ननवरील अत्याचारानंतरचे पुरोगामी पाखंड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Sep-2018
Total Views |
 
 
 
 
आसाराम बापू वा बाबा राम रहीम दोघांनाही त्यांनी केलेल्या कृत्यांसाठी न्यायालयीन प्रक्रियेनुसार शिक्षा व्हायलाच हवी. पण, हिंदू साधुसंतांचे नाव अशा एखाद्या प्रकरणात आले की, स्वतःच न्यायाधीश असल्याच्या आविर्भावात ‘मीडिया ट्रायल’ चालवणार्‍या धेंडांना आता नन्सवरील बलात्कारप्रकरणी एखादी ‘मीडिया ट्रायल’ चालवावीशी का वाटली नाही, हा मुद्दा उरतोच.
 
 

केरळमधील एका ननवर झालेल्या बलात्काराचे प्रकरण सध्या चांगलेच गाजताना दिसते. काही महिन्यांपूर्वी उजेडात आलेल्या या बलात्कार प्रकरणात सुरुवातीला पीडितेने पुढाकार घेत बिशप फ्रँको मुलक्कलविरोधात बोलण्याचे धाडस केले. नंतरनंतर दयाळूपणाचे सोंग घेतलेल्या बिशपच्या झळझळीत झग्यामागे दडलेल्या विकृत आणि हिडीस वृत्तीचा पर्दाफाश इतरही नन्सच्या मुखातून होऊ लागला. आता तर बलात्काराचा आरोप करणार्‍या ननच्या सोबतीला केरळच्या चर्चेसमधील कितीतरी नन्स उभ्या राहिल्याचे दिसते. काल-परवाच या सर्वच पीडित नन्सनी आपल्यावरील अन्याय, अत्याचाराविरोधात दाद मागत न्यायाची मागणी केली, धरणे धरले. एकीकडे केरळमधील नन्स आपल्यावरील अन्यायाचा पाढा वाचत असतानाच ज्या ‘चर्च’ नावाच्या संस्थेच्या, तिथल्या स्वतःला ‘देवाचा प्रतिनिधी’ म्हणवून घेणार्‍यांच्या विश्वासावर या नन्स आपले घर-दार-परिवार सोडून आल्या, त्या चर्चनीच त्यांना वार्‍यावर सोडत बिशप फ्रँको मुलक्कलला वाचवण्याचे प्रयत्न सुरू केले. भारतापासून व्हॅटिकनपर्यंतच्या चर्च प्रशासनाने आमचा बिशप सद्गुणांचा पुतळा वगैरे असल्याचे सांगत आपल्या पापावर पांघरूण घालण्याचा अमानुष प्रकार केला. आता तर बिशप फ्रँको मुलक्कलच्या बचावासाठी चर्चेसच्या गटांनी बलात्कारपीडित ननचे छायाचित्रही सार्वजनिक केले. कोणत्याही बलात्कार पीडितेचे छायाचित्र वा नाव सार्वजनिक करण्यावर बंधने असताना चर्चने केलेला हा उपद्व्याप त्या ‘आकाशातल्या बापा’लाही मान खाली घालायला लावणाराच! पण, ज्यांनी ‘आकाशातल्या बापा’च्या नावाने धर्मांतरणाचा आणि स्वतःच्याच ऐशोआरामाचा धंदा चालू केलाय, त्यांना त्याचे काही सोयरसुतक असण्याचे कारण नाही, हेही खरेच म्हणा. इथे आणखी एक लक्षात घेण्याजोगी गोष्ट म्हणजे, चर्च प्रशासनाची बलात्कार वा लैंगिक अत्याचाराशी संबंधित विषय दाबण्यातली तत्परता. ज्या तत्परतेने चर्च प्रशासन हे बलात्काराचे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करताना दिसते, त्यावरून अशीच आणखीही कितीतरी काळीकुट्ट प्रकरणे चर्च प्रशासनाने आपल्या पांढर्याशुभ्र डगल्याआड दाबली तर नसतील ना, हा प्रश्न उपस्थित होतो.

 
 

देशभरात समाजमाध्यमांसह सर्वत्र नन्सवरील अत्याचारावरून भडका उडालेला असताना सदैव हातची लेखणी अन् तोंडाची टकळी चालवणार्‍या पुरोगामी-धर्मनिरपेक्ष, स्त्रीमुक्तीवादी, पत्रकार, लेखक, बुद्धिजीवी, विचारवंत अशा नावांनी ओळखल्या जाणार्‍यांचे मौन निश्चितच विचारात पाडणारे ठरते. पण, खरे म्हणजे ही लोकं ना कधी पीडितांच्या वा अन्यायग्रस्तांच्या मागे उभी राहिली ना कधी त्यांनी कोणाला न्याय मिळवून दिला. कारण, या लोकांनी केलेला प्रकार हा फक्त ‘आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट’ या सदरात मोडणारा असल्याचेच वेळोवेळी ठसठशीतपणे समोर आले. ज्यावेळी आसाराम बापू वा बाबा राम रहीम यांच्यावर बलात्काराचे आरोप झाले, त्यावेळी ही मंडळी तावातावाने त्याविरोधात आकांड-तांडव करताना दिसली. मुख्य प्रवाहातील माध्यमांनी आणि त्यातल्या ‘बुद्धिमान’ लोकांनी तर जणू काही या घटनेव्यतिरिक्त देशातच नव्हे तर जगातही दुसरी काही घटना घडली नसल्याच्या थाटात दिवसच्या दिवस केवळ आसाराम बापू आणि बाबा राम रहीमचाच मुद्दा चघळला. पण, आसाराम बापू वा बाबा राम रहीमबाबत काहूर माजवणाऱ्यांना आज एक नन न्यायासाठी टाहो फोडत असताना त्याची दखल मात्र घ्यावीशी वाटत नाही, ही निर्भीड-निष्पक्ष पत्रकारितेची जपमाळ ओढणार्‍यांचा बुरखा टराटरा फाडणारीच घटना.

