कवीवर्य ना.धों.महानोर : अमृतमहोत्सवी काव्य पारिजात!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Sep-2018
Total Views |
 
 https://www.facebook.com/Tarunbharatjal/
 
जळगाव, १५ सप्टेंबर
परिस्थितीचे चटके बसले तरी मनाची संवेदनशीलता जपत, मनात कटुतेची कुठलीही रेषा उमटू न देण्याची दक्षता घेत वयाची ७५ वर्षे पूर्ण करणारे कवीवर्य पद्यश्री ना.धों.महानोर उर्फ ‘दादा’ म्हणजे काव्याचा अमृतमहोत्सवी पारिजात.
 
 
खान्देश आणि मराठवाड्याच्या सीमेवरील पळसखेड ही त्यांची जन्मभूमी. तिची प्रारंभापासूनच असलेली ओढ आजतागायत कायम असल्याचं दिसतं. ‘पळसखेडची गाणी’ हा त्यांचा लोकगीतांचा संग्रह जशी त्याची खूण आहे, तसंच अनेक ठिकाणी आलेला संदर्भही. बालपणापासूनच शेती, माती आणि पाणी यांच्यासमवेत रमणारे महानोर निसर्गाच्या विशाल कॅनव्हासचं विलोभनीय रूप पाहून काव्य लेखनाकडे वळले. वयाच्या २५ व्या वर्षी १९६७ मध्ये ‘रानातल्या कविता’ हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह आला आणि त्यांना ‘रानकवी’ ही ओळख देऊन गेला. या काव्यसंग्रहानेची सध्या पन्नाशी पार केली आहे. त्यानंतरच्या ‘पावसाची कविता’, ‘दिवेलागणीची वेळ’, ‘त्या आठवणींचा झोका’, ‘पक्ष्यांचे लक्ष थवे’, ‘जगाला प्रेम अर्पावे’, ‘पानझड’, ‘अजिंठा’, ‘गंगा वाहू दे निर्मळ’ आदी कविता संग्रहांनी त्यांची चिंतनशीलता आणि समष्टीवादी दृष्टिकोन यांचे प्रभावी प्रत्यंतर घडवले आहे. त्यांचे गद्य लेखनही अत्यंत चिंतनशिल आणि मनाचा ठाव घेणारे आहे. 
 https://www.facebook.com/Tarunbharatjal/
 
ह्या शेताने लळा
लाविला असा की,
सुखदुःखाला परस्परांशी हसलो-रडलो,
आता तर हा जीवच अवघा असा जखडला,
मी त्यांच्या हिरव्या बोलीचा शब्द जाहलो...
या ओळी त्यांचा शेती आणि मातीशी असलेला जिव्हाळा दर्शविण्यासाठी पुरेशा ठरतात. ते जसे मातीचे स्पंदन कवितेतून मांडतात, तसेच मातेचेही...
किती दिस आले गेले,
किती जुन्या आठवणी,
तुझ्या कारुण्य गीतांची
कधी सांगतो कहाणी...
 
 
अशी आईच्या आठवणींनी व्याकुळ झालेली त्यांची कविता आपल्याही डोळ्यांच्या कडा ओल्या करून जाते.
मराठी साहित्य आणि कलाविश्वात ना.धों.महानोर या नावाला एक वेगळंच वलय आहे. याचे प्रत्यंतर अनेक चित्रपटांसाठी त्यांनी जे गीतलेखन केलय त्यातून दिसून येतं. कवितेकडून भावकवितेकडे आणि भावकवितेकडून चित्रपटगीतांकडे त्यांच्या या प्रवासाने अचंबित व्हायला होतं. त्यांची कविता चित्रपटगीत होतांना असं वाटत की, जणू ती रचना त्यासाठीच लिहिली गेली आहे. जैत रे जैत, सर्जा, एक होता विदूषक, मुक्ता, दोघी आदी चित्रपटांसाठी त्यांनी केलेलं गीतलेखन अत्यंत गाजलं. विशेषतः ‘एक होता विदूषक’ या चित्रपटासाठी त्यांनी लिहिलेल्या गीतांमधील मी गातांना गीत तुला लडिवाळा, हा कंठ दाटूनी आला’ या अंगाई गीतातून तर जणू त्यांच्यातील मातृत्व भावनेने कळस गाठल्याचे दिसते. ‘लव लव करी पातं’ असं वीरश्रीयुक्त किंवा ‘श्रावणाचं उन बाई मला झेपेना’ असं लागणी गीत लिहिणारा हा कवी असे काळजाला पीळ पाडणारे शब्दही सहज लिहून जातो. पूर्वी शाळेत कवी दत्त यांची कविता शिकवताना शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांचेही डोळे भरून यायचे. अशी आठवण अनेक जण सांगतात. मात्र ‘मी गातांना गीत तुला लडिवाळा’ ही अंगाई त्यावरही वरचढ ठरली आहे.
 
 
कविवर्य ना.धों.महानोर यांच्या साहित्य सेवेचा गौरव म्हणून १९९१ मध्ये त्यांना भारत सरकारतर्फे पद्मश्री पुरस्काने गौरविण्यात आले. तसेच ‘पानझड’ या काव्यसंग्रहाला सन २००० मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला. आज वयाची ७६ वर्षे पूर्ण करणार्‍या या अमृतमहोत्सवी काव्य पारिजाताची काव्यसंपदा सतत अशीच फुलू दे, त्यांना अमृताचे मोल येवू दे आणि त्याचा सुगंध प्रदीर्घकाळ वाचक आणि रसिकांच्या मनात अन् हृदयातही दरवळत राहू दे, हीच दयाघनाला प्रार्थना...
 
 https://www.facebook.com/Tarunbharatjal/
@@AUTHORINFO_V1@@