॉट्स’बाबतही ते त्यावेळच्या परिस्थितीतले विचार असून आता त्यातल्या प्रत्येकच विचारांचे पालन करायला नको, असे परखड उत्तर दिले. सरसंघचालकांच्या या रोखठोक भूमिकेमुळे संघाला पाण्यात पाहणाऱ्यांची, संघावर टीका करणाऱ्यांची तोंडे नक्कीच बंद होतील, यात कुठलीही शंका नाही.

 

आज संघाने समाजातल्या सर्वच क्षेत्रांत आपले स्थान निर्माण केले आहे. शिक्षण, आरोग्य, उद्योग, माहिती-तंत्रज्ञान, भटके-विमुक्त, वनवासी, सेवा, संस्कृती, विज्ञान अशा समाजाच्या प्रत्येक ठिकाणी संघस्वयंसेवकांनी आदर्श प्रस्थापित केले. संघकार्याच्या प्रभावाने सर्व समाजच संघमय होऊ लागला. परिणामी आज संघ समाज व माध्यमांच्या केंद्रस्थानी पोहोचल्याचे दिसते. देशभरातील सर्वच लहानमोठ्या प्रसारमाध्यमांनी यामुळेच या सोहळ्याची ठसठशीत दखल घेतली. संघ नेमका काय आणि कसा आहे व भविष्यातील भारताकडे पाहण्याचा संघाचा दृष्टिकोन नेमका काय, याचे एक चित्रणच या तीन दिवसीय कार्यक्रमामुळे अनुभवायला मिळाले. देशातल्या सर्व समाजघटकांना सोबत घेऊन, प्रत्येकातील जे जे उन्नत, उदात्त, मधुर ते ते घेऊन, परस्परांच्या भावभावनांची जपणूक करत आपल्याला एकत्रितपणे पुढची वाटचाल करायची आहे आणि हीच संघाची भूमिका असल्याचे सरसंघचालकांनी आपल्या भाषणांतून व प्रश्नोत्तराच्या सत्रातूनही ठासून सांगितले. याचमुळे गेली ९३ वर्षे संघाबाबत विरोधी विचारसरणीच्या लोकांकडून पसरवलेले गैरसमज या कार्यक्रमामुळे दूर होतील, असे मानायला हरकत नाही.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@