जळगाव महापौरपदी भाजपच्या सीमा भोळे यांची एकमताने निवड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Sep-2018
Total Views |

उपमहापौरपदी डॉ.अश्‍विन सोनवणे

 
 
जळगाव, १८ सप्टेंबर :
महापौर निवडीसाठी मंगळवारी झालेल्या विशेष महासभेत भाजपाच्या उमेदवार सीमा सुरेश भोळे यांना ५६ मते तर शिवसेना उमेदवार जयश्री महाजन यांना शून्य मते मिळाली. एमआयएमचे तीन उमेदवार तटस्थ राहिले, तर शिवसेनेने निवड प्रकियेवर बहिष्कार टाकला होता.
 
 
पीठासीन अधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी सीमा भोळे यांची निवड झाल्याचे जाहीर करताच सभागृहात भाजपा सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. सभागृहाबाहेर ढोलताशांचा दणदणाट झाला. सकाळी ११ वाजता महासभेला सुरुवात झाली. महापालिका आयुक्त चंद्रकांत डांगे, नगरसचिव सुभाष मराठे यावेळी उपस्थित होते.
 
 
सुरुवातीला भाजपच्या उमेदवार सीमा भोळे आणि शिवसेनेच्या उमेदवार जयश्री महाजन यांच्या नामनिर्देशनपत्रांची छाननी पीठासीन अधिकार्‍यांनी केली. यानंतर अर्ज माघारीसाठी मुदत देण्यात आली. दोन उमेदवारांपैकी कुणीही अर्ज माघारी न घेतल्याने मतदान घेण्यात आले. त्यात सीमा भोळे यांना ५६ तर जयश्री महाजन यांना शून्य मते मिळाली. शिवसेना सदस्य गैरहजर होते. एमआयएमचे तीन सदस्य तटस्थ राहिले. भाजपाचे सदस्य विजय पाटील मुलाच्या गंभीर आजारपणामुळे परवानगीसह गैरहजर होते. त्यांनी पक्षाला पूर्वकल्पना दिली असल्याची माहिती कैलास सोनवणे यांनी पत्रकारांना दिली.
 
 
महापौर निवडीनंतर उपमहापौरपदासाठी निवड प्रक्रिया झाली. भाजपाचे उमेदवार डॉ. अश्विन सोनवणे यांना ५६ मते तर शिवसेना उमेदवार प्रशांत नाईक यांना शून्य मते मिळाली. एमआयएमचे तीन नगरसेवक तटस्थ राहिले. पीठासीन अधिकार्‍यांनी डॉ. अश्विन सोनवणे यांची उपमहापौरपदी निवड झाल्याचे जाहीर केले.
 
@@AUTHORINFO_V1@@