गुणसुमनांचा आदर्श

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Sep-2018
Total Views |




स्वतःच्या स्व-भावाची उकल करण्याच्या मुलांच्या या वयात ‘हिरोवर्शीप’ अर्थात ‘व्यक्तिपूजा’ हा टप्पा बऱ्याचदा येतो. अशावेळी हे ‘हिरो’ कोण आहेत, यावर त्या पूजेचे फलित काय असणार ते अवलंबून असते.


माजिक दृष्टीने चांगली शैक्षणिक-व्यावसायिक पार्श्वभूमी आणि यश संपादन केल्यानंतरही स्वत:ला अपयशी मानून नैराश्याने ग्रासलेला बत्तीशीचा तरुण माझ्याशी बोलताना म्हणाला, “माझी मोठी बहीण अभ्यासात खूप हुशार. शाळेत दरवर्षी तिचा पहिला क्रमांक ठरलेलाच, शिवाय शालेय अभ्यासक्रमाला पूरक इतर अनेक परीक्षांमध्येही ती वारंवार घवघवीत यश मिळवत असे. शाळेत, घरात, शेजारीपाजारी तिचं खूप कौतुक व्हायचं. आदर्श म्हणून तिचं उदाहरण मला पदोपदी दिलं जायचं. ते माझ्या मनात इतकं पक्कं बसलंय की आजही तिचा पगार, तिचं स्टेटस, तिचं घर, तिच्या गाड्या पाहून मी स्वतःची तिच्याशी तुलना करत राहतो. माझ्याकडे नेहमी थोडं का होईना, पण काहीतरी कमी असतंच तिच्यापेक्षा. असं वाटत राहतं की, मी तिच्याच आयुष्याच्या मार्गावर धावतो आहे सतत. फक्त तिच्यापेक्षा चार पावलं मागे आणि कदाचित मी नेहमी मागेच राहणार.” आयुष्यातील यशाला लावलेले चुकीचे निकष या तरुणाला नैराश्याच्या टोकावर घेऊन आले होते. लहानपणापासून कळत-नकळत किंवा जाणीवपूर्वक केली गेलेली तुलना आणि आदर्शाची चुकीची व्याख्या हे मुलांच्या भविष्यावर असे नुकसानकारक होऊ शकते. दहा-बारा वर्षांची मुले जेव्हा स्वतःचे व्यक्तिमत्व घडवू पाहत असतात तेव्हा त्यांच्या डोळ्यांसमोर कुठले आदर्श आहेत, हे फार महत्त्वाचे ठरते. मध्यंतरी एका शाळेतील इयत्ता सातवीचा वर्ग व त्यांचे शिक्षक यांचा एक संवाद माझ्यासमोर घडला. तेव्हा नुकताच प्रदर्शित झालेला ‘संजू’ चित्रपट किती मुलांनी पाहिला, असे शिक्षकांनी विचारले. आश्चर्यकारकरित्या चित्रपट पाहिलेल्या मुलांची संख्या लक्षणीय होती. हा चित्रपट पाहून तुम्हाला काय कळले? शिक्षकांचा पुढचा प्रश्न. “संजय दत्त दहशतवादी नाही,” एका चुणचुणीत मुलाने दिलेले उत्तर. वर्गात एकच हशा पिकला. या चित्रपटाच्या निर्माता-दिग्दर्शकाला त्यातून काय संदेश द्यायचा आहे हे मला माहीत नाही. परंतु संवेदनशील वयातील मुलांच्या मनावर त्याचे काय पडसाद उमटतात हा प्रश्न माझा पाठपुरावा करत राहिला. असे काही चरित्रपट या वयात मुलांना दाखवलेच, तर त्यावर पालकांनी मुलांशी चर्चा करणे गरजेचे आहे. त्यातून काय घेण्यासारखे आहे, काय अतिशयोक्ती असू शकते याबाबत गप्पा मारून मुलांच्या विचारशक्तीला चालना देणे गरजेचे आहे. स्वतःच्या स्व-भावाची उकल करण्याच्या मुलांच्या या वयात ‘हिरोवर्शीप’ अर्थात ‘व्यक्तिपूजा’ हा टप्पा बऱ्याचदा येतो. अशावेळी हे ‘हिरो’ कोण आहेत, यावर त्या पूजेचे फलित काय असणार ते अवलंबून असते.

 

एखाद्या व्यक्तीचे किंवा समूहाचे अंधानुकरण करण्यातून उत्पन्न होणाऱ्या प्रवृत्ती, समाजाचे स्वास्थ्य बिघडवायला कारणीभूत ठरतात हे इतिहासाने आपल्याला शिकवले आहे आणि वर्तमान तर दिवसागणिक त्याचे दाखले आपल्यासमोर ठेवत आहे. अशावेळी आपली मुले त्यांचे आदर्श काळजीपूर्वक निवडतात ना, यावर लक्ष ठेवावे लागेल. आदर्श म्हणून त्यांच्या समोर ‘कोणती व्यक्ती आहे?’ यापेक्षा ‘काय मूल्ये आहेत?’ हे जास्त महत्त्वाचे आहे. कारण व्यक्तीला मर्यादा असतात, परंतु चांगली मूल्ये ही कालातीत संकल्पना आहे. कुठलीही व्यक्ती पूर्णतः चांगली वा पूर्णपणे वाईट असत नाही. त्यामुळे कुणाच्या कुठल्या गुणांचे अनुसरण आपण करावे, हे समजायला आपल्या मुलांना मदत करावी लागते. यासाठी विविध क्षेत्रांतून समाजासाठी विधायक काम करणाऱ्या व्यक्तींबद्दल घराघरांतून बोलणे व्हायला हवे; शक्य तेव्हा अशा व्यक्तींचा सहवास मुलांना मिळायला हवा; त्यांच्या यशापयशाचा प्रवास मुलांना गप्पांमधून कळायला हवा. आपल्या भोवतालच्या प्रत्येक व्यक्तींकडून आपल्याला काही शिकता येण्यासारखे आहे, याची जाणीव मुलांना या वयात व्हायला हवी. यातून इतरांकडे व स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन अधिक व्यापक होत जातो.

 

दृक-श्राव्य प्रसारमाध्यमांचे वर्चस्व सध्या खूप मोठ्या प्रमाणावर दिसून येते. वेगवेगळ्या जाहिरातींतून, मालिकांमधून यशाच्या, सौंदर्याच्या, मर्दानगीच्या, नात्यांच्या एकांगी कल्पना वारंवार मनावर आदळल्या जातात. अशावेळी समोर आलेल्या गोष्टी, दाखवली गेलेली कॅरॅक्टर्स जशीच्या तशी स्वीकारणे घातक आहे. त्यापेक्षा उमलत्या वयातील मुलांना इतरांमधील ‘गुणसुमने’ वेचायला प्रवृत्त करणे केव्हाही जास्त लाभदायक आहे.

 
 

- गुंजन कुलकर्णी

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@