पं. दीनदयाळ उपाध्याय : भारतनिर्माणातील सशक्त नायक!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Sep-2018
Total Views |

 

 
 
 
  
दीनदयाळजी म्हणतात, “जर माणसाचा स्वभाव खरोखरच मुळात संघर्षाचा असेल, त्याच्या प्रत्येक कृतीमागची प्रेरणा दुसऱ्याला गिळंकृत करून स्वतः जगण्याची असेल, तर आपण त्याला दुसऱ्यासाठी जगणे व दुसऱ्यावर प्रेम करणे शिकवू शकणार नाही.”
 

२०१४ नंतर पद्धतशीरपणे प्रचारात आणली गेलेली असहिष्णुता, पुरस्कार वापसीचा जाणीवपूर्वक लिहिला गेलेला अंक, जेएनयुतील देशविरोधी घोषणा प्रकरण, इलेक्ट्रॉनिक वाहिन्यांवर घातले जाणारे चर्चेचे रतीब, समूहमाध्यमातून स्वनामधन्य विचारवंतांकडून चालणारी तर्कहीन व अर्थहीन चर्चा... जणूकाही हा देश अराजकाच्या उंबरठ्यावर उभा आहे, असा भास निर्माण केला गेला आहे. देशातील सर्व प्रश्न सुटल्याप्रमाणे केवळ भावनिक अस्मितेच्या प्रश्नांवर सर्व चर्चा केंद्रित झालेली दिसते. जेमतेम ५० वर्षांपूर्वी मांडल्या गेलेल्या संपूर्ण मानवाच्या आणि मानवेतर सृष्टीच्या कल्याणाच्या विचारांच्या पार्श्वभूमीवर आजची स्थिती तपासणे अगत्याचे ठरतेजगातील प्राचीन संस्कृती असणाऱ्या देशांपैकी एक देश म्हणून भारताचा उल्लेख केला जातो; किंबहुना ही भूमी असंख्य विचार, दर्शने, धर्म आणि पंथ प्रसवणारी राहिली आहे. कालमानपरत्वे असंख्य विचारांची गुंतागुंत निर्माण होणे, स्वाभाविक आहे. मात्र, भारताच्या संदर्भात विचार करताना सामान्यपणे मार्क्सवाद, गांधीवाद, हिंदुत्ववाद आणि आंबेडकरवाद या विचारांनी भारताचे विसावे शतक ढवळून काढल्याचे दिसून येते. इथे एक लक्षात घेतले पाहिजे की, कुठलाही विचार जन्माला येताना त्याची दुसरी बाजू घेऊनच जन्माला येतो. मार्क्सवाद पुढे समाजवादात व त्याहीपुढे गांधीप्रणीत समाजवादात रूपांतरित झाला. हिंदुत्वाचे सावरकर आणि संघ असे दोन प्रवाह बघायला मिळतात. पण, विशेष म्हणजे या दोन्ही प्रवाहांची हिंदुत्वावरील श्रद्धा अबाधित राहिली आहे. मार्क्स स्वतः विरोधविकासवादी होता. त्यामुळे प्रत्येक अंतिम वाटणारा विचार कालांतराने प्राथमिक अवस्थेत जातो, असे तो मानत असे. राहिला प्रश्न आंबेडकरांच्या विचारांचा, तर त्यांनीदेखील बुद्धाच्या मार्गाने जात आपला विचार सतत विकसनशील राहील, अशीच भूमिका मांडलेली दिसेल. त्यांच्या अनुयायांनी त्यांच्याजवळ न थांबता पुढे जावे, असे त्यांना वाटे. स्वातंत्र्यपूर्व काळात अशी वैचारिक घुसळण सुरू असताना स्वातंत्र्यानंतर साठीच्या दशकात पं. दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडलेल्या ‘एकात्म मानव विचारा’ चा परामर्श घेणे अगत्याचे ठरते.

