रा. स्व. संघ : हिंदूबंधुत्वापासून विश्वबंधुत्वापर्यंत!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Sep-2018
Total Views |

 

 
 
 
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघया विश्वव्यापी संघटनेची आता नव्याने ओळख करून देण्याची खरेतर गरज नाही. एक तर गेल्या ९३ वर्षांपासून ती अतिशय खुलेपणाने आपले कार्य करीत आली आहे आणि दुसरी त्याहून महत्त्वाची बाब म्हणजे वेगवेगळ्या निमित्ताने तिचे विरोधक तिला सतत चर्चेत ठेवण्याचा प्रयत्न करीत असतात. त्या चर्चांतूनही तिचे खरे स्वरूप लोकांच्या लक्षात येते व त्यांच्या गैरसमजांवर पडदा पडतो.
 
 
डॉ. हेडगेवार यांनी १९२५ मध्ये हिंदू समाजाला संघटित स्वरूप देण्यासाठी या संघटनेची स्थापना केली, तेव्हापासून ‘तीन बंदीं’चा अल्प काळ सोडला, तर तिचे कार्य अव्याहतपणे सुरू आहे. तिच्या प्रगतीचे अनेक टप्पे केवळ संघस्वयंसेवकांनीच नव्हे, तर संपूर्ण देशवासीयांनी पाहिले आहेत आणि प्रसंगपरत्वे अनुभवलेही आहेत. त्यामुळे या संघटनेबाबत जनमानसात सहसा गैरसमज निर्माण होत नाहीत आणि झालेच तर ते प्रामाणिक असतात. ज्यांनी हेतुपूर्वक गैरसमज करून घेतले आहेत, त्यांना समजावण्याच्या भानगडीत संघ सहसा पडत नाही. त्यातून घडते असे की, संघाला मिळणारा जनमानसाचा पाठिंबा दिवसागणिक वाढतोच आहे. आज जेव्हा मी संघस्वरूपाचे नव्याने आकलन करण्याचा प्रयत्न करीत आहे, तेव्हा डॉ. हेडगेवारांनी पाच-दहा लहान मुलांसह नागपूरच्या मोहितेवाड्याच्या परिसरात सुरु केलेल्या पहिल्या शाखेचे चित्र डोळ्यांसमोर उभे राहते आणि त्याचवेळी दि. ११ ते १३ सप्टेंबर, २०१८ पर्यंत स्वामी विवेकानंदांच्या १२५ वर्षांपूर्वीच्या जागतिक धर्म परिषदेतील ऐतिहासिक भाषणाच्या स्मरणार्थ नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या शिकागो येथील ‘विश्व हिंदू संमेलना’चे दृश्य दिसायला लागते. एकीकडे ९३ वर्षांपूर्वी डॉ. हेडगेवार यांनी मांडलेल्या ‘हिंदूबंधुत्वा’च्या कल्पनेचे स्मरण होते आणि दुसरीकडे त्याचवेळी ‘संघा’च्या ‘विश्वबंधुत्वा’ पर्यंतच्या प्रवासाचा साक्षात्कारही होतो.
 

नागपुरात अनंतराव शेवडे यांच्या पुढाकाराने झालेल्या पहिल्या ‘विश्व हिंदी संमेलना’नंतर आजही देश-विदेशात ‘विश्व हिंदी संमेलने’ होतच आहेत, पण ती हिंदी भाषेपुरती मर्यादित आहेत. मात्र, शिकागोमध्ये नुकत्याच पार पडलेल्या ‘विश्व हिंदू संमेलना’चे प्रयोजनच वेगळे होते. स्वामीजींनी १२५ वर्षांपूर्वी मांडलेल्या विचारांचेच स्मरण करून देणे व ते आजही कसे प्रासंगिक आहे, हे अधोरेखित करणे हा या संमेलनाचा हेतू होता आणि सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या उद्बोधनातून तो स्पष्टही झाला. जगभरातून त्यात सहभागी होण्यासाठी आलेल्या महानुभावांची उपस्थिती आणि सरसंघचालकांचे विचार म्हणजे संघाच्या ‘हिंदूबंधुत्वा’पासून ते ‘विश्वबंधुत्वा’पर्यंतच्या प्रवासाचा शंखनादच होता. प्रारंभीच्या काळात संघाने आपले कार्य हिंदू समाजापर्यंतच सीमित ठेवण्याचे जाहीर केले असले तरी, त्यात इतर समाजांविषयीचा दुस्वास नव्हता. हा देश मूलत: हिंदूंचा आहे. तो या मातृभूमीचा पुत्ररूप समाज आहे. त्यामुळे या देशाला पुनर्वैभव प्राप्त करून देण्याची त्या समाजाची जबाबदारी आहे. त्याला त्या उद्दिष्टाची विस्मृती झाल्यामुळे विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. त्याला संघटित स्वरूप दिले की, या समस्यांचे स्वाभाविकपणे निराकरण होईल. म्हणून ‘हिंदू संघटन’ अशी संघाची मांडणी होती, पण त्याबद्दल विविध कारणांनी व उद्देशांनी त्याच्यासंबंधी गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्याची चिंता न करता वा कोणत्याही प्रकारे विचलित न होता संघाने आपले कार्य सुरूच ठेवले. एकच कार्य एकाच उद्देशाने अनेक संकटांनंतरही सतत ९३ वर्षे चालू ठेवणे, ही साधीसुधी बाब निश्चितच नाही, पण

