ऐतिहासिक हैफा लढाईची शतकपूर्ती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Sep-2018   
Total Views |

 


 
 
 
या आठवड्याच्या अखेरीस, २३ सप्टेंबर रोजी हैफा शहरासाठीच्या लढाईला १०० वर्ष पूर्ण होत आहेत. भारत आणि इस्रायलमधील बहरणाऱ्या संबंधांना या युद्धाने ऐतिहासिक कोंदण प्राप्त करून दिले आहे. जगभरात सर्वत्र यहुदी लोकांचा सुमारे २००० वर्षे छळ झाला असताना, भारतात त्यांना कोणताही भेदभाव सहन करावा लागला नाही, याबद्दल यहुदी लोक आणि इस्रायल भारताचे कौतुक करतात.
 
 
दोन प्राचीन संस्कृत्यांसोबतच दोन आधुनिक लोकशाही देश असणारे भारत आणि इस्रायल एकाच कालखंडात स्वतंत्र झाले असले आणि एकसमान आव्हानांशी झुंजत असले तरी त्यांच्या पूर्ण राजनैतिक संबंध उजाडायला १९९२ साल उजाडावे लागले. असे असले तरी आपल्या पितृभूमी तसेच पुण्यभूमीत स्वतंत्र राष्ट्र निर्माण करण्याच्या यहुदी लोकांच्या प्रयत्नांना भारतीय सैनिकांचा मोठा हातभार लागला. पहिल्या महायुद्धात इंग्रजांनी, फ्रान्स आणि रशिया या आपल्या मित्रराष्ट्रांसह ऑटोमन तुर्कांवर विजय मिळवून एकेकाळी अल्जेरिया ते इराक आणि ऑस्ट्रिया ते सौदी अरेबियापर्यंत पसरलेले पण कालांतराने जर्जर झालेले ऑटोमन साम्राज्य संपवले. या युद्धात इंग्रजांच्या बाजूने दहा लाखांहून अधिक भारतीय सैनिक सहभागी झाले होते. हैफा हे आजच्या इस्रायलच्या आणि तेव्हा ऑटोमन साम्राज्याचा भाग असलेल्या पॅलेस्टाईन प्रांताच्या उत्तरेला असलेले एक महत्त्वाचे शहर. हैफाच्या सभोवतालच्या माऊंट कार्मेल टेकड्या आणि उत्तरेकडील पर्वतमय प्रदेशामुळे पॅलेस्टाईनवर नियंत्रण राखण्यासाठी हैफा आणि एकर ही शहरं ताब्यात असणं आवश्यक आहे. हैफाची लढाई ही १९-२५ सप्टेंबर १९१८ या कालावधीत पॅलेस्टाईनमध्ये झालेल्या लढायांचा एक भाग होती. हैफा ताब्यात घेण्यासाठी ब्रिटिशांनी जोधपूर, म्हैसूर आणि हैद्राबाद रेजिमेंटच्या घोडदळाला पाचारण केले. हैद्राबादचे बहुतांशी सैनिक मुस्लीम असल्यामुळे अविश्वासापोटी ब्रिटिशांनी जोधपूर आणि म्हैसूर रेजिमेंटच्या सैनिकांना आघाडीवर ठेवले होते. जोधपूरच्या मेजर दलपत सिंह शेखावत आणि अमन सिंह जोधा यांच्याकडे तुकडीचे नेतृत्त्व होते. शेखावत यांना जोधपूर नरेशांनी उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला पाठवले होते. ते वयाच्या १८ व्या वर्षी जोधपूर लान्सर्समध्ये घोडेस्वार म्हणून सामील झाले आणि कालांतराने मेजर बनले.
 

जेव्हा भारतीय सैनिक हैफाजवळ पोहोचले, तेव्हा तेथे तैनात असलेल्या तुर्की, जर्मन आणि ऑस्ट्रियन सैन्याकडे मशीनगन, तोफा आणि बॉम्ब असल्याची माहिती त्यांना मिळाली. अशा परिस्थितीत हैफावर आक्रमण करणे म्हणजे स्वतःला मृत्यूच्या तोंडात देण्यासारखे होते. ब्रिगेडियर जनरल किंग यांनी सैन्याला माघारी येण्यास सांगितले होते, पण शत्रूला पाठ दाखवणे भारतीय सैनिकांना मान्य नव्हते. मृत्यूची पर्वा न करता हैफावर हल्ला करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. तलवारी आणि भाल्यांच्या साहाय्याने लढणाऱ्या या तुकडीने २३ सप्टेंबरला सकाळी ५ वाजता हैफाकडे कूच केले. एकीकडे किशॉन नदीचा दलदली पट्टा तर दुसरीकडे कार्मेल टेकड्या यांच्यामधील मार्गाने ते सकाळी १० वाजता हैफाला पोहोचले. म्हैसूर लान्सर्सच्या एका स्क्वार्डनने शेरवूड रेंजर्सच्या साथीने दक्षिण दिशेने कार्मेल टेकड्यांवर चढाई केली. मशीनगनची पर्वा न करता शत्रूला आश्चर्यचकित करून त्यांनी त्यांच्या तोफांवर कब्जा केला. दुपारी दोन वाजता जोधपूर लान्सर्सनी हल्लाबोल करून दुपारी तीन वाजेपर्यंत ऑटोमन तुर्कांचा पराभव केला आणि हैफा ताब्यात घेतले. घोडदळ विरुद्ध तोफखाना आणि बंदुका अशी लढली गेलेली ही जगातील किंबहुना शेवटची लढाई होती. त्यामुळे भारतीय सैन्यदलांच्या इतिहासात तिला विशेष महत्त्व आहे.

