सावित्रीची लेक...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Sep-2018   
Total Views |


मातंग समाजातली पहिली महिला उपजिल्हाधिकारीप्रशासकीय कारकिर्दीमध्ये समाजभानत्यातही स्त्री सक्षमीकरणाची आस असलेल्या शुभांगी साठे. शाहीर अण्णा भाऊ साठेंचा वारसा घेऊन वाटेगावच्या मातीतून समाजाचे नाव उंचावणार्‍या कोकण प्रांत उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे. वाटेगावच्या साठे कुटुंबीयांची पार्श्वभूमी ग्रामीण. सामाजिक आणि आर्थिक स्तरावर सुबत्ता असणे शक्यच नाही. प्रतिकूल परिस्थितीशी समन्वय साधत साठे कुटुंबातल्या शुभांगीने लहानपणापासूनच गावाशिवाशी समरसता राखली होती. वडील अनिल शाळेमध्ये क्लार्क होते. आई गृहिणी शुभांगीची हुशारी आणि नम्रता यामुळे गावात सगळेचजण तिला आपल्या लेकीसारखे मानत.


लहान शुभांगी शिकण्यासाठी गावात जाई. गावापासून तिचे घर दूर, पण कधी उशीर झाला तर गावातले कुणीही अधिकारवाणीने, आपुलकीने छोट्या शुभांगीला घरी आणून सोडे. सगळ्यांचे म्हणणे एकच, पोर हुशार आहे. शुभांगी शिकत होती, नव्हे घरातूनच तिला पाठिंबा होता. यालाही कारण होतेच. शुभांगीची मोठी बहीण आठवी पास, जगरहाटीप्रमाणे तिचे वयाच्या सोळाव्या वर्षीच लग्न झालेले. विवाहाच्या अडीच वर्षातच बहिणीच्या पतीचे आकस्मिक निधन झाले. बहीण आणि तिच्यासोबत तिची दोन वर्षांची मुलगी माहेरी परत आली. काही चूक नसताना आयुष्यात खूप सहन करावं लागणार होतं. साठे दाम्पत्याला मात्र मनात वाटत राहिलं की, मुलीला शिकवले असते, स्वावलंबी करून मग तिचे लग्न केलं असतं तर आज तिचं आयुष्य सुस्थिर झालं असतं. त्यामुळे अनिल साठेंनी ठरवलं की, शुभांगी हुशार आहे. तिला जितके शिकायचे तितके शिकू द्यायचे. शुभांगीने या संधीचे सोने केले. तिने ठरवले की डॉक्टरच व्हायचं. पण पुढे महाविद्यालयात असताना शुभांगीला प्रथमच प्रशासकीय अधिकारी आणि त्याच्या स्पर्धा परीक्षांबद्दल कळले. ती महाविद्यालयाच्या दुसर्‍या वर्षापासून स्पर्धा परीक्षेची तयारी करू लागली. स्पर्धा परिक्षेची पुस्तके विकत घेण्यापेक्षा ती वाचनालयात बसून अभ्यास करत असे. तिने डोळ्यासमोर एकच ध्येय ठेवले की, आपण प्रशासकीय व्यवस्थेत जायचेच. तिने दोनवेळा प्रशासकीय सेवेसाठीच्या परीक्षा दिल्या. पण दोन्ही वेळेस तिला अपयश आले. अवघ्या एका गुणांसाठी तिची संधी हुकली. घरच्यांनी धीर दिला. मैत्रिणींनी बळ दिले. शुभांगीने पुन्हा परीक्षा दिली. प्रिलिम दिली. त्यानंतर मुख्य परीक्षा प्रदीर्घ कालावधीने ३ वर्षांनी दिली. हा काळ शुभांगीसाठी कसोटीचा होता. आत्मविश्वासाचे बळ कितीही असले तरी वास्तव त्याहून वेगळेच असते. कधी कधी बाहेरून अनाहूत सल्ले येतच की, या मोठ्या परीक्षा आपल्यासाठी नसतात. पैसे दिल्याशिवाय कोणी पास करणार नाही. बस झालं, किती शिकणार? लग्नाचं वय जाईल ना, पण अनिल साठे आणि त्यांची पत्नी ढालीसारखे शुभांगीच्या सोबत राहिले. शुभांगी सांगतात, ”या काळात माझ्यापेक्षा छोटे भाऊ-बहीण शिक्षण पूर्ण करून नोकरीला लागले होते. त्यामुळे मग मीही नोकरी करू लागले. पोस्टाची परीक्षा पास झाले आणि पोस्टात रूजू झाले. हे काम करत असताना मी माझे ध्येय विसरले नव्हते. धीर सोडला नव्हता. त्याचवेळी मला निरोप मिळाला की, मी स्पर्धा परीक्षा पास झाले. माझ्यापेक्षा माझ्या कुटुंबीयांसाठी, समाजासाठी आणि गावासाठी हा अभिमानाचा विषय होता.