 

ह्यनाभिषेको न संस्कार:

सिंहस्य क्रियते मृगै:।

विक्रमार्जितस्य राज्यस्य

स्वयमेव मृगेंद्रता॥

 

या सुभाषित पंक्तींवर संघाचा प्रगाढ विश्वास असल्यानेच आजचे स्वरूप त्याला प्राप्त झाले आहे.

 

अर्थात, या ९३ वर्षांत संघ ह्यमित: काल:। (एकाच जागेवर उभे राहून पाय आपटणे) करीत राहिला नाही. संघाबद्दल असे म्हटले जाते की, हा संघ बदलत नाही. हे एका अर्थाने खरे आहे. कारण संघाचा मूलभूत सिद्धांत कधीच बदलत नाही पण, त्यात बाह्यबदल सातत्याने होत आहेत. अगदी संघस्थापनेपासून ते आजच्या क्षणापर्यंत. कारण मूळ सिद्धांताला मुरड न घालता कालानुरूप बदलत राहण्याची सवय संघाने स्वत:ला प्रारंभापासूनच लावून घेतली आहे. संघाच्या या स्वरूपाच्या संदर्भात मला राज्यशास्त्रातील एक उक्ती आठवते. त्यात इंग्लंडच्या राजाबद्दल ‘दी किंग इज डेड लाँग लीव्ह दी किंग’ असे म्हटले जाते. त्याचा अर्थ असा की, राजपदावरील व्यक्तीचा मृत्यू जरी झाला तरी राजपद मात्र अढळच आहे. त्याच धर्तीवर संघाबद्दल हा संघ बदलत नाही. संघ बदलतच राहतो, असे सहज म्हणता येईल. संघाच्या बाह्य स्वरूपाचा इतिहास पाहिला, तर या उक्तीचा प्रत्यय येईल. संघशाखेत कवायतींसाठी दिल्या जाणाऱ्या संस्कृत आज्ञांपासून ते संघाच्या गणवेषापर्यंत, प्रारंभीच्या ४० दिवसांच्या व नागपुरातील एकाच ओटीसीपासून तर २५ दिवसांच्या प्रांताप्रांतांमधील संघ शिक्षा वर्गांपर्यंत संघात बदल झाला आहे. त्यात सहभागी होणाऱ्या स्वयंसेवकांच्या संदर्भात तर इतके बदल झाले आहेत की, आज तरुणांसाठी वेगळे संघ शिक्षा वर्ग होत आहेत, तर ज्येष्ठांसाठी वेगळे वर्ग होत आहेत. त्यातील कार्यक्रमातही गरजेनुसार बदल झाले आहेत. त्यामुळे संघ स्थितिशील आहे, या म्हणण्याला अर्थच उरत नाही. हे बदलही केवळ संघ शिक्षा वर्गांच्या वा गणवेषाच्या संदर्भातच झाले असे नाही. संघाच्या सर्व गतिविधींमध्ये ते झाले आहेत. हे ‘गतिविधी’ हा सर्वनामात्मक शब्द डॉ. हेडगेवारांच्याच काय श्रीगुरुजींच्या काळातही उच्चारला जात नव्हता. पण आज संघात ते विशेषनाम झाले आहे. कारण आजच्या संघात गतिविधी या शब्दाला विशिष्ट अर्थ प्राप्त झाला आहे. आज संघसंलग्न संघटनांसाठी माध्यमांमध्ये वापरला जाणारा ‘संघ परिवार’ हा शब्द तरी स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंत कुठे होता? कारण त्यावेळी परिवार असा नव्हताच. त्या काळात ‘राष्ट्र सेविका समिती’ ही संघाव्यतिरिक्त परिवारातील एकमेव संस्था होती. कारण त्यावेळच्या परिस्थितीत इतर संस्थांची गरजच भासली नाही किंवा गरज भासली असेलही तरीही ती पूर्ण करण्याइतपत संघाचा विस्तार झाला नव्हता. कुणाला संघाला दूषणच द्यायचे असेल, तर तो संघाला उशिरा कळले, असे फार तर म्हणू शकतो. 