 

 
 

 १९ व्या शतकाच्या अखेरीस झायोनिझम तत्त्वज्ञानाने प्रेरित झालेल्या यहुदी लोकांनी पूर्व युरोपातून पॅलेस्टाईनमध्ये परतण्यास प्रारंभ केला. २० व्या शतकाच्या सुरुवातीला त्यांच्या संख्येत लक्षणीयरित्या वाढ झाली. किबुत्झ या सहकारी तत्त्वावरील कृषिकेंद्री वसाहती आणि तेल-अवीव शहराची स्थापना केल्यानंतर पॅलेस्टाईनमधील झायोनिस्ट नेत्यांनी ऑटोमन सुलतानाकडे आपल्या पूर्वजांच्या भूमीत इस्रायलची स्थापना करण्यास साहाय्य करण्याची विनंती केली, पण ती त्याने धुडकावून लावली. त्यामुळे मग त्यांनी या युद्धात ब्रिटिशांची साथ दिली. हैफाच्या विजयामुळे पॅलेस्टाईन प्रांत ब्रिटिशांच्या ताब्यात आला. त्यामुळे भविष्यात यहुदी राष्ट्राचं स्वप्न साकार होण्यास मदत झाली. याची आठवण ठेऊन इस्रायलने हैफा युद्धात प्राणांची आहुती देणाऱ्या ४४ भारतीय सैनिकांच्या आणि जेरुसलेम, रामले इ. ठिकाणच्या दफनभूमींतील ९०० हून अधिक भारतीय सैनिकांच्या स्मारकांची काळजी घेतली आहे. तेथील स्थानिक पुस्तकांत याबाबत धडादेखील आहे. ब्रिटिशांनीही १९२२ साली दिल्लीमध्ये भारतीय सैन्याच्या घोडदळातील सिनाई, हैफा आणि सीरियात प्राणांची आहुती देणाऱ्या सैनिकांचे स्मारक उभारले. त्यावर जोधपूर, म्हैसूर आणि हैद्राबादच्या सैनिकांचे पुतळे आहेत. त्यामुळे या रस्त्याचे नाव तीन मूर्ती मार्ग असे पडले. यामुळेच पंतप्रधान पंडित नेहरूंचे निवासस्थानही तीन मूर्ती भवन म्हणून ओळखले जाऊ लागले. शांततावादी नेहरूंना ब्रिटिशांचा वारसा असलेल्या भारतीय लष्कराबद्दल सुरुवातीच्या काळामध्ये धास्ती होती. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात लाखो भारतीय सैनिकांनी जगभरात गाजवलेला पराक्रम अभिमानाने अंगावर वागवणे अहिंसावादी सरकारच्या सोयीचे नव्हते. त्यामुळे भारताने हा इतिहास विस्मृतीत ढकलला. तीन मूर्ती स्मारकातील तीन मूर्ती कोणाच्या आहेत आणि त्या का उभारल्या आहेत, याची माहिती भारतातील सोडा, राजधानी नवी दिल्लीतील बहुतेक लोकांना नव्हती.
 

असे असले तरी भारतीय सैन्यदलांकडून मात्र कायमच २३ सप्टेंबरला ‘हैफा दिन’ साजरा केला जातो. या इतिहासाने प्रभावित होऊन इंडिया-इस्रायल फ्रेंडशिप असोसिएशनने मुंबईतील ज्यू समुदायाच्या लोकांसह २०११ पासून हैफा दिवस’ साजरा करायला सुरुवात केली. संघाच्या विश्व विभागाच्या रवि कुमार यांनी हैफा युद्धाचा अभ्यास करून त्यावर पुस्तक लिहिले. या पुस्तकामुळे तसेच मोदी सरकारच्या इतिहासाकडे आणि लष्कराच्या इतिहासाकडे बघायच्या भिन्न दृष्टिकोनामुळे हैफाची लढाई भारत-इस्रायल संबंधांना मजबूत करणारा ऐतिहासिक दुवा बनली. नरेंद्र मोदींच्या इस्रायल दौऱ्यात त्यांनी बेंजामिन नेतान्याहूंसह हैफा येथील स्मारकास भेट दिली तर बेंजामिन नेतान्याहूंनी आपल्या भारतभेटीत मोदींसह तीन मूर्ती चौकातील स्मारकास भेट देऊन त्याचे ‘तीन मूर्ती हैफा चौक’ असे नामकरण केले. एकीकडे ओटोमन साम्राज्याच्या पराभवास कारणीभूत ठरलेले भारतीय सैन्याचे शौर्य तर दुसरीकडे खलिफाच्या पुनर्प्रतिष्ठापनेसाठी जगभरांच्या मुस्लिमांसह केलेले ‘खिलाफत आंदोलन’ या परस्परविरोधी गोष्टी आहेत, पण विदेशनीतीत असे विरोधाभास ठिकठिकाणी दिसतात. असे म्हणतात की, दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस युरोप उद्ध्वस्त झाल्यामुळे अमेरिकेच्या खालोखाल जगात सर्वात प्रबळ लष्करी तळ भारतात उरले होते, पण स्वातंत्र्यानंतर आपण संरक्षण क्षेत्रात खाजगी क्षेत्राला प्रवेश नाकारला आणि सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांना आत्मनिर्भर होण्यासाठी मदत करायच्याऐवजी अन्य देशांतून शस्त्रास्त्रांची आयात करण्यातच धन्यता मानली. हैफाची लढाई आजही आपल्याला जागतिक पटलावरील आपल्या क्षमतेची जाणीव करून देते. महासत्ता व्हायचे तर नैतिकतेला व्यवहाराची जोड देऊन जगात ठिकठिकाणच्या देशात आणीबाणीच्या परिस्थितीत लष्करी हस्तक्षेप करण्याची क्षमता असणे आवश्यक असते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@