इतिहासाची प्रेरणा हवी, ओझे नको

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Sep-2018   
Total Views |

 


 
 
 
संघ ही शब्दप्रामाण्य किंवा ग्रंथप्रामाण्य मानणारी संघटना नसून आपल्याला आलेल्या अनुभवाधारे सातत्याने विकसित होणारी संस्था आहे, हे त्यांनी पुरेशा स्पष्ट शब्दांत मांडले आहे, हे या व्याख्यानांचे प्रमुख वैशिष्ट्य मानावे लागेल. संघ इतिहासातून प्रेरणा घेतो, परंतु त्याचे ओझे बाळगून भविष्याचा विचार करीत नाही, तर भविष्यातील आव्हानांचा विचार करीत ऐतिहासिक प्रेरणेतून मिळणाऱ्या जीवनसत्त्वाला कालसुसंगत स्वरूप देतो.
 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी नवी दिल्ली येथे दिलेली तीन व्याख्याने ही ऐतिहासिक महत्त्वाची आहेत. याची तुलना संघाचे तृतीय सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी केलेल्या ‘सामाजिक समता आणि हिंदू संघटन’ या भाषणाशी करता येईल. वास्तविक पाहता, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेपासून हिंदू समाजात बंधुता निर्माण करणे हे संघाने आपल्या समोरचे प्रमुख ध्येय मानले आहे. समता निर्माण झाल्याशिवाय बंधुता निर्माण होत नाही, ही कोणालाही सहज समजणारी गोष्ट आहे. असे असूनही सामाजिक समतेच्या बाबतीत संघावर अनेक आक्षेप घेतले जात होते. संघाला सामाजिक विषमतेला कारणीभूत असलेली व उच्चनीचतेवर आधारित वर्णव्यवस्था पुन्हा स्थापन करायची आहे, असे आरोप पुन्हा पुन्हा केले जात होते. या पार्श्वभूमीवर संघाची सामाजिक समतेच्या बाबतची भूमिका सुस्पष्टपणे लोकांसमोर येणे आवश्यक होते. बाळासाहेब देवरसांच्या पुणे येथील वसंत व्याख्यानमालेतील या भाषणाने ती गोष्ट स्पष्ट केली. त्यानंतरही संघावर आरोप होत राहिले, पण त्यात पहिल्यासारखा जोर राहिला नाही. आता सामाजिक समतेच्या बाबतीत संघ कटिबद्ध आहे, असा अनुभव समाजाला येत आहे.

 

संघ स्थापन होऊन ९० हून अधिक वर्षे झाली. संघस्थापनेच्या पिढीपासून आज प्रत्यक्ष काम करणाऱ्या पाचव्या पिढीपर्यंत संघाचे काम सातत्याने वाढत गेले. या कामाला अनेक पैलू पडले आहेत आणि आज आपल्या देशातील संघ आणि संघसंबंधित संस्था प्रचंड आणि प्रभावशाली परिवर्तनशील शक्ती बनल्या आहेेत. केंद्रामध्ये आणि अनेक राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाची सरकारे असल्याने संघाचे बळ वाढले आहे, असे अनेकांना वाटते. परंतु, प्रत्यक्षात तशी वस्तुस्थिती नाही. भाजप सत्तेवर असताना काय किंवा नसताना काय, संघ व संघप्रेरित संस्था आपापल्या गतीने वाढतच होत्या. फार तर त्याची परिणीती राजकीय प्रभावात झाली, असे म्हणता येऊ शकते. परंतु, संघाकडे एकदा राजकीय चष्म्यातून पाहण्याची सवय झाली की, तशाच प्रतिमा प्रसारमाध्यमे लोकांसमोर उभ्या करतात. त्यामुळे मोहनजी जे म्हणाले, त्यात संघाच्या नियमित कार्यपद्धतीत असलेल्या स्वयंसेवकांना वेगळे वाटले नसले तरी, प्रसारमाध्यमांमध्ये मात्र संघाने आपली भूमिका कालानुरूप बदलली आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे. संघासारख्या जीवंत आणि गतिमान संघटनेला कालसुसंगत राहूनच आपल्या भूमिका ठरवाव्या लागतात. जुन्या भूमिकांमध्ये बदल घडवावा लागतो. संघामध्ये ही आंतरिक प्रक्रिया सातत्याने घडत असते. परंतु, इतर संघटनांप्रमाणे संघटनेच्या अंतर्गत झालेली चर्चा सार्वजनिक करण्याचा संघाचा स्वभाव नसल्याने अशा बदललेल्या भूमिकांची सार्वजनिक व्यासपीठावर चर्चा होत नाही. एकप्रकारे, या तीन भाषणांतून संघामध्ये चाललेल्या आंतरिक चर्चेचेच मोहनजींनी प्रकटीकरण केले आहे, असे म्हणावे लागेल.