 
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर तर देशाचे चित्रच बदलले. कदाचित आनुषंगिक कामे किती महत्त्वाची आहेत, याची विदारक जाणीव फाळणीच्या वेळी भारताच्या पूर्व आणि पश्चिम सीमांवर झालेल्या हिंदूंच्या रक्तपातामुळे व माताभगिनींच्या किंकाळ्यांमुळेही संघाला झाली असेल, पण त्यानंतर संघाने कधीच मागे पाहिले नाही. असे म्हटले जाते की, पहिल्या संघबंदीच्या काळात त्या लोकशाहीविरोधी कारवाईचा निषेध करण्यासाठी व संघाची बाजू मांडण्यासाठी एकही राजकीय पक्ष संसदेत वा संसदेबाहेर पुढे न आल्याने संघाला राजकीय क्षेत्रात आपले कार्यकर्ते पाठविण्याचा निर्णय घ्यावा लागला व त्यावेळी मंत्रिमंडळाचा राजीनामा देणारे डॉ. श्यामाप्रसाद यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनसंघाची स्थापना करावी लागली. नेमके काय घडले याबाबत मतमतांतरे असू शकतात पण, तेव्हापासून तर आणीबाणीकालीन जनता पक्षापर्यंत आणि त्यानंतर स्थापन झालेल्या भारतीय जनता पक्षापर्यंतच्या पक्षात संघ स्वयंसेवकांनी आपुलकीने योगदान दिले, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. कामगार क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या स्वयंसेवकांना ‘भारतीय मजदूर संघा’ची स्थापना करावीशी वाटली म्हणून ती संघटना स्थापन झाली. वनवासी भागातील अवैध धर्मांतराच्या विळख्यातून वनवासी बांधवांना मुक्त करण्यासाठी ‘वनवासी कल्याण आश्रम’ उदयाला आला. हिंदू समाजातील काही दुर्दैवी घटकांना अस्पृश्यता, अज्ञान, अंधश्रद्धा यांच्या विळख्यातून काढून व्यापक हिंदुत्वाचा साक्षात्कार घडविण्यासाठी संतमंडळींनी एकत्र येऊन ‘हिंदवा: सहोदरा:।’ या भावनेने ‘विश्व हिंदू परिषदे’ची स्थापना केली गेली आणि मग एकेक भारतीय जन्माला येऊ लागले. संस्कार भारती, सहकार भारती, विद्या भारती, आरोग्य भारती आदी नावांनी त्या क्षेत्रपरत्वे ओळखल्या जातात. ‘राष्ट्रीय शीख संगत,’ ‘समरसता मंच,’ ‘सर्वपंथसमादर मंच’ यासारखे मंचही तयार झाले. ‘मुस्लीम राष्ट्रीय मंच’ हा अलीकडेच स्थापन झालेला मंच अल्पसंख्याकांनाही आकर्षित करू लागला आहे. ख्रिस्ती समाजाचा एखादा मंच आहे की, नाही हे मला ठाऊक नाही पण, विशेषत: भारतीय जनता पक्षात अनेक ख्रिस्ती नेत्यांचा समावेश आहे, हे निश्चित. केंद्रात तर एक ख्रिस्ती मंत्री आहेतच, शिवाय गोव्यामधील भाजपच्या नेतृत्वाखालील मंत्रिमडळात दोन ख्रिस्ती मंत्री आहेत आणि उपसभापतीपदही त्या समुदायातील नेत्याकडेच आहे. एवढेच काय पण अल्पसंख्य समुदायातील अनेक तरुण संघशाखेतही येऊ लागले आहेत. त्यांचा ‘शो पीस’ म्हणून वापर करायचा नाही, असे संघाने ठरविले म्हणून अन्यथा त्यांचीही नावे दिली जाऊ शकतात. तात्पर्य हेच की, प्रारंभी प्राप्त परिस्थितीनुसार रूढार्थाने ‘हिंदू’ म्हणविल्या जाणाऱ्या समाजापर्यंत मर्यादित असलेला संघ आता अधिक व्यापक होऊ लागला आहे, होत आहे. वरील सर्व स्थित्यंतरे हे त्याचेच प्रत्यक्ष रूप.
 