 

स्वातंत्र्यानंतर काँग्रेसच्या हातात प्रदीर्घ काळ सत्ता राहिली आणि डाव्यांनी नेहमीच काँग्रेसची बौद्धिक गरज पूर्ण केली. त्यातही सर्व महत्त्वाच्या बौद्धिक संस्थांवर डाव्यांची मक्तेदारी असल्याने उजव्या मानल्या गेलेल्या दीनदयाळजींचा विचार उपेक्षित राहणे, अगदी स्वाभाविक होते. कोणताही विचार हा केवळ विरोधी आहे म्हणून नाकारणे, हा त्या विचारावर केलेला अन्याय आहे. साठच्या दशकात जनसंघाच्या कामानिमित्त भारतभ्रमण करीत असताना दीनदयाळजींचे चिंतन सुरू होते. १९६५ मध्ये विजयवाडा येथे भरलेल्या जनसंघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधीसभेत पक्षाचा सिद्धांत व नीतिविषयक जो प्रबंध स्वीकृत झाला, त्याची सुरुवातच मुळात एकात्म मानवदर्शनाने झालेली आहे. ‘एकात्म मानव विचार’ हा भारतीय विचारांचे अधिष्ठान असलेला विचार असून, दीनदयाळ त्याची तात्त्विक मांडणी करतात. ‘सर्वेपि सुखिनः सन्तु...’ म्हणत असताना किंवा ‘भवतु सब्ब मंगलम्’ असे म्हणताना भारतीय विचार केवळ मानवाच्या कल्याणाचा विचार करीत नाही, तर त्याहीपुढे मानवेतर सृष्टीचा त्यामागे विचार केलेला आपल्याला दिसून येईल. दीनदयाळजींनी चतुर्विध पुरुषार्थाच्या आधारे हा विचार मांडला असून, एकात्म मानवदर्शनात व्यक्तीचा ‘अहम् ते वयम्’ हा प्रवास अधोरेखित केला आहे. या विचारसूत्राचे आणखी एक वेगळेपण म्हणजे, एखाद्या विचाराच्या व्यवस्थेच्या विरोधातील प्रतिक्रिया म्हणून जन्माला आलेला नाही. याउलट, बहुतेक पाश्चात्त्य विचारप्रणाली प्रतिक्रियेतून संघर्ष व संघर्षातून पुन्हा प्रतिक्रिया, अशा चक्रातून जन्मास आलेल्या दिसतात. खरेतर हे कधीच न संपणारे दुष्टचक्र आहे. वरवर पाहता, विरोधातून विकास हे मार्क्सचे तत्त्व जगभर स्वीकारले गेले असले, तरी शाश्वत व परस्परपूरक विकासात ते कुचकामी ठरल्याचे सिद्ध झाले आहे. डार्विनने प्राणिशास्त्राचे, हेगेलने तत्त्वज्ञानाचे आणि मार्क्सने इतिहासाचे विश्लेषण विरोधविकास सिद्धांताच्या आधारे केलेले आपल्याला दिसेल. याउलट, एकात्म मानवदर्शन हे प्रतिक्रियेतून नव्हे, तर व्यष्टी, समष्टी आणि त्याहीपुढे जाऊन परमेष्टीशी तादात्म्य पावण्यासाठी पुरुषार्थाच्या आधारे केलेली मांडणी होय. ‘संघर्षातून जीवनविकास’ ही कल्पनाच एकात्म दर्शनाला मान्य नाही.

 

