आसनगाव लोकल आटगावपर्यंत नेण्याचा कपिल पाटील यांचा आग्रह

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Sep-2018
Total Views |



रेल्वे मंत्री पियूष गोयल यांना निवेदन

भिवंडी : आटगाव परिसरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन, आसनगाव रेल्वे स्थानकापर्यंत धावणाऱ्या लोकल आटगावपर्यंत आणाव्यात, अशी आग्रही मागणी भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी रेल्वे मंत्री पियूष गोयल यांच्याकडे केली आहे. तर जुन्या भिवंडी-ठाणे रस्त्यावरील वाहतूककोंडीतून दिलासा मिळण्यासाठी अंजूरफाटा येथील रेल्वेमार्गाखाली भुयारी रस्ता उभारावा, अशी मागणीही खासदार पाटील यांनी केली.

 

रेल्वे प्रवाशांच्या समस्यांबाबत रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी नुकतीच मुंबईत लोकप्रतिनिधींची बैठक घेतली. या बैठकीनंतर खासदार कपिल पाटील यांनी रेल्वेमंत्र्यांना निवेदन दिले. मध्य रेल्वेवरील कल्याण-कसारा मार्गावरील आटगावपर्यंत हजारो नागरीक राहण्यास आले आहेत. त्यांना कसाऱ्याकडे जाणाऱ्या लोकलशिवाय पर्याय नाही. या मार्गावर किमान एक ते दीड तासाने लोकल धावत असल्यामुळे नागरिकांना आसनगावपर्यंत रस्तेमार्गाने यावे लागते. त्यात त्यांचा नाहक वेळ व पैसा खर्च होतो. त्यामुळे आसनगावपर्यंत धावणाऱ्या लोकल आटगाव स्थानकापर्यंत आणाव्यात, अशी मागणी खासदार पाटील यांनी केली. या मागणीवर लवकरात लवकर निर्णय घेण्याचे आश्वासन रेल्वेमंत्र्यांनी दिले.

 

भिवंडी तालुक्यातील अंजूरफाटा येथे रेल्वेमार्गावरील पुलाखालून केवळ दुपदरी रस्ता आहे. त्यामुळे दररोज हजारो प्रवाशांना वर्षानुवर्षे वाहतूककोंडीला सामोरे जावे लागते. त्यामुळे खासदार कपिल पाटील यांनी रेल्वेमार्गाखालून भुयारी मार्ग तयार करावा, अशी मागणी खासदार पाटील यांनी केली. या मागण्यांबरोबरच बदलापूर होम प्लॅटफॉर्मची निविदा प्रक्रिया पूर्ण करावी, ठाणे-कर्जत आणि ठाणे-कसारा शटल सेवा सुरू कराव्यात, बदलापूर आणि आसनगाव रेल्वे स्थानकातून गर्दीच्या वेळी महिला विशेष लोकल सुरू करावी, रेल्वेचे दरवाजे अडविणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करावी, -टिटवाळा-मुरबाड रेल्वेमार्गासाठी अर्थसंकल्पात तरतूद करावी, भिवंडी रोड स्थानकात सर्व मेल-एक्सप्रेसला थांबा द्यावा, बदलापूर रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर संपूर्ण पत्राशेड टाकावी आदी मागण्या करण्यात आल्या. यासंदर्भात लवकरात लवकर निर्णय घेण्याचे आश्वासन रेल्वे मंत्री पियूषजी गोयल यांनी दिले.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@