कांजुरमार्गमध्ये ‘स्वयंप्रेरणे’चा जागर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Sep-2018
Total Views |




स्वयंप्रेरणाही माणसाच्या जीवनाची शक्ती आहे. आतून मनातून संवेदना भावना उमटल्याशिवाय कुणीही समाधानपूर्वक कोणतेही काम करूच शकत नाही. या ‘स्वयंप्रेरणा’ नावानेच कांजुरमार्ग इथे ‘स्वयंप्रेरणा’ संस्था काम करत आहे.

  

‘गोविंदा आला रे आला’ म्हणत दहीहंडीचा उत्सव नुकताच साजरा झाला. दहीहंडीच्या बरोबरीने मुंबईमध्ये ‘सराव दहीहंडी’ही प्रसिद्ध. दहीहंडी म्हटले की, उत्साहाने ओसंडून वाहणाऱ्या युवकांचा जल्लोष डोळ्यांसमोर येतो. पण, युवकांच्या बरोबरीने युवतीही दहीहंडीचा उत्सव तितक्याच जल्लोषात थरावर थर रचून साजरा करतात. युवतींचेही दहीहंडी पथक असते. अर्थात, दहीहंडी उत्सव साजरा करताना युवकांप्रमाणे ‘नगरी नगरी द्वारे द्वारे’ मोठ्या प्रमाणात मिरवणुकी काढताना युवतींना अनेक समस्या येतात. मुळात दहीहंडी पुरुषांचा उत्सव हे एक समीकरणच. या अशा समीकरणातून युवतींनीही दहीहंडी उत्सवात सहभागी व्हावे, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर कांजुरमार्ग गावात युवतींची सराव दहीहंडी’ चांगलीच रंगली. जोषात, जल्लोषात उत्साहाने दहीहंडी फोडण्याचा सराव करणाऱ्या युवतींचे मंडळ मोठ्या आत्मविश्वासाने उत्सव साजरा करताना दिसले. या युवतींना सरावाच्या दहीहंडीचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले ते ‘स्वंयप्रेरणा संस्थेने.’ २०१३ साली ‘स्वयंप्रेरणा संस्थे’ची स्थापना झाली. या संस्थेच्या अध्यक्ष आहेत, रजनी कदम. कांजुरमार्ग परिसरातील सेवाभावी आणि कार्यक्षम व्यक्तिमत्व म्हणून त्या चांगल्याच परिचित. आजपर्यंत पाहतो की महिला मंडळ म्हटले की, त्यांचे ठराविक उपक्रम असतात. सहसा मैदानी खेळ, उत्सव याकडे महिला संस्थांचे अनवधानाने दुर्लक्षच झालेले असते. असे असताना स्वयंप्रेरणा संस्थे’ला दहीहंडीसाठी युवतींनी सहभागी व्हावे असे का वाटले? तेही कांजुरमार्ग, विक्रोळीसारख्या निम्न मध्यमवर्गीय कामगार वस्तीमध्ये? यावर रजनी म्हणाल्या, “मुलींनाही मैदानी खेळ खेळायची संधी द्यायला हवी. कारण आपण पाहतो की आंतरराष्ट्रीय स्तरावरही महिला खेळाडू विविध खेळांमध्ये यशस्वी होत आहेत. महिलांमध्ये क्षमता आहे; पण ती सिद्ध करण्याची संधी सहसा मिळत नाही. दहीहंडी हे मैदानी खेळ सदृश्य उत्सव आहे. या उत्सवामध्ये मुली सहभागी होत आहेत हे महत्त्वाचे आहे. शाळेत माध्यमिक स्तरापर्यंत आजही परिसरातील मुली कबड्डी, खो-खो वगैरे खेळात प्राविण्य मिळवतात. त्यामध्ये त्या अगदी मास्टर्सही असतात. पण साधारणत: मुली वयात आल्या की, त्यांचे खेळणे बंद केले जाते. हो! आजही तेच चित्र आहे. ‘स्वयंप्रेरणा संस्थे’च्या सर्व पदाधिकाऱ्यांना वाटले की, हे खेळणे कदाचित दहीहंडीच्या माध्यमातून पुन्हा मुलींमध्ये तोच आत्मविश्वास ऊर्जा आणेल.