दीनदयाळजी म्हणतात, “जर माणसाचा स्वभाव खरोखरच मुळात संघर्षाचा असेल, त्याच्या प्रत्येक कृतीमागची प्रेरणा दुसऱ्याला गिळंकृत करून स्वतः जगण्याची असेल, तर आपण त्याला दुसऱ्यासाठी जगणे व दुसऱ्यावर प्रेम करणे शिकवू शकणार नाही.” यदाकदाचित प्रेम आणि सहकार्य यांना एखादा आधार असलाच, तर तो अधिक प्रबळ अशा एखाद्या शत्रूसमोर स्वतःच्या दुर्बलतेच्या आणि पराभवाच्या भावनेतून निर्माण होईल. तो आधार तात्पुरता असेल. त्यामुळे माणसामध्ये सद्भावना, त्याग, सेवा, सहिष्णुता, शिस्त आदी ज्या गुणांची निर्मिती होईल, ती केवळ एक धोरण म्हणून होईल. ते गुण मानवाच्या जीवनाचे अंग बनू शकणार नाहीत. संघर्षाच्या भूमिकेतून स्वेच्छापूर्वक आणि चिरस्थायी सहकार्याची सद्भावना निर्माण होऊ शकत नाहीप्रत्येक समाजाला स्वतःची एक लय असते, एक आत्मा असतो. त्याला पंडितजी ‘चिती’ असे संबोधतात. या समाजातील प्रत्येक घटक परस्परपूरक व परस्परावलंबी आहे. त्यामुळे समाजाचा विचार ते तुकड्यांमध्ये न मांडता साकल्याने मांडतात. किंबहुना हेच या दर्शनाचे मुख्य सूत्र आहे. व्यक्ती, समाज आणि परमेष्टी असा प्रवास होत असताना, यातील सर्व घटक एकात्मतेच्या धाग्याने परस्परांना घट्ट बांधले गेले आहेत. व्यक्ती, कुटुंब, समाज असे एक एक वर्तुळ गृहीत धरले, तर ते पार करीत असताना एकमेकांपासून विलग न होता प्रत्येक वर्तुळ मागच्या वर्तुळाशी सबंध ठेवूनच विकसित होते. लहानपणी केवळ मी विद्यमान असतो. मात्र, पुढे हे कुटुंब माझे आहे, कुटुंब ज्या समाजाचा घटक आहे तो समाजही माझा आहे. पुढच्या पायरीवर केवळ समाजच नाही, तर हे राष्ट्र आणि अखिल जगत माझे आहे आणि मी त्याचाच सदस्य असल्याची भावना निर्माण होणे, ही कल्पना दीनदयाळजींच्या चिंतनात सर्वत्र आढळते. सामान्य माणूस म्हणून आपण विचार केल्यास समाजात, देशात आणि अखिल जगात शांती राहावी, ज्याला त्याला त्याच्या परिश्रमाचा उचित मोबदला मिळावा यापेक्षा वेगळे काय वाटू शकते? परंतु, समाजात दिसणारी विविधता ही त्या आंतरिक एकतेताच परिपाक आहे, असे हे दर्शन मानते. चराचरात आत्मतत्त्वाचा वास आहे, असे आपण ऐकत असतो. अनेक प्रवचनकार आणि कीर्तनकार घासून गुळगुळीत झालेले एक वाक्य वापरत असतात ते म्हणजे, ‘प्रत्येकाच्या ठाई तो आत्माराम आहे.’ प्रत्यक्षात त्याचा अर्थ आपण किती जण समजून घेतो, हा भाग वेगळा; परंतु आपल्या प्रत्येकात एक चैतन्य आहे. माझ्यात जे तत्त्व विद्यमान आहे, तेच इतरांमध्ये आहे. हा भाव आला की, भेद उरत नाही. हा विचार या दर्शनाच्या मुळाशी आहे आणि हाच मूळ भारतीय विचारदेखील आहे. संत तुकाराम आपल्या एका अभंगात म्हणतात,

 

तुज सगुण म्हणो की निर्गुण रे।

सगुण निर्गुण एक गोविंदू रे॥

तुज स्थूल म्हणो की सूक्ष्म रे।

स्थूल सूक्ष्म एक गोविंदू रे॥

तुज दृश्य म्हणो की अदृश्य रे।

दृश्य अदृश्य एक गोविंदू रे॥

 

वरील ओळींमधील ‘गोविंदू’ हे चैतन्य आहे आणि स्थूलात, सूक्ष्मात सर्वत्र व्याप्त आहे. ज्यांचा योग आणि ध्यानधारणेचा अभ्यास असेल, त्यांना हे स्थूल आणि सूक्ष्म कळायला फार वेळ लागणार नाही आणि त्यामागील एकात्म भावदेखील अनुभवास आल्याशिवाय राहणार नाही. या चिंतनात हा ‘गोविंदू’ फार महत्त्वाचा आहे. इथे तृष्णातृप्ती मान्य आहे, पण ती पूर्ण करत असताना पुरुषार्थाचे भान सुटू नये, असा आग्रह कायम आहे. संपत्ती जमविण्याला आडकाठी नाही. मात्र, ती कोणत्या मार्गाने मिळविता, यावर मात्र नियंत्रण आहे. भारतीय परंपरेत धर्म, अर्थ, काम, मोक्ष असे चार पुरुषार्थ सांगितले आहेत. धर्माच्या आधारे काम आणि अर्थ हे पुरुषार्थ साधले, तर मोक्ष या पुरुषार्थाकडे जाण्याचा मार्ग श्रेयस्कर होतो. या ठिकाणी धर्म या शब्दाचा अर्थ अत्यंत व्यापक आहे. प्रार्थनास्थळावरून ठरतो तो धर्म, हा येथे अपेक्षित नाही. ‘धारण करतो तो धर्म.’ धर्म हा निसर्गाचा नियम आहे. धर्माच्या आधारे अर्थार्जन म्हणजे नैतिक भान सुटू न देता केलेले अर्थार्जन होय, हे पंडितजी आपल्याला वारंवार सांगतात. भौतिक संपन्नतेला त्यात विरोध नाही. मात्र, त्यामागे संयम आणि कुठेतरी थांबण्याची निश्चिती अपेक्षित आहे. आपल्या गरजांसाठी निसर्गाचे दोहन त्यात अपेक्षित नाही.

