संघावर टीका करण्याआधी संघ समजून घ्या : सरसंघचालक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Sep-2018
Total Views |
 
 
नवी दिल्ली : संघात एकचालकानुवर्तित्व आहे, म्हणजे हुकूमशाही असल्याचे काही लोक सांगतात. मात्र, त्यात काहीही तथ्य नाही. संघात शिस्तीसाठी केवळ एक व्यक्ती भूमिका मांडतो. याचा अर्थ स्वयंसेवकांचे मत डावलले जात नाही. संघात प्रत्येक स्वयंसेवक प्रश्न विचारू शकतो, आपली मते मांडू शकतो. स्वयंसेवकांनी कोणत्या क्षेत्रात काम करावे, हे संघ ठरवित नाही. मात्र, संघाचे संस्कार आणि शिस्त बिघडू नये, याची काळजी जरूर घेतो. संघाच्या विविध संस्था या स्वायत्तपणे कार्यरत आहेत. समन्वय बैठकांमध्ये संघ आदेश कधीही देत नाहीत. प्रत्येक संस्था आपापल्या क्षेत्रात स्वतंत्रपणे कार्यरत आहेत, त्यामुळे संघावर रिमोट कंट्रोल असल्याच्याही आरोपात काहीही तथ्य नाही. संघात प्रत्यक्ष येऊनच नेमके स्वरूप समजू शकतेत्याचे संघ नेहमीत स्वागत करतो. संघावर टीका अथवा संघाचा विरोध जरूर करा, मात्र त्यापूर्वी संघाचे नेमके स्वरूप समजून घेणे गरजेचे असल्याचे मत सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी सोमवारी व्यक्त केले.
 
 
 

राजधानी नवी दिल्लीतील विज्ञान भवनात भविष्यातील भारत : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दृष्टीकोनातून या विषयावर सलग तीन दिवस सरसंघचालक डॉ. मोहनजीभागवत संबोधित करणार आहेत. सोमवारी या व्याख्यानमालेतील पहिले व्याख्यान पार पडले, त्यावेळी डॉ. भागवत बोलत होते. यावेळी सामाजिक, राजकीय,शैक्षणिक, आर्थिक, उद्योग, पत्रकारिता आदी क्षेत्रातील विध मान्यवर उपस्थित होते. यावेळी सरसंघचालकांनी संघ आणि संघाची भूमिका, राष्ट्र व समाजाबद्दलची भूमिका, उद्दिष्टे आदींवर सविस्तर चिंतन केले. डॉ. भागवत म्हणाले की, डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी त्या काळातील विविध विचारप्रवाहांचा अभ्यास केला होता. त्यात क्रांतिकारक विचारप्रवाह, काँग्रेसचा विचारप्रवाह यांचाही समावेश होता. प्रत्येक विचारप्रवाहाचे अंतिम ध्येय म्हणजे समाजास आणि देशास समर्थ बनविणे हाच असल्याचे त्यांच्या लक्षात आले होते. त्यासाठी समाजात मोठ्या प्रमाणात जागृती घडविणे गरजेचे असल्याचेही त्यांनी जाणले होते. त्यामुळे त्यानी हिंदू समाजाचे संघटन करण्यासाठी काम करण्यास प्रारंभ केला आणि त्यातूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जन्म झाला. भेदमुक्त आणि समतायुक्त समाजाची निर्मिती करणे आणि त्यासाठी चारित्र्यवान व्यक्तींचे निर्माण करणे, संघाचे प्रधान उद्दीष्ट आहे. कारण समाजात बदल घडविण्यासाठी अगोदर व्यक्तींमध्ये बदल होणे, त्यांना चारित्र्यवान बनविण गरजेते असते. त्यामुळे देशभरात असे चारित्र्यवान स्वयंसेवकांचे निर्माण करून त्यायोगे समाजात परिवर्तन घडविण्यासाठी संघ कार्यरत असतो असेही डॉ. भागवत यांनी सांगितले. ‘हिंदूसमाज या शब्दावरून अनेक जण आक्षेप घेत असल्याचे सांगत डॉ. मोहनजी भागवत पुढे म्हणाले की, भारतात विविध भाष आहेत, पंथ आहेत. आहारविहारासह पेहराव आणि सणांमध्येदेखील फरक आहे. देवदेवता ३३ कोटी आहेत, मात्र त्यात सातत्याने वाढ होतच असते. दुर्दैवाने या विविधतेचा वापर करित प्रथम आपणच त्यात भेद निर्माण केले आणि पुढे जाऊन परकीयांनीदेखील त्याचा फायदा घेतला. अशावेळी सर्वांना एकत्र आणण्यासाठी या भूमीतील पारपंरिक हिंदू विचाराचे सहाय्य घेण्याचे निश्चित करण्यात आले. भारतात विविध विचार असले, तरीदेखील त्यांचा उगम आणि त्यांचे अखेरचे गंतव्यस्थान एकच आहे. त्यामुळे विविधतेचा स्विकार करणे, आपापल्या विविधतेवर ठाम राहणे, त्याचवेळी समन्वयही साधणे, हेच काम संघ करीत आहे. भारतीय मूल्यांचा मूळ विचार जगा आणि जगू द्या असा आहे. सर्व प्रकारच्या विचारांमध्ये त्याचा प्रतिबिंब पडलेले आढळते, भारतीय कुटुंबांमध्ये पिढ्यानपिढ्या हेच संस्कार होत आहेत. एवढेच नव्हे, तर इस्लाम आणि ख्रिश्चन या परकीयांवरही आता त्याचे संस्कार झाले आहेत. त्यामुळे या हिंदू मूल्यांनी सर्व समाजात एकत्र बांधून ठेवले आहे. ज्या ज्या वेळी हिंदूसमाज आपल्या मूल्यांना विसरला, त्या त्या वेळी देशाचे पतन झाले आहे. त्यामुळे या हिंदू समाजाचे संघटन करण्यासाठील रा. स्व. संघाची स्थापना करण्यात आली आहे. कोणाच्या विरोधासाठी अथवा कोणत्याही तात्कालिक घटनेची प्रतिक्रीया म्हणून रा. स्व. संघाची स्थापना झाली नसल्याचेही डॉ. भागवत यांनी नमूद केले. मोहनजी पुढे म्हणाले की, संघ स्वावलंबी आहे. दरवर्षी एक दिवस भगव्या ध्वजास गुरू मानून त्यापुढे सर्व स्वयंसेवक गुरूदक्षिणा अर्पण करतात आणि त्यावरच संघ चालतो. बाहेरून कोणत्याही प्रकारची मदत घेतली जात नाही. अर्थात स्वयंसेवकांमार्फत चालणाऱ्या सेवाकार्यासाठी समाजाची मदत घेतली जाते, त्यासाठी नियमाप्रामणे ट्रस्ट स्थापन करून काम चालते. संघ भगव्या ध्वजासोबतच तिरंग्यालाही मानतो आणि त्याचा सन्मान करतो, असेही डॉ. भागवत यांनी यावेळी स्पष्ट केले.

