पाणघोड्याच्या पिल्लाबाबत राणीबाग प्रशासनाचे मौन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Sep-2018
Total Views |



 

हम्बोल्ट पेंग्विनच्या पिल्लाच्या मृत्यूचा धसका

 

मुंबई (नितीन जगताप: भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात (राणीबाग) प्रशासनाने हम्बोल्ट पेंग्विनच्या पिल्लाच्या मृत्यूचा चांगलाच धसका घेतल्याचे दिसत आहे. कारण प्राणिसंग्रहालयातील पाणघोड्याच्या पिंजऱ्यात गोंडस पिल्लाचा जन्म झाल्याची माहिती सूत्रांनी दिली परंतु प्रशासनाने त्याबाबत मौन बाळगले आहे.

 

गेल्या आठवड्यात पाणघोड्यांच्या पिंजऱ्यात नव्या पिल्लाचा जन्म झाल्याची माहिती प्राणिसंग्रहालयातील सूत्रांनी सांगितले. राणीबागेतील पाणघोड्यांच्या पिंजऱ्यात दोन माद्या आणि एक नर पाणघोड्याचे वास्तव्य आहे. सध्या या पिंजऱ्यात पिल्लू दोन माद्यांपैकी नेमक्या कोणाचे आहे, हे समजू शकले नाही. गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात पिल्लू गमावलेल्या मादीने पुन्हा पिल्लाला जन्म देण्याची शक्यता कमी आहे. कारण प्रजनन पूर्ण झाल्यानंतर पाणघोड्यांमध्ये

 

गर्भधारणेचा कालावधी आठ महिन्यांचा असतो. त्यामुळे दुसऱ्या मादीने पिल्लाला जन्म दिल्याची शक्यता आहे. याबाबत प्राणिसंग्रहालय प्रशासनाशी संपर्क साधला असता त्यांनी माहिती देण्यास नकार दिला. पिल्लाचा जन्म झाल्यापासून त्याची देखरेख मादी पाणीघोडा करीत आहे. आपल्या आईच्या कुशीत राहून हे पिल्लू पाण्यात विहार करत आहे. मात्र काही दिवसांपूर्वी पेंग्विनच्या पिल्लाचा मृत्यू झाल्यामुळे राणीबाग प्रशासनाला चांगलेच धारेवर धरण्यात आले होते. त्यामुळे धास्तावलेल्या प्रशासनातील अधिकारी पाणघोड्याच्या पिल्लाच्या जन्माबाबत बोलण्यास तयार नाहीत. याउलट अधिकाऱ्यांनी पाणघोड्यांचा पिंजरा बंदिस्त करून त्यावर दुरुस्तीसाठी पिंजरा बंद असल्याचे फलक लावला आहे. तसेच त्या ठिकाणी नजर ठेवण्यासाठी प्राणीपालांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र बंदिस्त करण्यासाठी लावलेल्या मार्गरोधकांवर चढून उत्साही पर्यटक पाणघोड्यांचे दर्शन घेत आहेत.

 

गेल्या वर्षी एका पिल्लाचा झालेला मृत्यू

 

दोन वर्षांपूर्वी या ठिकाणी पाणघोड्याच्या पिल्लाचा जन्म झाला होता. मात्र गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात हे पिल्लू धनुर्वाताने त्रस्त झाले. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे या पिल्लाला वेळीच उपचार मिळाले नाहीत. त्यामुळे या पिल्लाचा मृत्यू झाला होता.

 

प्राणिसंग्रहालय प्रशासनाची माहिती देण्यास टाळाटाळ

 

पाणघोड्याला पिल्लू झाले आहे, ही माहिती खोटी आहे. पाणघोड्याच्या पिंजऱ्यांची सध्या दुरुस्ती सुरू आहे. त्यामुळे हा परिसर बॅरिकेडस् लावून बंद केला आहे. या परिसरात पर्यटकांनाही मनाई आहे, असे सांगत प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@