 

रजनी कदम अतिशय आत्मविश्वासाने बोलत होत्या. रजनी कदमचे पती रवींद्र कदम यांचा ‘साईराज प्लास्टिक’ नावाचा व्यवसाय आहे. दोघेही पती-पत्नी ‘स्वयंप्रेरणा संस्थेच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवत असतात. रजनीला त्यांच्या पतीची सर्वतोपरी साथ आहे. पण तरीही रजनी यांची ‘स्वयंप्रेरणा’ काय असावी? हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला. रजनी म्हणतात, “माझे वडील सातवी शिकलेले. कांजूर गावात भाजीचा धंदा करायचे. आई गृहिणी. घरात आर्थिक ओढाताण होतीच. पण त्याही परिस्थितीत आईवडील धार्मिक आणि प्रचंड नीतिमत्ता सांभाळणारे. घरात अर्धी भाकरी असली तरी दारात आलेल्याला त्यातील चतकोर भाकरी द्यायची आईबाबांची वृत्ती. त्यामुळे सामाजिकता लहाणपणापासूनच रूजली.” या सामाजिकतेचे भान घेऊनच ‘स्वंयप्रेरणा संस्था’ परिसरात विविध उपक्रम राबवते. हे उपक्रम राबवायला का सुरवात केली? तर त्याचीही कहाणी आहे. रजनी कदम यांनी अनुभवले की, वस्तीतील महिला राबराब राबतात. चार काय आठ घरची धुणीभांडी करतात. त्यांचा नवराही छोटेमोठे काम करतच असतो. पण या महिलेला कधीही मनासारखे काहीही करता येत नाही. का? तर यांचे कष्टाचे पैसे यांच्याकडे नसतातच. बचतच नाही. कारण बँकेत खाते नाही. खाते का नाही? तर बँक खाते उघडण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे या महिलेकडे नाहीत. याचा मागोवा घेतल्यावर रजनींना एक धक्कादायक सत्य दिसले की, या महिलांचे नागरी अस्तित्व दर्शवणारे कोणतेही सरकारी कागदपत्रे काढलेलीच नाही. कारण नवऱ्याचे म्हणणे माझे रेशनकार्ड आहे ना! माझे आधारकार्ड आहे ना! माझे बँक खाते आहे ना! मग तुला काय करायचे आहे हे सगळे काढून.त्यामुळे या महिलांचे भारतीय नागरिकत्वाचे पुरावे दुर्दैवाने नसतातच.

 

यासाठी स्वयंप्रेरणा संस्थेने जनजागरणाची मोहीम हाती घेतली. कांजूर आणि परिसरात २६ बचतगट स्थापन केले. या बचतगटांच्या माध्यमातून महिलांना भारतीयत्वाची ओळख दर्शवणारी कागदपत्रे कशी काढावी? त्यांचे महत्त्व काय आहे? याचे वर्ग घेण्यात आले. त्यासाठी शिबिरे आयोजित करण्यात आली. महिलांनी स्वयंसिद्धा बनावे, यासाठी त्यांना स्वयंरोजगार मिळेल, अशा कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यात आले. परिसरातील कितीतरी महिला या कौशल्य प्रशिक्षणाचा लाभ घेऊन खरोखर स्वयंसिद्धा झाल्या आहेत. संस्था सांस्कृतिक उपक्रमही राबवत असते. त्यापैकीच एक मंगळागौरीचे आयोजन. संस्थेच्या माध्यमातून आयोजित केलेल्या मंगळागौरी कार्यक्रमामध्ये शेकडो महिला आनंदाने सहभागी होतात. त्यापैकी बहुतेकजणी तर वर्षाच्या ३६४ दिवस काम एके कामच करत असतात. मंगळागौरीच्या निमित्ताने त्यांना एक निसटलेला आनंद परत मिळतो. रजनी कदम आणि सहकारी समाजातील प्रत्येक प्रश्नाला भिडत काम करत असतात. त्यांची प्रेरणा काय असेल? रजनी म्हणतात, “समाजातील मी एक घटक आहे. समाजाची मानसिकता मी अनुभवली आहे. महिलांचे जगणे, पिचणे आणि मरणे मी पाहत आले आहे. ते माझ्या मनात खोलवर रूजले आहे. त्यासाठी गरजू आणि समस्येने पीडित असलेल्या स्त्रिच्या आयुष्यात क्षणभर का होईना आमच्याकडून आनंद मिळाला, तर त्यामुळे मनाला खूप समाधान मिळते. हे समाधानच आमची स्वयंप्रेरणा आहे.” रजनी कदम यांची ‘स्वयंप्रेरणा’ अनुभवून वाटले की, स्त्रीने अवकाशातच भरारी घेतली म्हणजे सर्वकाही मिळवले असे नाही, तर आपल्या स्तरावर जमिनीशी प्रामाणिकपणा दाखवत काम केले तरी पुरे!

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 


@@AUTHORINFO_V1@@