याच पद्धतीने संघातही अंतर्गत बदल होत आहेतच. १९२५ ते १९४० या कालावधीत संघाने आपल्या कार्यपद्धतीला आकार देण्याचा प्रयत्न केला. ती सिद्धही करून दाखविली. कारण तोपर्यंत संघाचे कार्य भारतातील सर्व प्रांतापर्यंत पोहोचले होते. म्हणूनच १९४० च्या संघ शिक्षा वर्गातील सर्व प्रांतांचे प्रतिनिधीत्व पाहून डॉ. हेडगेवार म्हणाले होते की, “आज मी हिंदूराष्ट्राचे छोटेखानी स्वरूप पाहत आहे.” त्यानंतर संघाचे विस्तारपर्व सुरू झाले व ते आजतागायतही सुरूच आहे. या पर्वात संघाने अंतर्गत कार्यपद्धतीतही गरजेनुसार बदल केले. दैनंदिन शाखेचा आग्रह यत्किंचितही कमी होऊ न देता तिला नवनवे आयाम जोडले. प्रारंभी फक्त संध्याकाळच्याच शाखा होत्या. नंतर प्रभातशाखा, रात्रशाखा, अतिसायंशाखा सुरू झाल्या. आता त्यांची मजल ‘ई-शाखां’ पर्यंत गेली, तर कुणाला आश्चर्य वाटणार नाही. ज्यांना दैनंदिन शाखेत येणे जमत नाही, त्यांच्यासाठी साप्ताहिक मिलने सुरू झाली. संघकार्य सार्वभौम (म्हणजे सर्व ठिकाणी, शहर असेल तर सर्व मोहल्ल्यात, ग्रामीण भाग असेल तर सर्व खेड्यात) व्हावे म्हणून संघाने सेवा वस्त्यांच्या स्वरूपात सर्वत्र संपर्क आणि संवाद साधण्याचा प्रयत्न केला. ग्रामविकासापासून ते कृषी विकासापर्यंतची आणि शैक्षणिक विकासापासून ते औद्योगिक विकासापर्यंतची ही प्रक्रिया आहे व तिला अंत नाही.

 

पूर्वी संघ फक्त भारतातच होता. आता जगातील सुमारे शंभर देशांत तरी तो पोहोचला आहे. त्याचे संचालन करण्यासाठी संघाने ‘विदेश विभाग’ नावाची स्वतंत्र यंत्रणा उभी केली आहे. भारतातील शाखांप्रमाणेच तिकडे शाखा चालतात. नित्यनैमित्तिक कार्यक्रम होतात. संघाच्या अधिकाऱ्यांचे दौरेही होतात. या ठिकाणी हे उल्लेखनीय आहे की, हे असले तरी संघाचे पहिले तीन सरसंघचालक डॉ. हेडगेवार, श्रीगुरुजी व बाळासाहेब देवरस कधीही परदेशात गेले नाहीत. कारण त्यावेळी तशी गरज नव्हती. ६०-६५ वर्षांनंतर तशी गरज निर्माण होताच ते जाऊ लागले आहेत. तसे परदेशात जाणारे पहिले सरसंघचालक म्हणजे प्रा. राजेंद्रसिंहजी. संघस्थापनेपासूनचा हा धावता आलेख एवढ्याचसाठी मांडला आहे की, १९२५ च्या विजयादशमीपासून ते परवा ११ सप्टेंबर २०१८ रोजी शिकागोमध्ये झालेल्या ‘विश्व हिंदू संमेलना’ पर्यंतचा संघाचा ‘हिंदू बंधुत्वा’ पासून ‘विश्वबंधुत्वा’ पर्यंतचा प्रवास अधोरेखित व्हावा. त्यातून संघाच्या विस्ताराची जशी जाणीव होते तसेच ‘हिंदूबंधुत्व’ आणि ‘विश्वबंधुत्व’ या दोन वेगवेगळ्या संकल्पना नाहीत, हेही स्पष्ट होते. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना संघ शिक्षा वर्गाच्या समारोपाला निमंत्रित करण्यापासून ते येत्या १७ सप्टेंबरपासून दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या सरसंघचालकांच्या तीन दिवसीय व्याख्यानमालांपर्यंतच्या घटनांचा आढावा घेतला, तर हा संघाचा नवा ऑफेन्सिव्ह आहे, असे मला वाटते.

- ल.त्र्यं.जोशी 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@