एपीआयच्या बदलीसाठी आमदाराचे आंदोलन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Sep-2018
Total Views |

गृहमंत्र्यांच्या आदेशाला अधीक्षकांकडून केराची टोपली 

 
 
 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... https://www.facebook.com/Tarunbharatjal/

जळगाव, १७ सप्टेंबर
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्‍वर येथील एपीआय पोलीस अधिकारी संदीप पाटील यांची बदली करण्यासाठी तीन एस.पी, आय.जी, डी.जी, तसेच राज्याचे गृहमंत्री यांनी आदेश देऊनही त्यांची बदली होत नसल्याने शिवसेनेचे आ. किशोर पाटील यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. मात्र अधीक्षक शिंदे यांच्याशी चर्चा केल्यानंतर ३० सप्टेंबरपर्यंत चौकशी करून अस्थापनासमोर हा मुद्दा ठेवून त्यानंतर निर्णय घेण्याचे सांगितले. यावेळी ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र, ३० सप्टेंबरपर्यंत कार्यवाही न झाल्यास १ ते ५ ऑक्टोबरदरम्यान आंदोलन करणार मग गुन्हे दाखल झाले तरी चालतील असा इशारा देण्यात आला.
 
 
पिंपळगाव हरेश्‍वर येथील एपीआय संदीप पाटील यांचा दोन वर्षाचा कार्यकाळ संपला असून त्यांना पुन्हा ७ महिन्यांचा कार्यकाळ वाढवून दिला आहे. यात भर म्हणजे नवनियुक्त अधीक्षक दत्ता शिंदे यांनी तर त्यांना प्रशस्तीपत्र व एक वर्षाचा काळ वाढवून दिला. मात्र, या अधिकार्‍याविरुद्ध गावातील अनेक नागरिकांच्या तक्रारी आहे. या अधिकार्‍याने महिला व पुरुषांना मारहाण करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहे. पाटील हे गावातील ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या अपहाराची नोंद करत नाहीत, उलट जीवे मारण्याच्या धमक्या देतात. अपंग व्यक्तींवर ३५३ दाखल करून त्याला हद्दीपारीच्या नोटिसा बजावतो. अशा मनमानी अधिकार्‍याच्या तक्रारी माजी एस.पी सुपेकर, तत्कालीन एस.पी कराळे, विद्यमान एस.पी दत्ता शिंदे यांना करण्यात आल्या. मात्र, तरीही त्या अधिकार्‍याची बदली एकही जिल्हा पोलीस अधीक्षक करू शकत नाही, याचे काय गौडबंगाल आहे, असा प्रश्‍न आ. किशोर पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला.
 
कुठेतरी पाणी मुरतंय...
एक आमदार आय.जी, डी.जी यांना तक्रारी देतो, त्याची चौकशी होते. फलित काय शून्य. राज्याचे गृहमंत्री केसरकर यांना याची माहिती दिली, त्यांनी आपल्याला याबाबत फोन केला. मात्र, तरीसुध्दा आपण बदली केली नाही. याचे कारण काय? यात कुठेतरी पाणी मुरत असल्याचा आरोप करत अधिकारी पाटील यांची जोपर्यंत बदली होत नाही, तोपर्यंत आम्ही जाणार नाही, असा इशारा आ. किशोर पाटील यांनी दिला.
 
 
गणपती विसर्जनानंतर निर्णय घेणार
यावर एस.पी दत्ता शिंदे यांनी राज्य, आयुक्त व जिल्हा याठिकाणी आस्थापना मंडळ असते. त्यांच्यासमोर या सर्व चौकशांचे अहवाल आल्यानंतर तसेच २३ रोजी गणपती विसर्जन झाल्यानंतर ३० पर्यंत आम्ही निर्णय घेणार, असे अधीक्षक शिंदे यांनी सांगितले.
@@AUTHORINFO_V1@@