 
 
 

संघकार्यात महिलांचा मोठा सहभाग : आपल्या व्याख्यानात महिलांविषयी बोलताना सरसंघचालक म्हणाले की, रा. स्व. संघाच महिलांना प्रवेश का नाही, असा प्रश्न नेहमी विचारण्यात येतो. डॉ. हेडगेवारांनाही हा प्रश्न एका महिलेने विचारला होता. त्यावेळी त्यांना उत्तर देताना तशी स्वतंत्र संघटना काढावी, असे डॉ. हेडगेवार यांनी सुचविले. त्याप्रमाणे त्या महिलेने पुढाकार घेतला आणि राष्ट्रसेविका समितीची स्थापना करण्यात आली. दोन्ही संघटना समांतरपणे मात्र परस्परांच्या कार्यक्षेत्रात न येता, परस्परांना मदत करत काम करीत आहेत. त्याचप्रमाणे संघकार्यातही महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग आहे. त्यामुळे अशा प्रश्नास महत्व नाही, असे भागवत यांनी स्पष्ट केले.

 
 
 

सरसंघचालकांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

· संघात प्रत्येक स्वयंसेवक प्रश्न विचारू शकतो, आपली मते मांडू शकतो.

· समन्वय बैठकांमध्ये संघ आदेश कधीही देत नाहीत. प्रत्येक संस्था आपापल्या क्षेत्रात स्वतंत्रपणे कार्यरत आहेत, त्यामुळे संघावर रिमोट कंट्रोल असल्याच्याही आरोपात काहीही तथ्य नाही.

· संघावर टीका अथवा संघाचा विरोध जरूर करा, मात्र त्यापूर्वी संघाचे नेमके स्वरूप समजून घेणे गरजेचे.

· भेदमुक्त आणि समतायुक्त समाजाची निर्मिती करणे आणि त्यासाठी चारित्र्यवान व्यक्तींचे निर्माण करणे, संघाचे प्रधान उद्दीष्ट आहे.

· देशभरात चारित्र्यवान स्वयंसेवकांचे निर्माण करून त्यायोगे समाजात परिवर्तन घडविण्यासाठी संघ कार्यरत असतो.

· भारतात विविध विचार असले, तरीदेखील त्यांचा उगम आणि त्यांचे अखेरचे गंतव्यस्थान एकच आहे.

· ज्या ज्या वेळी हिंदूसमाज आपल्या मूल्यांना विसरला, त्या त्या वेळी देशाचे पतन झाले आहे.

· कोणाच्या विरोधासाठी अथवा कोणत्याही तात्कालिक घटनेची प्रतिक्रीया म्हणून रा. स्व. संघाची स्थापना झाली नाही.

· संघ भगव्या ध्वजासोबतच तिरंग्यालाही मानतो आणि त्याचा सन्मान करतो.

 

 
   माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/
 
@@AUTHORINFO_V1@@