'कथित पुरोगामित्व' मुस्लिम कट्टरतेच्या वळचणीला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Sep-2018
Total Views |


 


भारिप बहुजन महासंघाची एमआयएमशी आघाडी होणार


मुंबई : एकीकडे पुरोगामित्व मिरवणारे आणि दुसरीकडे कित्येकदा जाहीरपणे नक्षलवादाला सहानुभूती दाखवून टीकेचे धनी ठरलेले, भीमा-कोरेगाव हिंसाचारानंतर पुन्हा प्रसिद्धीच्या झोतात आलेले भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी चक्क कट्टर मुस्लीम पक्ष असलेल्या एमआयएम पक्षाशी आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळातून भुवया उंचावल्या गेल्या असून लवकरच दोन्ही पक्षांकडून याबाबत एकत्रितरीत्या अधिकृत घोषणा होणार असल्याचे वृत्त आहे.

 

खासदार असदुद्दिन ओवेसी यांचा मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन अर्थात एमआयएम हा पक्ष कट्टर मुस्लिम पक्ष म्हणून ओळखला जातो. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू असलेले व त्यामुळे स्वतःला बाबासाहेबांचा राजकीय वारस म्हणून पुढे आणू पाहणारे प्रकाश आंबेडकर आता अशा एका धार्मिक कट्टरपंथीय पक्षाच्या वळचणीला गेले आहेत. या आघाडीबाबत याधीही चर्चा होत होतीच. प्रकाश आंबेडकर यांच्या पुण्यातील निवासस्थानी नुकतीच याबाबत बैठकही झाल्याचे समजते. आता या चर्चा-शक्यतांवर अखेर शिक्कामोर्तब होणार असून एमआयएम पक्षाचे औरंगाबादचे आमदार इम्तियाज जलील यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आतापर्यंत दलित आणि मुस्लिम मतांचा केवळ राजकारणासाठी वापर झाल्याची टीका त्यांनी केली. तसेच, येत्या २ ऑक्टोबर रोजी राज्यात राजकीय भूकंप येणार असल्याचे सूचक वक्तव्य इम्तियाज जलील यांनी केले. त्यामुळे २ ऑक्टोबर रोजीच या आघाडीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. आगामी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका ही आघाडी एकत्रित लढणार असून या आघाडीचे नेतृत्व प्रकाश आंबेडकर हेच करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच, अहमदनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत या आघाडीची नेट प्रॅक्टिसहोणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

 

काँग्रेसला धक्का?

 

एमआयएम आणि भारिप बहुजन महासंघ एकत्र येणे हा काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. सर्व भाजपविरोधी पक्षांची एकत्रित मोट बांधण्याच्या प्रयत्नात असलेली काँग्रेस भारिप बहुजन महासंघाला या महाआघाडीत आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र, या प्रयत्नांना प्रकाश आंबेडकर यांनी थेट एमआयएमशीच युती करून ठेंगा दाखवल्याचे दिसत असून यामुळे काँग्रेसला मतविभाजनाचा मोठा फटका बसू शकतो.

 

आघाडी एमआयएमच्या पथ्थ्यावर?

 

भारिप बहुजन महासंघाशी होत असलेली ही आघाडी एमआयएमच्या भलतीच पथ्थ्यावर पडण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षांपासून असदुद्दिन व अकबरुद्दिन या ओवेसी बंधूंनी महाराष्ट्रात शिरकाव करून जम बसवण्याचा प्रयत्न केला आहे. विशेषतः मराठवाडा भाग त्यांना बऱ्यापैकी यशही मिळाले आहे. प्रकाश आंबेडकरांच्या भारिप बहुजन महासंघाची मराठवाडा व पश्चिम विदर्भात बऱ्यापैकी ताकद आहे. याचा फायदा एमआयएमला महाराष्ट्रात जम बसवण्यासाठी होण्याची शक्यता आहे.

 

कोण किती पाण्यात?

 

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत एमआयएमने राज्यात एकूण २४ तर भारिप बहुजन महासंघाने ७० जागांवर निवडणूक लढली होती. यापैकी एमआयएमने भायखळा आणि औरंगाबाद मध्य या दोन जागांवर विजय मिळवत महाराष्ट्र विधानसभेत चंचूप्रवेश केला. भारिप बहुजन महासंघाला बाळापुर ही एकच जागा जिंकता आली. संपूर्ण राज्यात मिळून या एमआयएम व भारिप बहुजन महासंघाला अनुक्रमे ०.९३ व ०.८९ टक्के मते मिळाली. मात्र, प्रत्यक्षात लढवलेल्या जागांमधून या दोन पक्षांना अनुक्रमे १३.१६ व ३.६४ टक्के अशी लक्षणीय मते मिळाली होती.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@