 

व्यवहार्यता

 

आज पंडितजींचा विचार कालोचित होता, असे पदोपदी आपल्याला जाणवेल. पश्चिमेकडून आम्ही केवळ मानवाच्या उपभोगाचा विचार घेतला; ज्यात इतरांचा विचार गौण ठरला. त्यामुळे केवळ मनुष्यजातीच्या प्रगतीचाच विचार केंद्रस्थानी आला. परिणाम काय? तर ग्लोबल वॉर्मिंग! नुकताच केरळमध्येझालेला हाहाकार हा निसर्गाचा प्रकोप नसून ते मानवनिर्मित संकट होते, असे पर्यावरणतज्ज्ञ मंडळी सांगताहेत. आम्हाला पुन्हा एकदा या सर्व गोष्टींचा दीनदयाळजींच्या विचारांच्या प्रकाशात साकल्याने विचार करावा लागेल. मुंबईत झालेल्या ‘नीती आणि सिद्धांत’ या विषयाच्या समारोपात दीनदयाळजी, भारतीय आणि भारताबाहेरील विविध विचारप्रवाहांचा सम्यक् विचार करून त्या विचारातील सामर्थ्य आणि दुर्बलता ध्यानात घेऊन ‘एकात्म मानवविचार’ असा एक मार्ग दाखवीत आहेत की, जो मानवाला त्याचे आजवरचे चिंतन, अनुभव आणि सिद्धी या सर्व बाबतीत पुढे घेऊन जाईल. ते या सिद्धांताची केवळ तात्त्विक बाजू मांडून थांबत नाहीत, तर ती प्रत्यक्षात येण्याकरिता काही मौलिक सूचना करतात. अपेक्षित सामाजाची उभारणी करताना असंख्य संस्कार केंद्रे, संस्था, समर्पित लोकांकडून चालविल्या जाणाऱ्या शाळा, राष्ट्र उभारणीचा वसा घेतलेले असंख्य तरुण या कामी लागतील, असे ते आपल्याला सांगून जातात. जुन्या अनेक केंद्रांचे पुनर्निर्माण त्यात अपेक्षित आहे. अशा समाजाचे निर्माण होत असताना तो समाज भौतिक दृष्टीनेदेखील पुढे सरकला पाहिजे, हा व्यवहार्य दृष्टिकोन ते मांडतात.

 

दीनदयाळजींचे चिंतन हे मूळ भारतीय विचारांची अभिव्यक्ती आहे. महात्मा गांधींचा विचारदेखील यापेक्षा वेगळा नाही. पण, एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती अशी की, विचाराने प्रगल्भ असलेल्या या भूमीवर आचरणाच्या पातळीवर मात्र टोकाचा विरोधाभास दिसून येतो. याचे उत्तर कशात शोधायचे? ‘अहम् ते वयम्’ हा प्रवास होत असताना आम्ही कुठे कमी पडतो? आमच्यावर आमचा स्वार्थ वरचढ ठरतोय का? अनेक वर्षांच्या गुलामगिरीमुळे आमच्या जाणिवा बोथट झाल्या आहेत का? की आमची व्यवस्था कुचकामी आहे? या प्रश्नांची उत्तरे अनेक माणसे आणि संस्था आपल्या परीने शोधण्याचा प्रयत्न निश्चित करीत आहेत. या प्रश्नांची उत्तरे आम्हाला आमच्या शिक्षा पद्धतीतदेखील मिळू शकतात. पंडितजींच्या चिंतनात शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे, जे दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतरदेखील मेकॉलेच्या मार्गाने गेले. पंडितजींचा विचार आणि त्या आधारावर पुन्हा समाजाचे निर्माण करायचे असेल, तर व्यापक जाणिवेच्या आधारावर समाजानेच आपला स्व-भाव ओळखून संघटित प्रयत्न करणे गरजेचे आहे. आजच्या काळातदेखील पंडितजींचा विचार हा कालोचित असणे, यातच सगळे आले.

 

- प्रशांत आर्वे

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@