तोट्याच्या खड्ड्यात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

 

 
खरंतर सरकारी क्षेत्रातल्या किंबहुना त्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या काही कंपन्या गेली अनेक वर्ष मोठ्या तोट्यात आहेत. बँकांचीही अशीच परिस्थिती असल्याने त्यावरचे संकट कमी करण्यासाठी मध्यंतरीच्या काळात बँकांच्या विलीनीकरणाची प्रक्रिया झाली. येत्या काळात आणखी तीन बँकांचेही विलीनीकरण होणारच आहे. मात्र, सार्वजनिक क्षेत्रातली आणि प्रामुख्याने मुंबई आणि दिल्लीमध्ये दुरसंचार सेवा पुरवणारी कंपनी एमटीएनएलची अवस्था म्हणजे आमदनी अठन्नी खर्चा रुपय्या सारखी झाली आहे.
 

खिशात आठ आणे आणि देणं लागतो रुपयाचे अशी काहीशी स्थिती गेल्या अनेक वर्षांपासून एमटीएनएलसारख्या कंपनीची झाली आहे. याबाबत कंपनीला कोणत्याही प्रकारचं दु:खही दिसत नाही. खासगी क्षेत्रातल्या कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चढाओढ लागली असून नव्या तंत्रज्ञानाचीही त्यात भर टाकण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु या चढाओढीत एमटीएनएलसारखी कंपनी कुठेही उभी राहिलेली दिसत नाही. एमटीएनएलच्या या पिछेहाटीपाठी कंपनीची उदासीन कामगिरी तितकीच जबाबदार आहे. एकेकाळी एमटीएनलच्या लँडलाईन घेण्यासाठी ग्राहकांच्या मोठाल्या रांगा लागत. मात्र, आज अगदी कमी किमतीत, समोरून बोलावूनदेखील कोणीही त्या घेण्यासाठी पुढे येताना दिसत नाही आणि असले तरी त्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच आहे. नव्या तंत्रज्ञानाची कमतरता, निर्णय घेण्यात होणारा उशीर किंवा त्यात बाहेरचा होणारा हस्तक्षेप हीदेखील यामागची कारणं म्हणता येतील.

 

एकीकडे प्रगत तंत्रज्ञान असताना एमटीएनएलसारखी कंपनी ते सुरू करण्यातही आज फार मागे राहिली आहे. भारतात ४ जी सारखे तंत्रज्ञान येऊन दोन-तीन वर्षांपेक्षा अधिक कालावधी लोटला असवा, परंतु आज या कंपनीला त्यासाठीदेखील केवळ विचारच करावा लागत आहे. कंपनीला मिळणारे उत्पन्न आणि कंपनीत असलेल्या कर्मचार्यांची संख्या ही एमटीएनएलची डोकेदुखी ठरत आहे. इतर सर्वच खाजगी दूरसंचार कंपन्यांमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचार्यांच्या एकत्रित संख्येएवढे कर्मचारी आज एकट्या एमटीएनएलमध्ये कार्यरत आहेत. कंपनीला मिळणार्‍या उत्पन्नाच्या साठ ते सत्तर टक्के वाटा आज कर्मचार्‍यांच्या वेतनावर आणि इतर देणी देण्यावर जातो. त्याचाच फटका नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी आणि पूर्वीपासून असलेल्या सुविधांच्या देखभालीसाठी जात आहे.

 
 
 

आमदनी अठन्नी खर्चा रुपय्या

 

गेल्या काही वर्षात पाहिलं तर एमटीएनएलच्या तोट्यात मोठ्या प्रमाणात वाढच होत आहे. २०१८ च्या आर्थिक वर्षात पाहिलं तर कंपनीला ३ हजार ११६ कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालं, परंतु कंपनीचा खर्च हा ६ हजार ८७ कोटी रुपयांचा होता. म्हणजेच कंपनीला २ हजार ९७१ कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला होता. २०१७ च्या आर्थिक वर्षात २ हजार ९७१ कोटींचा तर २०१६ च्या आर्थिक वर्षांत कंपनीला २ हजार ६ कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला होता. ही केवळ गेल्या तीन वर्षांपासून कंपनीच्या कामाची आणि त्यांच्या तोट्याची आकडेवारी आहे. यापूर्वी कंपनीची स्थिती यापेक्षाही अधिक बिकट होती. मिळालेला महसूल हा जवळपास ३ हजार कोटींचा तर एकूण खर्च हा जवळपास ५ हजार कोटींपेक्षा अधिकच होता. ३ दशलक्षपेक्षा कमी ग्राहक आणि केवळ मुंबई आणि दिल्लीसारख्या महानगरांमध्ये सेवा देत असताना इतक्या मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागण्यामागची कारणे आश्चर्यचकीत करण्यासारखीच आहेत. एमटीएनएल ही कंपनी आजही त्यांच्या सेवांची गुणवत्ता वाढवण्यावर काम करत नाही. कंपनीच्या उत्पन्नापेक्षा अधिक खर्च हा त्यांच्या कर्मचार्‍यांवर होत आहे. दोन महानगरांमध्ये सेवा पुरवत असतानाही आज त्या कंपनीत तब्बल २७ हजार कर्मचारी कार्यरत आहेत. २०१८ या आर्थिक वर्षात कर्मचार्‍यांच्या वेतनावर, निवृत्तीवेतनावर तब्बल २ हजार, ४४६ कोटी रुपयांचा खर्च झाला होता तर कंपनीला २ हजार, ३७२ कोटींचे उत्पन्न मिळाल्याची माहिती खुद्द दूरसंचार मंत्र्यांनीच राज्यसभेत लिखित स्वरूपात दिली होती. २०१६ आणि २०१७ या आर्थिक वर्षांमध्ये कर्मचार्‍यांच्या वेतनावर अनुक्रमे २ हजार, ६४८ कोटी आणि २ हजार, ६३७ कोटी रुपयांचा खर्च झाला होता. एअरटेल, व्होडाफोन, आयडिया आणि जिओ या कंपन्यांमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचार्यांच्या तुलनेत आज केवळ दोन महानगरांमध्ये सेवा देणार्‍या या कंपनीच्या कर्मचार्‍यांची संख्या अधिक आहे. येत्या काळात कंपनीला तोटा कमी करायचा असेल तर नक्कीच कठोर निर्णय घेणे भाग पडणार आहे. त्या दृष्टीने कंपनीने पावलं उचलण्यास सुरुवात केली असून कर्मचार्याचे निवृत्ती वय ६० वरून ५८ करण्यावरही विचार सुरू आहे. त्यामुळे कंपनीची ४०० कोटी रुपयांची बचत होणार आहे. त्यामुळे येत्या काळात ही कंपनी तोट्यातून बाहेर येते किंवा तोट्यात आणखी खोल रूतत जाते, हे कंपनीची धोरणे आणि काळच ठरवणार आहे.

 
 

      माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@