 

’मुलगी शिकली, प्रगती झाली’ याचा जिवंत अनुभव घेतलेल्या शुभांगी यांनी विविध शहरांमध्ये कार्यभार सांभाळताना तिथल्या जनजीवनाचा अभ्यास केला. आपल्या अखत्यारितल्या कार्यक्षेत्रात समाजाचा विकास कसा होईल यासाठी प्रयत्न केले. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये भूमापन अधिकारी असताना त्यांनी पाहिले की, जमीन घरातल्या आई, बहीण किंवा सुनेच्या नावावर असली तरी त्या जमिनीच्या कामासंबंधात कधीही कार्यालयात येत नसत. आल्यातरी खाली मान घालून ’हो ला हो’ करत. राज्यातल्या विविध शहरांमध्ये महिलांची परिस्थिती अपवाद वगळता थोड्याफार फरकाने अशीच दिसली. या वास्तवाने शुभांगी अस्वस्थ झाल्या. चाकोरीबाहेर जाऊन त्यांनी महिलांच्या जागृतीसाठी, हक्कासाठी कार्यक्रम आयोजित केले. जी मुलं स्पर्धा परीक्षेचे क्लास लावू शकत नाहीत त्यांच्यासाठी स्पर्धा परीक्षा सरावाची विनाशुल्क प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली. शुभांगी यांना पतीही मिळाले ते समाजभान असलेले प्रा. खंडागळे. या दोघांमध्येही वैचारिकता आणि समाजशिलता हा समान दुवा. त्यामुळे दोघेही मिळून समाजामध्ये उच्च शिक्षणाचा टक्का वाढवावा यासाठी जिवाचं रान करून प्रयत्न करतात. समाजानेही शुभांगीच्या निःस्वार्थी सेवाकर्तृत्वाच्या आलेखाला सन्मानित केले आहे. शुभांगी म्हणतात, ”मी सावित्रीची लेक आहे. तिच्या पुण्याईने शिकले. जर खरंच ध्येयाप्रती निष्ठा असेल आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर कोणत्याही माणसाला ध्येय प्राप्त होतेच. तसेच कोणत्याही परिस्थितीत शिकणे हे समाजातल्या प्रत्येकाचे ध्येय असलेच पाहिजे.” असो. शुभांगी यांच्या शब्दाला आज समाजात किंमत आहे. अर्थात शुभांगी पहिली महिला उपजिल्हाधिकारी आहेत म्हणून नाही तर, अधिकारक्षेत्रात असतानाही शुभांगी समाजाची सेवाशील कन्याच आहे. शुभांगीने यशाच्या अवकाशाशी नाते जोडताना समाजाशी ऋणानुबंध कायम जपले आहेत. म्हणून समाज त्यांच्या शब्दांना मान देतो.

 
 
      माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/
 
 
@@AUTHORINFO_V1@@