 

संघाच्या स्थापनेपासून संघाला दैनंदिन राजकारण करायचे नसून राष्ट्रकारण करायचे आहे, ही भूमिका राहिलेली आहे. परंतु, लोकशाही समाजव्यवस्थेत राष्ट्रकारणामध्ये, राजकारणाला महत्त्वपूर्ण स्थान असते. संघावर सर्व राजकीय पक्षांनी घोषित बहिष्कार टाकल्याने राजकारणावर प्रभाव टाकण्याकरिता संघाच्या स्वयंसेवकांना स्वतंत्र राजकीय पक्षाची स्थापना करावी लागली. राजकीय पक्षांच्या भूमिका या प्रसारमाध्यमातून सार्वजनिक चर्चेचा विषय बनत असल्याने तशाच राजकीय भूमिकेतून संघाकडे पाहिले जात होते. आपल्या भाषणांतून मोहनजींनी राष्ट्रकारणाची संघाची भूमिका सुस्पष्टपणे लोकांपुढे ठेवली आहे. पूर्वी हिंदू समाज असंघटित असल्याने निवडणुकीसाठी राजकीय पक्षांना ‘मतदार’ म्हणून हिंदू समाजाचे महत्त्व वाटत नव्हते. आता ही परिस्थिती बदलली आहे. प्रत्येक राजकीय पक्ष हिंदूंना काय वाटेल, याची आता दखल घेऊ लागला आहे. तशीच स्थिती आता संघाची बनली आहे. कोणताही राजकीय पक्ष सत्तेवर आला तरी संघाची उपेक्षा करून त्याला राज्य करता येणार नाही. या पार्श्वभूमीवर आधुनिक भारताच्या जडणघडणीत काँग्रेससह सर्वांचा सहभाग मान्य करीत इतर पक्षांना संघाचे वावडे असले तरी संघाला अन्य पक्षांचे वावडे नाही, हा मुद्दा सुस्पष्टपणे त्यांच्यासमोर ठेवला आहे. आता संघाबद्दल कसा विचार करायचा, हे ठरविण्याची जबाबदारी विविध राजकीय पक्षांसमोर आली आहेसंघाचा संविधानावर विश्वास नाही, संघाला संविधान बदलायचे आहे, अशा तर्‍हेचा प्रचाराचा गदारोळ केला जातो. आजवर संघाने जेवढे घटनात्मक नियमांचे आणि संकेतांचे पालन केले असेल, तेवढे क्वचितच अन्य संघटनांनी केले असेल. भारतीय राज्यघटना निर्माण करणारा या देशातील कोणता एक विशिष्ट गट नसून त्यावेळी अस्तित्त्वात असलेल्या सर्वपक्षीय राजकीय नेत्यांच्या सामूहिक शहाणपणातून ही घटना तयार झाली आहे. घटनेबाबत प्रारंभीच्या काळात काहीजणांनी आपली मते व्यक्त केली असतील, परंतु त्या आधारावर घटना बदलण्याचा कोणताही कार्यक्रम संघाने हाती घेतला नव्हता किंवा तशा प्रकारचे कोणतेही आंदोलन केले नाही. राज्यघटना स्वीकारून आपल्या देशाला सत्तर वर्षे पूर्ण होतील म्हणजेच स्वातंत्र्यानंतरच्या दोन पिढ्या याच घटनात्मक वातावरणात वाढल्या आहेत. त्यामुळे ही राज्यघटना भारतीय समाजजीवनाचा अंगभूत भाग बनली आहे. ही गोष्ट सुस्पष्टपणे मांडून संघाबद्दलचा लोकमनात निर्माण केला गेलेला संशय या व्याख्यानमालेने सुस्पष्टपणे दूर केला आहे.

