सत्यासोबतच शिवम् आणि सुंदरमदेखील समजायला हवे : सरसंघचालक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Sep-2018
Total Views |

 


 
 
 
‘भारतमातेचे सुपुत्र’ लघुपटसंग्रहाचे लोकार्पण
 

मुंबई : कला या माध्यमात प्रचंड सामर्थ्य आहेपरंतु या सामर्थ्याचा उपयोग आपण कसा करतो हेही महत्त्वाचे आहे. चित्रपटासारख्या माध्यमांतून सत्य हे तर समजलेच पाहिजे. परंतु त्यासोबतच शिवम् आणि सुंदरम् हेही लोकांना समजले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करत सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी कलाक्षेत्राने पुढील पिढी घडवण्यासाठी कार्य करावेअसे आवाहन केले. 

 

भारतमातेचे सुपुत्र या १०० लघुपटांच्या संग्रहाचे लोकार्पण रविवारी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते विलेपार्ले येथील प्रबोधनकार ठाकरे क्रिडा संकुल येथे झालेल्या कार्यक्रमात करण्यात आले, यावेळी मोहनजी भागवत यांनी आपले मत सविस्तरपणे मांडले. यावेळी केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी तसेच या लघुपट संग्रहांचे निर्माते व इंडियन इन्फोटेनमेंट मीडिया कॉर्पोरेशनचे अध्यक्ष देवेंद्र खंडेलवाल आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ. मोहनजी भागवत म्हणाले की, “कला हे मानवी जीवनाचे अविभाज्य अंग आहे, जसा शरिराचा एखादा अवयव असतो. सद्भावना, दुर्भावना आदी भाव तसेच काय करायचे आहे व काय नाही, याचा विवेक या दोन्ही गोष्टी कलांमधून मिळतात. आपण आपल्या पूर्वजांना आणि त्यांच्या कार्याला नाकारू शकत नाही. मी संपूर्ण भारत फिरलो आहे. या माझ्या संपूर्ण प्रवासात मला आजवर देशातील एकही प्रदेश असा प्रदेश आढळला नाही, जिथे कोणी महापुरुष जन्मला नाही. हा आपला गौरवशाली इतिहास आहे,” असे भागवत म्हणाले. 

 

डॉ. मोहनजी भागवत पुढे म्हणाले की, “ज्यावेळेस या देशावर परकीय सत्तांचे राज्य होते त्या काळास आपण पारतंत्र्य काळ म्हणतो. परंतु, तो संघर्षाचा काळ आहे. आपण कधीच पराजित झालो नाही. आपण संघर्ष करत राहिलो, संघर्ष करत राहिलो. हा आपला वारसा असून, हाच जर आपण विसरलो तर आपल्याला पुढे काय करायचे आहे, याचा विवेक कसा जागृत होईल? असाही प्रश्न त्यांनी विचारला. त्यासाठी आधी आपण कोण आहोत, हे जाणून घ्यायला हवे. त्यातूनच तो भाव निर्माण होतो. हे ज्यांना कळते, तेच यशस्वी होतात, त्यांच्या जीवनाचे सार्थक होते,” असे सांगत ते म्हणाले की, नव्या पिढीला असे यशस्वी बनवायचे असेल तर या बाबी त्यांना समजायला हव्यात. यासाठीचे सर्वोत्तम माध्यम हे कला आहे. चित्रपट पाहून आल्यानंतर कित्येक लहान मुले त्या चित्रपटातील व्यक्तिरेखांचे अनुकरण करताना दिसतात. कारण, ते माध्यमच तेवढे प्रभावी आहे. ते पाहताना लोक एकाग्र होऊन जातात, एवढे त्याचे सामर्थ्य आहे. त्याचा उपयोग आपण कसा करतो हे पाहणे महत्वाचे असल्याचे भागवत म्हणाले.
 

 
 
चित्रपटातून सत्य हे समजलेच पाहिजे. परंतु, त्या ‘सत्यम’सोबतच शिवम आणि सुंदरम हेही समजायला हवे. चित्रपट हा केवळ थ्रीलसाठी असू नये. चित्रपटातून सत्यम, शिवम आणि सुंदरम हा भाव निर्माण झाला पाहिजे, त्यातून समाजाला पुढे काय करायचे आहे याची जाणीव होऊन तसा पुरुषार्थ घडवता आला पाहिजे,” अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. आपल्या देशात जे जे आक्रमक बाहेरून आले, त्यांच्या आठवणी आपल्याकडे कोणी चांगल्या भावनेने सांगत नाहीत. कारण त्यात काही कटू आठवणीही आहेत. दुसरीकडे, आपले पूर्वज ज्या ज्या प्रदेशांत गेले, तेथील लोक मात्र आपल्या त्या पूर्वजांच्या आठवणी आनंदाने, अभिमानाने सांगतात. हा आपला वारसा पुढील पिढीला समजायला हवा. तो वारसा पोहोचवण्याचे काम कला क्षेत्रातून व्हायला हवे,” असेही भागवत यांनी सांगितले. भारतमातेचे सुपुत्र या उपक्रमाविषयी बोलताना सरसंघचालक म्हणाले की, आपला वारसा पुढे नेण्याच्या कार्यात हा प्रकल्प महत्वाचा असून याचा त्या दृष्टीने प्रचार-प्रसार व्हायला हवा. या कार्यक्रमाला चित्रपटासह कला क्षेत्रातील अनेक मान्यवर तसेच संघ परिवार व सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्राशी अनेक मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.
 

अनेकांची नावे इतिहासातून गळाली किंवा गाळली गेली..

 

या देशाच्या इतिहासात योगदान देणारी असंख्य माणसे आहेत. या माणसांनी केवळ भारताला स्वातंत्र्यच मिळवून दिले नाही तर देशाची ‘आन-बान-शान’, देशाचा जगभरात गौरव वाढवण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य समर्पित केले. यातील अनेकांची नावे इतिहासाच्या पटलावरून गळाली किंवा गाळली गेली,” अशी खंत केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी व्यक्त केली. ही असंख्य व्यक्तिमत्व, त्यांचे कार्य नव्या आणि सध्याच्याही पिढीला समजले पाहिजे, असे सांगत नक्वी यांनी या लघुपट संग्रहाच्या निर्मात्यांची प्रशंसा केली.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@