रणांगणातून पळणारी ही कसली शिवसेना?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Sep-2018
Total Views |

जळगाव महापौर निवड

 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... https://www.facebook.com/Tarunbharatjal/

 
जळगाव, १७ सप्टेंबर
भाजपाच्या ताब्यातील जळगाव महापालिकेत शिवसेनेचाच महापौर होईल, अशी वल्गना करणार्‍या शिवसेनेने सोमवारी चक्क पळपुटी भूमिका स्वीकारत मंगळवारी होणार्‍या महापौर निवडणुकीत भाजपाशी थेट सामना करणे टाळले. महापालिकेच्या कार्यालयास कुलूप ठोकणारे शिवसेना गटनेता अनंत (बंटी) जोशी यांच्यावर प्रशासनाने दाखल केलेल्या गुन्ह्याची संधी साधून शिवसेनेने महापौर निवडीवर बहिष्कार टाकला. त्यामुळे रणांगणातून पळ काढणारी ही कसली शिवसेना? असा प्रश्‍न कार्यकर्ते विचारत आहेत.
 
 
जळगाव महापालिकेतील शिवसेना नेत्यांची वर्षानुवर्षांची सत्ता उखडून फेकत भाजपाने स्पष्ट बहुमत (७५ पैकी ५७ जागा) मिळविले. जंगलात मदमस्त हत्तीसारख्या वावरणार्‍या शिवसेनेला जेमतेम १५ जागांवर समाधान मानावे लागले. गेली कित्येक वर्षे जळगावकरांना लुटणार्‍या, छळणार्‍या शिवसेना नेत्यांना त्यांची जागा मतदारांनी मतपेटीतून दाखवून दिली.
मंगळवारी शहराचा प्रथम नागरिक अर्थातच महापौर ठरणार आहे. भाजपातर्फे आ. सुरेश भोळे यांच्या पत्नी सीमा भोळे तर उपमहापौरपदासाठी डॉ. अश्‍विन सोनवणे यांनी अर्ज दाखल केला आहे. शिवसेनेकडून महापौरपदासाठी जयश्री सुनील महाजन तर उपमहापौरपदासाठी प्रशांत सुरेश नाईक यांनी अर्ज दाखल केला आहे. सभागृहात स्पष्ट बहुमत असलेल्या भाजपाचाच उमेदवार महापौर होईल हे राजकारणातील शेंबडा कार्यकर्ताही सांगू शकेल, पण शिवसेना नेत्यांची शेवटी ‘बालबुध्दीच’ असेल तर, त्याला जळगावकर काय करणार?
 
 
रविवारी सायंकाळी शिवसेनेचे महानगराध्यक्ष शरद तायडे यांनी पत्रपरिषद घेऊन महापौर आणि उपमहापौरपदासाठी गोपनीय पद्धतीने मतदान झाल्यास शिवसेना उमेदवारांना ४० पेक्षा अधिक मते मिळतील, असा दावा केला होता. या स्वप्नरंजनातून जागे होण्यास नेत्यांना फारसा वेळ लागला नाही. रणांगणात सामना करण्याचे आव्हान तर दिले आहे पण आता मागच्या मागे पळायचे कसे? याचीच संधी ते शोधत होते आणि सोमवारी ती ‘आणली’ गेली.
 
 
शिवसेना गटनेता अनंत (बंटी) जोशी यांनी सोमवारी महापालिकेतील नगररचना विभागातील कारभारास ‘लक्ष्य’ करीत तेथे टाळे ठोकले. हा उतावीळपणा जोशी यांच्याच अंगाशी आला. प्रशासनाने गुन्हा दाखल केला. इतकी वर्षे शिवसेना नेत्यांच्या देखरेखीखाली हा विभाग ‘चालविला’ जात होता. त्यांच्या पंगतीला कोण-कोण बसत होते हे वेगळे सांगायची गरज नाही.
जोशी यांच्या टाळेबंदीची शिवसेना नेत्यांनी संधी साधली. गुन्हा दाखल केला म्हणून महापौर निवड प्रक्रियेवर बहिष्कार टाकत असल्याचे घोषित केेले. जळगावकरांचा एवढाच जर कळवळा होता तर भाजपाशी दोन हात करून शिवसेनेने स्वतःचा उमेदवार महापौरपदी निवडून आणायला हवा होता. मात्र, त्यासाठी रणांगणात भक्कमपणे दटून राहावे लागले असते.
 
महापौर, उपमहापौर आज ठरणार
जळगावचा महापौर व उपमहापौर मंगळवारी (दि.१७) ठरणार असून, त्यासाठी विशेष महासभा महापालिकेत सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे.
 
 
आधीच कपडे फाटलेत, आता लंगोटी तरी सांभाळा
गेल्या दोन दिवसांतील घटनाक्रम पाहता हे सर्व ठरवून केले गेले का? अशी शंका येण्यास बराच वाव आहे आणि त्याचीच चर्चा कार्यकर्त्यांमध्ये होत आहे. ऑगस्टमध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेना नेत्यांची खोड जळगावकरांनी मोडली आहे. कथित नेत्यांचे कपडे पुरते फाटले असून, लंगोटी कशीबशी वाचली आहे. पण आता तीही सांभाळायची अक्कल नेत्यांमध्ये नसेल तर कहरच म्हणायचा. यालाच म्हणतात, हात दाखवून अवलक्षण!
 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... https://www.facebook.com/Tarunbharatjal/

 
@@AUTHORINFO_V1@@