 

हिंदू धर्म एक विशिष्ट संप्रदाय नसून तो प्रवाही मूल्यविचार आहे. या मूल्यविचारानेच शेकडो वर्षे हिंदू समाजाचे अस्तित्व व चैतन्य कायम ठेवले आहे. या मूल्यसंचितामध्येच कालानुरूप परिवर्तन घडवून आणण्याची आंतरिक शक्ती आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे त्या आंतरिक शक्तीचेच प्रकट झालेले विसाव्या-एकविसाव्या शतकातील प्रकटीकरण आहे. हे काम करीत असताना संघाला भारताला हिंदू मूलतत्त्ववादी राष्ट्र बनवावयाचे आहे, असा जो आरोप केला जातो, त्यासंबंधीची संघाची भूमिकानिःसंदिग्धपणे मोहनजींनी आपल्या भाषणातून व्यक्त केली. ‘बहुविधता’ हे हिंदू समाजाचे आणि हिंदू संस्कृतीचे अंगभूत वैशिष्ट्य आहे. ही बहुविधता नष्ट करणे हे कोणालाही शक्य होणार नाही. संघाचे हे उद्दिष्टही नाही आणि तसा कार्यक्रमही नाही. मुस्लिमांच्या मनात संघाबद्दलचे भय निर्माण करून त्या आधारे अल्पसंख्याकवादाचे राजकारण करण्याचा राजकीय पक्षांचा प्रयत्न होता. त्याच्याही मर्यादा आता स्पष्ट झाल्या आहेत. अशा प्रकारची सांस्कृतिक बहुविधता मान्य करून या देशात कशाप्रकारे राहायचे, याचा गांभीर्याने विचार स्वतःला ‘अल्पसंख्याकवादी’ म्हणणाऱ्या शक्तींनी केला, तर जातीयता दूर करण्याचे ते महत्त्वाचे साधन ठरेल. गोमांस बाळगणाऱ्यांवर देशभरात हल्ला करण्याचे काही प्रसंग झाले. संघपरिवाराचा जणू काही तेवढाच एकमेव अजेंडा आहे, असे वातावरण प्रसारमाध्यमे आणि विविध राजकीय पक्षांनी तयार केले. त्याबाबत संघाची भूमिका मोहनजींनी सुस्पष्टपणे लोकांसमोर ठेवली.

 

संघाची शताब्दी होण्याकरिता सात वर्षांचाच काळ बाकी आहे. प्रत्येक राष्ट्रात राष्ट्र सुस्थिर राहण्याकरिता राष्ट्रीय भूमिकेतून काम करणाऱ्या संस्थांचे जाळे निर्माण होणे आवश्यक असते. संघाच्या माध्यमातून तसे जाळे निर्माण झाले आहे. हे जाळे निर्माण करीत असताना समाजाची सर्व अंगे आपल्या ताब्यात घ्यावीत, असा संघाचा दृष्टिकोन नसून राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने त्या त्या क्षेत्रांचे काम उत्तमपणे करू पाहणाऱ्या संस्था आणि व्यक्ती यांना साहाय्यकारी भूमिका असावी, अशीच संघाची भूमिका आहे. त्यामुळे ज्या ज्या व्यक्ती आणि संस्था संघाच्या नेहमीच्या संपर्कात आल्या आहेत, त्यांना संघाची ही भूमिका अनुभवाने लक्षातही आली आहे. परंतु, हे लक्षात न घेता संघाच्या इतिहासकाळात घडलेली काही वक्तव्ये, प्रसंग यांचे भांडवल करून त्याद्वारे संघावर टीका करण्याचा जो प्रयत्न केला जातो, त्याला मोहनजींनी सुस्पष्टपणे उत्तर दिले आहे. संघ ही शब्दप्रामाण्य किंवा ग्रंथप्रामाण्य मानणारी संघटना नसून आपल्याला आलेल्या अनुभवाधारे सातत्याने विकसित होणारी संस्था आहे, हे त्यांनी पुरेशा स्पष्ट शब्दांत मांडले आहे, हे या व्याख्यानांचे प्रमुख वैशिष्ट्य मानावे लागेल. संघ इतिहासातून प्रेरणा घेतो, परंतु त्याचे ओझे बाळगून भविष्याचा विचार करीत नाही, तर भविष्यातील आव्हानांचा विचार करीत ऐतिहासिक प्रेरणेतून मिळणाऱ्या जीवनसत्त्वाला कालसुसंगत स्वरूप देतो.संघाचे हे स्वरूप मोहनजींच्या व्याख्यानांनी अधोरेखित केले असून ही तीन व्याख्याने हा संघाच्या विकासक्रमातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणून गणली जातील, यात शंका नाही.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@