 
 

पत्रकारितेच्या विश्वात ज्याला ‘सिंगल कॉलम न्यूज’ म्हणतात, अशा स्वरूपाच्या बातम्या मुख्य प्रवाहातील माध्यमांनी, वृत्तपत्रांनी केरळमधील नन्सवरील अत्याचाराबाबत प्रसिद्ध केल्या. एका हिंदी वृत्तवाहिनीवर अन्यायग्रस्तांचे मसिहा असल्याचा आव आणूनप्राइम टाईम शो’ चालविणार्‍या, ‘जाने कहाँ से आते है ऐसे लोग’ची टेप वाजविणार्‍या रविश कुमार यांनीही या प्रकरणी शहामृगी पवित्रा घेत मातीत चोच खुपसली. कुठलाही बलात्कार, अत्याचार, गुन्ह्याचे मोजमाप धर्म, राजकीय विचारधारा आणि जातीपातीच्याच निकषावर करणार्‍यांकडून यापेक्षा दुसरी काही अपेक्षा नाहीच, हेही खरेच म्हणा. कारण गुन्हा करणारा आपला मुल्ला-फादर असेल तर त्याच्या चरणाशी लीन होणे आणि कोणी हिंदू साधुसंत असेल तर त्याच्याविरोधात राईचा पर्वत करत राळ उडवून देणे, एवढेच या लोकांना जमते. म्हणूनच कठुआतल्या बलात्कारानंतर या मंडळींनी थेट मंदिरातल्या देवालाच आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्याचा तमाशा मांडला, तर इथे बिशप फ्रँको मुलक्कल आणि चर्च प्रशासनाचे अन्याय-अत्याचार जगाच्या चव्हाट्यावर येऊनही त्याविरोधात ‘ब्र’ काढण्याचीही या लोकांनी हिंमत केली नाही. अर्थात, समोर मुल्ला-फादर असेल तर आपली बुद्धी गहाण ठेवण्याचा शिरस्ताच या लोकांनी पाडला आहे आणि त्याबरहुकूमच ते वागले!उल्लेखनीय म्हणजे तिकडे केरळात पुरोगामी-बुद्धिजीवी लोकांच्या लाडक्या डाव्या विचारांचे सरकार सत्तेवर आहे. पीडितांवरील, शोषितांवरील अन्याय-अत्याचाराच्या निराकरणासाठी डावा विचार हाच एकमेव पर्याय असल्याचे ही लोकं नेहमीच कंठशोष करत सांगतात, पण आता तिथल्या सरकारनेही या प्रकरणात कुठलीही कार्यवाही केली नाही. केरळ विधानसभेतल्या पी. सी. जॉर्ज नामक एका आमदाराने तर “१२ वेळा बलात्कार एन्जॉय केलेल्या ननने १३ व्या वेळी अत्याचाराचा आरोप कसा केला?” असा प्रश्न विचारत तिला थेट ‘वेश्या’ असे संबोधले, त्यावरही पुरोगामी टोळक्यात स्मशानशांतता आहे. एरवी अन्यत्र खुट्ट जरी वाजले तरी ‘हे भयावह आहे,’ चा धोशा लावणार्‍यांना यात काहीही वावगे वाटले नाही, हे जितके चीड आणणारे तितकेच कथित स्त्रीमुक्तीवादी, बुद्धिजीवी, विचारवंत, पत्रकार मंडळींचा दुटप्पीपणा उघड करणारेही.

 
 

आसाराम बापू वा बाबा राम रहीम दोघांनाही त्यांनी केलेल्या कृत्यांसाठी न्यायालयीन प्रक्रियेनुसार शिक्षा व्हायलाच हवी. पण, हिंदू साधुसंतांचे नाव अशा एखाद्या प्रकरणात आले की, स्वतःच न्यायाधीश असल्याच्या आविर्भावात ‘मीडिया ट्रायल’ चालवणार्‍या धेंडांना आता नन्सवरील बलात्कारप्रकरणी एखादी ‘मीडिया ट्रायल’ चालवावीशी का वाटली नाही, हा मुद्दा उरतोच. हा सर्वच प्रकार जितका विचित्र आणि निषेधार्ह तितकाच मुख्य प्रवाहांतील माध्यमांबाबतचा विश्वास आणि आदर उणावणाराही. त्याची या लोकांना फिकीर नाहीच, कारण चार-दोन टाळक्यांनी यांच्या शहाणपणाची वाहवा केली की, यांना जग जिंकल्यासारखे वाटते. पण, सर्वसामान्यांच्या मनातली या लोकांची प्रतिमा समाजमाध्यमातून धगधगणार्‍या असंतोषावरून नेहमीच दिसते. मागे एकदा मदर तेरेसांना चमत्कारी ठरवून पुरस्कृत करणार्‍या व्हॅटिकनवर टीका करत आपण दांभिक पुरोगामी नसल्याचे मराठीतल्या एका संपादकाने सिद्ध केले होते, पण दुसर्‍याच दिवशी कोण्या गूढ शक्तींच्या प्रभावाखाली येत त्यांनी वृत्तपत्रीय इतिहासात पहिल्यांदाच अग्रलेख मागे घेण्याचा पराक्रमही केला. आजही या महाशयांना आपण दांभिक पुरोगामी नाहीत, हे सांगण्याची संधी आलेली आहे, पण तरीही ते हाताच्या मुठी आवळून बसलेत, असे का? चर्चच्या दबावाला बळी पडण्याची ताकद नाही, म्हणूनच ना?

 
 

      माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@